Primary tabs

पुष्कलावती

share on:

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूरदेशांमध्ये रुजली होती. भारतीय धर्म,देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंक, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा आहे. या यात्रेत पाहणार आहोत साहित्यात प्रतिबिंबित झालेली तीर्थस्थळे. त्यापैकी आजचे स्थळ आहे पाकिस्तानमधील पुष्कलावती नगरी.

पुष्कलावती नगरीचे मूळ शोधत गेल्यास ते सापडते रामायणात. असे सांगितले जाते की भरत आणि मांडवी यांचे पुत्र तक्ष आणि पुष्कल यांनी अनुक्रमे तक्षशिला आणि पुष्कलावती या नगरी वसवल्या. तक्षशिला वसवली होती मध्य आशियातील Silk Road आणि भारतातील उत्तरापथ या दोन महामार्गांच्या संगमावर, तर पुष्कलावती वसवली होती सुवास्तू आणि कुभा या दोन सुंदर नद्यांच्या संगमावर.

या रम्य नगरीच्या नद्या सुवास्तू आणि कुभा यांचा उल्लेख ॠग्वेदात येतो. या दोन्ही नद्या हिंदुकुश पर्वतात उगम पावतात. निरभ्र आकाशासारखे स्वच्छ निळेशार पाणी असलेली सुवास्तू नदी कुभेला मिळते. पुढे कुभा नदी पूर्वेला सिंधूला जाऊन मिळते. आज या नद्या स्वात आणि काबुल या नावाने ओळखल्या जातात.

अनंत प्रफुल्लित कमळांनी शोभून दिसणारी पुष्कलावती, गांधार प्रांताची राजधानी होती. गांधारची आर्थिक राजधानी तक्षशिला असली, तरी राज्य पुष्कलावती येथून केले जात होते. इस.पूर्व सहाव्या शतकापासून जवळजवळ 500 वर्षे पुष्कलावतीने गांधारची राजधानी म्हणून मिरवले. यवन आणि शक राजांच्या काळात, पुष्कलावतीमध्ये एक टांकसाळ होती. येथे पाडलेल्या अनेक नाण्यांपैकी हे गांधारच्या शक राजा अझीलिसेसने (Azilisesचे) गजलक्ष्मीचे नाणे -

कमळात उभी असलेली लक्ष्मी आणि दोन बाजूंनी हत्ती. खरोष्टी लिपीमध्ये 'महाराजस राजराजस महातस ऐलीशस' असे लिहिले आहे. हे नाणे आता ब्रिटिश संग्रहालयात आहे.

पुष्कलावतीचे आजचे नाव आहे चारसदा. या नगरीच्या आजूबाजूच्या परिसरात आहे 25 किलोमीटर दक्षिणेला पुरुषपूर. इसवी सनाच्या पहिल्या शतकात हे शहर उदयास आले. पुरुषपूर म्हणजे आजचे पेशावर. तसेच पुष्कलावतीच्या पश्चिमेला, कुभा नदीच्या काठावर कुभा नावाचीच नगरी होती. या सुंदर नगरीचे वर्णनसुध्दा ॠग्वेदात येते, तसेच नंतरच्या पर्शियन काव्यातही कुभाचे वर्णन आहे. आज ही नगरी अफगाणिस्तानमधील 'काबुल' म्हणून ओळखली जाते.

कुभा आणि पुष्कलावती यांच्यामधून उत्तर-दक्षिण दिशेने हिंदुकुश पर्वत पसरले आहेत. ही पर्वतांची रांग एक प्रकारे भारताची संरक्षक भिंत होती. या भिंतीत काही दरवाजेही होते. त्यापैकी एक प्रसिध्द द्वार आहे खैबर खिंड! या खिंडीच्या एका बाजूला काबुल आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरुषपूर.

अफगाणिस्तानातून आणि मध्य आशियामधून भारतात उतरण्यासाठी खैबर खिंड हा राजमार्ग होता. यवन, शक, पहलव, कुशाण, हुण, गझनी, घुरी, तैमूर, मुघल, अब्दाली ही सर्व मंडळी खैबर खिंडीतून भारतात आली. इथून आलेल्या टोळयांशी झालेली युध्दे भारताच्या इतिहासात निर्णायक ठरली. या युध्दांवर अनेकानेक ग्रंथ आणि महाकाव्ये रचली गेली.

सर्वात पहिली लढाई होती इस.पूर्व चौथ्या शतकातील यवन राजा सिकंदर आणि पंजाबचा पुरू यांची. झेलम नदीच्या काठावर झालेल्या या लढाईनंतर सिकंदर ग्रीसकडे परत जायला निघाला, आणि पुरू आणखी मोठया प्रदेशावर राज्य करू लागला. त्यानंतरची लढाई इस.पूर्व पहिल्या शतकातील शक नरेश नहपान आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांची. ही लढाई नाशिकजवळ गोवर्धन येथे झाली. गौतमीपुत्राने शकांचा पराभव करून महाराष्ट्रातील शकांचा प्रांत ताब्यात आणला. चौथ्या शतकात माळवा प्रांतातील शकांना चंद्रगुप्त गुप्तने हरवून 'शकारी' ही पदवी घेतली. चंद्रगुप्तचा नातू स्कंदगुप्त याने हुणांच्या सततच्या आक़्रमणांचा उत्तम प्रतिकार केला होता. पण त्याच्या नंतरच्या यशोधर्माने हूण राजा मिहीरकुल याचा सपशेल पराभव केला. पुढे दहाव्या-अकराव्या शतकात गझनींशी पाल राजांच्या 3-4 पिढया लढल्या. शेवटचा पाल राजा भीमपाल 1026मध्ये युध्दात मारला गेला, त्याच वर्षी गझनीच्या महमदने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. 1191-92मधल्या महमद घुरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्या लढाया झाल्या, त्यांच्यातील शेवटच्या लढाईत पृथ्वीराज चौहान पराभूत झाला. त्यानंतरची लढाई पानिपत येथे झाली, ज्यामध्ये अकबरने हेमचंद्रला हरवून दिल्लीचे तख्त काबीज केले. तर, मुघल राज्याच्या पडत्या काळात, पुन्हा पानिपतलाच अहमद शाह अब्दाली आणि सदाशिवरावभाऊ यांची लढाई गाजली. सिकंदरपासून अब्दालीपर्यंतच्या सर्व लढायांचा उगम या खैबर खिंडीत झाला.

खैबर खिंडीतून जसे आक्रमक आले, तसेच व्यापारी आले, ग्रीक, पर्शियन व अरबी विद्वान आले, इतिहासकार आले, विद्यार्थी आले, भक्त आले, शरणार्थी आले आणि अनेक बौध्द यात्रेकरू आले. चिनी यात्रेकरूंनी भारतात येऊन बौध्द स्थानकांना भेटी दिल्या. बौध्द साहित्य शिकले, जाताना अनेक ग्रंथ घेऊन गेले. या ग्रंथांची पुढे चिनी, तिबेटी भाषांतरे केली गेली. चिनी यात्रेकरूंच्या प्रवासवर्णनांमध्ये तत्कालीन भारताचे चित्र मिळते.

या खिंडीतून भारतावर जरी आक़्रमणे झाली, तरी भारताने मात्र या खिंडीतून सैनिक पाठवले नाहीत. भारताने अंकगणित, दशमान पध्दत, कथा साहित्य आणि बुध्दाचा शांती संदेश या खिंडीतून बाहेर पाठवला. भारतीय दशमान पध्दत खैबर खिंडीतून पर्शियात, अरेबियात आणि नंतर युरोपमध्ये गेली आणि ती जगभर रूढ झाली. पंचतंत्रच्या कथासुध्दा याच मार्गाने युरोपमध्ये गेल्या. उपनिषदांची पर्शियन भाषांतरे या खिंडीतून पर्शियामध्ये व नंतर युरोपमध्ये पोहोचली. बुध्दाचे चरित्र व कथा, बुध्दाचा शांती संदेश आणि बौध्द देवतासुध्दा याच मार्गाने पर्शिया, ग्रीस, मध्य आशिया, चीन, कोरिया, तिबेट आणि जपानमध्ये पोहोचल्या.

दिपाली पाटवदकर.

 

लेखक: 

No comment

Leave a Response