Primary tabs

२१ व्या शतकातील स्त्री व आव्हाने

share on:

‛स्त्री' म्हणजे काय? तर  परमेश्वराने या पृथ्वीतलावर पाठवलेली एक सुंदर कलाकृती .२१ व्या शतकातच काय तर अनेक शतके स्त्री च्या अस्तित्वामुळेच निर्माण झाली. स्त्री नसती तर......
   कल्पना जरी केली तर हे जगच नष्ट झाल्या सारखे वाटते . म्हणूनच स्त्री ही युगानु युगे हे जग निर्माण करणारी एक कलाकृतीच आहे .
   पूर्वीपासूनच आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीयांना मानाचे स्थान दिले आहे.आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांना मानाचे स्थान तर दिले पण काही रूढी,परंपरा, समाज  व्यवस्था यांमुळे  स्त्रियांना संसारात चूल व मूल यातच गुरफटून घ्यावे लागले. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने घातली गेली व तिला घरातच बंदिस्त करून ठेवले.
   १८ व्या शतकात ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य केले तेव्हापासून मग काय सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे,आनंदीबाई गोपाळ या समाज सुधारक महिलांनी पुढाकार घेऊन स्त्री ला तिच्या चूल आणि मूल या जगातून बाहेर काढले. तिला शिक्षण देऊन तिच्या हक्कांची जाणीव करून दिली व तिच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यामुळेच १८ व्या शतकापासून स्त्री ने आपली प्रगती करण्यास सुरुवात केली.ती आज २१ व्या शतकात एक कर्तृत्ववान व कर्तबगार महिला झाली.
सावित्रीने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा। म्हणत आजच्या २१ व्या शतकातील स्त्रीने उंच गगन भरारी घेतली आहे.यशाचे नवे शिखर तिने गाठले आहे. पूर्वीच्या काळात चूल सांभाळणारी स्त्री आज २१ व्या शतकात देशाची सत्ता सांभाळते.स्त्री ची ही प्रगती जणू थक्क करणारीच आहे. आजची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने कार्य करते आहे.तसेच सामाजिक,आर्थिक,राजकिय, कृषी,वैद्यकीय,शिक्षण,सैनिकी,कला,क्रीडा,हवाई दल या सर्व क्षेत्रांत आजची स्त्री प्रगत झाली आहे.
   आजची सामाजिक परिस्थिती, स्त्रीयांचा शिक्षणात वाढलेला सहभाग तसेच वैचारिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वावलंबन यांमुळे आज स्त्री ची प्रगती होत आहे.परिस्तिथीनुरूप रूढी व परंपरा यांना फाटा देत आजची स्त्री प्रगत व शिक्षित झाली.स्त्रीयांमध्ये असणारी जास्त कार्यक्षमता, नीटनेटकेपणा व कोणतेही काम कुशलतेने करण्याची क्षमता हे गुण असल्यामुळे आजची स्त्री ही सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीची भूमिका पार पडतांना दिसते.त्यामुळे त्यांच्या कार्यकुशलतेच्या जोरावर तिने आपला सर्वांगीण विकास घडवून आणला आहे
   आपल्या या समाज व्यवस्थेत स्त्री ने प्रगती तर केली परंतु त्याचबरोबर तिच्यासमोर हे सर्व करत असतांना तिला काही आव्हानांनाही समोर जावे लागत आहे.आपण म्हणतो स्त्री शिक्षित झाली,ती प्रगत झाली.पण  खरच ती शिक्षित झाली का? खरच तिला स्वतंत्र मिळाले का? काळानुरूप स्त्री स्वतःला बदलवत तर गेली पण तिच्या आव्हानांमध्ये बदल झालाय का?आजची स्त्री खरच सुरक्षित आहे का? असे अनेक प्रश्न मलाही पडलेत. बाहेर नोकरी निमित्त गेलेली स्त्री घरात सुरक्षित पोहचेपर्यंत काळजी.
   समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार,लैंगिक शोषण,स्त्रीभ्रूणहत्या,हुंडाबळी,नोकरीच्या ठिकाणी वरीष्ठांकडून होणारे अपमान,कुटूंबातील वैयक्तिक अपमान,तिची होणारी पिळवणूक,या अशा अनेक गोष्टींना तिला एक प्रकारचे आव्हानच द्यावे लागते.मग प्रश्न उभा राहतो तो स्त्री च्या सुरक्षिततेचा,तिच्या अस्मितेचा,तिच्या व्यक्तीमत्वाचा आजही स्त्रीयांची शारीरिक,मानसिक,सामाजिक,आर्थिक कुचंबणा होते.यालाही स्त्री ला एक आव्हान म्हणूनच पेलावे लागते.तरीही आजची स्त्री झगडते आहे स्वतःला शिक्षित करून घेण्यासाठी,स्वतःला सिद्ध करण्यासाठी.शासनाच्या सोयी सुविधा,सवलती,आरक्षण घेण्याचा प्रयत्न ती करतेय व या आव्हानांनाही सामोरे जातेय.
   आजच्या स्त्री ला आरक्षण तर दिले जाते परंतु खरच याचा फायदा तिला होतो का? मग हेही एक तिच्यापुढे आव्हानच आहे ना.पुरुषी अहंकाराला झुगारून स्वतःच्या पदाचा उपभोग घेण्याचे सामर्थ्य तिला स्वतःलाच निर्माण करायचे आहे.अशी अनेक आव्हाने प्रत्येक क्षेत्रात स्त्री ने स्वीकारली आहे. आपल्या प्रगतीत येणाऱ्या अडथळ्यांवर तिने मातही केली आहे.
   स्त्री सबलीकरण,महिला सक्षमीकरण अश्या अनेक योजना शासन राबवत आहे आजची स्त्री सक्षम झाली आहे म्हणूनच तीने स्व-संरक्षणासाठी धडे घेतले पाहिजे. शारीरिक दृष्ट्या स्वतःला फिट ठेवलेच पाहिजे त्यासाठी जुडो,कराटे,लाठी शिक्षण हे प्रत्येक स्त्री ने घेतलेच पाहिजे.आज समाजात स्त्रीयांवर होणारे अत्याचार वाढतच चालले आहे.‛स्त्रीयांची सुरक्षितता' हे स्त्रीयांनी उपलब्ध सुविधांचा सुयोग्य व समयोचित वापर करणे.उदा=एखादा गुंड/विचित्र प्रवृत्तीचा माणूस त्रास देत असेल तर लगेच पालक,दक्षता समिती व पोलिस ठाणे येथे माहिती द्यावी.स्वतःचा पोशाख हावभाव आचरणातून चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घ्यावी.प्रत्येक गोष्टीला स्त्री किंवा पुरुषच जबाबदार असतो असे नाही तर पुरुषी अहंकार,समाजात स्त्रीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन,पुरुषी मानसिकता,वैचारिक पातळी यांमुळेही स्त्री वर अन्याय होतांना दिसतो.
   आज वर्तमान पत्र पहिले तर अंगावर शहारे आणणाऱ्या घटना दिसून येतात.भर रस्त्यात होणारे अत्याचार,acid हल्ले,स्त्री च्या चारिभ्या वर होणारी चिखलफेक,हुंडाबळी,स्त्री भ्रूणहत्या अशा अनेक घटना दिसून येतात.अशा आव्हानांना अजूनही आजही स्त्री तोंड देत आहे.सतयूग ते द्वापार युग ते कलियुग अजूनही स्त्रीयांना अग्निपरीक्षा द्यावी लागतेय.आजही तीला उकळत्या तेलातून नाणे उचलून स्वतःचे चारिग्य, शिल यांची दिव्य परीक्षा द्यावी लागतेय हे सर्व मग स्त्रीलाच का? पुरुषांनीही स्वतःच्या चारित्र्याची परीक्षा द्यावी तरच स्त्रीयांवरील होणारे असले अन्याय दूर होतील एकीकडे आपण स्त्री-पुरुष समानतेचे नारे देतो.महिला दिन साजरे करतो मग ते काय एक दिवसा पुरतेच काय?तीचा सन्मान हा एक दिवसाचा नाही तो दररोज झाला पाहिजे तरच आणि तरच स्त्रीयांवरील आव्हानांचे ओझे कमी होईल.त्यासाठी या समाजाची मानसिकता व विचार सरणी बदलणे गरजेचे आहे.तर आजची स्त्री सक्षम होईल.२१व्या शतकातील आजच्या स्त्री पुढे होणाऱ्या प्रगती बरोबरच अशी अनेक आव्हाने उभी आहे.आव्हानांची जणू खाणच तीच्या भोवती खोदली आहे.या सर्व गोष्टींचा विचार केला तर तिला खरच नवदुर्गा,अष्टभुजा,दुर्गेच रूप घ्यावं लागेल.मला तर वाटत आपल्या माउलीने सावित्री बाईंनी एक सक्षम व स्वतंत्र स्त्री च जे स्वप्न पाहिल होत होत ते आता वास्तवात उतरवण्याची वेळ आली आहे.
   म्हणूनच मला वाटते आजच्या प्रत्येक स्त्री न शारीरिक व मानसिक दृष्ट्या खंबीर होऊन सावित्री बाईंनी पेटवलेल्या या ज्योतीच रूपांतर मशालीत करूया.हा स्त्री सबलीकरणाचा वटवृक्ष बहरवण्यासाठी आपण २१ व्या शतकातील स्त्रीयांनी नक्कीच शर्थीने प्रयत्न करूया....
आता मी शेवटी एवढेच म्हणेल....
दे ललकारी,घे उंच भरारी,
फिरू नको तू माघारी!
सावित्री ची ज्योत तू पेटव या मशाली,
अन्यायाला देवून चाड,
पेलव तू खडतर आव्हान!
नको डगमागू,नको घाबरू,
धडे गिरव तू स्व-रक्षणाचे
स्व-कीर्तीचे अन स्वाभिमानाचे!
कर सार्थक तू या स्त्री जन्माचे!

 

-वाघ गोकूळदास अरविंद

लेखक: 

No comment

Leave a Response