Primary tabs

सकारात्मक मानसिक आरोग्य – तरुणाईची गरज

share on:

बालपण आयुष्यातील आनंदाचा काळ आहे, कारण त्यात नैसर्गिक आनंद घेता येतो. आयुष्यातील वास्तवाचा दबाव बालकावर नसतो. पण तारुण्य हे पुढच्या संपूर्ण आयुष्याचा पाया आहे. भविष्य खऱ्या अर्थाने घडते ते तारुण्याच्या अनुभवावर. हे अनुभव जितके संपन्न व प्रामाणिक असतील, जितके ससुंस्कृत असतील, तितके ते भविष्य सुरक्षित करतील. म्हणूनच सकारात्मक मानसिक आरोग्य ही तरुणाईची गरज आहे.

मानसिक आरोग्य हा सुंदर व समाधानी जीवनाचा पाया आहे. आयुष्यात संपत्ती व सत्ता मिळविणे एकवेळ सोपे आहे, पण मानसिक शांतीचा व आरोग्याचा लाभ होणे कठीण आहे. आपल्याला भावनिकदृष्टया समाधानी वाटणे, आयुष्यातील दैनंदिन गोष्टींशी, तसेच कधीकधी कठीण तणावपूर्ण प्रसंगाशी सामना करता येणे व आयुष्यातील घडामोडींना यशस्वीपणे सामोरे जाता येणे यातून मानसिक आरोग्य साकार होत असते. जीवनाच्या विविध टप्प्यांवर मानसिक आरोग्याच्या समस्या विविध पध्दतींनी व्यक्त होत असतात. त्या त्या टप्प्यावर येणाऱ्या आयुष्यातील विविध अनुभवांच्या व घटनांच्या स्वरूपानुसार सुखाचे व समाधानाचे मापदंड बदलत असतात. आयुष्याच्या विकासात हे मापदंड महत्त्वाचे ठरतात.

तरुणाईचा काळ हा आयुष्यातील नवनवीन घटनांचा व अनुभवाचा काळ असतो. मूल म्हणून लहानपणी जगात वावरताना पालकांनी, शिक्षकांनी व इतर मोठया मंडळींनी मुलांना सुरक्षिततेचे एक कवच दिलेले असते. या कवचात असताना आयुष्यातली आव्हाने जाणवतीलच असे नाही. हा चौकटीतला मार्ग तसा सोपा असतो. अनेकांची साथ असते. पण बालपणातील हे सुरक्षा कवच फुटून जेव्हा व्यक्ती तरुणाईच्या दिशेने वाटचाल करते, तेव्हा जगातले सत्य व तथ्य दिसायला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. साधारणपणे 18 ते 29 वर्षे वयाचा काळ हा संक्रमणाचा काळ असतो. या काळातच आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, आपली निर्णयक्षमता व एक माणूस म्हणून आपले हक्क तरुणांना जाणवायला लागतात. याच कालावधीत विविध प्रकारच्या ताणतणावांना त्यांना सामोरे जावे लागते. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यांना तळहाताच्या फोडासारखे जपले होते, त्यांच्या आवडीनिवडी सांभाळल्या होत्या, त्याच सगळया व्यक्तींच्या अपेक्षा तरुणाईकडून बदललेल्या असतात. आता शिस्तीने व जबाबदारीने वागायची मागणी केली जाते. स्वत:ची कामे स्वत: करा, असे आदेश दिले जातात. या गोष्टी मोठयांच्या आज्ञेनुसार केल्या नाहीत, तर मोठयांची अवज्ञा केल्याचे खापर तरुणाईच्या डोक्यावर फुटते. बेजबाबदार म्हणून शेरा मारला जातो. पूर्वी खेळात व मित्रमैत्रिणीत मजा करायला पूर्ण मुभा दिली होती, पण आता तारुण्यात प्रवेश करताना आपले मित्रमैत्रिणी कोण आहेत व कोण असावेत यावर बारीक नजर पालक ठेवत असतात. काही मित्रमंडळींना टाळायचे आदेश दिले जातात. या सगळया गोष्टी तरुण मुलांना आवडत नाहीत. पटत नाहीत. त्यांच्या स्वातंत्र्यावर व अस्मितेवर मोठयांनी गदा आणली आहे असे त्यांना वाटते. एकंदरीत नियमांचे पालन, वागण्यावर मर्यादा, भावनांवर काबू व प्रगल्भ वर्तन या सगळया संकल्पनेत आपल्या नैसर्गिक अस्तित्वाचा बळी घेतला जातो आहे, असे तरुण मंडळींना वाटते.

सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या भावनिक व वैचारिक मूल्यमापनामुळे तरुणांना काहीसे अस्वस्थ वाटणे, चिडल्यासारखे वाटणे व मन बंड करून उठणे, हा अनुभव सामान्य आहे. जवळजवळ सगळयांचा असा अनुभव असतो. काहीशा अशांत व प्रक्षुब्ध वातावरणातून तरुणांना जायला लागते. आपल्याला आवडणाऱ्या अनेक गोष्टी प्रगल्भ वातावरणाची अपेक्षा असलेल्या मोठया मंडळींना पटत नाहीत, म्हणून कधी त्यांना मनाला मुरड घालावी लागते, तर कधी मनाचा बंडखोरपणा व्यक्त करावा लागतो. नवनवीन प्रयोग करायची इच्छाही या वयातच होते. कारण आपली दुनिया आता बच्चोंकी नसते, तर तरुणांची असते हे सिध्द करायची गरज तरुणाईला भासते. याक्षणी स्वप्नांची दुनिया खरी वाटते, म्हणून प्रेमात पडून जगाला विसरून जायचे, नशा करून पाहायची, धुंदी अनुभवून पाहायची, जोखमीचे प्रयोग करायचे थ्रिल अनुभवायचे हाही भाग असतोच. कारण आयुष्यात एक एक करून उत्तेजित व धुंद अनुभव घ्यायचे असतात. मित्रमंडळींच्या प्रभावात आणि सहवासात हे अनुभव अधिक तीव्र होतात. तरुणाईत आपल्या घरच्या वातावरणात तेवढे सूर जमविता येत नाहीत, तर आपल्या विचारांच्या मित्रमंडळींत त्यांना अधिक मस्त व स्वस्थ - सुरक्षित वाटते. कारण तिथे अमर्याद स्वातंत्र्य मिळते. रोखणारा वा टोकणारा कुणी नसतो. सगळे कसे 'कूल' असते.

तारुण्यात शारीरिक आरोग्य जितके महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा भावनिक व मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचे आहे. आयुष्यात येणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी व लवचीक राहण्यास उत्तम मानसिक आरोग्य तरुणांना मदत करते.

मानसिक आरोग्य लाभण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत-

1) उत्तम समतोल आहार घेणे. 2) व्यायाम नियमित करणे. 3) घरी वा मैदानी खेळ खेळणे. 4) शाळा-कॉलेजात जाऊन अभ्यास करणे. 5) सुसंस्कृत मित्रमंडळी असणे. 6) अनेक सामाजिक कामात भाग घेणे.

या गोष्टी मूलभूत आहेत. जरुरीच्या आहेत. याशिवाय अनेक भावनिक गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत.

* अनेक गोष्टींची आवड असणे व त्या गोष्टींत आनंद घेता येणे.

* आशावादी असणे. स्वप्नपूर्तीची अपेक्षा असणे.

* समोर येणाऱ्या संधीचा फायदा घेता येणे.

* आपल्या कुटुंबात समरस होणे.

* आपल्या शिक्षकांबद्दल व शिक्षणाबद्दल आपलेपणा व आस्था असणे.

* तात्त्विक व नैतिकदृष्टया चूक काय किंवा बरोबर काय याचा बोध घेता येणे.

मानसिक आरोग्याच्या संकल्पनेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपेचे नियोजन. आपले शारीरिक आरोग्य जोपासण्यासाठी आठ तास झोप आवश्यक आहे. आजकाल मोबाइल, इंटरनेट व चॅटिंग यामुळे तरुण पूर्ण रात्रभर किंवा मध्यरात्रीपर्यंत तरी जागत असतात व दिवसा झोपा काढतात. यामुळे त्यांना दिवसा थकल्यासारखे वाटते. ती सतत चिडत राहतात. त्यांना कशातही मन एकाग्र करता येत नाहीत. दिवसा जेव्हा आपण शाळा-कॉलेजात जात असतो, तेव्हा आपले भविष्य व करियर घडवण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे. पण आजकाल तरुणांना रात्रीच्या जागण्याच्या सवयीमुळे सकाळी अभ्यासात मन एकाग्र करता येत नाही, ही कॉमन समस्या झालेली आहे. यामुळे अभ्यासात ती मागे पडतात व निराश होतात.

व्यसनाधीनता ही आजच्या तरुण पिढीची विधायकता नष्ट करणारी मोठी समस्या आहे. मित्रमैत्रिणींच्या प्रभावाने एखादी नवीन उत्तेजित गोष्ट करून पाहायची, या प्रयोगातून अनेकांना व्यसनाची सवय लागते व त्यातून आपण व्यसनाधीनतेच्या विळख्यात कसे अडकतो हे कुणालाच कळत नाही. त्यामुळे आयुष्याला हानिकारक ठरणारे व्यसनासारखे प्रयोग माणसाने करूच नयेत, हे उत्तम.

आपण पाहिलेली स्वप्ने बऱ्याच वेळा पूर्ण होत नाहीत. ध्यानीमनी नसताना अपयशाला सामोरे जावे लागते. परीक्षेत अपयश येते, प्रेमभंग होतो, नोकरी मिळत नाही असे मनाला उद्वेग देणारे अनेक प्रसंग घडत असतात. अपेक्षाभंग होत असतो. अशा वेळी निराशेच्या भरात आत्महत्येचे विचार मनात येतात. घायकुतीला येऊन आत्महत्या करणारी अनेक तरुण मंडळी आपण पाहतो. ज्या कारणांसाठी ही तरुण मंडळी जीवन संपवायचा प्रयत्न करतात, त्या कारणांना तोंड देत आयुष्य यशस्वी करणारे अनेक तरुण याच जगात आहेत. याचाच अर्थ उमेद जगवायची कला, कठीण प्रसंगाना सामोरे जायची फिलॉसॉफी आत्मसात करायला पाहिजे. कठीण प्रसंग आणि घटना आयुष्यात घडत असतात, पण कठीण माणसे मात्र या सगळयावर मात करून टिकतात, हे सत्य आहे.

तारुण्यात मानसिक आरोग्य जतन करता यायला पाहिजे. कारण या काळातच अनेक गंभीर मानसिक आजार उद्भवत असतात. यासाठी अनेक आरोग्यपूर्ण गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. आयुष्याच्या गुंतागुंतीला समजून घेत मार्गक्रमण करता येईल. विश्वासाची कणखर नाती जोपासण्याने संकटकाळी आपल्याला हवा असलेला आधार मिळेल. या तरुणाईच्या काळात आयुष्यात अनेक बदल होत असतात. त्यांच्याशी आपण जुळवून घ्यायला पाहिजे. तारुण्यात आयुष्याचा अनुभव कमी असतो, त्यामुळे प्रौढ प्रगल्भपणा कमी असतो. अशा वेळी सहनशील राहण्याचा प्रयत्न करावा. आततायीपणे निर्णय घेऊ नये. आपल्या क्षमतेची योग्य जाणीव ठेवावी. आयुष्याला पुढे घेऊन जातील अशी कौशल्ये शिकावीत. यात उत्तम संवाद कौशल्य जितके महत्त्वाचे, तितकेच उत्तम माणसांना जमविण्याची कलाही महत्त्वाची आहे.

बालपण आयुष्यातील आनंदाचा काळ आहे, कारण त्यात नैसर्गिक आनंद घेता येतो. आयुष्यातील वास्तवाचा दबाव बालकावर नसतो. पण तारुण्य हे पुढच्या संपूर्ण आयुष्याचा पाया आहे. भविष्य खऱ्या अर्थाने घडते ते तारुण्याच्या अनुभवावर. हे अनुभव जितके संपन्न व प्रामाणिक असतील, जितके ससुंस्कृत असतील, तितके ते भविष्य सुरक्षित करतील. म्हणूनच सकारात्मक मानसिक आरोग्य ही तरुणाईची गरज आहे.

 

 

डॉ. शुभांगी पारकर

लेखिका के.ई.एम. रुग्णालयात प्राध्यापक आणि मानसोपचार विभागाच्या प्रमुख आहेत.

9819282175

लेखक: 

No comment

Leave a Response