पृथ्वीला अतिशय दाट असे वातावरण लाभले आहे. हे वातावरण अनेक किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेले आहे. या वातावरणामुळे पृथ्वीचा विविध प्रकारच्या अवकाशीय वस्तू, तसेच विविध अवकाशीय किरणे यापासून बचाव होत असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे उत्तर गोलार्धात काही भागात आकाशात हिरव्या किंवा निळ्या छटांचा अनोखा खेळ पाहायला मिळतो. यालाच तेथे अरोरा बोरीयलीस असे म्हणतात. आरोरा बोरीयलीस म्हणजे सूर्यापासून उत्सर्जित झालेले आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक कणांनी तयार झालेले किरण असतात. ते किरण पृथ्वीच्या जवळ येतात, तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे ते किरण पृथ्वीवर न येता त्यांचा एक सुरेख अवकाशीय नाच उत्तर गोलार्धातील काही देशांमध्ये पहावयास मिळतो. या प्रकारच्या किरणांप्रमाणेच अजून एका वेगळ्या प्रकारचे किरण सूर्यापासून अथवा सूर्यमालेमधून किंवा विविध आकाशगंगा आणि दीर्घिकांपासून पृथ्वीपर्यंत येत असतात. या प्रकारच्या किरणांना वैश्विक किरणे किंवा कॉस्मिक रेज असे म्हटले जाते. हे वैश्विक किरण म्हणजे प्रोटॉन अथवा अणूचे गर्भ. ते प्रकाशाच्या वेगाने अवकाशात भ्रमण करीत असतात.
या वैश्विक किरणांचा शोध विक्टर हेसने १९१२ मध्ये हवामानाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या फुग्यांच्या माध्यमातून लावला. कमी ऊर्जेच्या वैश्विक किरणांचा शोध घेणे आणि त्यांचा अभ्यास करणे हे साधारण १९५० च्या आसपास जेव्हा अंतराळात कृत्रिम उपग्रह सोडण्यात आले त्यानंतर शक्य झाले. या वैश्विक किरणांच्या अभ्यासासाठी अवकाशात पाठवण्यात आलेल्या कृत्रिम उपग्रहांवर अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणारी सूक्ष्म कणशोधक यंत्रे बसविण्यात आलेली होती आणि याच यंत्रांच्या साह्याने या वैश्विक किरणांचा सखोल अभ्यास करणे शक्य झाले.
वैश्विक किरण पृथ्वीच्या वातावरणावर आढळतात तेव्हा या कणांचे विघटन होऊन त्याचे आणखी सूक्ष्म कणांमध्ये विघटन होते आणि त्यातील काही कण हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतात. फर्मी टेलिस्कोपच्या साह्याने शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की, हे वैश्विक किरण हे ताऱ्यांच्या महाविस्फोटानंतरसुद्धा तयार होऊन पृथ्वीपर्यंत पोहोचतात. या वैश्विक किरणांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे याचे मुख्य कारण म्हणजे वैश्विक किरणांचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर होणारा परिणाम. याच प्रमाणे वैश्विक किरण अवकाशयात्रींच्या शरीरावरसुद्धा परिणाम करतात. काही अवकाशयात्रींनी त्यांना यानाबाहेर काम करीत असताना त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकतात त्या प्रकारचा काही अनुभव आल्याचे सांगितले. या प्रमाणे काही वेळासाठी कानामध्ये वेगळ्या प्रकारचा आवाजसुद्धा काहींनी अनुभवला.
या सर्व कारणांमुळेच वैश्विक किरणांचा अभ्यास करणे फारच महत्त्वाचे ठरले आहे. कुणास ठाऊक कदाचित येत्या भविष्यकाळात हेच वैश्विक किरण विश्वातील अनेक कोडी उलगडण्यास मानवाला मदत करतील.
- अक्षय भिडे
No comment