Primary tabs

प्रवास

share on:

'उद्या सकाळी सहाचीच गाडी आहे. त्यामुळे लवकर उठावं लागेल....' अशा गप्पांपासून प्रवासाला सुरुवात होते. प्रत्यक्ष प्रवासाच्या आधीच आपल्या मनात वेगळा प्रवास सुरू झालेला असतो. या प्रवासात गाडी मिळेल का, मिळाली तर जागा मिळेल का, रिझर्व्हेशन केलं असलं; तरी सीटवर कोणी बसलं नसेल न, शेजारी कोण असेल वगैरे वगैरे प्रश्न कधीच त्रास देत नाही. प्रवासाआधीचा प्रवास यामुळेच सुखावह ठरतो. त्यात कायमच खिडकीजवळची जागा फक्त आपल्यालाच मिळालेली असते (मनाला काय अशक्य आहे...), सोबतीला आवडतं पुस्तक असतं (मनाच्या प्रवासात 'अरे पुस्तक घरीच विसरलो,' असं कधीच होत नाही), हातात गरम चहाचा कप असतो (मनाच्या प्रवासातला चहासुद्धा उत्कृष्टच असतो) आणि सगळे प्रवासीसुद्धा खूप हसत-खेळत, हास्यविनोद वगैरे करीत प्रवास करत असतात. वर वर्णन केलेलं चित्र कधीच रंगवलं नाही, असं कोणी तरी असेल का? अगदीच नाही!

प्रवासाआधीचा प्रवास मनाला अधिक भावतो, कारण त्यात मन रमतं. मनाला त्यात आनंद घेता येतो. हवा तसा स्वच्छंदी विहार करता येतो. व्यावहारिक प्रश्न, आर्थिक गणितं, सामाजिक समस्या, वैयक्तिक अडचणी, खासगी शंका यापैकी काहीही तिथे नसतात. 'हवं तसं वागा' या तत्त्वावर उभ्या केलेल्या इमारतीचा डोलारा अगदी हवा तसाच रंगवता येतो.   प्रत्यक्ष प्रवासाचे नियम, आडाखे, अटी वगैरे इथे नसतातच. 'पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे'वर प्रवास करत असाल, तर ट्रॅफिकच्या वेळा सोडून घरातून निघा.... अशा कोणत्याही अटी-शर्तींशिवाय मन सुसाट धावत असतं. गाडी लोणावळ्याला असतानाच, मन 'फोर्ट'मधल्या एखाद्या जुन्या हॉटेलात चहा पीत बसलेलं असतं.

तात्पर्य, मनाचा प्रवास कधी संपत नाही आणि प्रवासातलं मन कधी थांबत नाही. कारण... धावणं आणि त्यातही सुखाच्या मागे धावणं हा मनाचा स्थायीभाव आहे. मनाच्या प्रवासाला तिकीट लागतं ते फक्त 'कल्पने'चं! कल्पनाविस्तारच होऊ शकत नसेल, आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही तरी वाटणं ही क्रियाच होऊ शकत नसेल, तर मनाचा प्रवास थांबतो. मग असं मन एसी स्लीपर कोचमध्ये वाफाळती कॉफी पिताना हातात आवडीचं पुस्तक असूनही उदास असतं. नक्की काय कमी आहे, उणीव आहे ती कशाची, हेच कळत नाही. जीव कल्पनेत रमत नाही आणि वास्तवात टिकत नाही, अशी अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी अवस्था असते. 

ही अवस्था, ही उदासीनता, हे नैराश्य येऊ नये यासाठी मनाचा प्रवास करत राहावा, त्यात दिसणाऱ्या गोष्टी टिपत जाव्या, ज्या आता सुटतील त्या पुढच्या फेरीत गाठाव्यात, जे सहप्रवासी आवडतील त्यांच्याशी जुळवून घ्यावं, ज्यांच्याशी पटणार नाही त्यांना सोडून द्यावं, वाचलेल्या पुस्तकांचं चिंतन करावं, पळणाऱ्या झाडांना मोजण्याची स्पर्धा करावी, एखादा मोठा डोंगर दिसेनासा होईपर्यंत त्याकडे पाहात राहावं, सूर्योदय आणि सूर्यास्त कॅमेऱ्यात अलगद घ्यावेत, कधी एकाच प्रवासात पुस्तक संपवावं, तर कधी मोबाइलवर एखादा पिक्चर पाहावा. कधी एखादं व्याख्यान ऐकावं, तर कधी एखादीच बंदीश पुन्हा पुन्हा ऐकत मनाचा तळ गाठावा. कधी एखादी कविता उलगडावी, तर कधी कवितेसारखी एखादी आठवण.... 

ही यादी न संपणारी आहे आणि म्हणूनच आपला प्रवासही न संपणारा आहे. न संपणाऱ्या प्रवासाला आरंभबिंदू मात्र असतो, तो बिंदू म्हणजेच हे सदर, कल्पनेचा प्रांत... समर्थ रामदास स्वामी म्हणतात... 
कल्पनेचा प्रांत, तो माझा एकांत
तेथे मी निवांत, बैसेन...

माझ्यासह तुम्ही आणि तुमच्यासह मी या कल्पनेच्या प्रांताचा प्रवास करण्यासाठी तयार होऊ या! या प्रवासात आपण सगळे सोबत असलो, तरी ज्याचा-त्याचा 'एकांत' निश्चित वेगळा आहे, स्वतंत्र आहे. त्यामुळेच प्रत्येकाची अनुभूती वेगळी आहे.

दर आठवड्याला होणाऱ्या या भेटीतून, या प्रवासातून काय हाती येईल, काय मिळेल, कोणती नवनिर्मिती होईल, याची उत्सुकता मलाही आहेच. एखाद्या 'जिप्सी'प्रमाणे मी माझी बॅग भरून माझ्या चौकटीबाहेर पडलोय. ठिकठिकाणच्या वळणांवर, छोट्या-मोठ्या थांब्यावर तुम्ही भेटाल... दाद द्याल... नवी ऊर्जा द्याल आणि न जाणो तुम्हीही चार पावले चालाल, असा विश्वास वाटतो!

- मयूर भावे.
9552416459
mayurbhave28@gmail.com

लेखक: 

No comment

Leave a Response