Primary tabs

स्वार्थत्याग की ?..

share on:

मुलं आधी, मग हे, त्यानंतर इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सगळं करून सरतेशेवटी उरलंच तर आपण. आईसक्रिमच्या निवडीच्या निमित्ताने, माझ्या विचारामागची चुकीची बैठक माझ्या लक्षात आणून दिली. स्वार्थत्याग हा दार वेळी सुखाचा मार्ग नाही, हे मला पटलं.

संसार सुरु होऊन थोडा जुना झाला होता. जगण्याचं एक वळण पडलं होतं. असेच एक दिवस मी, नवरा, आणि आमची दोन मुलं आईस्क्रीम खायला गेलो होतो. त्या उमेदीच्या काळात माझ्या मनात सतत बचतीचे विचार असत. काय काय करून पैसे वाचवता येतील याचाच हिशोब सतत मनात चालू असे. स्वतःच्या इच्छांचा, गरजांचा, हौशीचा विचार न करता कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य द्यायचं, हे माझ्यासारख्या गृहिणीचं पक्क ठरलेलं असतं. मुलं आधी, मग हे, त्यांनतर इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आवडीनिवडी, गरजा कमीच होत्या. त्यामुळे आपण यात फार मोठा स्वार्थत्याग वगैरे करतो आहोत असं कधी मनातदेखील नव्हतं. त्या दिवशी यांनी प्रत्येकाला त्याच्या आवडीचं आईस्क्रीम निवडायला सांगितल्यावर मी सवयीने म्हणाले, “ मला नकोय. ”

त्यांच्या आनंदात मी सुखी होते. मी आईस्क्रीम न घेऊन आज वाचलेल्या पैशात कदाचित उद्या त्यांचीच एखादी गरज पूर्ण झाली असती.

माझ्या त्या नकारावर कधी नव्हे ते ह्यांनी माझ्याकडे थेट रोखून पाहिलं. मला त्या नजरेचा अर्थ समजेना. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“ प्लीज असं करू नकोस. हा तुझ्यावर आणि पर्यायाने आमच्यावरदेखील अन्याय आहे. मला एक सुखी समाधानी बायको हवी आहे, बळीचा बकरा नकोय. खूप त्याग केल्याने माणसाच्या मनात हळूहळू आपण अन्यायग्रस्त असल्याची भावना मूळ धरते आणि मला हे तुझ्याबाबतीत घडायला नकोय.

असं बघ...तुझ्या अशा नकारामुळे कालांतराने आम्ही सगळेच तुझी आवडनिवड विचारायचं विसरून जाऊ. कारण आम्ही तुला गृहीत धरायला सुरुवात करू आणि तुला काही मत आहे हे विसरून विचारणं सोडून देऊ. मग तुला याचं दु:ख होईल, अपमानित झाल्यासारखं वाटेल. आपण दुर्लक्षिले जातोय या भावनेने तू कुढायला सुरुवात करशील. तुला वाटेल – आम्हाला तुझी पर्वा नाही. पण प्रत्यक्षात आम्ही सवयीने, अगदी सहज तसं वागत असू. आम्ही या समजुतीत असू की, तुला असंच वागवलं जावं अशी तुझी इच्छा आहे आणि तू यातच सुखी आहेस. तुझ्या दृष्टीने तुझ्या इच्छा महत्त्वाच्या नाहीतच, असा आमचा समज होईल.

म्हणून मी तुला असं सुचवेन की, यापेक्षा तू दरवेळी तुझी आवड सांगावीस तुझ्या हिश्श्याचा वाटा जरूर घ्यावास. वाटल्यास नंतर दुसऱ्या कुणाला दे, पण आधीच घ्यायला नाही म्हणू नकोस. यामुळे तुझं, तुझ्या मताच महत्त्व टिकून राहील. आम्ही तुझं मत, इच्छा विचारात घेऊच आणि आपण सगळेच सुखी होऊ. ”

मला हे बोलणं पटलं. साध्या आईस्क्रीमच्या निवडीच्या निमित्ताने ह्यांनी मला जागं केलं होतं. माझ्या विचारामागची चुकीची बैठक लक्षात आणून दिली होती.

त्यावर विचार करताना, माझ्या नात्यागोत्यातल्या कितीतरी स्त्रिया मला आठवल्या, ज्या सतत हेच म्हणायच्या कि “ मी याच्या / त्याच्यासाठी किती अन काय केलं आणि आता त्यांना माझी मुळीच / पर्वा / कदर किंमत नाही. ”

याउलट असेही प्रसंग आठवले, जिथे मुलं उलटून म्हणायची, “ कशाला केलंस ? आम्ही सांगितलं होतं का करायला ? तू हे केलंस कारण तुला तसं करण्यात आनंद वाटत होता. आता आमच्यावर हे उपकारांचं ओझं कशाला ? ”

या विचारांच्या साखळीने मला माझ्या व्याख्या पुन्हा तपासून घ्यायला भाग पाडलं. नि:स्वार्थीपणा आणि स्वेच्छांचा बळी या दोन शब्दात महदंतर होतं, ते समानार्थी नाहीत. स्वतःचं महत्त्व वाढाव, वर्चस्व टिकून राहावं म्हणून मी हे सगळं करतेय का ? तसं असेल, तर हा एक प्रकारचा स्वार्थीपणाच ठरतो आहे. यातून वरवर त्याग आणि आतून वेगळी सत्ताकांक्षा दिसते. आणि समजा अगदीच असं नसलं, तरी ज्या हेतूने मी हे करते आहे, तो व्यावहारिकदृष्ट्या आत्ता योग्य वाटला तरी अंतिमतः सगळ्यांनाच महागात पडणार आहे. नवऱ्याच्या विचारांनी माझे डोळे उघडले.

स्वार्थत्याग हा दार वेळी सुखाचा मार्ग नाही...नव्हेच !

सुचरिता

लेखक: 

No comment

Leave a Response