Primary tabs

ट्रेकिंगची वाढती क्रेझ

share on:

ट्रेकिंग म्हटलं की डोळयासमोर उभं राहतं एक वेगळंच चित्र. त्यात अधिकांशाने मौजमजा, मस्ती, सेल्फी, फोटोशूट आणि त्यामुळे होणारे अपघात हेचं काहीसं आपल्यासमोर येतं आणि म्हणूनच ट्रेकिंगकडे अनेक जण उपेक्षित नजरेने किंवा रिकामटेकडयाचं काम या अर्थाने पाहतात. वास्तविक पाहता ऍडव्हेंचर (साहसी प्रकार) आणि सामान्य ट्रेकिंग (गड/किल्ले) करणं हे तसे भिन्न प्रकार आहेत. मोजक्याच किल्ल्यांवर जाताना तांत्रिक गोष्टींची मदत घ्यावी लागते. बाकी बहुतांश किल्ल्यांवर सामान्यपणे व सहज जाता येतं.

सोशल मीडियावर आपले सुंदर सुंदर फोटो टाकायला पाहिजेत किंवा नेहमी त्याच त्याच ठिकाणी जाऊन मजा करण्यापेक्षा कधीतरी वेगळया ठिकाणी जाऊ या, म्हणून ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि हेच थोडंसं काळजीचं कारण आहे. एकेकाळी उपेक्षित असलेला ट्रेकिंग हा प्रकार आजकाल तरुणांमध्ये मात्र 'ग्लॅमरप्रमाणे' आहे. मला आठवतंय की वीस-एक वर्षांपूर्वी जेव्हा मी शुक्रवारी, शनिवारी रात्री भलीमोठी बॅग, त्यावर कॅरीमॅट, टोपी, पायात बूट, टीशर्ट व जीन्स असा बाहेर पडायचो, तर गल्लीपासून ते स्टेशनपर्यंत सगळेच अतिरेक्याला पाहतो या नजरेने बघायचे. तेव्हा काही गूगल नव्हते की कोणत्याही वेबसाइट्स नव्हत्या. आम्हाला मदत व्हायची ती प्र.के. घाणेकर, आनंद पाळंदे व गो.नि. दांडेकर यासारख्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची. आमचे गाईड म्हणजे रिक्षावाल्यापासून ते पायथ्याच्या गावातील एखादे म्हातारे आजोबा. अशा ट्रेकिंग प्रकाराची सुरुवात करणारा मी आज अद्ययावत वस्तूंसह जेव्हा ट्रेकिंगला जातो, तेव्हा मागचे दिवस आठवल्याखेरीज राहत नाहीत. असो.

तर अशा या ट्रेकिंग प्रकारात सर्वांनी - अगदी सर्व वयोगटाच्या मंडळींनी सहभागी व्हावं असं मला वाटतं, म्हणूनच हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.

ट्रेकिंग करणं तसं आरोग्यदायक असतं. 1) चढणं-उतरणं यामुळे घामावाटे शरीरातील अनावश्यक घटक (टॉक्सिन) बाहेर पडतात. 2) शरीराला काटयाकुटयांपासून ते कडेकपारीपर्यंत चालण्याची सवय लागते. 3) गडकिल्ल्यावरील पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 4) निसर्गाचं मनमोहक रूप पाहिल्यामुळे जो आनंद मिळतो, त्यामुळे आयुष्य नक्कीच वाढतं.

ट्रेकिंग करण्यासाठी तसं नेहमी फार लांब जाण्याची किंवा मोठा प्रवास करून जायची गरज मुंबई/ठाण्यातील लोकांना तरी नक्कीच नाही. पुणेकर तर या बाबतीत नशीब घेऊनच जन्माला आलेत. पुण्याच्या चहूकडे जवळपास 25 ते 30 किल्ले सुस्थितीत आहेत.viv

मुंबई/ठाण्याहून एका दिवसात किंवा एक मुक्काम करून जाऊन येण्यासारखे काही किल्ले बघू या.

1) कोथळीगड / पेठ : कर्जत/नेरळ या स्टेशनपासून खाजगी रिक्षाने किंवा टॅक्सीने आंबिवली या पायथ्याच्या गावी जाता येतं. गडावरील गुहेत किंवा मध्यावर असलेल्या पेठ गावात मुक्काम करता येतो.

2) विकटगड / पेब : नेरळ रेल्वे स्टेशनपासून चालत ममदापूरमार्गे टाटा पॉवरच्या तीन टॉवरच्या दिशेने किंवा माथेरानमार्गे (134 सेक्शनला उतरून) रेल्वे रुळावरून चालत जात शिडयांच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येतं. गुहेत किंवा गडावरील मठात मुक्काम करता येतो.

3) गोरखगड : मुरबाड-म्हसामार्गे देहरी या गावात जाऊन किल्ल्यावर जाता येतं. गुहेपर्यंत जाणं तसं सोपं आहे, मात्र वर सुळक्यावर जाताना प्रस्तरारोहणाचा अनुभव असणं किंवा सवय असणं आवश्यक आहे. गडावरील गुहेत मुक्काम करता येतो.

4) सिध्दगड : मुरबाड म्हसामार्गे नारिवली गावातून गडावर जाता येतं. सिध्दगडवाडीपासून पुढे थोडं काळजीपूर्वक चढाई उतराई करावी. सिध्दगडवाडीत मुक्काम करता येतो.

5) चंदेरी : बदलापूरहून खाजगी रिक्षाने ते चिंचोली या गावातून गडावर जाता येतं. इथेसुध्दा गुहेपर्यंतचा रस्ता तसा साधारण आहे, पुढे मात्र प्रस्तरारोहणाचं तंत्र वापरून जाता येतं. गुहेत मुक्काम करता येतो.

6) कर्नाळा : पनवेल व पेणच्या मध्ये गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत हा किल्ला आहे. वनखात्याच्या चौकीवर प्रवेशशुल्क भरून दिवसभरात किल्ला बघून येता येतं. त्याबरोबर पक्षी अभयारण्यही पाहता येतं.

7) कलावंतीण दुर्ग : पनवेलच्या जवळ असणारा हा सुळकावजा दुर्ग, त्याच्या कातळात कोरलेल्या नागमोडी पायऱ्यांमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. थोडी काळजीपूर्वक चढाई-उतराई केली तर तसा हा सोपा किल्ला. प्रबळगड हा भलामोठा किल्ला लागूनच आहे. कलावंतीण व प्रबळगड यांच्या मधोमध प्रबळगड माची गाव आहे, तिथे राहण्याची व जेवणाची सोय आहे.

8) हरिहर : घोटी-इगतपुरीहून निरगुडपाडा या गावी जाऊन किल्ल्यावर जाता येतं. याच्यासुध्दा सरळ रेषेत कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहून मन सुखावतं. निरगुडपाडयात किंवा किल्ल्यावर मुक्काम करता येतो.

9) हरिश्चंद्रगड : माळशेज घाट संपल्यावर खुबी फाटामार्गे खिरेश्वर गावातून किंवा कसारा-राजूर-पाचनईमार्गे किल्ल्यावर जाता येतं. ट्रेकर्सची पंढरी समजला जाणारा हा किल्ला. काहीशे फूट अंतर्वक्राकार असलेल्या कोकणकडयासाठी हा किल्ला प्रसिध्द आहे. गडावर गुहेत किंवा मंदिरात मुक्काम करता येतो.

10) सुधागड : अष्टविनायकातील पाली या गावापासून पाच्छापूर-ठाकूरवाडी असा प्रवास करून गडावर पोहोचता येतं. विस्तृत पठार असलेला हा गड. मंदिरात किंवा गडावरील वाडयात मुक्काम करता येतो.

11) रतनगड : इगतपुरी-घोटी-शेंडीमार्गे रतनवाडीत जाता येतं. गडावर असलेलं नेढं (डोंगरातील आरपार भोक) आकर्षक आहे. तसंच पायथ्याला असलेलं अमृतेश्वराचं मंदिर यादवकालीन स्थापत्यशास्त्राची ओळख करून देतं.

 

राजमाची 

12) राजमाची : कर्जत-कोंढाणेमार्गे उधेवाडी गावात जाऊन गडावर जाता येतं किंवा लोणावळयाहून (आजकाल जीप उधेवाडीपर्यंत जातात) चालत जाता येतं. उधेवाडीत उदयसागर हा जलाशय, तसंच बाजूला शंकराचं पुरातन मंदिर आहे. राजमाची नावाचा किल्ला नसून वर श्रीवर्धन व मनरंजन असे छोटे किल्ले आहेत. याच जोडगोळीला राजमाची म्हणतात.

13) लोहगड-लोणावळा : मळवलीमार्गे या किल्ल्यावर जाता येतं. मनमोहक असं प्रवेशद्वार सुस्थितीत आहे. पायथ्याला भाजे लेण्यासुध्दा पाहता येतात.

14) नाणेघाट :  माळशेज घाटातील वैशाखरे गावातून चालत किंवा जुन्नर-घाटघर गाडीमार्गाने नाणेघाटात पोहोचता येतं. नाणं टाकण्याचा (टोल) दगडी रांजण आणि शिल्पकाम असलेली गुहा हे विशेष आहे. गुहेत किंवा घाटघरमध्ये असलेल्या हॉटेलात मुक्काम करता येतो.

15) रायगड : महाड-पाचाडमार्गे चालत किंवा रोपवेने गडावर जाता येतं. या किल्ल्याबद्दल लिहिण्याएवढं शब्दसामर्थ्य अजूनतरी माझ्याकडे नाहीये. गडावर एमटीडीसीच्या खोल्या आहेत किंवा अनेक ठिकाणं आहेत जिथे मुक्काम करता येतो. आयुष्यात किमान एकदातरी या किल्ल्यावर गेलंच पाहिजे.

याशिवाय सांदण व्हॅली, कळसूबाई, विश्रामगड, भास्करगड, कावनाई, सरसगड, अवचितगड, तळागड, माहुली, मलंगगड, तांदूळवाडी, माणिकगड, सोंडाई, भिवगड/भीमगड, सोनगिरी, मृगगड, तुंग, तिकोणा, शिवनेरी, विसापूर, त्रिंगलवाडी, हे किल्लेसुध्दा आपण सहजगत्या पाहून येऊ शकतो.
 

आजकाल किल्ल्यांवर जाऊन येणं हे सहजसाध्य झालंय आणि म्हणूनच आपण काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

l       ज्या किल्ल्यावर आपण जाणार, त्याची पूर्ण व योग्य माहिती घ्यायला हवी.

l       आपल्यासह कोणी अनुभवी ट्रेकर किंवा स्थानिक वाटाडया असावा.

l       प्रथमोपचार पेटी सोबत असावी.

l       टोपी, पायात बूट, सैल कपडे (पूर्ण बाह्यांचे शर्ट)

l       पाठीवरची बॅग, शिटी, टॉर्च/विजेरी, काठी (स्टिक)

l       आग पेटवण्यासाठी लायटर

l       मुक्कामाचा ट्रेक असेल, तर स्लिपिंग बॅग/अंथरूण-पांघरूण, कॅरीमॅट,   जेवणाचं सामान, तंबू.

l       मोठा ग्रूप असेल, तर प्रत्येकाला संख्या देऊन वारंवार मोजणी घ्यावी.

या सर्व बाबी काळजीपूर्वक कराव्यात.

   l  किल्ल्यावर गेल्यावर किंवा मुक्कामाच्या ठिकाणी जर आग पेटवली असेल, तर ती पूर्ण विझली का याची खात्री करावी.

   l  आपल्यामुळे गडावर अथवा परिसरात कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी.

   l  माकडांपासून सावध राहावं.

   l  स्वत:चे व इतरांचे फोटो काढताना, स्वत:ला उगाच धोक्यात टाकू नये.

ट्रेकिंग हे जंगलात असतं. तिथे आपले शहरातील/मनुष्यवस्तीतील नियम लागू होत नाहीत हे कायम ध्यानात ठेवावं. सरपटणारे प्राणी व वन्यजीव हे मुक्त संचार करीत असतात. त्यापासून सावध राहावं व त्यांना त्रास देऊ नये. गडकिल्ल्यांवरील वास्तू व बांधकामं शेकडो वर्षांपूर्वीची असतात. त्याची डागडुजी अथवा देखभाल करणारं दुर्दैवाने कोणीही नाही. त्यामुळे अशा ठिकाणी वावरताना किंवा वास्तूंमध्ये प्रवेश करताना काळजी घ्यावी. अजूनही सुस्थितीत असलेले हे अवशेष आपल्यामुळे ढासळणार नाहीत किंवा त्याची नासधूस होणार नाही याकडे लक्ष द्यावं. गडकिल्ल्यावर पाण्याचं एकमात्र ठिकाण म्हणजे कातळात खणलेली टाकी व तलाव. हेच पाणी पिऊन ट्रेकर/भटके आपली तहान वर्षभर भागवत असतो. त्यामुळे त्या पाण्याचा वापर जपून करावा, तसंच त्यात कचरा पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
 

 

लोहगड लोणावळा 

एक ट्रेकर म्हणून माझं भावनिक आवाहन आहे. हे सर्व गड-किल्ले आपल्या जाज्वल्य व पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देत आजही बुलंदपणे उभे आहेत. इथल्या दगड, माती व वास्तू त्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. इथेच आपल्या शूर नरवीरांनी देव, देश, धर्म अन् संस्कृतीसाठी रक्त सांडलं आहे. अशी ही पवित्र तीर्थं म्हणजे गडकिल्ले. मौजमजा, मनोरंजन व साहस याच्या पलीकडे जाऊन तिथे घडलेला इतिहास, त्याचं बांधकाम, स्थापत्यशास्त्र, त्याचं भौगोलिक महत्त्व व त्या किल्ल्याने इतिहासात बजावलेल्या भूमिका याची माहिती घेतली, तर हा समृध्द इतिहास नक्कीच उजळेल. घरात बसून लोक म्हणतात की गडकिल्ल्यांवर जाऊन कित्येक लोक धिंगाणा घालतात किंवा चाळे करतात. मग अशा या दुर्जन शक्तीला रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर वचक बसण्यासाठी सज्जन शक्तीला अधिक संख्येने गडकिल्ल्यांवर गेलंच पाहिजे.

चला तर मग...

॥करू या भटकंती दुर्गांची,

घेऊनी उरी आस इतिहासाची॥

जय भवानी, जय शिवाजी॥

विवेक पाटील 

लेखक: 

No comment

Leave a Response