Primary tabs

सावरकरांची माफीपत्रे: आक्षेप आणि वास्तव - भाग-१

share on:

स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांची माफी मागून अंदमानातून सुटले, असे निराधार आरोप फार पूर्वीपासून केले गेले. नादान राहुल गांधींनीही मग कुठलीही पार्श्वभूमी माहीत नसताना त्याचीच रीओढली. पण, या दाव्यांमध्ये तथ्य किती? यामागे सावरकरांची नेमकी कूटनीति काय होती? यांसारख्या प्रश्नांचे, विविध शंकांचे निरसन करणारा सावरकरांची माफीपत्रे - आक्षेप आणि वास्तवहा परखड लेख आजपासून सलग तीन भागांमध्ये प्रकाशित करत आहोत. त्याचाच हा पहिला भाग.

सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही, तर “मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे,” अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले; याचे पुरावे नवी दिल्लीच्या शासकीय अभिलेखागारात उपलब्ध आहेत. (Dubey, Krishnan Ramakrishnan, Venkitesh. Far from heroism - The tale of Veer Savarkar, Frontline, ७ April १९९६) अशा प्रकाराचे सावरकरांवर सदैव आरोप केले जातात. काल राहुल गांधींनीसुद्धा सावरकरांच्या माफीपत्रांचा उल्लेख केला. पण, ज्या व्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान ‘माझी जन्मठेप’ हे सावरकारांचे अंदमानातील कारावासावर आधारित आत्मचरित्र वाचले आहे, त्यांना या आरोपातील फोलपणा त्वरित लक्षात येईल. दुष्ट शत्रूवर आघात करून पुन्हा निसटून जाण्याचे साधतो तोच खरा शूर; तो भित्रा नव्हे, असे सावरकरांचे धोरण होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ब्रिटिशांच्या तुरुंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. “सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागृहात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही,” असे सावरकरांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचे मत होते. (Garnett, David, In the first volume of his autobiography, The Golden Echo, Harcourt, Brace and Company, New York, १९५४) “कारागृहात राहून जी करता येत आहे त्याहून काही प्रमाणात अधिक, प्रत्यक्ष सेवा या आमच्या मातृभूमीची करता येईल, अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे, तर समाजहिताचे दृष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे,” (सावरकर वि. दा., माझी जन्मठेप, परचुरे प्रकाशन, १८ वी आवृत्ती, २०११, पृष्ठ ४७०) असे सावरकरांचे स्पष्ट मत होते. सावरकरांवर ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचा प्रसंगच उद्भवला नाही. पण, तशी वेळ आली असतीच, तर सावरकरांनी तशी शपथ घेतली असती आणि वेळ येताच ती मोडलीही असती. कारण, शत्रूला खोटे आश्वासन देणे, फसवणे, शत्रूचा विश्वासघात करणे यात गैर काय आहे? पण, सध्याच्या काळात आपल्याकडे शत्रूशी खरं बोलणे, शत्रूला दिलेले वचन प्राणपणाने पाळणे आणि स्वकीयांशी द्रोह, विश्वासघात करणे अशा सद्गुण वाटणाऱ्या विकृती प्रचलित आहे. त्यामुळे सावरकरनीती कळणे अथवा झेपणे जरा कठीणच आहे.

“अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की, जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल. म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते म्हणजे, विश्वासघातपणा, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण, त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वत:च्या उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्रघातकी होणारी होती. तेव्हा असे वर्तन टाळून, जर मुक्तता मिळण्याची निश्चित संधी मिळत असेल, तर ती साधावयाची. ती निश्चित संधी मिळेपर्यंत त्या परिस्थितीतच जे काय राष्ट्रहित साधता येईल, ते साधण्याचा प्रयत्न करीत दिवस कंठावयाचे. त्यातही शक्यतो ज्यांच्यावर सरकारचा इतका उग्र दोष व तीव्र दृष्टी नाही, तोवर त्यांच्याकडून ती कृत्ये करवावयाची. जेव्हा आपणावाचून त्या परिस्थितीत शक्य असलेली सार्वजनिक चळवळ करण्यास दुसरे कोणी इतके इच्छुक वा समर्थ नसेल तेव्हा ती प्रकरणे स्वत: करावयाची. मुक्ततेचा संभव दिसत असता दाटून दवडावयाचा नाही. पण तो निश्चित संभव नसता केवळ आशाळभूत भ्याडपणाने ‘नाही तर सोडणार नाहीत’ असे म्हणत अंदमानात स्वकीयांचे चाललेले छळ निमूटपणे पाहतही बसावयाचे नाही.” (जन्मठेप, पृष्ठ : ३८७) अशी सावरकरांची भूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक किंवा देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत व अंदमानात निमूटपणे छळही सहन केला नाही. वेळोवेळी संप, उपवास, कामास नकार देऊन निषेध नोंदवला होता. सहा महिने कठोर एकांतवास, सात खडी दंडाबेडी व काम करण्याचे नाकारल्याबद्दल १० दिवस खोडाबेडी (Source Material for History of Freedom Movement in India, खंड २, पृष्ठ ४७८-४७९) अशा एकूण २०-२२ वेळा आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, हातकड्या, कोठडीबंद्या, अन्नत्याग इत्यादी सर्व शिक्षा सावरकरांनी भोगल्या होत्या. (जन्मठेप, पृष्ठ : ३३३) आजारी रुग्णांना दूध देण्यात येई. पण, आजारी सावरकरांना फक्त कच्ची पोळी नाहीतर पाणी-भात देण्यात येई. या भयानक शिक्षा ब्रिटिशांबरोबर सावरकरांनी हातमिळवणी केल्याचे दर्शवतात का? तुरुंगवासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच, पण त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागद-पेन्सिल नसतानाही तुरुंगातील भिंतींवर पाच हजार ओळींचे उत्कट काव्य नव्हे, तर महाकाव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले. संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येईल का?

२८ ऑक्टोबर, १९१६ ला सावरकरांना ‘दुसरा वर्ग’ देण्याची घोषणा झाली. त्याची अंमलबजावणी २ नोव्हेंबर, १९१६ पासून झाली. ही बढती मिळाली, पण तुरुंगातून बाहेर येण्याची सवलत नव्हती, लेखन साहित्य ठेवण्याची सवलत नव्हती, अंदमानातच बंदीवान असणाऱ्या बंधू बाबारावांसह राहण्याची अथवा बोलण्याची सवलत नव्हती, अपरिहार्य किंवा सक्त श्रमापासून मुक्तता नव्हती, वॉर्डर होण्याची किंवा कोठडीतून बंद न ठेवण्याची सवलत नव्हती, अधिक चांगले किंवा आदरयुक्त वागविले जाण्याची सवलत नव्हती, अधिक पत्रे धाडण्याची सवलत नव्हती, घरून भेट येऊ देण्याची सवलत नव्हती, इतरांना पाच वर्षांत ही सवलत उपभोगता येत असे, पण सावरकरांना आठ वर्षे झाली तरी, ही सवलत मिळाली नव्हती. (माझी जन्मठेप, पृष्ठ : ३४४) म्हणजे नुसते नावाला दुसरा वर्ग दिला होता. कामात कसलीही सवलत दिलेली नव्हती. तात्यारावांची आणि माईंची भेट दि. ३० मे, १९१९ ला म्हणजे आठ वर्षांनी झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये सावरकर कुटुंबीयांना दोन्ही सावरकर बंधूंची अंदमानात भेट घेण्याची अनुमती मिळाली. त्यावेळेस कुटुंबीयांनी नेलेल्या आवडीच्या खाद्यपदार्थांची आणि रुमालांची ट्रंक तुरुंगाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष देऊ केली नाहीच, पण उलट ती गडप केली. सावरकरांनी ब्रिटिशांशी सहकार्य केले असते, तर ब्रिटिश सरकार सावरकरांशी असे खुनशीपणाने वागले असते का?

 ब्रिटिश अधिकारी सावरकरांबाबत विशेष सावधगिरीने आणि अतीव दुष्टपणाने वागत होते. सावरकर बंधूंना सोडावे लागू नये, यासाठी ब्रिटिश सरकार किती आटोकाट प्रयत्न करत होते हे 'Source Material for History of Freedom Movement in India' या शासकीय प्रकाशित ग्रंथातील पुढील नोंदींवरून कळते.

१) गणेश दामोदर सावरकर व विनायक दामोदर सावरकर यांना शिक्षेत कोणतीही सवलत देण्यात येऊ नये, अशी शिफारस मुंबई सरकार करत आहे. (पृष्ठ : ४६७)

२) सार्वजनिक शिक्षामाफीचा कोणताही लाभ सावरकर बंधूंना मिळू नये, याच्याशी दिल्ली सरकार पूर्णपणे सहमत आहे. - ८ डिसेंबर, १९१९ (पृष्ठ : ४६९)

३) मुंबई सरकारच्या गृहखात्याचे पत्र क्रमांक ११०६/३६, दि. २९ फेब्रुवारी, १९२१ - सावरकर बंधूंना अंदमानातून भारतात पाठवण्यात येऊ नये, असे गव्हर्नर कौन्सिलचे मत आहे. कारण, तसे केल्यास त्यांच्या सुटकेसाठीच्या चळवळीला बळ मिळेल. (पृष्ठ : ४७७-४७८)

सावरकरांना ५० वर्षांची जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावल्यावर अंदमानला नेण्याआधी सावरकरांना डोंगरीच्या कारागृहात ठेवले होते. डोंगरीच्या कारावासात असतानाच सावरकरांनी आपली २५-२५ वर्षांच्या दोन जन्मठेपांची शिक्षा एककालिक करावी असा अर्ज केला होता. कारण, मनुष्याला एकच जन्म असतो. तेव्हा दुसरी शिक्षा नवीन जन्मात भोगायची का? हा प्रश्न निर्माण होत होता. पण हिंदुस्थान सरकारने ४ एप्रिल, १९११ च्या, क्र. २०२२ पत्राद्वारे ही विनंती त्यांच्या पहिल्या जन्मठेपीची शिक्षा संपल्यावर विचारात घेण्यात येईल, असे सांगून फेटाळून लावली. (जोशी वि. श्री., क्रांतिकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, १९८५, पृष्ठ : ४८८) म्हणजे ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा शक्य तितकी कमी करून घ्यावी असा प्रयत्न अंदमानमध्ये पाऊल ठेवण्याच्या आधीपासून सावरकर करत होते. अंदमानातील छळामुळे त्यांचे मनोधैर्य खचले व मग त्यांनी माफीपत्रांचा सपाटा लावला, हा आरोपच त्यामुळे फोल ठरतो.

अंदमानात आल्यावर सावरकरांनी राजक्षमेसाठी पहिले आवेदन ३० ऑगस्ट, १९११ ला केले व ब्रिटिश सरकारने ते आवेदन ३ सप्टेंबरला फेटाळल्याचे कळवले. हे आवेदन सातव्या एडवर्डनंतर गादीवर आलेले बादशहा पंचम जॉर्ज यांच्या राज्यरोहणाच्या निमित्ताने केले असावे असे दिसते. (जोशी वि. श्री., क्रांतिकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, १९८५, पृष्ठ : ४९९) सावरकरांनी ब्रिटिशांना पाठवेलेली आवेदने दिनांकांसह : १) ३० ऑगस्ट, १९११ २) २९ ऑक्टोबर, १९१२ ३) १४ नोव्हेंबर, १९१३ ४) १४ सप्टेंबर, १९१४ ५) २ ऑक्टोबर, १९१७ ६) २४ जानेवारी, १९२० ७) २ एप्रिल, १९२० ८) ६ एप्रिल, १९२० ९) १ व २३ ऑगस्ट, १९२३ (Source Material for History of Freedom Movement in India, खंड २, पृष्ठ ४७८ ते ४८१)

ही आवेदने सावरकरांच्या अंदमानच्या इतिहासदर्शिकेवरून घेतलेली आहेत. ही अंदमानची इतिहासदर्शिका ‘समग्र सावरकर वाङ्मय’ व 'Source Material for History of Freedom Movement in India' या शासकीय प्रकाशनातील ग्रंथात छापलेली आहे. कोणीही ती लपवलेली नाही, सावरकरांनी ‘माझी जन्मठेप’ पुस्तकातही याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी होते. अफजलखानाच्या वधाच्या आधी, सिद्दी जोहरच्या वेढ्याच्यावेळी त्यांनी अशीच शत्रूला बेसावध करणारी पत्रे पाठवली होती. तसेच पुरंदरच्या तहावेळी महाराजांनीही औरंगजेबाच्या अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच त्याचा प्रतिशोध घेतला. हा ‘राजकीय कूटनीति’चा एक भाग असतो. ज्यांना ‘राजकीय कूटनीति’ म्हणजे काय हे माहीत नाही तेच कदाचित सावरकरांच्या या तथाकथित माफीपत्रांना सावरकरांची शरणागती समजत असावेत किंवा सावरकरविरोधक सावरकरांनी तेव्हा शत्रूला फसवण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रचलेल्या सापळ्यात अडकले असावेत. चाणाक्ष शत्रू ब्रिटिश फसले नाहीत पण, तथाकथित बुद्धिवादी यात फसले असावेत.

अक्षय जोग 

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response