Primary tabs

पर्यावरणशास्त्र - भाग २: परिसंस्था (ecosystem) म्हणजे काय?

share on:

एखाद्या विशिष्ट प्रदेशात आढळणाऱ्या आणि परस्परांशी काहीतरी संबंध असणाऱ्या सजीव आणि निर्जीव घटकांची मिळून 'परिसंस्था' (ecosystem) तयार होते.

उदा. जंगल ही एक परिसंस्था आहे, ज्यात मोठी झाडं, वेली, गवतं, कीटक, प्राणी, पक्षी असे जैविक घटक आणि दगड, माती, हवा, पाणी असे अजैविक घटक असतात आणि त्यांच्यात काहीतरी परस्परसंबंध प्रस्थापित झालेला असतो. माणसाच्या बाबतीत 'समाज' या शब्दाचा जो अर्थ आहे, तोच निसर्गाच्या बाबतीत 'परिसंस्था' या शब्दाचा आहे. समाज म्हणजे नुसता माणसांचा समूह नव्हे, तर त्या समूहातल्या प्रत्येकाचा प्रत्येकाशी काहीतरी संबंध प्रस्थापित झालेला असतो. तसंच परिसंस्थेतलाही प्रत्येक घटक प्रत्येकाशी कुठल्या ना कुठल्या संबंधाने जोडलेला असतो. परिसंस्थेचा आकार तिच्या वैशिष्ट्यांनुसार ठरतो. Ecosytem हा शब्द सर्वप्रथम ब्रिटीश पर्यावरणतद्न्य आर्थर टॅनस्ले याने १९३५ साली वापरला.

परिसंस्थेतले सजीव घटक आणि निर्जीव घटक एकमेकांपासूनच एकमेकांची निर्मिती करत असतात. म्हणजे सूर्यप्रकाश, कार्बन डाय ऑक्साइड, पाणी आणि जमिनीतले कार्बन, नायट्रोजन, खनिजं इत्यादी निर्जीव घटक एकत्र येऊन, त्यांच्यात काहीतरी आंतरक्रिया होऊन 'वनस्पती' हा सजीव घटक तयार होतो. ही झाडं पुढे प्राण्यांना खाद्य पुरवतात आणि मृत प्राणी आणि वनस्पती यांच्या शरीरात साचलेले अजैविक घटक पुन्हा मातीत मिसळतात आणि पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात. म्हणजेच जैविक आणि अजैविक घटकांचं परस्परांमध्ये रूपांतर निसर्गात सतत चालू राहतं. मोठ्या परिसंस्थांना 'बायोम्स' (Biomes) म्हणतात. भूपृष्ठीय परिसंस्था (Terrestrial ecosystem) आणि जलीय परिसंस्था (Aquatic ecosystem) हे मोठ्या परिसंस्थांचे प्रकार होत. जलीय परिसंस्थांमध्ये सागरी परिसंस्था (Marine ecosystem) आणि गोड्या पाण्याच्या परिसंस्था (freshwater ecosystem) असे प्रकार पडतात.

परिसंस्थेवर अनेक बाह्य घटकांचा आणि अंतर्गत घटकांचा परिणाम होत असतो. हवामान हा परिसंस्थेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. तापमान आणि पावसाचं प्रमाण या बाह्य घटकांमुळे परिसंस्थेतल्या ऊर्जेच्या साठ्याचं प्रमाण ठरतं. एखाद्या प्रदेशात मातीतला मुख्य घटक (Parent Material) कुठला आहे, पृष्ठभागाची रचना कशी आहे (Topography), समुद्रसपाटीपासूनची उंची किती आहे, इत्यादी अनेक घटक परिसंस्थेवर परिणाम करत असतात. बाह्य घटक मुख्यतः परिसंस्थेतल्या अंतर्गत घटकांवर परिणाम करत असतात. अंतर्गत घटकांचा बाह्य घटकांवर फारसा परिणाम होत नाही. अजैविक कार्बनी पदार्थांचं जैविक पदार्थांमध्ये रूपांतर करणं हे परिसंस्थेचं प्राथमिक काम असतं. ही प्रक्रिया वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे घडवून आणतात. या प्रक्रियेत सूर्यप्रकाशावाटे पृथ्वीवर आलेली ऊर्जा रासायनिक ऊर्जेत रूपांतरित केली जाते आणि पुढच्या सर्व सजीवसृष्टीमध्ये रूपांतरित केली जाते. या उर्जेच्या प्रवाहाला Energy Flow म्हणतात. अन्नसाखळी आणि ऊर्जाप्रवाह या परिसंस्थेतल्या फार मनोरंजक गोष्टी आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ पुढच्या भागात...

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response