Primary tabs

पीअर प्रेशर आणि आपण : सावनी

share on:

आपल्या आसपासच्या लोकांचे अनुकरण तर सगळेच करतात. भोवतालचे लोक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न आपण सगळेच करत असतो. मग यातल्या कोणत्या गोष्टी सामाजिक दबावामुळे करतो? कोणत्या स्वतःच्या मनाने? सामाजिक दबावामुळे केलेल्या सगळ्याच गोष्टी वाईट असतात? ‘माय लाईफ, माय रुल्स’च्या जमान्यात पीअर प्रेशर आहे? असे कितीतरी प्रश्न सर्वांच्याच मनात असतात.

 सर्वांत आधी पीअर प्रेशर म्हणजे काय, तर आपल्या मित्र-मैत्रिणींमुळे आलेला दबाव. अगदी लहानपणी आपण आई-वडिलांचे अनुकरण करतो, मग भाऊ-बहीण यांचे. जसं वय वाढतं तसं मित्र-मैत्रिणींचे अनुकरण करतो. त्यात वावगं काहीच नाही, जोपर्यंत आपण कोणाच्या दबावामुळे अनुकरण करत नाही.  पीअर  प्रेशरचा खरा  प्रॉब्लेम सुरू होतो, तो टीनएजर मुला-मुलींमध्ये आणि मग कदाचित आयुष्यभर तो राहतो.

 तुम्ही बऱ्याच मुलांना विचारा, पहिली सिगारेट कधी ओढली, दारू कधी प्यायलात? बहुतांश मुलं हेच सांगतील "मित्रांनी आग्रह केला मग वाटलं करावंसं." हेच ते पीअर प्रेशर. बरीच मुले पहिली रिलेशनशिपही यामुळे करतात, की, सर्वांना गर्लफ्रेंड/बॉयफ़्रेंड आहे मग मलाच का नाही? इतरांमुळे दहावीनंतर विज्ञान आणि बारावीनंतर इंजिनिअरिंग घेतलेले लोक कमी नाहीत. यामध्ये स्वतःची खरी आवडच नाही तर मर्यादा, तत्त्वे, सद्सद्विवेकबुद्धी लोक विसरतात. टीनएजमध्ये तर हे खूपच सहज होते, त्या मुलांची समजही कमी असते, जबाबदारी तशी फार नसते. कमी वयात वाईट सवयी लागण्याचे तोटे, चुकीचे करियर निवडले तर, होणारे नुकसान सर्वांनाच माहीत आहेत. मग हे कसे कंट्रोल करायचे?

खरं तर, सोशल मीडिया, इंटरनेट, आई-बाबांचे बिझी रुटीन, घरात मोठ्या माणसांची कमतरता हे लक्षात घेता आजकालच्या मुलांना 'कंट्रोल' करणं तसं अशक्यच आहे. मुलांना स्वतःचे हिताचे काय आणि प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यायचे हे शिकवले तरी खूप आहे. मग त्यांच्या निर्णयामागे उभे राहण्यासाठी संवाद गरजेचा आहे. बऱ्याचदा मुलांना कळतं, हे वाईट आहे, पण स्वतःसाठी स्टॅन्ड घेण्याची हिंमत नसते. सगळे हसतील, एकटं पाडतील ही भीती असते, यासाठी घरी संवाद हवा.

 

आता, पीअर प्रेशर फक्त टीनएजर मुलांनाच असते का, तर नाही, त्यानंतरही नोकरी करताना, लग्न करताना, मुलांना वाढवताना सगळीकडे हे जाणवते. किती तरी मुलं पीअर प्रेशरमुळे स्वतःच्या आवडी-निवडी विसरतात, काही त्या नीट ठरवूदेखील शकत नाहीत. हे सर्व आपल्या नकळत होते. "लोक काय म्हणतील?" या गोंडस नावाखाली. प्रत्येक वेळी हे सिरीयस असेलच असे नाही. कधी कधी साध्या गोष्टीही आपण दबावामुळे करतो. सगळे सोशल मीडियावर फोटो टाकताय, सगळे ट्रीपला जाताय, मग आपण का नाही करायचं? पण आपल्याला हे सगळं खरंच आवडतं का? याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. लोकांना आधुनिक कपड्यात वावरतांना पाहून, तसंच राहायचा प्रयत्न करतांना आपल्याला आणि आपल्या प्रोफेशनला ते शोभेल का? आपण आत्मविश्वासाने वावरू शकू का? याचा विचार करण्याची गरज आहे. नाही तर, आत्मविश्वास मिळवण्यासाठी, पीअर प्रेशरखाली येऊन केलेल्या गोष्टीमुळे आत्मविश्वास कमी व्हायचा. 

 

पीअर प्रेशरचा मुलींवर आणि मुलांवर परिणामही वेगवेगळा असतो. मुलांवर प्रत्यक्ष तर, मुलींवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम करते. कारण बऱ्याचदा मुलांना वाईट सवयी लावण्यासाठी त्यांचे मित्र भरीस पाडतात/आग्रह करतात. पण मुली स्वतः पीअर प्रेशरखाली येतात. आसपासच्या  वातावरणात फिट होण्यासाठीची धडपड असते, आपल्याला सगळे जुनाट विचारांचे समजतील ही भीती असते. प्रोसेस वेगळी असली तरी, त्यामुळे होणारे नुकसान सारखेच असते.

 

आता हे  पीअर प्रेशर वाईटच असते का? तर नाही, पॉझिटिव्ह, क्टिव्हही असते. बऱ्याचदा "लोक काय म्हणतील??" याचा विचार करून आपण बेताल वागत नाही, संयम पाळतो, तेच. अर्थात फक्त लोकांच्या धाकापायी असलेले हे वागणे वरवरचे असते. समाजाच्या नियमात, स्वतःच्या नियमांना आणि आवडीला बसवता यायला हवे. सवयीने जमू शकते.

 

बाकी काय, "जनाचा नाही पण मनाचा धाक महत्त्वाचा असतो." हर्षद मेहतांच्या सीरिजमध्ये एक संवाद आहे, "रिस्क है, तो इश्क है" पण ही रिस्क स्वतःच्या विचारांतून जन्मलेली असावी, फक्त मित्रमंडळींच्या मताने नाही. पण आत्मनिरीक्षण आणि जगावेगळे वागण्याची हिंमत असेल तर या सगळ्यातून तरुन जाता येते. पीअर प्रेशरला बळी पडणं किंवा न पडणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. फक्त स्वतःच्या विचारांवर विश्वास हवा आणि हिंमत हवी.

 

- सावनी

 

लेखक: 

No comment

Leave a Response