Primary tabs

महाराष्ट्रधर्म! : डॉ. अपर्णा बेडेकर

share on:

परित्राणाय साधूनाम | विनाशायच दुष्कृताम |

धर्मसंस्थापनार्थाय | संभवामि युगे युगे ||

 

भगवद्गीतेतल्या या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अवतार घेण्याचं प्रयोजन सांगतात. साधूंचे, सज्जनांचे रक्षण करून आणि दुष्ट शक्तींचा संहार करून धर्मसंस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो अशी जणू ग्वाही देतात.

 

धर्मसंस्थापना समजून घेण्यासाठी आधी, धर्म समजून घेतला पाहिजे. धर्म हा शब्द धृ-धारण करणे या धातूपासून निघाला असून “धर्मो धारयते प्रजाः” .. अर्थात, जो सर्व प्रजेला धारण करतो, तो धर्म अशी धर्माची व्याख्या केली आहे. याकरताच, धर्म जर सुटला तर, प्रजेची अवस्था सुकाणू नसलेल्या आणि महासागरात भरकटलेल्या एखाद्या जहाजासारखी होईल. किंवा सूर्याच्या आकर्षणशक्तीपासून सुटून गेलेल्या ग्रहमालेसारखी अनियंत्रित होईल. या अनियंत्रित, भरकटलेल्या व्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी प्रत्यक्ष देवाला यावं लागतं. धर्म शोचनीय होऊन चालत नाही, उलट तो सुप्रतिष्ठित करावा लागतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की, युगानुयुगे माझे दश-अवतार होतील, आणि, धर्मसंस्थापना हे या अवतारांमागील प्रयोजन असेल...धर्म हा इतका महत्त्वाचा..!

 

‘आचारधर्म'

 

तुझा धर्म कोणता असा प्रश्न एखाद्या माणसाला आपण विचारला, तर पारलौकिक कल्याणासाठी तू कोणत्या मार्गाने जातोस? असाच या प्रश्नाचा सहज अर्थ घेऊन तो माणूस आपल्याला वैदिक, बौध्द, जैन, ख्रिस्ती, इस्लाम यापैकी काही उत्तर देईल. हे उत्तर योग्यच आहे, परंतु या प्रश्नाला अजून एक बाजू आहे. धर्माचा अर्थ केवळ या पारलौकिक उत्तरासोबत संपत नाही; कारण त्याला लौकीकाचीही बाजू आहे. धर्माला पारलौकिक नि:श्रेयसासोबत अभ्युदयाची लौकिक भरजरी किनार आहे. म्हणूनच, धर्म या शब्दाचा केवळ पारलौकिक धर्म असा अर्थसंकोच न करता, राजधर्म, क्षात्रधर्म, प्रजाधर्म, राष्ट्रधर्म, ज्ञातीधर्म, कुलधर्म, मित्रधर्म आदी ऐहिक नितीधार्मांचाही विचार त्यासोबत निश्चितपणे केलाच पाहिजे. या सगळ्या नीती रोजच्या जीवनव्यवहारात वापरणं, म्हणजे, धर्माने वागणं. भारतीय तत्त्वज्ञानाने असा प्रकारे धर्माची सांगड ही मनुष्याच्या आचार विचारांशी, सद्वर्तनाशी, सदव्यवहारांशी, विवेकाशी घातली आहे. धर्मपालन ही फावल्या वेळात, आयुष्याच्या उत्तरार्धात, किंवा संपूर्ण जगाशी फारकत घेऊन करायची गोष्ट नव्हे. धर्म हा मनुष्याचा रोजचा दिनक्रम आहे, आचारधर्म आहे.

 

आहार निद्रा भय मैथुनं च | सामान्यमेतद पशुभिर्नराणाम |

धर्मो हि तेषाेमधिको विशेषः | धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ||   

 

आहार, निद्र, भय आणि मैथुन या चार गोष्टी पशुपक्षी व मनुष्यप्राणी यात समान आहेत. मनुष्य या सर्वांपासून वेगळा आणि अधिक उत्क्रांत समाजाला जातो, तो त्याच्या धर्माचरणामुळे, नीतीमत्तेमुळे! नीती शिकवणारा हा आचारधर्म जर मनुष्याच्या जीवनातून काढून टाकला, तर मनुष्य केवळ पशू समान उरेल. म्हणून मनुष्याच्या जीवनात हा आचारधर्म महत्त्वाचा!

 

‘युगधर्म’

 

कृत, त्रेता, द्वापर, व कली या चारही युगांची जीवनप्रणाली वेगवेगळी राहिली...धर्मातली सनातन मूल्ये जरी शाश्वत राहिली, तरी काळानुरूप त्यात काही बदलही होत गेले. धर्म ही एक अविरत प्रवाही अशी धारा असल्याने, प्रत्येक युगातील बदलणाऱ्या जीवनप्रणाली प्रमाणे धर्मही बदलत राहिला. धर्म साचेबद्ध , संकुचित झाला नाही, उलट बदलत्या युगाप्रमाणे युगधर्म निर्माण होत राहिला. गेल्या शतकातील उदाहरण द्यायचं झालं तर, केशवपन ही धर्मसंमत आज्ञा गेल्या शतकात बंद झाली.जाचक रुढींच्या चौकटीत बंद झालेला धर्म प्रवाही झाला. स्थळ काळ परिस्थितीनुसार युगधर्म घडत गेला, त्या त्या युगाची धारणा हा युगधर्म करत राहिला. 

 

धर्म म्हणजे काय? आचारधर्मात किती व्यापक गोष्टी अंतर्भूत होतात? युगधर्म घडतांना सनातन धर्मतत्त्वे कायम राहून काळाला सामावून घेणारा एक युगधर्म उदयाला येतो. या विवेचनावर महाराष्ट्रधर्माची संकल्पना बेतलेली आहे. 

 

‘महाराष्ट्रधर्म’

 

सनातन धर्माच्या परंपरेतील महाराष्ट्रीय संतांच्या, भागवत धर्माच्या भक्ती परंपरेलाच अनुसरत महाराष्ट्रात सतराव्या शतकात महाराष्ट्रधर्म उदयाला आला. फार वैशिष्ट्यपूर्ण जडणघडणीतून हा धर्म उदयाला आला. सनातन वैदिक धर्माच्या आणि आदी शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या पायावर या धर्माची इमारत उभी राहिली. भक्तीसहित शक्तीची अनिवार्यता, रामकार्यासोबत राष्ट्र कार्याची चेतना हा या महाराष्ट्र धर्माने अनुसरलेला आचारधर्म म्हणता येईल. आणि पारतंत्र्याच्या युगात स्वधर्माचे, राष्ट्राचे पुनरुत्थान, त्यासाठी आवश्यक समाजकारण, राजकारण आणि संघटनात्मक प्रयत्न करून स्वातंत्र्य प्राप्ती हा या महाराष्ट्र धर्माचा युगधर्म म्हणावा लागेल.    

 

देवमात्र उच्छेदिला | 

आपला स्वधर्म बुडविला |

 

अशी परिस्थिती होती. देवालये, देवमूर्ती फोडल्या जात होत्या. या सत्तापिपासू राजकीय आक्रमकांनी धर्मावरही आक्रमण केले होते. शूर मराठे सरदार निजामाची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. म्हणजे हे आक्रमण मनोभूमीवरच घाला घालणारे होते. साहजिकच, आपण पारतंत्र्यात आहोत याचे शल्यच मनाला नव्हते. पारतंत्र्याला परतवून लावण्याची क्षात्रवृत्तीच निर्माण होत नव्हती. अत्याचार, अस्मानी दुष्काळाच्या झळा यामुळे, कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था ढासळत होती. सर्वात भयंकर गोष्ट अशी की, या सर्वावर उपाय म्हणून संन्यासधर्म स्वीकारावा अशी अकर्मण्यता मूळ धरू पाहत होती.    

 

अशा या काळात समर्थांनी महाराष्ट्राच्या क्षात्रवृत्तीला आवाहन केले. साद घातली...

 

मराठा तितुका मेळवावा | 

आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा ||

 

समर्थ म्हणाले, 'महाराष्ट्राच्या शूर वीरांनो काळाची पावले ओळखा. एकत्र या. ठकासी ठक आणि उद्धटासी उद्धट व्हा. अन्यायाचा, अत्याचाराचा प्रतिकार करा.'

 

देव मस्तकी धरावा | 

अवघा हलकल्लोळ करावा |

मुलुख बुडवावा की बडवावा | धर्म संस्थापनेसाठी ||

 

समर्थांनी महाराष्ट्र धर्माची प्रेरणा दिली. महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यात ही साद दुमदुमली. धर्म संस्थापना हे येरागबाळ्यांचे काम नव्हे. त्यासाठी क्षात्रवृत्तीला पर्याय नाही. अशा शूरांनी शस्त्र हाती घ्यावे. असा शूरांचा धर्म समर्थांनी सांगितला. 

 

यासोबत, समर्थांनी प्रापंचिकांचा धर्म सांगितला. सदाचाराने वागावे, निंद्य सोडून द्यावे, वाणी नम्र असावी, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, असा समर्थांनी सांगितलेला प्रापंचिकधर्म म्हणजे, कुटुंबव्यवस्था सावरणारा प्रपंच परमार्थाचा मेळ होता.

 

कुटुंब व्यवस्था सावरली तर चांगला समाज घडणार होता. अशा समाजातील धुरीणांसाठी समर्थांनी समाज धर्म सांगितला. नित्यानित्य विवेकाने वागावे, मठ मंदिरे देवालये यांची व्यवस्था उत्तम राखावी, अन्नछत्रे, विहिरी, पाणपोया, धर्मशाळा, आदी व्यवस्था निर्माण कराव्यात, ग्रंथवाचन अभ्यासू वृत्तीने करावे, सण समारंभ वैभवाने करावेत, सर्वांनी एकत्र यावे, या लोकसंग्रहातून सामाजिक चळवळी उभाराव्यात समर्थांचा हा मोलाचा उपदेश त्यांच्या व्यापक युगधर्माचाच भाग होता. 

 

मनोभूमिका उंचावलेल्या शक्ती बुद्धी युक्त समाजाने आता राजधर्म, राष्ट्रधर्म समजून घ्यावा.. परकीय परधर्मीय सत्तेला उलथवून टाकणारा प्रजाहितदक्ष राजा शिवाजी धर्मसंस्थापना करतो आहे त्या राष्ट्रकार्यात सर्व शक्तीनिशी सामील व्हावे अशी प्रेरणा दिली.

 

महाराष्ट्रधर्माची नाळ लोकजीवनाशी अशी घट्ट जुळलेली होती. दे

ऊळे म्हणजे नाना शरीरे | 

तेथे राहिजे सर्वेश्वरे 

असं म्हणणारा महाराष्ट्रधर्म विराट लोकजीवनाशी निगडित होता. धर्म ही संकल्पना केवळ देव आणि देवालयाशी निबद्ध नाही.. तर प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात असलेल्या चैतन्यात तोच दडलेला आहे, अशी विश्वव्यापक उपासना शिकवणाराहा धर्म होता. 

 

समर्थानी सांगितलेला महाराष्ट्रधर्म असा युगप्रवर्तक होता. या महाराष्ट्र धर्मात तत्त्वज्ञान होते, कृतिशीलता होती, समाजभान होते, राष्ट्र स्वतंत्र होण्याची अभिलाषा होती.. 

हा युगप्रवर्तक धर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म! पारलौकिक साधनेसोबत लौकिकातील संपन्नता, सदाचार म्हणजे महाराष्ट्र धर्म! आणि परंपरागत तत्त्वज्ञान, नीतिमूल्ये यांची वीण घट्ट करत राष्ट्राचे पुनरुत्थान करणारा धर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म!

 

म्हणूनच आजच्या महाराष्ट्रदिनी महाराष्ट्र धर्म राहिला काही |

तुम्हां कारणे|| 

 

ही ओवी सार्थ करणाऱ्या समर्थांचे आणि छत्रपती शिवरायांचे स्मरण करून त्यांच्या मार्गावरून जाणे हेच आपले कर्तव्य ठरते !

 

- डॉ. अपर्णा बेडेकर.

लेखक: 

No comment

Leave a Response