Primary tabs

कल्पनारम्यतेच्यारंगांत न्हालेला बॉलीवूड ड्रामा : संदेश कुडतरकर

share on:

गीतांजली राव दिग्दर्शित 'बॉम्बे रोझ' हा अ‍ॅनिमेशनपट २०१९ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. भारतीय अ‍ॅनिमेशनपटांकडे एक ओझरती नजर टाकली तर, त्यांचा भर केवळ पौराणिक, ऐतिहासिक कथा उलगडण्याकडे आहे, हे सहज लक्षात येतं. वेगळे प्रयोग होतातही पण फार मोजके. या पार्श्वभूमीवर 'बॉम्बे रोझ'ची दखल घ्यावीच लागेल. गीतांजली राव यांची अ‍ॅनिमेशन या माध्यमावरची मजबूत पकड पाहायची असेल, तर 'बॉम्बे रोझ'कडे वळण्यापूर्वी यू-ट्युबवर उपलब्ध असलेला त्यांचा 'प्रिंटेड रेंबो' हा लघुपट अवश्य पाहावा.

 

पोट भरण्यासाठी तारा, कमला आणि त्यांचे आजोबा मुंबईत राहत असतात. कमला गजरे विकून पैसे कमावते आणि ताराच्या शिक्षणाची सोय करते. पुष्पगुच्छ विकणाऱ्या सलीमच्या दृष्टीस कमल पडते आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. माइक नावाचा दलाल कमलाच्या मागे असतो. आहे. "तुला दुबईला नेऊन सुखात ठेवेन", अशी वचनं देऊन तिला भुलवू पाहत आहे. मिस डिसूझा एकेकाळची सुप्रसिद्ध नायिका आहे. आपल्या नवऱ्याच्या थडग्यावर गुलाबाचं फूल ठेवण्यासाठी ती तारासोबत सतत स्मशानात येते. आपल्या घरातल्या  दुर्मीळ वस्तू विकण्यासाठी ती अँथनीच्या दुकानात जाते. कमला आणि ताराचे आजोबा घड्याळजी आहेत. जवळच एक थिएटरही आहे, जिथे 'प्यार का फसाना'चे खेळ लागले आहेत. कमला आणि सलीमची प्रेमकथा यशस्वी होते का, त्यांच्या प्रेमात काय अडथळे येतात, घड्याळजी, मिस डिसूझा, अँथनी, थिएटर, बार या सगळ्याचा या दोघांच्या प्रेमकथेशी काय संबंध, हे क्लायमॅक्सला स्पष्ट होतं. घटना अचानक वेग घेतात आणि हा चित्रपट एखाद्या बॉलिवूडपटाची रंजकता घेऊन प्रेक्षकांना भिडतो. स्वप्ननगरी मुंबईतल्या स्वप्नांचं दर्शन घडवतानाही इथल्या कटू वास्तवाचं भान ढळू देत नाही.    

 

'बॉम्बे रोझ' ही निव्वळ प्रेमकथा नाही. ही कथा कमला आणि सलीमची आहेच. त्यासोबत ती शर्ली आणि अँथनीचीही आहे. तारा आणि तिच्या लहानग्या मित्राचीही आहे. प्यासा बारची आणि तिथे नाचणाऱ्या बारडान्सर्सची आहे.

 

इथे मुंबई आहे, समुद्र आहे, थिएटर आहे, शिट्ट्या आहेत, पडद्यावरचं चुंबनदृश्य कापल्यावर प्रेक्षकांतून उठणाऱ्या आरोळ्या आहेत. क्लायमॅक्सला तर चित्रपटाची कथा जगणारा नायक आणि पडद्यावरचा नायक समोरासमोर येतात. वास्तव आणि कल्पिताची सरमिसळ होते. एका दृश्यात भर पावसात सलीम आणि कमला एकत्र असताना त्यांच्या समोरून टॅक्सी जाते आणि त्या काचेत ते दोघे दिसतात, ते दृश्य पडद्यावर चाललेल्या चित्रपटात स्वतःला पाहत स्मरणरंजनात रमणाऱ्या प्रेक्षकांचंच प्रतिबिंब आहे. कमला, तारा, सलीम, शर्ली, अँथनी या सर्वांची उपकथानकं एकत्र येतात, तेव्हा बॅकड्रॉपला असणाऱ्या मुसळधार पावसाची योजना ही चित्रपटाचं कथानक मुंबईत घडत असण्यालाच काव्यात्म न्याय मिळवून देणारी आहे. दुःख, रोमांच, प्रेम, अगतिकता अशा अनेक भावना पावसासोबत साकारणारी आहे. राग, प्रेम, इच्छा, सामर्थ्य, धोका अशा अनेक भावना दर्शविणारा लाल रंग हा कमलाच्या कपड्यांचा आहे, लाल गुलाबाचा आहे, त्याचप्रमाणे चित्रपटाच्या बहुसंख्य फ्रेम्समध्येही तोच विशेषत्वाने दिसतो.

 

या चित्रपटाची कथनशैलीही इतर सरधोपट मनोरंजक चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. कमला स्वप्नात रममाण होते, तेव्हा ती एका महालातली राजकुमारी असते आणि सलीम तिचा राजकुमार. खलनायक त्या स्वप्नरंजनात पक्षी बनून येतो. वेषांतर करून किंवा रूप बदलून नायिकांना फसवू पाहणाऱ्या, त्यांचं चारित्र्यहनन करणाऱ्या खलनायकांच्या अनेक कथा पुराणांत आहेत. त्याचीच इथे आठवण होते. सलीम चित्रपटातल्या नायक-नायिकेत स्वतःला आणि कमलाला पाहतो, हे त्याचं स्वप्नरंजन आहे. शर्ली अजूनही आपल्या मृत पतीसोबतच्या आठवणींत, गाण्याच्या शूटच्या वेळी रिटेक्सच्या आठवणींत रमलेली आहे. मिस डिसूझा जो गुलाब पतीच्या थडग्यावर ठेवते, त्या गुलाबाच्या नजरेतूनही कथा उलगडते. त्यामुळेच 'बॉम्बे रोझ' एक वेगळा प्रयोग म्हणून तर महत्त्वाचा आहेच, पण अ‍ॅनिमेशन हे माध्यम कथा सांगण्यासाठी कसं उत्तमरीत्या वापरता येतं, याचा आदर्श नमुना आहे.

 

'बॉम्बे रोझ'ची आणखी एक खासियत म्हणजे काळजाचा ठाव घेणारं या चित्रपटाचं पार्श्वसंगीत. सायली खरे यांच्या आवाजातलं, स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेलं 'रेवा नैनों में रहे' पाठलाग करत राहतं. अधूनमधून येणारी जुनी हिंदी गाणी - 'दिल तडप तडप के कह रहा है', 'आइये मेहेरबान' आणि इतर गाणी - नॉस्टॅल्जिक करतात. मिस डिसूझाची कथा उलगडताना येणारं गोवन शैलीचं गाणंही गोड आहे. पाठलागाच्या दृश्यांच्या वेळी येणारं पार्श्वसंगीत प्रसंगांना अधिक उठाव देणारं आहे. सायली खरे, अमित देओंदी आणि गार्गी शितोळे यांनी अनुक्रमे कमला, सलीम आणि ताराच्या पात्रांना आवाज दिला आहे. अनुराग कश्यप, गीतांजली कुलकर्णी, मकरंद देशपांडे, अमरदीप झा, वीरेंद्र सक्सेना, शिशीर शर्मा, छाया कदम, कल्याणी मुळ्ये या दिग्गजांनी इतर पात्रं जिवंत केली आहेत. बॉलीवूड आणि मुंबईसाठी समर्पित असणारा हा नयनरम्य चित्रपट सर्व वयोगटातल्या पात्रांचं भावविश्व उभं करतो आणि त्यामुळेच एखाद्या रोचक कादंबरीचा किंवा भव्य ऑपेराचा व्यापक अनुभव प्रेक्षकांना देतो. अशा प्रयोगांचं प्रेक्षकांनी स्वागत करायला हवं आणि या कलाकृती केवळ पुरस्कारांमध्ये अडकून विस्मृतीत जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.

 

- संदेश कुडतरकर

लेखक: 

No comment

Leave a Response