Primary tabs

बॅचलर

share on:

“अगं, ती सगळी मुलं-मुलंच राहतात बरं का.. काहीतरी सहा-सात मुलं आहेत.. अधूनमधून मुली पण येत जात असतात.. विचार कर काम धरण्याआधी.. नंतर नसता ताप होईल डोक्याला…” 

“काकू तुम्ही ओळखता का त्या मुलांना?” काकूंच्या बोलण्याला घाबरून मंगलानं विचारलं.

“नाही गं, मी कुठे बोलायला गेले त्यांच्याशी कधी? पण या एकट्या राहणाऱ्या मुलांची गोष्टच वेगळी असते बाई.. त्यांचं काही समजत नाही.. कुणी सांगितलेत कुणी नसते ताप?”

----------- 

२०२० सालचा दणका सगळ्यांनाच बसला होता. मंगला ही सगळ्यांमध्येच आली. फेब्रुवारी महिन्यापासून डोकावू पाहणारं महामारीचं संकट बघता बघता हातपाय पसरवू लागलं होतं. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जेव्हा शहरात एकदोन रुग्ण मिळाल्याची माहिती मिळाली तेव्हा पार्लरमध्ये तिघींची चर्चा सुद्धा झाली. मॅडम म्हटल्या होत्या की हे स्वाईन फ्लूसारखं प्रकरण होणार.. ज्या शाळेतली मुलं आहेत, ती शाळा बंद होईल काही दिवस. रुग्ण वाढल्याच्या बातम्या येतील आणि काही दिवसांत बंद होतील. सॅनीटायझर, मास्कचं फॅड निघेल आता काही दिवस. मंगलाला हे काहीच माहीत नव्हतं, पण तिच्या मते मॅडम म्हणताहेत ते खरंच असलं पाहिजे. तसंही २०१० साली मंगला शहरात आलीच नव्हती. तिला शहरात येऊन जेमतेम दोन वर्ष झाली होती.१८ वर्षांची झाल्यावर वडिलांनी लग्न लावून दिलं आणि ती नवऱ्याबरोबर पहिल्यांदा शहरात आली. एकदोन महिन्यातच चाळीजवळ असणाऱ्या  मॅडमच्या ब्युटी पार्लरमध्ये मदतनीस म्हणून लागली होती. ब्युटी पार्लरच्या कामांबरोबर मॅडमने तिला बरंच काही शिकवलं होतं, त्यामुळे मॅडम म्हणतात तेच बरोबर असं मानून ती त्या दिवशी आपलं काम करत राहिली पण त्या नंतर आठवडाभरातच सगळं चित्र बदललं. एका रविवारी दिवसभरासाठी  सगळं बंद करण्यात काय आलं आणि मग त्याच्याच दुसऱ्या दिवशी पूर्ण देश बंद केला. त्या दिवशी मॅडमचा फोन आला की काही काळजी करू नकोस, १४ एप्रिलपर्यंत सगळं आटोक्यात येईल. तोपर्यंत काही त्या पगार कापणार नव्हत्या. नवऱ्याच्या फॅक्टरीमधून सुद्धा हेच सांगितलं होतं. एप्रिल महिन्याचा दोघांना अर्धा पगार मिळाला. तो महिना पार पडला पण मे महिन्यात मात्र मॅडमनाच पार्लरची जागा सोडावी लागली, त्यामुळे हिचा पगार बंद झाला आणि लागोपाठ नवऱ्याला सुद्धा कामावरून कमी करण्यात आलं. घरात साठवलेले पैसे होते पण महिनाभर पुरतील इतपतच.. मग बाहेरून भाजी आणून ती चिरून घरोघरी पोहोचव, घरून नाश्ता, पोळ्या करून द्या अशा अनेक उड्या दोन महिने त्यांनी मारल्या. पण त्या काळात त्यांच्याप्रमाणेच अनेक जण अशाच प्रकारे हात पाय मारायचा प्रयत्न करत होते. अशात सगळ्यांचा निभाव लागणं कठीणच होतं. परत गावी जायचं तरी पैशांचा प्रश्न काही सुटणार नव्हता. त्यामुळे शहरातच आहे त्या परिस्थितीत काहीतरी करत राहण्यापलीकडे पर्याय नव्हता. 

जुलै महिन्यात नियम शिथिल होऊ लागले, तेव्हा समोरच्या टाॅवरमधून घरकामासाठी विचारणा होऊ लागली.

मंगला-निलेशची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती, पण लोकांच्या घरची धुणीभांडी करावी लागतील, अशी वेळ कधी आली नव्हती आणि कधी येईल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती. पण या अवघड काळात भल्याभल्यांना झळ बसली होती, त्यामुळे भाजी, पोळ्या, डबे हे चालू ठेवून मंगलानं जोशी काकूंच काम धरलं. सकाळी घरचं, डबे आटपून मंगला निघायची. नवरा डिलिव्हरीचं बघायचा. दुपारच्या वेळी त्यांच्याकडे जाऊन घर आवरणं, कपडे वाळत घालणं, भाजी निवडून देणं... अशी कामं होती. त्यांच्याकडे लागून पंधरा दिवस होत होते, तोच खालच्या मजल्यावरचं हे स्वयंपाकाचं काम आलं होतं. जोशी काकूंना मंगला आनंदानं सांगायला गेली तर त्यांनी हा त्यांनी मिठाचा खडा टाकला होता. नुसती पोरं राहतात, त्यामुळे घराचा उकिरडा असतो. स्वयंपाकघर तर सतत पसरलेलं असतं आणि काय काय जोशी काकू तासभर बोलत राहिल्या, पण मंगलाला हे असले नखरे परवडणारे नव्हते. स्वयंपाक करायचा आणि पगार घ्यायचा इतकाच संबंध तिला ठेवायचा होता. मग ती मुलं कशी का राहेनात? त्याच्याशी तिला काय घेणं-देणं? 

पैशांची बोलणी करायला म्हणून मंगला खालच्या फ्लॅटमध्ये गेली तर साधारण काकूंनी वर्णन केल्यासारखीच परिस्थिती होती. पदराचा बोळा करून नाकाशी धरावा लागत नसला तरी घरात जाणवण्याइतपत वास येत होताच. सहा मुलं एका घरात राहत होती. सातवा मुलगा घरूनच काम करायचंय म्हणून गावी गेला होता. सहा लोकांचा दोन वेळचा स्वयंपाक.. त्यातून ती तगडी पोरं बघून मंगलाने पाचशे रुपये जास्तच सांगितले. पण मुलांनी काहीच कटकट न करता मान्य केले. अगदी त्याच दिवसापासून कामाला सुरुवात करायला सांगितली, मंगलासुद्धा तयार झाली आणि पदर खोचून स्वयंपाकघराकडे निघाली. ओट्यावर तिला जागा करून देण्यासाठी तिच्या मागून एक मुलगा आला. त्याचे कपडे त्यातल्या त्यात धुतल्यासारखे दिसत होते. पण त्याच्या अशा मागेमागे करण्यानं तिलाच अवघडल्यासारखं झालं म्हणून तिनं त्याला ‘राहू दे’ अशी खून केली. तरी त्यानं तिथे उभं राहून तिला मिठाचा, मसाल्याचा डबा आणि इतर समान कुठे आहे ते पटकन दाखवलं आणि बाहेर गेला. तो गेल्यावर सगळ्यात आधी मंगलानं मोठा श्वास घेतला, सुरुवात कुठून करावी असा विचार केला आणि पटकन आवराआवरी केली. तासाभरात स्वयंपाक करून मंगला तिथून बाहेरसुद्धा पडली. तोवर सहा पैकी चार मुलं आळीपाळीनं येऊन डोकावून गेली होती.

काम करतान गप्पा मारायची सवय तिला आणि इकडच्या तिकडच्या बातम्या काढायची सवय जोशी काकूंना  असल्यानं दुसऱ्या दिवशी तिनं हा सगळा वृतांत त्यांना सांगितला. 

“बघ बाई, ओटा आवरण्यात काल इतका वेळ गेला तुझा आता आज जाऊन परत तशीच गत असणार तुझी.” काकूंची टिप्पणी करून झालीच. 

“खरं तर अशा मुलांचा उपद्रव होतो म्हणून बॅचलर मुलामुलींना घर भाड्यानं द्यायला परवानगीच नाही, पण देशपांड्यांच्याच फ्लॅट तो.. त्यात त्यांचा मुलगा आणि इतर सहा जण राहतात म्हटल्यावर काय बोलणार?” 

काकूंनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली. 

हे ऐकून मंगला गप्प बसली. सोसायटीवाले कधी काय नियम करतील सांगता येत नाही. उगाच आपण जास्त बडबड करायचो आणि आपलंच काम जायचं असं तिला वाटलं. 

कामाच्या पहिल्या दिवशी जोशी काकूंनी वर्णन केल्यासारखं मुलाचं घर असलं तरी त्यांच्या दुसऱ्या दिवशीचा अंदाज मात्र अगदीच चुकला होता. तिनं आवरलं अगदी तसंच स्वयंपाकघर होतं. भांडी घासणाऱ्या मावशींनी सुद्धा भांडी व्यवस्थित मांडून ठेवली होती. 

कामाला लागून एक दीड महिना होऊन गेला आणि तिची या सहा मुलांशी चांगलीच ओळख वाढायला लागली. शशांक, राहुल, अमित, क्षितीज, आकाश आणि उदय!

“भाजी छान झाली होती..” असं अधूनमधून सांगून राहुलनंच संभाषणाला सुरुवात केली होती. राहुल म्हणजे पहिल्या दिवशी तिच्या मागे स्वयंपाकघरात आला होता तोच, त्यातल्या त्यात धुतलेले कपडे घातलेला मुलगा. मग हळूहळू इतरांबरोबर सुद्धा संभाषणाची गाडी पुढे जात राहिली. 

“एवढ्या मुलांकडं एकटी काम करतेस, तासभर तरी असतेस ना गं? नवऱ्याला माहिती आहे ना बाई? नाहीतर उगाच सोसायटीत तमाशा व्हायचा..” 

जोशी काकूंकडे समोरच्या पाटील काकू चहाला आल्या होत्या एकदा तेव्हा त्यांनी कुचकटपणे विचारलं. जोशी काकूंनी सुद्धा हो ला हो केलं. मग एरवी पायी येणाऱ्या मंगलानं एकेदिवशी दुपारी तिच्या नवऱ्याला घ्यायला बोलावलं. त्यानं याच महिन्यात सॅनीटायझर स्टँड दुकानात विकायला सुरुवात केली होती त्याचं निमित्त काढून अत्यंत हुशारीनं मुलांशी ओळख करून दिली. त्याच्याकडे दुचाकी आहे हे समजल्यावर अमितनं तर त्याच्या ऑफिसमधल्या डिलिव्हरीच्या कामाला त्याला लाऊन दिलं. तशी आता तिला चांगली चार-पाच कामं लागली होती. “नवरा बरा आहे ना तुझा? मारत-बिरत नाही ना?” किंवा “काही लागलं तर सांग, बरं का?” यापलीकडं कुणी तिच्या नवऱ्याची फार विचारपूस केली नव्हती. एका कामावरच्या काकांनी एक-दोन ठिकाणी त्याची शिफारस करून स्टँडला गिऱ्हाईक मिळवून दिलं होतं, पण या डिलिव्हरीच्या कामामुळे त्यांची आर्थिक चणचण एकदमच कमी झाली.    

हळूहळू सगळे व्यवहार पूर्ववत होत होते. पण मुलांचं काम मात्र घरूनचं सुरू होतं. हिनं कामं सांभाळून घरून पोळ्या देणं, ऑर्डरप्रमाणे लाडू देणं सुरू केलं होतं. जुनं पार्लर सुरू होण्याची मात्र काहीच चिन्ह नव्हती, त्यामुळे यातच आपला जम बसवण्यासाठी तिची धडपड सुरू होती. सगळं परत सुरू होतंय, घरी बसून कंटाळा आलाय, कामाचा कंटाळा आलाय आणि त्यात दिवाळी म्हणून तिच्या कामाच्या घरांपैकी बरीच जण बाहेर फिरायला गेली होती, कोणी आपल्या गावी तर कोणी कोकण, महाबळेश्वर, लोणावळा.. कुठे कुठे निघाली होती. मंगलानं ही नावं फक्त ऐकली होती. कामांना सुट्टी मिळाल्यामुळे तिला सुद्धा निवांत वाटत होतं. लोकांना त्यांचा ‘चेंज’ मिळाला आणि आपल्याला आपला यात ती समाधान मानत होती. कामं कमी होती म्हणून ती मुलांकडे नेहमीपेक्षा लवकर पोहोचली तर क्षितीजची सुद्धा निघायची गडबड सुरू होती. 

“कोकणात घर आहे माझं, तिकडं रेंजचा प्राॅब्लेम होता म्हणून इथं अडकून पडलो होतो… पण गावात आता नवीन टाॅवर बसवलाय.. महिनाभर राहून येईन.. “ सामान भरता भरता क्षितीज सांगत होता.. 

“अय्या कोकण? समुद्र दिसतो तुमच्या घरून? मंगलानं पटकन विचारलं तेव्हा निघायच्या गडबडीत असताना सुद्धा तिच्या डोळ्यातली चमक त्यानं टिपली आणि गालातल्या गालात हसून “हो..” म्हणून उत्तर दिलं. 

“छान घरी राहून या..” म्हणत तिनं त्याला निरोप दिला आणि कामाला सुरुवात केली. क्षितीज क्षणभर दाराशी रेंगाळला. 

“तुम्ही नाही जाणार सुट्टी घेऊन गावी?” 

“नाही, दादा.. कुठं काय? जायचं होतं पण सासऱ्यांनी सांगितलं आत्ता कुठे… आत्ता काही कामं नाही.. कापणी करायला या.. तेवढीच मदत होईल..” 

क्षितीजला वाईट वाटलं पण तो काही न बोलता निघून गेला. मध्ये दोन तीन दिवस गेले असतील, मंगला तर हे बोलणं विसरून सुद्धा गेली होती पण त्या दिवशी कामावर आल्या आल्या रोहननं “हे आमच्या सगळ्यांकडून..  तुमचा या महिन्याचा पगार नाही हा.. हा तुमचा दिवाळी बोनस..” तिच्या हातात एक पाकीट ठेवलं. सगळ्या कामावर गावाहून आल्यावर बोनस देऊ म्हणून सांगितलं होतं पण हा बोनस आधीच मिळाल्यामुळे फराळाला दोन पदार्थ जास्त करता येतील म्हणून तिनं खुश होऊन पाकीट उघडलं तर आत दापोलीची दोन तिकीटं आणि दोन दिवसांचं हाॅटेल बुकिंग होतं. 

काय बोलायचं न समजून तिला एकदम लाजायलाच झालं.. ज्या गोष्टीचं स्वप्न बघायचं सुद्धा तिच्यात या गेल्या काही महिन्यात धारिष्ट्य उरलं नव्हतं ते साक्षात घडणार होतं.. 

“पैसे काय सगळेच देतील पण आयुष्यात हे क्षण सुद्धा महत्वाचे असतात.. दोघं कष्ट करताय म्हटल्यावर पैसे काय कुठे जात नाहीत.. मग काय मंगला बाई? जाताय ना?” रोहननं चिडवण्याच्या सुरात विचारलं. 

“खरंच बाई, तुम्हा या एकट्या राहणाऱ्या मुलांची गोष्टच वेगळी असते.. तुमचं काही समजत नाही..” जोशी काकूंचा डायलॉग वेगळ्याच स्टाईलमध्ये मारून मंगला आत निघून गेली! 

 

©मुग्धा सचिन मणेरीकर 

लेखक: 

No comment

Leave a Response