Primary tabs

संवेदनशील दिग्दर्शकाची ‘एक्झिट’

share on:

संवेदनशील दिग्दर्शकाची ‘एक्झिट’

सुमित्रा भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

(१२ जानेवारी १९४३ – १९ एप्रिल २०२१)

चित्रपट क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी जवळजवळ वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सुमित्रा भावे यांचा जन्म पुण्यातला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव उमराणी आणि आईचे नाव कमल. त्यांचे शालेय शिक्षण आगरकर हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी माध्यमातून समाजशास्त्रामध्ये आणि राज्यशास्त्रामध्ये पदवी संपादन केली आणि त्यानंतर मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ‘मास्टर इन सोशल वर्क’ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या कर्वे शिक्षणसंस्थेत सामाजिक कार्य हा विषय दहा वर्षे शिकवला. या दरम्यान लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची गरज त्यांना जाणवली आणि त्यांनी उरळीकांचन येथे एक अभिनव प्रयोग केला. शाळा सोडलेल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुक्त शिक्षण देणार्‍या मुक्त विद्यापीठाचा. त्यानंतर अविवाहित माता, महिला गुन्हेगारी, गांधी विचारप्रभावित महिला नेतृत्व, स्त्रीविषयक पुराणकथांचे पुनरावलोकन, अशा अनेक प्रकल्पांवर त्यांनी संशोधन केले आणि प्रबंध सादर केले.

स्त्रीवाणी संशोधन प्रकल्पाच्या संचालकपदावर दहा वर्षे काम करताना त्यांना जाणवले की, आतापर्यंत महिलाविषयक आणि सामाजिक संशोधनातून आलेले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि विशेषत: अशिक्षित समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम आहे ते दृक-श्राव्य माध्यम, अर्थात चित्रपट माध्यम. म्हणूनच सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांमध्ये त्यांचा सामाजिक कार्यासंबंधीचा अभ्यास, संशोधन आणि कार्य याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. त्यांना पुण्याच्या फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन संस्थेत दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुनील सुकथनकर यांची साथ लाभली. सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे या दिग्दर्शकद्वयीने आतापर्यंत सामाजिक आशयाचे मनोरंजक चित्रपट तयार केले. भावे आणि सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीचा ‘बाई’ हा पहिला चित्रपट. एका दलित स्त्रीचा जीवनसंघर्ष व्यक्त करणार्‍या ‘बाई’ला राष्ट्रपतींच्या रजतकमल पुरस्काराने गौरवले गेले आणि या पहिल्याच चित्रपटाने ‘संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारे चित्रपटकर्ते’ म्हणून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

चित्रपटाची मांडणी जर कलात्मक असेल, तर वास्तववादी पद्धतीने चांगल्या विचारातही प्रेक्षकांचे मन गुंतवून ठेवता येते, हे त्यांनी सिद्ध केले. ज्या परिसरात, ज्या काळात चित्रपटाची कथा घडते, त्या काळाची भाषा जपण्यासाठी संवादलेखन, त्या काळाचे अचूक वातावरण दाखवण्यासाठी त्या चित्रपटाचे कलादिग्दर्शन आणि वेषभूषा, हे भागही सुमित्रा भावे स्वत: सांभाळत. लोकसंस्कृतीचे प्रदर्शन हे त्यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. चित्रपट जरी आभासी माध्यम असले, तरी त्यातले संदेश वास्तववादी रूपात लोकांसमोर यावेत, यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या चित्रपटात कलाकारांना लौकिक अर्थाने रंगभूषा नसते, ती यामुळेच. या दिग्दर्शकद्वयीचे चित्रपट जनसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरले आणि या लोकप्रियतेवर सन्माननीय शासकीय पुरस्कारांचीही मोहोर उठली. ‘बाई’ - उत्कृष्ट सामाजिक कल्याण चित्रपट, ‘पाणी’ - उत्कृष्ट अभिप्रेरक चित्रपट आणि ‘दोघी’ - उत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट, या चित्रपटांना राष्ट्रपतींच्या रजतकमल पुरस्काराने गौरवले गेले. त्यानंतर १९९४ मध्ये या द्वयीने ‘दोघी’ हा खेड्यातल्या दोन तरुण मुलींनी अंधश्रद्धेविरुद्ध दिलेला लढा दाखवणारा,  ‘जिंदगी जिंदाबाद’ (१९९६) हा भारतातील एड्स समस्येवर आधारित चित्रपट, ‘दहावी फ’ (२००२) हा पौगंडावस्थेतील हिंसकतेवर सकारात्मक उपाय सुचवणारा, ‘वास्तुपुरुष’ (२००५) हा जमीनदारीचा व जातिव्यवस्थेचा बीमोड आणि जागतिक स्तरावरचा नव्या सामाजिक दृष्टिकोन देणारा, ‘देवराई’ (२००४) हा देवराईच्या रूपालंकारात विश्‍लेषित केलेली स्किझोफ्रेनिया रुग्णाच्या मानसिक अवस्था, ‘बाधा’ (२००४) हा भीती आणि श्रद्धा यांतला संघर्ष, ‘नितळ’ (२००६) हा श्‍वेत कोड असलेल्या तरुण महिला डॉक्टरची कथा, सुंदर असणे म्हणजे एकमेवाद्वितीय असणे, ‘बेवक्त बारीश’ (२००७) हा एड्सच्या छायेत फुलणारे तरल प्रेम दर्शवणारा, ‘घो मला असला हवा’ (२००९) हा खेड्यातल्या एका बंडखोर तरुणीची संगीतमय कथा सांगणारा, आणि ‘एक कप चाय’ हा माहितीचा अधिकार कायद्यावर आधारित सामान्य माणसाच्या आत्मसन्मानाच्या कथेवरचा चित्रपट, ‘मोर देखने जंगल में’ (२०१०) हा आदिवासी कल्याणासाठी काम करणार्‍या एका तरुण व्यवस्थापनशास्त्र पदवीधराचा स्वयंअनुभूतीचा प्रवास, ‘हा भारत माझा’ (२०११)  अण्णा हजारेंच्या आंदोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वत:ची जीवनमूल्ये तपासून पाहणार्‍या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा, ‘संहिता’ हा स्वातंत्र्यपूर्व काळातला संस्थानिक राजवटीचा काळ आणि आधुनिक काळ यांची सांगड घालणारी कथा, अशा चित्रपटांची निर्मिती केली. संहिता (२०१३), अस्तु (२०१६), कासव (२०१७) हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.

अमेरिका, यू.के., जपान, इटली, फ्रान्स, स्पेन, नॉर्वे, कॅनडा, इजिप्त, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया येथील चित्रपट महोत्सवांमध्ये हे सर्व चित्रपट प्रदर्शित केले गेले. याशिवाय ‘मुक्ती’ (१९९०), ‘संवाद’ (१९९२), ‘सरशी’ (१९९३), ‘सहयोग’ (१९९३), ‘चाकोरी’ (१९९४), ‘लाहा’ (१९९४), ‘सह अध्याय’ (१९९४) ‘Our Health Is In Our Hands’ (१९९७), ‘I Want A Home’ (१९९७), Pilgrims of Light (१९९८), ‘Three Faces of Tomorrow’ (१९९८), ‘School That Gautam’s Mother Built’ (१९९९), ‘Pihoo and Eklavya’ (१९९९), ‘Parting With Pride’ (२०००), ‘Dai’ (२०००), ‘Doctor, Baby Doesn’t Speak’ (२००१), ‘Of The People By The People’ (२००२), ‘जिद’ (२००३), ‘कर्ता’ - शंतनुराव किर्लोस्करांच्या कार्याचा वेध घेणारी लघुचित्रपट मालिका, ‘ममता की छांव में’, ‘A Gift Of Wings’, ‘Tomorrow’,  हे लघुपट त्यांनी दिग्दर्शित केले.

त्यांनी ‘भैंस बराबर’ (१९९८-९९) राष्ट्रीय साक्षरता मोहिमेअंतर्गत २६ भाग, ‘अखेरची रात्र’ - महाभारतावर आधारित विद्याधर पुंडलीक यांच्या कथेवर एक भाग, ‘एक और कहानी’ या मालिकेसाठी चार टेलिफिल्म, ‘कथा सरिता’ - तेरा मराठी कथांवर आधारित मालिका, अशा मालिकाही दूरदर्शनसाठी केल्या. ‘दोघी’ या चित्रपटाला कथा-पटकथा-संवादलेखनासाठी आणि कला दिग्दर्शनासाठी सुमित्रा भावे यांना अकरा राज्य पुरस्कार मिळाले. शिवाय टोरीनो, इटली हे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

व्ही. शांताराम पुरस्कार, अरविंदन पुरस्कार, फिल्मफेअर, कालनिर्णय आणि नानासाहेब सरपोतदार पुरस्कार असे राष्ट्रीय स्तरावरचे पाच पुरस्कारही त्यांना मिळाले. ‘दहावी फ’ या चित्रपटाला २००२-०३ मधील उत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह पाच राज्यस्तरीय पुरस्कार आणि तीन स्क्रीन पुरस्कार, नानासाहेब सरपोतदार पुरस्कार, दोन आल्फा गौरव पुरस्कार, २००२-०३ मधील उत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह नऊ महाराष्ट्र टाईम्स पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारासाठी सर्वांगीण लोकप्रिय मनोरंजनासाठी नामांकन झाले होते. ‘वास्तुपुरुष’ - राष्ट्रीय पुरस्कार - मराठीतील उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट, २००२-०३ मधील उत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह आठ राज्यस्तरीय पुरस्कार; देवराई - पर्यावरण संवर्धनासाठीच्या उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दोन राज्य पुरस्कार, चौदा राज्यस्तरीय पुरस्कार; ‘नितळ’ - उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी स्क्रीन पुरस्कार, झी गौरव पुरस्कार - उत्कृष्ट छायाचित्रण आणि संपादन, राज्य पुरस्कार - उत्कृष्ट चित्रपट आणि  उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी; ‘कौन जीता कौन हारा’ - (और एक कहानी या कार्यक्रमासाठी टेलीफिल्म) भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार - उत्कृष्ट टेलीफिल्म, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट छायाचित्रण, उत्कृष्ट संकलन, उत्कृष्ट ध्वनिलेखन आणि उत्कृष्ट बालकलाकार, असे असंख्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार समित्यांवर परीक्षक म्हणून त्यांनी काम केले. प्रत्येकानेच जर मानवी स्वभावातील आणि परिस्थितीतील वैविध्य स्वीकारले आणि कोणीही कोणाचीही, कोणत्याही कारणाने पिळवणूक केली नाही, तर आपले आणि इतरांचेही जीवन सुंदर होईल, हा त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन आहे आणि तोच त्यांच्या चित्रपटांत नेहमी व्यक्त झालेला दिसतो.

-  इंद्रायणी चव्हाण

( साभार - शिल्पकार चरित्रकोश, चित्रपट आणि संगीत खंड )

लेखक: 

No comment

Leave a Response