Primary tabs

पदाकांमागचे 'असामान्य' सामान्य

share on:

आशियाई स्पर्धेतील आपल्या यशाकडे पाहताना तारतम्य ठेवणे गरजेचे ठरते. या पदकांपैकी फारच कमी पदके जागतिक स्तरावरील कामगिरी करत मिळालेली आहेत. असे असले तरी, सहभागी खेळाडूंची जिद्द ही दाद देण्यासारखी आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून आणि त्यातही ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंनी अथक परिश्रम घेत जी कामगिरी केलेली असते, तिची नोंद घेणे आवश्यक ठरते. अशा काही खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

इंडोनेशियामध्ये अलीकडेच पार पडलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताने सुवर्णपदकांची संख्या आणि एकूण पदकांची संख्या या बाबतीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली, तरीही 'निराशाजनक' असेच तिचे एकूण वर्णन करावे लागेल. कारण 1951च्या दिल्लीतील स्पर्धा व 2018 मधील या स्पर्धा यांच्यामधल्या कामगिरीमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. नेमबाजीसह विविध क्रीडाप्रकारांमध्ये अनेक भारतीय खेळाडू जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी करत असले, तरी त्यांच्यापैकी अनेक जण या वेळी साफ अपयशी ठरले. काही जण पदकही मिळवू शकले नाहीत. अन्यथा भारताची पदकसंख्या आणखी वाढू शकली असती. याशिवाय ही स्पर्धा हॉकीच्या व विशेषत: कबड्डीच्या निकालांच्या बाबतीत झोप उडवणारी ठरली.

सर्वोत्तम कामगिरीच्या बाबतीत जागतिक पातळी आणि आशियाई पातळी यात बहुतेक क्रीडाप्रकारांमध्ये बराच फरक आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत आपले खेळाडू तुलनेने खोऱ्याने पदके मिळवत असतानाही जवळपास तशीच परिस्थिती असते. त्यापेक्षा आपल्याला आशियाई स्पर्धेत कमी पदके मिळतात हे पाहता राष्ट्रकुल स्पर्धांचा दर्जा कळू शकतो. विविध जागतिक स्पर्धांसह ऑॅलिम्पिक स्पर्धा गाजवणारा चीन आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट करतो यात आश्चर्य नसते. पदकसंख्येत उझबेकिस्तान, इराण आणि तैवान हे देशही आपल्यापेक्षा पुढे आहेत. म्हणूनच आशियाई स्पर्धेतील आपल्या यशाकडे पाहताना तारतम्य ठेवणे गरजेचे ठरते. या पदकांपैकी फारच कमी पदके जागतिक स्तरावरील कामगिरी करत मिळालेली आहेत. असे असले, तरी अतिशय सामान्य परिस्थितीतून आणि त्यातही ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंनी अथक परिश्रम घेत जी कामगिरी केलेली असते, तिची नोंद घेणे आवश्यक ठरते. अशा काही खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

उझबेकिस्तानचा ऑॅलिम्पिकविजेता हसनबॉय दुस्मातोव्ह याला हरवून भारताच्या अमित फंगल याने 49 किलो गटात बॉक्सिंगमधले सुवर्णपदक मिळवले खरे, परंतु त्यामागे फार मोठी स्फूर्तिदायक कहाणी आहे. पूर्ण दिवस भरण्यापूर्वीच जन्म होतेवेळी अमितचे वजन केवळ दीड किलो होते. मोठा झाल्यावरही तो शरीराने भरेना, तेव्हा रोहतकजवळ राहणाऱ्या त्याच्या आई-वडलांना काळजी वाटू लागली. त्यातच त्याने भावाचे पाहून बॉक्सिंग शिकण्याचा आग्रह धरला. वयाच्या बाराव्या वर्षी केवळ चोवीस किलो वजन असताना, घरचे त्याला त्यापासून परावृत्त करत असताना प्रशिक्षक अनिल धनकर यांनी मात्र त्याच्या चिवटपणाचा दाखला देत त्याला प्रोत्साहन दिले. बरे, या कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी होती? देशभरातील बहुसंख्य अल्पभूधारक शेतकऱ्यांपैकी एक. एक एकर जमीन. याने कुमार गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळवल्यानंतर मात्र आई-वडलांनी नातेवाइकांकडून व मित्रमंडळींकडून पैसे उधार घेऊन त्याची वाटचाल पुढे चालू ठेवली. प्रशिक्षणामधून तो कधी घरी आलाच, तर घरचे त्याला दूध आणि केळी याशिवाय काही अधिक देऊ  शकत नसत. बॉक्सिंगमध्ये कारकिर्द करण्याच्या स्वत:च्या इच्छेला मुरड घालून भाऊ  अजय याने सैन्यात नोकरी मिळाल्यावर अमितकडे लक्ष दिले. एक वेळ अशी होती की असलेले बॉक्सिंग ग्लोव्ह्ज फाटल्यावर नवे घेण्यासाठी तीन हजार रुपये नसल्यामुळे त्याने सहा महिने त्यांच्याशिवायच सराव केला. आता सुवर्णपदक मिळवल्यावर त्याची आई म्हणते की तो शरीराने लहान असला, तरी त्याने आपल्या सिंहासारख्या हृदयाने त्याची भरपाई केली आहे.

बंगालमधील जलपाईगुडीमध्ये जन्म झालेल्या स्वप्ना बर्मन हिचा पराक्रम असाच विलक्षण आहे. तिची आई तेथील चहाच्या मळयात काम करी, तर वडील रिक्षा चालवत. काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्यापासून वडील बिछान्याला खिळून आहेत. घरची गरिबी आणि घरात हिच्यासह तीन भावंडे. त्यामुळे खाण्यापिण्याची सदैव आबाळ. तिची गुणवत्ता ओळखली ती स्थानिक प्रशिक्षक सुकांत सिन्हा यांनी ती चौथीत असताना. तेथील स्पोर्ट्स क्लबकडून जेवढी मदत करणे शक्य होते, तेवढी त्यांनी केली. समोरची संकटे कमी होती की काय, म्हणून तिच्यासमोर निसर्गाचेच आगळेवेगळे आव्हान उभे होते, ते म्हणजे तिच्या दोन्ही पायांना असलेली प्रत्येकी सहा बोटे. त्यामुळे तिला तिच्या मापाचे बूट मिळणे अशक्य झाले. तिने मागच्या वर्षी भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते आणि आता या स्पर्धेतही त्याची पुनरावृत्ती केली. या क्रीडाप्रकारातील जागतिक दर्जाची कामगिरी साडेसात हजार गुणांच्या आसपास आहे. स्वप्नाने या स्पर्धेत जेमतेम सहा हजारांचा आकडा पार केला, हे पाहता आशियाबाहेर चमकदार कामगिरी करण्याच्या दृष्टीने गुणवत्तावाढीसाठी तिला आणखी बराच वाव आहे.

हरयाणाची कुस्तीपटू विनेश फोगटचे नाव तुलनेने परिचयाचे आहे. ती केवळ आठ वर्षांची असताना तिच्या वडलांची हत्या झाली होती. संकटे एकेक करून येत नाहीत. नंतर लगेचच तिच्या आईला कॅन्सर झाल्याचे उघड झाले. आईदेखील इतकी निश्चयी की, तिने तिचे उपचार मुलीच्या प्रशिक्षणाच्या आड येऊ  दिले नाहीत. तिच्या काकांनी विनेशला आपली मुलगी असल्यासारखे वाढवले. तिच्याकडून कसून सराव करून घेतला. आता तिने बबिता आणि गीता या काकांच्या मुलींपेक्षाही अधिक मोठे यश मिळवले आहे. 2016च्या ऑॅलिम्पिकमध्ये चीनच्या प्रतिस्पर्ध्याशी झालेल्या लढतीत गंभीररित्या जखमी झाल्यावर तिची कारकिर्द जवळजवळ संपुष्टात आली होती. डॉक्टरांनी याबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतरही जवळजवळ एक वर्षभर बिछान्याला खिळून राहिल्यानंतर तिने जिद्दीने सराव केला आणि मागच्या राष्ट्रकुल स्पर्धेत व या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. आता तिचे पुढचे लक्ष्य टोक्यो ऑॅलिम्पिक स्पर्धांचे आहे.

शेतकरी कुटुंबातील नाओरेम रोशोबिना देवी हिने ‘वुशु’ या भारतीयांसाठी नव्या असलेल्या प्रकारातील साठ किलो गटात कांस्यपदक मिळवले. बल्गेरियामध्ये 2016मध्ये झालेल्या कुमारांच्या जागतिक स्पर्धेत व 2017मध्ये आशियाई कुमारांच्या स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले होते. पदक मिळवल्यानंतर पंतप्रधानांनी मणिपूरच्या या खेळाडूचे विशेष अभिनंदन केले.

द्युती चंद या ओदिशातील वेगवान धावपटूची कहाणी खरोखर आगळीवेगळी आहे. तिचा जन्म तेथील गरीब विणकर परिवारातला. सात बहिणींपैकी ती तिसरी. सर्वात मोठी बहीण सरस्वती शाळेत असताना धावपटू होती. शाळेतील एका शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले हे त्यामागचे एक कारण आणि शाळेत तिला मध्यान्ह भोजन मिळे, हे दुसरे. बहिणीच्या धावण्यामुळे द्युतीला त्यात रस निर्माण झाला. 2013 मध्ये ती जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाली. त्याच वर्षी तिने शंभर व दोनशे मीटर धावण्याच्या प्रकारांमध्ये राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. 2014 मध्ये आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवल्यानंतर राष्ट्रकूल स्पर्धेत मात्र तिला धक्कादायकपणे प्रवेश नाकारण्यात आला. तिच्या वैद्यकीय चाचणीत तिला हायपर अॅड्रोजेनिझम असल्याचे कळले. यात ‘टेस्टोस्टेरॉन या पुरुषी संप्रेरकाचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे अशा महिला इतर महिला स्पर्धकांपेक्षा अधिक कार्यक्षम असल्याचे समजले जाते. त्यामुळे त्यांना इतर महिला खेळाडूंबरोबर स्पर्धेत भाग घेऊ दिला जात नाही. परिणामस्वरूप राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ तिला मागच्या आशियाई स्पर्धांनाही मुकावे लागले. आपल्या प्रभावी कामगिरीमुळे आशियाची स्टार जलद धावपटू अशी ख्याती होऊ  घातलेल्या द्युतीची कारकीर्दच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला. तिने याविरुध्द क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादाकडे दाद मागितली. कॅनडातील एका संस्थेने तिला याकामी मोफत मदत केली. या संप्रेरकामुळे महिला खेळाडूंची कामगिरी उंचावते हे सिद्ध होईपर्यंत या लवादाने आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स संघटनेच्या या नियमाला दोन वर्षांची स्थगिती दिली. त्यामुळे या वेळच्या आशियाई स्पर्धेत द्युती भाग घेऊ  शकली व तिने महिलांच्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. आता हे सारे मार्गी लागले असे वाटत असले, तरी तिच्या कसोटीच्या काळात तिला मोठया अग्निदिव्याला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा एक प्रशिक्षक ती द्युती चंद नव्हे, तर 'द्युती सिंग' असल्याचे तिला म्हणाला. संघटनेच्या डॉक्टरने तिच्या तपासणीचा अहवाल सार्वजनिक होणार नाही, याची काळजी न घेतल्यामुळे प्रसारमाध्यमांनी द्युतीला 'ती पुरुष आहे की स्त्री' असा अभद्र प्रश्न विचारत तिची अवहेलना केली. नंतर मात्र राष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या अधिकाऱ्यांना शहाणपण सुचले असावे व त्यांनी तिला मदत केली. या साऱ्यामुळे तिची एकूणच मानसिक अवस्था पाहता तिने मिळवलेले रौप्यपदक फार मोलाचे आहे. द्युतीप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेच्या ‘कॅस्टर सेमेन्या’ या आठशे मीटर धावप्रकारात जागतिक पातळीवर पदके मिळवणाऱ्या अॅथलेटलाही आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स संघटनेने याबाबतीत लक्ष्य केलेले दिसते.

 दत्तू भोकनळ या नाशिकच्या खेळाडूचे नाव प्रकाशझोतात आले ते रियो ऑॅलिंपिकमध्ये. त्यापूर्वी २०१३च्या इंचन आशियाई स्पर्धेत तो पाचवा आला होता. ऑॅलिम्पिकमध्ये तो पदकापासून बराच दूर होता, तरी रोइंगमध्ये भारतीय खेळाडूने केलेली ती सर्वोत्तम कामगिरी होती. तो रियोला गेला असता इकडे त्याची आई अपघातामुळे कोमामध्ये गेली होती. त्यामुळे त्याचे मन एकाग्र होणे फार कठीण होते. नंतर तो मानसिक नैराश्याचा बळी ठरला. त्याचे सहकारी आणि प्रशिक्षक यांच्या अथक प्रयत्नांनी त्याची कामगिरी बहरू लागली. या वेळी त्याच्या वैयक्तिक क्रीडाप्रकाराच्या वेळी तो आजारी पडला आणि अंतिम फेरीत त्याचा अखेरचा क्रमांक आला. तरी सांघिक स्पर्धेत ‘क्वाड्रपल स्कल्स’ या प्रकारात त्याने सुवर्णपदक मिळवले. भारतात रोइंग हा खेळ सामान्यांसाठी नाही. स्पर्धात्मक पातळीवर खेळायचे, तर आवश्यक त्या साहित्याची किंमत पाच लाख रुपयांच्या घरात जाते. शिवाय हा खेळ फारसा लोकप्रिय नसल्यामुळे काही ठरावीक ठिकाणीच खेळला जातो. त्यातही लष्करामध्ये याचे प्रमाण अधिक. त्यामुळे लष्करात भरती होईपर्यंत अनेकांना हा क्रीडाप्रकारच माहित नसतो. तेथे गेल्यानंतर त्यांचे गुण हेरून मग त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होते. दत्तू, त्याचा सहकारी स्वर्णसिंग विर्क यांची आणि इतरांची कथाही जवळजवळ तशीच. स्वर्ण सिंगने २०१३ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. आताच्या स्पर्धेच्या निमित्ताने या खेळाडूंच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात एक मोठा वाद समोर आला. संघाचे आधीचे अमेरिकन प्रशिक्षक व आताचे रुमानियाचे प्रशिक्षक यांच्या प्रशिक्षण पद्धतीत फार फरक आहे. आताचे प्रशिक्षक खेळाडूंकडून अतिपरिश्रम करून घेतात, ही त्यांच्याबाबतची मोठी तक्रार आहे. इतके की, एकही खेळाडू त्यामुळे संपूर्णपणे तंदुरुस्त राहत नाही. आताच्या प्रशिक्षकांची मुदत टोक्यो ऑॅलिम्पिकपर्यंत आहे. आणि त्यांची नेमणूक करून मोठी चूक केल्याचे भारतीय रोइंग संघटनेचे पदाधिकारी आता मान्य करत आहेत.

बजरंग पुनियाचे वडील स्वत: पैलवान होते. मात्र गरिबीमुळे त्यांना त्यात फार प्रगती करता आली नाही. आपल्या मुलासाठी मात्र ते बसऐवजी सायकलने प्रवास करत बचत करू पाहत. एरवी आपण पैलवानांच्या आहाराबाबत वाचतो, पण बजरंगच्या नशिबात तसे काही नव्हते. परंतु तो कुस्तीमध्ये चमक दाखवतो आहे हे पाहिल्यापासून त्याच्या साधनेत व्यत्यय येऊ  नये म्हणून कुटुंबाचे सारे निर्णय आजही त्याच्याभोवती फिरतात. आशियाई पातळीवरचे पदक बजरंगसाठी नवे नाही. मागच्या आशियाई स्पर्धांमध्ये त्याने रौप्यपदक मिळवले होते. २०१३ मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याने कांस्यपदकही मिळवले होते. आताच्या सुवर्णपदकाचे वैशिष्टय हे की, त्याने अंतिम फेरीत ज्याला पराभूत केले, त्या जपानी प्रतिस्पर्ध्याकडून त्याचा मागच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत पराभव झाला होता. बजरंगने आताचे सुवर्णपदक दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले. तो आता केवळ २४ वर्षांचा असल्यामुळे आगामी काळात त्याच्याकडून आणखी चमकदार कामगिरीची अपेक्षा ठेवता येईल.

पानिपतजवळच्या एका खेडयातील नीरज चोप्रा आता केवळ वीस वर्षांचा आहे. तरी त्याची सुवर्णपदकविजेती ८८ मीटर लांब भालाफेक रौप्यपदक विजेत्यापेक्षा तब्बल चार मीटर्सने अधिक आहे. अर्थात यातील जागतिक विक्रमाची कामगिरी शंभर मीटरच्या आसपास असल्याने त्याला आणखी परिश्रम घ्यावे लागतील. २०१६ मध्ये त्याने जागतिक युवा स्पर्धेत विश्वविक्रम केल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. चेक रिपब्लिकचा माजी विश्वविक्रमवीर यान झेलेझ्नी याची भालाफेकीतली लय यूटयूबवर पाहून त्याने स्फूर्ती घेतली आणि तो या क्रीडाप्रकारात कारकिर्द करण्यास उद्युक्त झाला, हे पाहिले तर ग्रामीण भागात राहून इंटरनेटचा कसा चांगला उपयोग करता येतो हे कळू शकते. आताच्या आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन समारंभातील संचलनात नीरजने भारतीय चमूचे नेतृत्व केले होते.

अलीकडेच जागतिक युवा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत सर्वांची वाहवा मिळवणाऱ्या हिमा दासने २०० मीटर स्पर्धेत धावण्यास सुरुवात करताना चूक झाल्यामुळे निराशा केली, तरी नंतर ४०० मीटर स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेतील तिची ५१ सेकंदांची कामगिरी वैयक्तिक पातळीवर सर्वश्रेष्ठ असली, तरी यातील जागतिक विक्रम ४७.६०  सेकंदांचा आहे हे पाहता तिला आणखी बरीच मजल मारायची आहे हे स्पष्ट आहे. ती आता केवळ १८ वर्षांची असल्यामुळे तिच्या कामगिरीमध्ये आगामी काळात थोडीफार सुधारणा होईलच. हिमा आसाममधील एका अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी असून ग्रामीण भागातून येऊन जागतिक स्तरावर लक्षवेधक कामगिरी करणे निव्वळ प्रशंसनीय आहे. यात तिला पारखणाऱ्या निपन दास या तिच्या प्रशिक्षकाचाही मोठा वाटा आहे. तिच्या स्पर्धेच्या आधी तिच्या लघवीच्या नमुन्यात काही आक्षेपार्ह पदार्थ सापडल्याची बातमी आसाममधील स्थानिक वाहिनी सतत दाखवत होती. या खोटया बातमीमुळे २०० मीटर स्पर्धेत धावायला सुरुवात करण्यापूर्वी तिच्यावर प्रचंड मानसिक दडपण होते आणि त्यामुळे धावण्यास सुरुवात करताना तिच्याकडून चूक झाली, असे ती म्हणाली. माध्यमे बातम्या देताना तारतम्य दाखवत नाहीत, याचे आणखी एक उदाहरण वर दिले आहे.

इयत्ता दहावीत शोभेल अशा वयातला मुलगा हातात पिस्तूल घेतो, याची खरे तर काळजी वाटायला हवी. मीरतजवळ राहणाऱ्या सोळा वर्षांच्या सौरभ चौधरीने १०  मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चक्क सुवर्णपदक मिळवले. आर्थिक परिस्थिती वाईट नसली, तरी त्याची नेमबाजीची सुरुवात सुखासुखी झाली नाही. वडील त्याच्या या 'छंदाच्या' अगदी विरुद्ध होते. त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अशा मताचे. मात्र याने हट्ट करून खाणेच सोडले, तेव्हा मात्र पालकांना त्याचा हट्ट मानावा लागला. त्यानंतर केवळ तीन वर्षांमध्ये त्याने ही कामगिरी केली. इकडे सौरभची अशी कहाणी, तर त्याच्यापेक्षाही वयाने लहान असलेल्या मीरतच्याच पंधरा वर्षांच्या शार्दूल विहान याने डबल ट्रॅपमध्ये रौप्यपदक मिळवण्याचा पराक्रम केला.

दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकणाऱ्या दीपक कुमारची कथा अशीच स्फूर्तिदायक आहे. तो हवाई दलात आहे. यापूर्वी दुहेरी प्रकारांमध्ये त्याने जागतिक स्पर्धेतही पदक मिळवले असले, तरी आताचे हे पदक त्याचे एकटयाचे आहे. लहानपणी व्रात्य असल्यामुळे आणि एकूणच भारतीय शिक्षण पद्धतीवर विश्वास असल्याने त्याच्या आईवडलांनी त्याला डेहराडूनमधल्या गुरुकुलात दाखल केले होते. अशी पार्श्वभूमी असल्यामुळे की काय, त्याने आईवडलांना यजुर्वेदातील पंक्ती म्हणून दाखवून आपल्या यशाचा आनंद साजरा केला. मागे एका स्पर्धेत आलेल्या अपयशानंतर तो रागाने बेभान होऊन दहा किलोमीटर धावला. इतके की, नाकातून रक्त येऊ  लागले. आपल्या रागावर नियंत्रण मिळवायला हवे, हे त्या वेळी त्याच्या लक्षात आले. मध्यंतरी त्याला स्पर्धेच्या दरम्यान मनाची एकाग्रता सांभाळणे जड जाऊ  लागले. प्रत्येक स्पर्धेत यशाच्या जवळ जात असताना अखेरच्या क्षणी कच खाल्ल्यामुळे अपयशाचा सामना करावा लागे. निवृत्त होण्याचा निर्णय घेईपर्यंत वेळ आली. मात्र यावर उपाय म्हणून त्याने इंटरनेटवरून एक मानसोपचारतज्ज्ञ शोधला. बरे, तोही भारतीय नव्हे, तर अमेरिकेतला. डॉ. पॅट्रिक कोहन. ते क्रीडाविषयक मानसोचारतज्ज्ञ आहेत. याने ईमेलवर त्यांना सल्ला विचारला. त्यांचे उत्तर येण्याची अपेक्षाही नव्हती. मात्र त्यांनी सविस्तर उत्तर पाठवले व गेल्या सव्वा वर्षापासून त्यांचा हा बिनपैशाचा सल्ला चालूच आहे. कोहन यांचे नाव वाचल्यावर कुतुहल वाटले म्हणून शोधले, तर परस्परसंबंधांचा हा सुंदर आविष्कार समोर आला.

केवळ ज्यांनी पदके मिळवली त्यांचीच नोंद घेतली जावी असे नाही. पदक न मिळालेल्यांच्याही संघर्षकथा असू शकतात. दुर्दम्य इच्छाशक्ती असली तर आर्थिक परिस्थिती, शिक्षण आणि वय हे प्रगतीच्या आड येत नाहीत, हे या उदाहरणांवरून कळू शकते. पदक हा निकष न ठेवताही आपण पूर्वी होतो त्या सामाजिक-आर्थिक स्थितीशी दोन हात करून जेथे पोहोचू शकलो, याचे मानसिक समाधान या खेळाडूंना नक्की असणार.

जागतिक पातळीवरील कामगिरीचा दर्जा आणि भारताची एकूणच कामगिरी हा निश्चितपणे काळजीचा विषय आहे. विशेषत: विविध क्रीडाप्रकारांमधील महासत्तांच्या बरोबरीने कामगिरी करणाऱ्या चीनच्या तुलनेत आपली कामगिरी फारच सर्वसाधारण ठरते. वर उल्लेख केलेल्या बहुतेक उदाहरणांमध्ये या खेळाडूंनी अंत:प्रेरणेने या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. त्यांना या क्षेत्रात जाण्याची प्रेरणा द्यावी, अशी त्यातील बहुतेकांच्या पालकांची परिस्थिती नव्हती. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता कष्ट घेण्याची तयारी असलेल्या या हिऱ्यांची कथा अनेकांना स्फूर्तिदायक ठरू शकते. मात्र ती पदकतालिकेतील संख्येमध्ये अडकून न राहता अधिकाधिक शाळकरी मुलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शिक्षण आणि स्पर्धात्मक खेळ हे एकमेकांबरोबर जाऊच शकत नाहीत ही आपल्याकडे असलेली पक्की धारणा आपल्या असमाधानकारक कामगिरीला कारणीभूत आहे.

पूर्वीपेक्षा सरकारकडून क्रीडाक्षेत्रावर केला जाणारा खर्च बराच वाढलेला असला, तरी जागतिक पातळीवरील स्पर्धा एवढी वाढलेली आहे की तो पुरेसा नाही हे स्पष्ट आहे. शिवाय या खर्चाचा नेमका किती फायदा थेट खेळाडूंना पोहोचतो व त्यापैकी किती बाबूंवर खर्च होतो, याचा आढावा घेणे गरजेचे आहे. आताच्या प्रस्थापित व उगवत्या ताऱ्यांचे कौतुक आहेच, मात्र भारतीय क्रीडाक्षेत्राने नव्याने उभारी घेणे गरजेचे आहे हे निश्चित. तूर्त या साऱ्या मर्यादा असूनही आपले सर्वस्व आपल्या ध्येयासाठी देणाऱ्या आपल्या चमूचे कौतुक. आपल्या पदराला व खिशाला चाट लावून आपल्या मुला-मुलीच्या ध्येयात शक्य तेवढी मदत करणाऱ्या आणि आपण किमान त्यांच्या ध्येयात अडसर बनणार नाही याची काळजी घेणाऱ्या पडद्यामागच्या शेकडो आई-वडलांची व भावाबहिणींची नावे आपल्याला कदाचित कळणारही नाहीत.

परिस्थितीशी दोन हात करून आपले लक्ष्य गाठणाऱ्या या खेळाडूंच्या विजिगीषू वृत्तीला नमन!

- राजेश कुलकर्णी 

content@yuvavivek.com

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response