Primary tabs

फेरीवाले

share on:

फेरीवाले

पहाटेच एक आवाज कानी पडला, 'दे दान सुटे गिरान'.  हा शब्द काही आज ऐकला असं नाही पण तरीही गंमत वाटली.  बोली भाषेतले शब्द किती गोड वाटतात. पैसे द्या, कापड द्या, दान करा असं म्हणत होती ती बाई.  हे असे लोक आपली किती सोय करतात नाही? मग अशाच अनेक आरोळ्या आठवायला लागल्या. प्रत्येकाची पद्धत निराळी. लहान झालो मी क्षणात. आजीचं नारायण पेठेतल़ं वाड्यातलं घर आठवलं. वासूदेव यायचा.  त्याच्या वेषाचं, खास करून मोरपिशी टोपीचं खूप अप्रूप वाटायचं. खड्या तरीही गोड आवाजात त्याने म्हटलेली गाणी.  तो यायच्या आधी त्याच्या चिपळ्यांचा आवाज पोहोचायचा. आता फार क्वचित दिसतो, ऐकायला येतो. असंच पिंगळा यायचा. खरं तर उजाडायच्या आधीच, अंधारात यायचा. घुबडाचंच नाव याचं. भविष्य सांगायचा ते म्हणूनच की काय कुणास ठाऊक. त्याची जरा भीतीच वाटायची. ती नंतर खरीही ठरली. तरुण असताना एकदा याचा आवाज आला म्हणून डोकावलो तर त्याने बोलावलं की तोच वर आला. कसली भूल पडली मला कुणास ठाऊक. कदाचित माझ्या आयुष्यातला खडतर काळ होता म्हणून ही असेल. तर हा घुसलाच आणि मग ते कुणी करणी केलीय वगैरे चालू झालं. नाव सांगतो म्हणाला. मग पैसे मागणं, नाही केलं तर असं होईल, तसं होईल.  दडपण आलं खूप. पण यांचं चेहरा वाचण्याचे कौशल्य वादातीत. पिंगळाही देवाची गाणी सुंदर म्हणायचा. मशाल नाचवणारा भुत्याही यायचा पण फार काही आठवत नाही.  

सुया, पोत, बिब्बं, वाळे असा आवाज यायचा. मग पोटरीपर्यंत लुगडं नेसलेलं काटक शरीर यायचं. क्वचित कुणाच्या पाठुंगळी पोर बांधलेलं असायचं. क्वचित कशाला, बहुतेक वेळा असायचं. गोधडीचं असंच. काही वेळा मोलकरणी द्यायच्या शिवून पण या बायकाही फिरायच्या सूईदोरा घेऊन. अजूनही येतात हिवाळ्याच्या आधी. पन्हाळी असं सुरुवातीला मोठ्या आवाजात म्हणून पुढचं अस्पष्ट किंवा भरभर म्हणणारा माणूस यायचा पावसाचे वेध लागले की. पन्हाळी दुरूस्त करायचा किंवा नवीन बसवायचा. बाकी ते भाजी ला य जोडून लांबणारं  भाजीय असं ओरडणारा भाजीवाला यायचा. काही भाजीवाले  कल्पक.  त्यांच्या तालासुरात हातगाडीवर असलेल्या सगळ्या भाज्यांची नावं एका दमात घेणार. तो कुल्फीवाला पण कुल्फी असं म्हणत पोटात कालवाकालव करायचा. कधी घरच्यांना दया आली तर पोट शांतवायचं. मला एक कडधान्य विकणारा फार आवडायचा, म्हणजे त्याचं ओरडणं मजेशीर होतं म्हणून. वाटाटणा हे सुरुवातीचं तेवढं कळायचं बाकी सगळं मला कधीच कळलं नाही. बघितल्यामुळे तो काय विकतो हे कळलं तरी. आवाजाची पण किती विविधता या सगळ्यांमध्ये. आता आपण जाहिरातींचा आवाज सहन करतो, पण जुने विक्रेते मात्र सोबती वाटतात. पेपाॅर  असं ओरडत येणारा वृत्तपत्र विकणारा मला अजून आठवतो. रोज विकत घ्यायचा पेपर. त्याचा पेपरसारखा निर्विकार चेहरा लक्षात राहिला. कधीकधी आम्हा बच्चे कपनीकडे बघून हसायचा तो. फार छान होतं त्याचं हसू. मग रद्दीवाला,  भंगारवाला,  प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं. एक खेळणीवाला यायचा, बायको, पोरगं पण असायचं बरोबर. ते भिरभिरं विकणारे असातात ना, ते भिरभिरी ज्यावर अडकतात तसाच बांबू पण त्यावर आडव्या पट्ट्या असायच्या आणि त्यावर छोटी छोटी खेळणी लावलेली असायची. अप्राप्य खेळणी. ते मात्र ओरडायचे नाहीत काही. पिपाणी वगैरे वाजवत असावेत. अजून एक बराच काळ ऐकू येत असलेला आवाज म्हणजे पीपीपी करत येणारा इडली-वडेवाल्याचा.  ह्याचा हा भोंगा बोलत असे. हाही हल्ली गायब झाला आहे.

  हे सर्व खरं तर पोटार्थी पण  ही एक संस्कृतीच आहे असं मला वाटतं,  लोप पावत चाललेली संस्कृती..

 

अतुल कुलकर्णी 

लेखक: 

No comment

Leave a Response