Primary tabs

पर्यावरणशास्त्र - भाग १: Ecologyची संकल्पना

share on:

'पर्यावरणशास्त्र' या लेखमालेच्या या पहिल्याच भागात माहिती घेऊया या 'पर्यावरणशास्त्र' (ecology) या संकल्पनेचा उदय कसा झाला त्याची...

पर्यावरण ही नुसती कुठलीतरी आदर्शवादी विचारसरणी नाही, तर ते एक शास्त्र आहे. याला इंग्रजीमध्ये ecology म्हणतात. ही एक जीवशात्राची शाखा म्हणून विकसित झाली आहे. जीवशास्त्रामध्ये प्रामुख्याने वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास होतो, तर ecology मध्ये एखाद्या विशिष्ट प्रदेशात आढळणारे सजीव-निर्जीव घटक आणि त्यांच्यातला परस्परसंबंध अभ्यासाला जातो. Ecology या शब्दाची निर्मिती oikos या ग्रीक शब्दापासून झाली आहे, ज्याचा अर्थ 'कुटुंब' असा होतो. ही पृथ्वी हे वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव आणि मानव यांचं एक कुटुंब आहे आणि हे कुटुंब कसं चालतं त्याचा अभ्यास म्हणजे ecology होय. Okologie हा शब्द सर्वप्रथम जर्मन शास्त्रद्न्य अर्न्स्ट हायकेल याने १८६६ साली वापरला. अॅरिस्टॉटल आणि हिप्पोक्रॅटस या प्राचीन ग्रीक विचारवंतांनी जो नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास केला त्यात ecologyची पायाभरणी झालेली दिसते. आधुनिक काळात ecology ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आली. Ecology चा अभ्यास वेगवेगळ्या पातळ्यांवर केला जातो. या पातळ्यांची चढत्या क्रमाने रचना करायची झाल्यास जनुक(gene)-पेशी(cell)-उती(tissue)-अवयव(organ)-सजीव(organism)-प्रजाती(specie)-पॉप्युलेशन(population)-अधिवास(community)-परिसंस्था(ecosystem)-मोठ्या परिसंस्था(biomes)-जीवावरण(biosphere) अशी करता येते. या प्रत्येक पातळीवर सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेचा (Biodiversity) अभ्यास ecology मध्ये केला जातो. ख्रिस्तपूर्व सुमारे ४०० वर्षांपूर्वी ग्रीक विचारवंत हिरोडोटस याने एक निरीक्षण नोंदवून ठेवलं होतं. आफ्रिकेतल्या नाईल नदीतल्या मगरी विश्रांतीसाठी पाण्यातून बाहेर येऊन तोंड उघडं ठेवून बराच वेळ उन्हात सुस्त बसून राहतात. त्यावेळी त्यांच्या तोंडात असलेल्या जळवा पाणपक्षी खातात. अर्थात, आधुनिक काळात याचा कुठलाही पुरावा संशोधकांना आढळलेला नाही. मात्र एवढ्या प्राचीन काळीसुद्धा सजीवांमधल्या सहजीवनाचा विचार कोणाकडूनतरी होत होता. याचा अर्थ ecology चा निरीक्षणाच्या माध्यमातून अभ्यास त्या काळीही होत होता. अॅरिस्टॉटल आणि त्याचा शिष्य थिओफ्रॅस्टस यांनीही वनस्पती आणि प्राण्यांच्या वर्तनावर भरपूर निरीक्षण करून त्यांची नोंद करून ठेवली, ज्यायोगे आधुनिक ecology चा पाया रचला गेला. अँटनी वॅन ल्युवेनहॉक, रिचर्ड ब्रॅडली, अलेक्झांडर हम्बोल्ट, जेम्स ह्युटन, जीन लॅमार्क, हॅन्स रिटर हे सतराव्या शतकातले आधुनिक ecology चा पाया रचणारे सजीवसृष्टीचे अभ्यासक होत. 'वर्गीकरणशास्त्राचा जनक' (Father of Taxonomy) असं ज्याला म्हटलं जातं त्या कार्ल लिनियस नावाच्या वनस्पतिशास्त्रज्ञाने सजीवांमधल्या आंतरक्रियांना Economics of Nature असे संबोधले. या कार्ल लिनियसच्या सिद्धांताचा प्रभाव पुढे चार्ल्स डार्विनवर पडला, ज्याने जगप्रसिद्ध आणि जगन्मान्य उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. त्यानेही त्याच्या The Origin of Species या पुस्तकात Economy or Polity of Nature ही संज्ञा वापरली होती. १७८९ साली गिल्बर्ट व्हाईट याचे Natural History of Selborne हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकामुळे ecology ही स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली. १९०५ साली फ्रेडरिक क्लेमेंट याचं ecology वरचं अमेरिकेतलं पाहिलं पुस्तक प्रकशित झालं. क्लेमेंटने मांडलेल्या सिद्धांतांना हेनरी ग्लिसन याने आव्हान दिलं. १९२५ च्या सुमारास चार्ल्स एल्टन याने Animal Ecology या पुस्तकात अन्नसाखळीची संकल्पना सर्वप्रथम मांडली. १९४२ साली रेमंड लिंडमन याने अन्नसाखळीवर (trophic dynamics) एक शोधनिबंध प्रकाशित केला, ज्यामुळे पुढील संशोधनास मोठी चालना मिळाली. १९५० साली रॉबर्ट मॅकार्थर याने ecology ची गणितीय पद्धतीने मांडणी करण्यास सुरुवात केली. १९६० च्या दशकापासून औद्योगिक प्रदूषणाची जाणीव जगभर वाढू लागली आणि पर्यावरण चळवळींचा जन्म झाला. त्यामुळे पृथ्वी आणि मानवजात वाचवण्याच्या उदात्त दृष्टिकोनातून जगभर ecology चा अभ्यास होऊ लागला. १९६२ साली जीवशास्त्रद्न्य रॅचेल कार्सन यांचं Silent Spring हे पुस्तक प्रकशित झालं, ज्यात कीटकनाशकांचा पक्ष्यांवर होणार परिणाम सर्वप्रथम जगासमोर आला. तेव्हापासून ecology च्या अभ्यासाला नवी गती मिळाली.

                                                                                                                                                                                                                                                       - हर्षद तुळपुळे

                                                                                                                                                                                                                                     content@yuvaviek.com 

लेखक: 

No comment

Leave a Response