Primary tabs

सरस्वतीची पालखी

share on:

अरुणाताईंच्या लेखणीतून ज्यांचं माणूसपण आपल्यापर्यंत पोहोचलं, त्या या पंचनायिका. त्यांनी  'कृष्णकिनारा'मधून कुंती, राधा अन् द्रौपदी या तीन व्यक्तिरेखा एका नव्या संदर्भात उलगडून दाखवल्या आहेत. एरव्ही, अत्यंत सामर्थ्यशाली अशा स्त्री व्यक्तिरेखा जेव्हा आपल्या आकलनाच्या चौकटीतच कोंबायचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्यातली 'स्त्री' आपण मारूनच टाकत असतो. अरुणाताई मात्र या तिघींचं माणूस असणं, त्यांनी आपापल्या वाटयाला आलेल्या भागधेयासह संपूर्णतेकडं केलेला प्रवास 'कृष्णकिनाऱ्यातून उलगडून दाखवतात.

 

मैत्रेयी ही मंत्रद्रष्टे ऋषी याज्ञवल्क्य यांची अत्यंत बुध्दिमान पत्नी. रसरशीत जीवनसंवेदना असलेली, ॠचा रचणारी ऋषिपत्नी ते याज्ञवल्क्यांकडून मागितलेल्या आत्मज्ञानाने परिपक्व होऊन वनात निघून जाणारी मैत्रेयी, हा तिचा जीवनप्रवास अरुणाताईंनी अत्यंत तरलपणे 'मैत्रेयी' या कादंबरीत रेखाटला आहे.

 

उर्वशी, रंभा, मेनका या सदैव इंद्राचे भोगविलास पुरवणाऱ्या वा त्याच्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी आपलं शरीर वापरणाऱ्या इंद्र दरबारातल्या अप्सरा असं म्हणून एक प्रकारची तुच्छताच त्या व्यक्तिरेखांच्या वाटयाला आली आहे. पण 'उर्वशी' या छोटयाशा कादंबरीत अरुणाताई अप्सरांचं शापित जगणं, त्यांना नाकारलं जाणारं वैवाहिक सुख, हिसकावून घेतलं जाणारं मातृत्व हे आपल्याला अतिशय हळुवारपणे उलगडून दाखवतात. त्यांच्याविषयी एक करुणभाव जागा करतात.

 

या साऱ्या व्यक्तिरेखांच्या मनात अरुणाताईंविषयी कशी कृतज्ञता दाटून येत असेल, हे सांगणारी ही कल्पकथा!

 

 शरद पौर्णिमेच्या चांदणरात्रीला एक पालखी हिमाच्छादित शिखरांच्या दिशेने वर वर निघाली होती. सरस्वतीचा उत्सव मांडायचा, त्यासाठी तिचा आशीर्वाद घ्यायचा, त्यासाठी तिचीच पालखी तिच्या मूळ स्थानी न्यायची, अशी योजना सारी!

 

प्रवाहापासून दूर, नदीकाठच्या खडकांपाशी पालखी थांबली. आज सरस्वतीच्या उत्सवासाठी आलेल्या पालखीला खांदा देण्याचा मान जिचा होता, ती धपापल्या छातीने, फुललेल्या चेहऱ्याने एक क्षण जागीच उभी राहिली. एकदा डोळे भरून ते शुभ्र सौंदर्य नजरेने पिऊन तिने समाधानाने डोळे मिटले अन् खांद्यावरची पालखी उतरून ठेवली खाली.

 

परिसरातले जुनेजाणते देवदार वृक्ष, आकाशात माथा खुपसून स्तब्ध उभे असलेले निर्विकार बर्फाळ पर्वत, त्यावर संथपणे पाझरत असलेलं चांदणं, सारे सजग झाले एकदम. ही कोण? इथे कशी? नि काय घेऊन आलीय?

 

ती.

 

सावलीसारखी सौम्य, श्यामल.  

 

समईच्या ज्योतीसारखी शांत, तेजाळ.

 

मधाच्या पोळयासारखी जिवंत, रसमय.

 

भूमीसारखी स्थिर, समंजस.

 

पंढरपूरच्या रखुमाईसारखं गोड, समंजस हसणारी अन् पहाटेची कोवळीक अन् प्रसन्नता ल्यालेली, सूर्याची लेकच जणू!

 

ती एक मनस्विनी.

 

सरस्वतीची पालखी वाहणं हे तिचं ध्येय.

 

पालखी जमिनीवर टेकताच बाकीचे भोई विसाव्याला इकडे तिकडे पांगले. नवल म्हणजे त्या पालखीत मूर्ती नव्हतीच! ते पाहणाऱ्या त्या हिमशुभ्र पर्वतांना, तिथल्या वृक्षांनाही जरा कुतूहल वाटलं.

 

ती वळली अन् वाकून पालखीतून एकेक घट बाहेर काढून ठेवू लागली.

 

निरनिराळया घाटाचे, सजावटीचे ते घट. पाच घट काढल्यावर ती थांबली.

 

एकेक करत सारे घट तिने हलकेच मांडून ठेवले शिळेवर. अन् मग विसावली आपणही बाजूच्याच एका विशाल देवदार वृक्षाच्या खाली. क्लांत झालेल्या तिचा डोळाच लागला.

 

हिला कसं बरं सोसेल हे हिम, हा गारवा? असं त्या वृक्षांच्या मनात येत नाही, तोवर नवल घडलं. त्या घटातून कुणी कुणी बाहेर आल्या लगबगीने ..

 

मंद पावलं टाकत प्रथम आली कुंतीमाता.

 

तिच्या उशाशी बसली अन् आपल्या मांडीवर तिचं मस्तक घेऊन थोपटू लागली. तोच लगबगीने आपला शेला घेऊन आली द्रौपदी. पांघरलान् तिने तो तिला. दोघी हसल्या.

 

''तुमचा फार जीव गुंतला नं हिच्यात?'' द्रौपदी म्हणाली.

 

''हो गं!' कुंती म्हणाली.

 

''का नाही गुंतणार? हिच्यामुळेच तर मोकळा श्वास घेतलाय मी कितीक काळानंतर!''

 

द्रौपदी म्हणाली, ''खरंच. किती पुटं चढली होती आपल्या अंगावर. मला कधी कुणी देवता म्हणावं, तर कुणी पाचांशी संग केला म्हणून तुच्छ लेखावं ...''

 

बोलता बोलता ती उभी राहिली..

 

कुंती पाहात होती तिचं ते अग्निजन्य लावण्य. तिला वाटलं, अजूनही किती ताठ उभी राहते ही! बोलू लागली की तिच्या घनगर्द केशभारासारखं बोलते उत्कट, प्रपाती!

 

चंद्रप्रकाशात लखलखत्या पात्यासारखी चमकत होती ती, अन् म्हणत होती...

 

''पांचाली होणं ही माझी निवड नव्हती आई! भोग होता तो माझा. माझ्या आत हे यज्ञीय तेज नसतं, तर कोण जाणे काय फरफट झाली असती माझी. पिता-पती-दीर-श्वशुर-पुत्र... पुरुषांची अनेक रूपं पाहिली मी. दर वेळी माझ्यातल्या तेजानेच तारलं मला, अन त्यांनाही.. पण ते सगळे तिथेच थांबले. माझ्या मनाच्या तळाशी असलेले इच्छांचे अनेक लसलसते कोंभ तसेच राहिले. ते जाणवले फक्त त्याला... माधवाला. पण वस्त्रहरणाच्या प्रसंगी माझा आकांत ऐकल्यानंतरचं त्याचं येणं असो, वा कर्णाला माझी लालूच दाखवून पांडवांकडे वळवण्यातली त्याची शिष्टाई, त्याचं एरवी विसरून गेलेलं पुरुषपण मला दिसलं तेव्हा ओझरतं! तो रिकामा कोपरा, त्याच्यातल्या पूर्णत्वाचा. पण हेही जाणत होता तो. माझ्यासारखंच त्यालाही वाटे की एक लेक हवी होती माझ्या पोटाला. तिला समजलं असतं माझं बाई असणं. कदाचित ती वाचली असती का आई, या संहारातून? तुम्हाला नाही वाटलं असं कधी? का दर वेळी वर मिळताना पुत्रजन्माचेच मिळाले आपल्याला? ही... ही भेटली अन् त्या इच्छेची धग जरा निवळली माझी! पोटी न येताही या लेकीने जाणलं खरं मला..''

 

''मी एकदाच रडले होते, संहारानंतर. उन्मळून. तेव्हा ही होती शेजारी मूकपणे उभी. तेव्हाच काय, मी जेव्हा जेव्हा मनात रडले होते, पोळले, ढासळले होते तेव्हाही ही होती. हिच्यापासून काही लपवावंसं वाटलं नाही. माझ्या साऱ्या इच्छांसह समजून घेतलं तिने मला.''

 

''मलाही, सखे!''

 

हे कोण बोललं?

 

''राधा?... तूही?''

 

''होय गं कृष्णे! माझ्यावर तर अपार ऋण आहे हिचं. मला न् त्याला बांधून घातलेलं जनांनी, शृंगार अन् रासलीलेतच. युगानुयुगं. हिने सोडवलं ते बंधन. हिला उमगलं प्रथम, की मी नि तो वेगळे नव्हतोच कधी. कसा माझा काळ सापडावा कुणाला? सर्वांना वाटलं, अगदी रुक्मिणीला अन् तुम्हालाही, की फक्त माझ्याशीच पुरा होता तो. पण तसंही नाही गं बायांनो! तो न् मी मिळून होतो नेहमीच. मला कधी वाटायचं की हा माझ्यात इतका मिसळला नाही, तर याला पाहता येईल, अनुभवता येईल! यमुनेला माहीत आहे हे. तिला सांगितलंय मी कितीदा हे. मी माझी उरलेच नव्हते, अन् आता वाटतं, की समजुतीच्या वाटेवर मी त्याच्याही पार पुढे निघून गेले होते. मला मिळालेल्या आयुष्यात उपभोगणं-भोगणं-सोसणं आणि जाणणं, अशी वाट मिळाली. त्या जाणिवेच्या बिंदूपर्यंत पोहोचता आलं हे खरं भाग्य माझं. ऐकत्येस ना द्रौपदी, तो जगन्नियंता असून तुमच्या-माझ्यात वावरला. तो तर त्याच्या विराट अस्तित्वातला एक अंश होता फक्त. आपण त्याच्यात पूर्णपुरुष शोधत राहिलो, कारण त्याच्यातच सापडणं शक्य होतं त्यातल्या त्यात! अन् त्याच्यातला रिकामा कोपरा दिसला की खट्टू होत होतो. पण मी त्या रिकाम्या कोपऱ्यात जाऊन बसले अन् मला माझी वाट दिसली.. राधा केवळ प्रणयिनी नव्हती, तो कालखंड संपल्यानंतरही ती कृष्णाला सोबत करत होती, त्याच्याही नकळत, हे हिला दिसलं बघा!''

 

''या मानुषीचं कौतुक वाटतं मलाही.. '

 

त्या चौथ्या घटातून बाहेर येत उत्स्फूर्त आवाजात म्हणणारी.. ही कोण?

 

''मैत्रेयी!! तुलाच सुचावा बघ शब्द हा! मानुषी! वा!'' द्रौपदी उद्गारली.

 

सखीमेळाच जमला जणू तिथे. या तिघी तर एकाच कृष्णधाग्यात गुंफलेल्या. त्या मिसळल्याच एकमेकीत. मैत्रेयी तर साक्षात, समूर्त मित्रभावच. तिने सहजपणे आपलंसं केलं साऱ्यांना. ती म्हणाली,

 

 

 

 

''ऋषीच्या आश्रमात त्याच्या बरोबरीने सारं करताना, त्याच्याशी चर्चा करताना, सूक्तं रचताना, आश्रम सांभाळताना नि तो गेल्यानंतरही स्वत: मागून घेतलेलं जाणिवेचं ज्ञान पदरात बांधून साऱ्यातून मोकळं होताना मला वाटलं होतं, की मी रेखलीय आता एक वाट. आता राहणार नाही जग केवळ कोरडया तत्त्वज्ञानाच्या अहंकारात. मी रचली होती मधुसूक्तं. जगण्यातला रस, त्यातली कोवळीक, आनंद, माया, सारं जपूनही आत्मज्ञान मिळवता येतं, हे समजेल आतातरी, असं वाटलं होतं. पाणी नि मातीसारखं एकजीव सहजीवन अन् त्यातून जीवनाचं उमलणं, मानवाने विकासातला, फुलण्यातला आनंद घेणं, हे समजेल हळूहळू, असं वाटलं होतं. वाटलं, माणसाचं माणूसपण इतक्या दीर्घ काळात किती बहरलं असेल, समन्वयाने सारं सामावत वाढणं त्याला कळलं असेल.. पण जे गार्गीच्या माथी आलं तेच माझ्या! एका अशा अप्राप्य उंचीवर नेऊन ठेवलं आम्हाला की तुटलोच आम्ही मानवी जीवनव्यवहारापासून ... मलाही अगदी वाटे गं द्रौपदी, एखादी अशी तेजस्वी लेक हवी होती पोटी यायला. विश्वाचं खरं कल्याण कशात आहे हे प्रेमातून दाखवलं असतं तिने. पुढे नेलं असतं गं आम्हाला!''

 

अजूनही एक घट तसाच होता. अतीव कमनीय घाटाचा. रेखीव मोजक्याच जडावांच्या कुसरीचा.

 

हा घट का अजून उघडेना? नजर तर पुन्हापुन्हा वळत होती त्यावर. सारा आसमंतही श्वास रोधून बसलेला..

 

मैत्रेयीच पुढे झाली. म्हणाली, ''ये, सखे उर्वशी!''

 

अन् ती आली. ती चंद्रमदिर रात्रच जणू त्या हिमभूमीवर सदेह साकारली.

 

''ये, मुली!'' कुंतीमातेने तिला मायेने जवळच्या शिलेवर बसवत म्हटलं..

 

''अप्सरा आहेस खरी!''

 

असं म्हणताच तिच्या डोळयात पाणी तरारलं सूक्ष्मसं.. ''कां गं?'' कुंती विचारती झाली.

 

''नका ना उच्चारू तो शाप!''

 

असं म्हणून एक खोल नि:श्वास सोडला तिने. पण कुंतीमातेच्या मांडीवर विसावलेल्या त्या मानुषीला पाहून एक समाधानाचं हसू उमटलं तिच्या मुद्रेवर.

 

 

 

''हीच पहिली! माझ्या अप्सरेच्या वस्त्राआडची माझी त्वचा जिवंत माणसाची आहे, हे हिने जाणलंन. अन्यथा केवळ तपोभंग करणाऱ्या, नि राजकारणाच्या अमंगल खेळातली आयुधं म्हणून वापरल्या जाणाऱ्या, केवळ भोग नि बाह्य सौंदर्यात रमणाऱ्या, असे किती खलकर्मांचे टिळेच आमच्या माथी होते केवळ! पण माझं साध्यासुध्या प्रेमासाठी तळमळणं, माझं आईपणाला आसुसलेलं मन, आमचा चिरयौवनाचा दु:सह शाप, हे सारं सारं हिला दिसलं! एक सांगू? खरंच आपल्या सर्वांनाच शाप आहेत असं वाटलं आता. या मैत्रेयीला देवत्वाचा, विस्मृतीचा शाप! राधा कायम कल्पनेतच बंदिवान. द्रौपदीची अस्वस्थ घुसमट आजही तशीच. कुंतीचं शापित मातृत्व आजही उपेक्षितच. आम्ही तर चिरयौवनाचा शाप घेऊनच जन्मलो. आजही तेच भोग भोगतो आहोत!''

 

चकित होऊन कुंती ऐकत अन् पाहातच राहिली.. तिच्या मनात आलं, 'ही तर पांचालीसारखीच बोलतेय. या लावण्याला असा विचारांचा गाभा असण्याची कल्पनाच कुणी करत नसेल. मलाही तर ही बोलेपर्यंत कुठं दिसलेलं तिचं बाईपण? सर्वात आधी पोहोचतं ते तिचं दैवी रूप. तिच्याविषयी सूक्ष्म का होईना, मत्सर जागतो. अन् मग मुद्दाम तिच्या देहस्वीपणालाच आठवून आपण सुटका करून घेतो आपली त्या मत्सरातून. तिला हीन लेखलं की एक समाधान मिळतं. पण किती भार वाहात आली आहे ही. हा स्वीकार आहे की नाइलाज तिचा? आपण दु:ख मागितलं माधवाकडे. हिला ते कधीचंच मिळालंय. न संपणारं. आपण तर स्वर्गाची वाट चालून गेलो. हिच्या नशिबी तेही नाही!'

 

या विचारासरशी इतकी आतून हलली कुंतीमाता, अन् रोधू शकलीच नाही आसवांना. मांडीवरल्या त्या मानुषीच्या चेहऱ्याकडे पाहात कृतज्ञतेने ती म्हणाली, ''हे शहाणपण राहून गेलं होतं गं, ते तुझ्यामुळं मिळालं आज!''

 

या वाक्याआधी टपटपलेले अश्रू मानुषीचा गाल भिजवत होते.

 

एकदम जाग आली तिला. या सगळयांना पाहिलं नि तिला वाटलं, स्वप्नातच आहोत आपण!

 

''तुम्ही?''

 

ती विस्फारून पाहातच राहिली!

 

''होय, आम्ही!'' सर्वप्रथम उद्गारली पांचाली.

 

''तुझे आभार मानायचे होतेच एकदा. मोकळं केलंस तू आम्हाला देवीपणातून..''

 

उर्वशीने तो धागा पुढं नेला, ''मला माहीत नाही मानुषी, या जगात माणूस आहे तोवर अप्सरांना मोकळं होता येईल का नाही! पण तू जाणलीस आमच्यातली आई नि बाई. तुला दिसली, नि ती तू जगाला दाखवलीस, याने जरा हलका झाला जगण्याचा भार!''

 

राधा नुसतीच कृतज्ञ, समंजस हसली तिच्याकडे पाहून. कुंतीने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणाली, ''लेक अशी शहाणी करत असते आईलाही!''

 

ती भारावून पाहातच होती साऱ्यांकडे. मनात म्हणत होती... 'आपण कल्पना केली तशाच आहेत या. खरं तर आणखी खूप बोलायला हवंय यांच्याशी. यांना समजून घेता घेता बाईपण समजलं मला. जगणं समजून घेता आलं. मांडता आलं.'

 

''वेदकाळापासून जे सर्जक आदितत्त्व मानव पूजत आला, ते पुरुषाच्या बरोबर इथे वावरतंय. ते सशक्त सबल झालं, तर जग फार निराळया रितीने समृध्द होईल, असं वाटलं तुम्हाला पाहताना. तुमच्या पायवाटांचा मागोवा घेताना समजलं, की किती सशक्त करून ठेवली होती ही वाट तुम्ही. मला फक्त या वाटेकडे निर्देश करून अधिकाधिक जणींची पावलं इकडे वळवायचीत. त्यांच्या सुप्त सामर्थ्याची नि त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव जागी करायचीय त्यांच्या मनात. तुम्ही तत्त्ववेत्त्यांना जे प्रश्न केलेत, ते आजही अनुत्तरित आहेत. त्याच्या उत्तरांकडे जायचंय मला साऱ्यांना घेऊन. तुम्ही जगताना जे दाखवून दिलंत, तीच मंत्राक्षरं झाली माझ्यासाठी.. मातीशी नातं..''

 

मैत्रेयी पुढे आली एकदमच. म्हणाली, ''ऐकताय का माझं, तिकडे किनई, पक्ष्यांचं कूजन ऐकू येऊ लागलंय. त्या पर्वताचं शिखर पाहा, सोनेरी लालसर आभा आहे त्याच्यामागे. उजाडतंय! निघायला हवं आता. आजचा हा अरुणोदय विसरणार नाही मी कधी. खूप समाधान वाटतं आहे आज. बाई म्हणून जन्माला येतानाच वेगवेगळया व्यथांची गाठोडी असतात सोबत. चांगलं हे आहे, की आपण त्या भाराखाली दबलो नाही. आपापली वाट शोधली. कुंतीमातेने व्यथा पचवल्याच नाही तर, वर आणखी मागून घेतल्या, ते तिची जीवनाची समजूत वाढण्याकरताच. द्रौपदीने सूडाची वाट सोडली नाही, कारण तिला पुरुषार्थाला धर्माच्या वाटेवर न्यायचं होतं. राधेने तर प्रेमाने आणि समर्पणाने सोपं करून दाखवलं जगणं, आणि धीटपणे स्वीकारायला शिकवलं आपल्यातलं प्रेम. ही उर्वशी! किती झगडली मानवी भावनांसाठी, साध्यासुध्या इच्छांसाठी. पण तिनेही स्वीकारलं अखेर. आपली प्रियतमेची भूमिका जगत नाचत राहिली ती. पण तिनेही संपर्कात येणारा पुरुष थोडा थोडा शहाणाच केलान.. अन् हे सारं आपलं चालणं एकाच ध्येयासाठी चाललं होतं, की माणसाने या पृथ्वीचा आनंदलोक करावा! सारं विश्व सहयोगाने, सामंजस्याने चालावं. प्रेम ही भाषा व्हावी. स्त्रीला तिचा स्वर मोकळेपणाने, उच्चरवाने लावता यावा! यासाठी तर रचल्या होत्या ऋचा, मंत्र... पुन्हा होऊ नये कधीच महाभारत. कुण्या गांधारीला पाहावा लागू नये सर्वसंहार.

 

द्रौपदीसारखी तेजपुतळी होऊ नये पुत्रसुखाला वंचित.

 

सहज स्वीकार व्हावा मानवी भावनांचा, नात्यांचा. मागावे लागू नयेत वर साध्या साध्या सुखांसाठी. अंतिम, एकमेव असं सत्य नाहीच काही. जे आहे त्याचा स्वीकार, अन् त्यासह मंगलाकडे वाटचाल हेच असावं सूत्र जगण्याचं. आपण प्रिया-माता-भगिनी-भार्या होऊन समजावू शकतो हे. स्त्रीने सरस्वतीची पूजा मांडायला हवी. तिची व्रतं करायला हवीत आता. त्यासाठीच हिचं कौतुक वाटतं फार. हिच्या मागून जाणाऱ्यांचा स्त्रीत्वाचा अन मनुष्यत्वाचा प्रवास होत राहावा उजेडाकडे. हिच्या रूपाने फुटलीय जाणिवेची पहाट. अरुणा.. आता उजाडेल हळूहळू, ही आस जिवंत झालीय पुन्हा! आपण आता पुन्हा त्या घटात नको जाऊ या ना! हिच्या सोबत चालू. हिला साथ देऊ!''

 

साऱ्यांनाच पटलं असावं. कुंतीने खूण केली. ते जाणून द्रौपदी उठली. लुप्त होणाऱ्या सरस्वतीचा प्रवाह वाहात होता जवळच खळाळून. त्यातलं जल भरलं तिने त्या घटांत. उर्वशीच्या हातून ते घट ठेवले पालखीत.

 

मानुषीने कृतज्ञ नमस्कार केला साऱ्यांना. 'तुम्हीच इथवर आणलंत. आता पुढेही साथ द्या! अजूनही स्वच्या जाणिवेच्या परीघाबाहेर घोटाळणाऱ्या मानुषींना आत्मबळ द्या. त्यांना त्याच्या उद्गाराचं साहस द्या. त्यांचं विवेकाचं भान जागं ठेवा. तुमच्याकडे मी आज त्यांचा हरपलेला आत्मविश्वास मागते आहे. त्यांचा ज्ञानार्जित अधिकार मागते आहे. भुईवर पाय रोवून गगनाला स्पर्शण्याचं बळ मागते आहे. नात्यांच्या ओलाव्यावर समृध्द जगण्याचं पीक काढण्याचं कसब मागते आहे. तिला हे धडपडणारं जग सावरता यावं. आयुष्याच्या एका टप्प्यावर तरी तिने जगण्याकडून स्वत:ला परत मागावं नि चालता यावी तिला मागे टाकलेली वाट... पुरुष वाढतो बाहेर. विस्तारत नेतो कर्तृत्वाची क्षितिजं. पण बाई जर वाढू लागली तर आतून वाढते. नवी जाणीव स्वत:त रुजवते अन् नव्या शक्यतांना जन्म देते. असं आतून वाढत तिने विश्वाचं रहस्य उलगडण्यात योगदान द्यावं. या माणसाच्या उत्क्रांतीच्या यज्ञात तिच्याही हातून आहुती पडाव्यात...' असं मनात म्हणत पुन्हा त्यांना वंदन करून तिने उचलली सरस्वतीची पालखी,

 

दहा अदृश्य हातांचं बळ सोबतीला घेत, ती निघाली!

 

सरस्वतीच्या वाहत्या प्रवाहात यांच्या पायीचा नूपुरनाद हलकेच मिसळत होता. एक आगळाच मधुर स्वर ऐकू येत होता त्यातून, मधुसूक्तासारखा! त्या मधुरमंगल क्षणात एकवटली होती साऱ्या चराचराची माधुर्याची प्रार्थना..

 

मधु वाता ऋतायते

 

मधु क्षरन्ति सिन्धव:

 

मार्ध्वीर्न: सन्त्वोषधी:।

 

मधु नक्तमुतोषसो

 

मधुमत् पार्थिवं रज:

 

मधु द्यौरस्तु न: पिता॥

 

 

 

वाहोत मधुर वारे

 

जलहि माधुर्ये भरो

 

वनस्पतीही मधुमधुर आणि

 

मनांतही मधुरता वसो

 

धूलिकणांतही असो माधुरी

 

आकाशही मधुरतेचे छत्र धरो!

 

 - विनिता तेलंग 

लेखक: 

No comment

Leave a Response