Primary tabs

share on:

सोशल मिडिया हा आजच्या काळातील परवलीचा शब्द मनाला जातो. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत अगदी सहज पोहोचू शकेल, अशी त्याची ताकद आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर अगदी सरकारी यंत्रणेद्वारे देखील सोशल मिडीयाचा प्रभावी उपयोग केला जाताना आपण पाहतो. अशा पार्श्वभूमीवर व्यवसायासाठी त्याला किती वाव आहे, हे चाचपडून बघितले पाहिजे.

ब्रँडविषयी जागरुकता  व्यावसायिक वापरासाठी जेव्हा सोशल मिडिया हाताळला जातो, त्यावेळी व्यवसायाच्या ब्रँडविषयी जागरुकता निर्माण करणे, हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. डिजिटल मार्केटिंगच्या युगात सोशलमिडियाद्वारे ब्रँड जागरुकता हा विषय प्रभावीपणे करता येऊ शकतो, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या ९१% तज्ञांचे मत आहे. आपला व्यावसायिक ब्रँड जेवढा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, तेवढीच वृद्धी ही व्यवसायाची होत असते.

ग्राहक एंगेजमेंट  कोणताही व्यवसाय करताना ग्राहक एंगेजमेंट हा सर्वाधिक महत्त्वाचा विषय ठरत असतो. आपल्या व्यवसायिक ब्रँडकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक तऱ्हा पूर्वीपासून वापरल्या जात आहेत. टी.व्ही., एफ. एम., रेडीओ, यावर जाहिराती देणे असो किंवा प्रिंट मिडियाच्या माध्यमातून जाहिराती देऊन त्याबद्दल ग्राहकांना आकर्षित करण्याची पद्धती असो. या सर्व पद्धती आता जुन्या झाल्या आहेत. तसेच यात एकेरी संभाषण असल्यामुळे ग्राहकाला काय वाटते? हे जाणून घेता येत नाही. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मात्र हे संभाषण दोन्ही बाजूने करता येते. त्यामुळे ग्राहक एंगेजमेंट पूर्वीच्या पद्धतीपेक्षा सोशल मिडियाद्वारे अधिक प्रभावीपणे करता येते.

विश्वासार्हता  विश्वासार्हता ही व्यावसायिक वृद्धीची गुरुकिल्ली मानली जाते. एखाद्या ब्रँडप्रती ग्राहकांची विश्वासार्हता संपली तर तो व्यवसाय तळाला जातो, याची अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत. ती टिकवण्यासाठी किंबहुना वाढवण्यासाठी सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरताना दिसत आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही जगात, जेव्हा ग्राहक तुमच्या व्यवसायाला सोशल मिडीयावर पाहतात, तेव्हा तुमच्या व्यवसायाशी जोडले जाण्याचा सहज मार्ग उपलब्ध होतो. त्यामुळे ग्राहकाला येणाऱ्या अडचणी तेथे सहज मांडल्या जाऊन व्यावसायिकांना देखील त्या सोडवण्यात जलद गती प्राप्त होते. ज्यातून ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यातील संबंध घट्ट होतात. परिणामी व्यवसायाप्रती विश्वासार्हता वाढत असते.

 

व्यवसायिक संबंध – जेव्हा व्यावसायिक वृद्धीसाठी सोशल मिडिया वापरला जात असतो, त्यावेळी केवळ ग्राहक-व्यावसायिक संबंध, एवढाच त्याचा परीघ न राहता याद्वारे अनेक व्यावसायिक देखील एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. स्टार्ट-अप्ससारख्या नवीन व्यवसायांना गुंतवणूकसाठी सोशल मिडिया बळ देऊ शकते. त्याचप्रकारे लघु उद्योजक देखील यातून आपला परीघ वाढवून विविध गटांशी जोडले जात असतात. ज्याद्वारे व्यावसायिक संबध अधिक दृढ आणि घट्ट होऊन आपला व्यापार वाढवण्याचे प्रभावी मध्यम बनू शकते.

खर्च  आजच्या जाहिरात युगात सोशल मिडिया हाताळणे ही सर्वात स्वस्त आणि कमी खर्चिक बाब आहे. कुठल्याही सोशल मिडियाला साईन-अप करण्यासाठी पैशांची गरज भासत नाही. त्यामुळे अनेकबाबतीत खर्च कमी होत जातो. जोपर्यंत यावर पेड-प्रमोशन (पैसे देऊन जाहिरात करणे) केले जात नाही, तोपर्यंत हे माध्यम मोफत उपलब्ध आहे. विविध व्यावसायिक गरजेनुसार याचा वापर करत असतात.

आजच्या डिजिटल युगात सोशल मिडियाची निकड प्रत्येक क्षेत्रात आहे. व्यवसायिक वापरासाठी त्याचा प्रभावी उपयोग करून आपला व्यवसाय वृद्धिंगत व्हावा यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.

- हर्षल कंसारा

 content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response