Primary tabs

सोशल मीडिया आणि लॉकडाऊन : सावनी

share on:

२०२० मध्ये कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले. त्या काळात बहुतांश जनतेला टीव्हीपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनिमे, वेबसेरीज आणि सोशल मीडिया याचा आधार वाटला. या काळात सोशल मीडियावर बऱ्याच घडामोडी घडल्या. आता सोशल मीडियात बऱ्याच वेबसाइट्स येतात, पण यू-ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे इथले महारथी. या सगळ्या वेबसाइटवर तरुणाई असते, पण विषय सारखे असले तरी, प्रत्येक ठिकाणी व्यक्त होण्याची पद्धत वेगळी, प्रतिसाद देणारा वर्ग वेगळा. आता या सगळ्या ठिकाणी लॉकडाउन २०२० मध्ये साधारण काय वातावरण होते ते पाहू.

 

यू-ट्यूब - सर्वांत जास्त प्रतिसाद मिळाला तो खाद्यपदार्थांच्या चॅनेल्सना. केक, ब्रेड यांसारखे एरवी घरी न होणारे पदार्थ लोकांनी घरी तयार केले. पूर्वीपासून यूट्युबवर जम बसवलेल्या लोकांनी कमी साहित्यात पदार्थ कसे बनवायचे त्याच्या सिरीज सुरू केल्या. बऱ्याच सुगरणींनी घरी बसल्या बसल्या स्वतःचे चॅनेल्स सुरू केले. यातील किती लोक नियमित व्हिडिओ टाकतील आणि प्रसिद्ध होतील हा भाग वेगळा. यानंतर चर्चेत होते फिटनेस चॅनेल्स. घरी आहोत तर, रोज व्यायाम करू, फिटनेस वाढवू या भावनेतून बऱ्याच लोकांनी व्यायामाला सुरुवात केली. या चॅनेल्सवर लॉकडाउन असल्याने कोणतेही डंबेल्स, मशिन्स न वापरता डिझाइन केलेले वर्कआउट चांगलेच गाजले. यात पाच दिवसांपासून ते एकवीस दिवसांचे फिटनेस चॅलेंजेस, ते चॅलेंजेस स्वीकारून त्यांचे रीव्ह्यू आणि या रिव्हयूवर चॅलेंज दिलेल्या फिटनेस ट्रेनरचा प्रतिसाद असे न संपणारे चक्र सुरू होते. अर्थात, हे सगळे आरोग्याच्या दृष्टीने योग्यच.

 

यूट्युबवर पॉडकास्ट नावाचा प्रकार या दरम्यान चांगलाच लोकप्रिय झाला. पाच-सहा किंवा त्याहून अधिक लोक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर एकत्र येतात आणि एखाद्या विषयावर बोलतात. कॉमेडी, राजकारण, सिनेमा, विज्ञान, क्रीडा, आरोग्य अशा कोणत्याही विषयावर या चर्चा होतात. आधी असे पॉडकास्ट नीट शूट व्हायचे, पण लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलवर सगळे एकत्र आले. या चर्चांमधून वेगवेगळी मते समजतात त्यावर कमेंट्सही करता येतात. लाइव्ह चर्चासत्रांमधील कमेंट्स तर फारच मनोरंजक असतात. टेक्नॉलॉजिपासून ते मेकअपपर्यंत सगळं काही शिकण्यासाठी यूट्युब हे चांगले आणि फ्री माध्यम आहे. बातम्यांचे चॅनेल्स आणि त्यावर स्वतःचे मत व्यक्त करणारे चॅनेल्स बरीच पाहिली जातात. पण यात माहिती आणि बातमीपेक्षा एखाद्या ठरावीक विचारसरणीचे उदात्तीकरण करायचा प्रकार जास्त असतो. २०२० मध्ये अशा बऱ्याच घडामोडी घडल्याने या चॅनेल्सला बरेच रीव्हयू मिळाले.

 

फेसबुक - फेसबुक आता तरुणाईचे राहिले नाहीये. पस्तीशीपुढील वर्गाने यावर कब्जा केलाय. मध्यमवयीन लोक फेसबुकवर मुख्यतः लिहायला आणि चांगले लिखाण वाचायला येतात. पोस्ट्स, मिम्स याचा आधार घेऊन चालू घडामोडींवर लोक व्यक्त होत असतात. लॉकडाउनमध्ये बऱ्याच लोकांनी परत लिखाण सुरू केले. फक्त नातेवाइक, मित्रमंडळींसाठी पोस्ट्स लिहिणाऱ्यांनी सर्वांसाठी लिखाण सुरू करून बरेच फॉलोअर्स मिळवले. चित्रकला, पाककला, विणकाम यासारख्या छंदांकडे लोक परत वळले. आपल्या कलाकृतींचे फोटोज पोस्ट करून लोकांकडून कौतुक करवून घेतले. काहींनी फेसबुकचा उपयोग नवीन व्यवसाय, युट्युब चॅनेल्स, पुस्तके, कोर्सेस यांच्या प्रसिद्धीसाठी केला. वेगवेगळे फोटोज पोस्ट करायचे चॅलेंजेस दिले गेले. लाइव्ह सेशन्सचे प्रमाण प्रचंड वाढले. या लाइव्ह सेशन्समध्ये कथा, कविता सादर करणे, एखाद्या विषयावर चर्चा करणे, पॉडकास्ट याचा समावेश होता. लोक घरीच असल्याने प्रतिसादही जास्त मिळाला. या सगळ्यामागे एकाच विचार होता, 'सध्या बाहेर सुरु असलेल्या भयानक परिस्थितीपासून स्वतःला जपायचे, कुठेतरी मन रमवायचे. सारख्या विचारांच्या लोकांना व्यक्त व्हायला, चर्चा करायला फेसबुक अतिशय उत्तम व्यासपीठ आहे. निरपेक्ष भावनेने व्यक्त होणाऱ्या, संवाद साधणाऱ्या लोकांना इथे बरेच फ्रेंड्स मिळाले, पण काही गैरफायदा घेणारेही आहेत, त्यांना वेळीच टाळता यायला हवे. बऱ्याचदा यावरून वादविवाद, कमेंट्सची युद्धे होतात, पण त्यामुळे लोक व्यक्त होतात. समोरच्याला आपले विचार पटवून देताना आपलेच विचार स्पष्ट होतात. लॉकडाउन संपल्यावर बरेच फेसबुक मित्र-मैत्रिणी एकमेकांना प्रत्यक्षातही भेटले, नंतरही भेटतील. यातील सगळ्याच लोकांची मैत्री टिकेलच असे नाही, पण आपल्या विचारांशी आणि बौद्धिक पातळीशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीसोबतचा संवाद खूप अमूल्य असतो. आपल्यासारख्या विचारांचे लोक आहेत हे पाहूनही खूप समाधान मिळते. लॉकडाउन दरम्यान फेसबुकवर सगळे एकमेकांना मानसिक आधार देत होते. अगदी अनोळखी लोकांच्या सकारात्मक पोस्ट्स, कमेंट्समुळे बऱ्याच लोकांचा ताण कमी झाला. अनेक नावाजलेले डॉक्टर्स, फार्मसी क्षेत्रातील नामवंत वैज्ञानिक नियमितपणे फेसबुकवर शास्त्रीय माहिती लिहित होते, व्हिडिओ पोस्ट करत होते. तसेच कोव्हिडमधून बरे झालेल्या लोकांच्या अनुभवांमुळे या रोगाबद्दलची भीती कमी व्हायला मदत झाली. वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या लोकांच्या पोस्ट्समुळे अगदी खरी परिस्थिती कळत होती आणि आपण एकटे नाही ही भावना हळूहळू मजबूत होत गेली. 

 

इंस्टाग्राम - तरुणाई इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय आहे. लॉकडाउनदरम्यान सेलेब्रिटिनी घरातील कामे करतानाचे, व्यायाम करतानाचे व्हिडिओ पोस्ट केले. इंस्टाग्रामवर फेसबुकइतके गंभीर वातावरण नसते. वेगवेगळ्या गाण्यांचे डान्स चॅलेन्जेस झाले. जवळपास सगळे लोक घरी स्वयंपाक आणि इतर कामे करत असल्याने त्याचे फोटोज स्टोरीजमध्ये असायचे. रिल्सच्या माध्यमातून बऱ्याच सेलिब्रिटीजनी कोव्हिडबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओ टाकले. अगदी वीस सेकंद हात कसे धुवायचे इथपासू, तर मास्क कसा वापरायचा इथपर्यंत. लॉकडाउनचा फारसा फरक ज्यांच्या आर्थिक परिथितीवर होणार नाही असा वर्ग आणि वयोगट इथे जास्त असल्याने थोडं आनंददायी वातावरण होतं.

 

ट्विटर - ट्विटरची वैशिष्ट्ये म्हणजे शब्दमर्यादा आणि ट्रोलिंग. विषय कोणताही असो, त्यावर विनोदी, गंभीर अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया असतात. राजकारण हा इथे चघळला जाणारा मुख्य विषय. २०२० मध्ये जगभरातील सर्वच राजकारणी लोकांवर दडपण होते. कोव्हिडच्या राक्षसाचा सामना करायचे. राजकारण्यांनी आपापल्या परीने, भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतले. प्रत्येक निर्णयानंतर सगळ्या स्तरातून सगळ्या प्रकारची मतं ट्विटरवर पहायला मिळतात, त्या निर्णयाशी संबंधित लोकांना टॅग करून. सामान्य जनता ट्विटरवर फार सक्रिय नाही, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असेल, तर ट्विटर उत्तम. इथे फेसबूकसारखे घरगुती किंवा इंस्टाग्रामसारखे पार्टीचे वातावरण नसते, तर ऑफीससारखे वातावरण असते. एकमेकांवर कुरघोडी करणे, ट्रोल करणे तर नेहमीचेच! लॉकडाऊनदरम्यान कोव्हिडसंदर्भात महत्त्वाची माहिती, नवीन रेग्युलेशन हे अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून लोकांपर्यंत पोहोचवले गेले.

 

एका दिवसात कोणालाही प्रसिद्ध किंवा बदनाम करायची शक्ती सोशल मीडियामध्ये आहे. युट्युबवर कमेंट्समध्ये व्यक्त होणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे आणि चॅनेल्स त्यामानाने कमी. पण फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर स्वतःच्या अकाउंटवरून पोस्ट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हे तीन सोशल मीडिया काहीसे वेगळे आहेत. लॉकडाऊनच्या काळात या सोशल मीडियामुळे लोक जोडले गेले, संपर्कात राहिले, मन मोकळं करायला शिकले. लॉकडाऊनमध्ये कितीतरी लेखक, युटूबर्स, कवी, संगीतकार, गायक, व्यावसायिक जन्माला आले, यातील काही पुढे टिकतील, काही टिकणार नाहीत. वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या लोकांना मदत करायला, औषधे, ऑक्सिजनबेड्स पुरवायला आजही सोशलमीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांमुळे मनोधैर्य कमी होऊ शकते, पण त्या बातम्यांमधील सत्य पडताळते आता सोपे झाले आहे. सामान्य माणसांसाठी अजून तरी हे दुधारी शस्त्र नाहीये, योग्य वापर जमायला हवा! सोशल मीडियाचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत, जे आता सर्वांना माहीत आहेत. पण या महामारीच्या काळात ज्या आभासी जगामुळे आपल्या सर्वांचे जगणे सुसह्य झाले त्या जगाचे आभार!!

 

- सावनी

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response