Primary tabs

एका डेटिंगची गोष्ट

share on:

''डिअर, आज रात्री आपण डिनरला जातोय. मी घरी पोहोचेन तोवर तयार हो.'' तिने डायरीत आजची तारीख लिहिली. प्रसन्न हसली. आणि त्याच उत्साहाने तयारीला लागली. 'ती' डेट आणि आजची 'डेट'. वर्षं उलटली तरी उत्साह कायम होता. फरक इतकाच होता -आज टेबल त्याने बुक केलं होतं, साडी त्याने आणली होती आणि वेळ तो पाळणार होता. इतका सारा बदल. कारण अर्थातच आता ती बायको होती आणि तो नवरा. आणि त्याला हे मनोमन पटलं होतं की 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक 'डेट' असते.'

मोर किमान पाच हजार तरुण-तरुणी. आख्ख्या तरुणाईला वेड लावणारा गायक आणि त्याच्यासोबतचे आणखी चार जण. गेले तीन तास त्यांच्या गाण्यांच्या बोलावर आणि गिटार, ड्रमच्या तालावर तरुणाई डोलत होती. शेवटचं गाणं सुरू होणार, इतक्यात त्या 'celebrity' गायकाने त्याला बोलावलं. चित्कारणाऱ्या 'crowd'कडे बघत गायक म्हणाला, ''Thanks Bro, This event was possible only because of you.'' क्षणार्धात आख्ख्या गर्दीतून त्याच्या नावाच्या आरोळया निघाल्या. तो निवांत हसला आणि गर्दीकडे पाहत त्याने एक फ्लाइंग किस दिला. गायकाने हातात माईक घेतला आणि सूर छेडले, ''तुम हो तो गाता है दिल....'' तो backstageला आला, सिगारेट शिलगावली. घडयाळात पाहिलं, दीड तास उशीर. Shit, Man!!! थांबली असेल का ती?? असेल, थांबली असेल. आज खरं तर इतका महत्त्वाचा कार्यक्रम, तरीही आपण तिला भेटायला तयार झालो. तिला दिलेली वेळ आणि आपलं काम यात आजही कामाने बाजी मारली. ठीक आहे, दीड तास उशीर झालाय, पण थांबली असेल ती. विचारांच्या गणगणीत त्याने मोबाइलकडेसुध्दा पाहिलं नाही. सिगरेट विझवली, बाइकला किक मारली आणि निघालासुध्दा. निघता निघता इतकंच पुटपुटला, 'ती नाही जाणार आजची 'डेट' सोडून.'

चेहऱ्यावर भलंमोठ्ठं हसू घेऊन ती तितक्याच मोठ्ठया बेडरूममध्ये शिरली. आत गेल्या गेल्या ती आरशासमोर उभी राहिली. स्वत:शीच हसून तिने स्वत:लाच पाच वेगवेगळया पोझेसमध्ये पाहिलं. तीन दिवसांपूर्वी त्याने सांगितलेलं, ''आपण चार दिवसांनी भेटू या. मला असं वाटतंय आपल्याला दोघांनाही एकमेकांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय.'' तिने ते एक वाक्य पुन्हा पाच वेळा वाचलं. कसं कळतं नं त्याला मनातलं सगळं!!! असा एक उनाड विचार तिच्या मनात डोकावला. चार दिवसांतले तीन तर गेले, म्हणजे उद्याच संध्याकाळी जायचंय त्याला भेटायला. तिने कपाटातले सगळे टॉप्स बाहेर काढले. आख्खा बेड बघता बघता रंगीत झाला. त्याकडे बघता बघता ती स्वत:शीच बोलायला लागली, 'त्याला आवडणारे एकूण रंग तीन. त्यातले दोन रंग मलाही खुलून दिसतात. (म्हणजे मला कुठलेही रंग खुलून दिसतात म्हणा!!) बरं. तर त्या दोन रंगांच्या सहा छटांचे एकूण दहा टॉप्स आहेत. त्यातला एक निवडायला हवा.' तब्बल तीन तासांनी ती बेडरूममधून बाहेर पडली. उद्याच्या संध्याकाळचा सगळा 'लुक' फायनल करून.

आज उशीर करायला नको हे डोक्यात ठेवून तिने वेळेत आटोपलं. त्यानेही वेळेत यायला हवं. कसलातरी इव्हेंट आहे म्हणत होता. हा मनुष्य एक आख्खा दिवस देऊ शकत नाही. संध्याकाळ मागितली फक्त, तर तीसुध्दा इव्हेंट manage करून येतो असं म्हणालाय. नाही करणार आज उशीर. आजची 'डेट' मिस नाही करणार तो. विचारांच्या चक्रात बुडालेली असतानाच तिने कारचा दरवाजा उघडला आणि ती आत बसली. आरशामध्ये तिने पुन्हा स्वत:ला पाहिलं आणि स्वत:वर निहायत खूश झाली. आजच्या 'डेट'साठी ती परफेक्ट दिसत होती.

ठरलेल्या वेळी कार हॉटेलसमोर थांबली. ती उतरली आणि आत शिरली. तो आला नव्हताच. उत्साहात टेबलसुध्दा तिनेच बुक केलं होतं. तिथे जाऊन ती बसली. कधी येईल तो? किंबहुना येईल तरी का? हा प्रश्न तिला छळत होता. वेटरने आणून दिलेल्या मेनू कार्डची पानं उलटत ती बरीच मागे जाऊन पोहोचली. पार कॉलेजपर्यंत. कॉलेज... नुसत्या नावासरशी आठवणी भरभर गोळा झाल्या. तो पहिल्यांदा कॉलेजात भेटलेला. नाही.... भेटलेला तसा शाळेतच, पण भावलेला कॉलेजात असताना. प्रचंड बिझी असायचा तेव्हापासूनच. बोलायचा ते फक्त त्याचे इव्हेंट्स, ऍचीव्हमेंट्स, आणि त्याचा 'बिझी'नेस याबद्दलच. बरंचसं काही ठरवलेलं त्याने आयुष्याबद्दल. काय मिळवायचं, कधी मिळवायचं आणि कसं मिळवायचं ते. भेटी व्हायच्या, तेव्हाही तो तसाच असायचा. कायम घोडयावर. तिच्यासाठी ती भेट असायची, पण त्याच्यासाठी मात्र फक्त 'मीटिंग'. भेटीचा एक तास झुर्रकन उडून जायचा. तासभर ती शोधत राहायची त्याच्या आयुष्याच्या चित्रातली त्याची जागा. तिला मात्र रिकाम्याच हाताने परतावं लागायचं नेहमी. आणि तो??? तो निघून गेला असायचा बाइकला किक मारून. या बाइकवरूनच तिला भेटायला जायचा तो. आजच्यासारखा. चाकांच्याच गतीने त्याचं मनही भूतकाळात जायला लागलं. आवडायची ती त्याला आधीपासूनच, पण तरीही आयुष्याच्या चित्रात तिला कुठे बसवावं हे त्याला उमगायचं नाही. त्याचं चित्र आधीपासूनच तयार होतं. काम, ध्येय, यश या सगळयात तिला कुठे ठेवावं? 'background'ला? ते मान्य नव्हतं त्याला. पण मग मूळ चित्रात घातलंच, तर तितका वेळी देऊ शकणार नव्हता तो तिला. कदाचित मग स्वत:च्या चित्रापेक्षा 'दोघांच्या' चित्रात जास्त गुंतून जाऊ, असं वाटायचं त्याला. भविष्यातल्या यशाचं चित्र काढायचं असेल, तर आजचा वर्तमानकाळ सोडून बाकी कुणासोबत शेअर करायची त्याची तयारी नव्हती. आणि तिची???

भूतकाळाचा बराचसा पल्ला पार करून आता ती वर्तमानात आली. भविष्याचा विचार करता करता ती अधिकच कन्फ्यूज झाली. त्याच्यासोबत आयुष्य काढायचं, तर त्याचं कामच तिची 'सौतन' झाली असती. तिला ते नको होतं. तिला तो फक्त तिचा म्हणून हवा होता. त्याला बाकी कुणाहीसोबत 'शेअर' करण्याची तिची तयारी नव्हती. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने मेनू कार्ड बंद केलं आणि वेटरला बोलावलं. त्याला वाटलं, मघापासून 'नक्की काय मागवायचं?' या विचारात असणाऱ्या म्याडमनी ऑर्डर फायनल केलीये...

त्याचं मात्र काहीच फायनल होत नव्हतं. एका क्षणी त्याला वाटायचं, आपलं काम हेच आपलं पाहिलं प्रेम आहे. खात्री होती त्याला की जितकं प्रेम कामावर करतोय, तितकं तिच्यावर करूच शकणार नाही आपण. पण तरीही प्रत्येक वेळेस तिला भेटला की ही खात्री, विश्वास क्षणार्धात डळमळायला लागायचा. मग तो तिच्याशीही कामाबद्दलच बोलत राहायचा. 'फोकस' ढळू नये म्हणून. आज मात्र आपण हिच्याशी 'आपल्या'बद्दल बोलायला हवं. विचारांच्या तंद्रीतच हॉटेल आलं. त्याने बाइक पार्क केली. ''गुड इव्हनिंग साहेब'' म्हणणाऱ्या दारवानाकडे जवळजवळ दुर्लक्ष करीत तो वेगाने आत शिरला आणि त्याची अस्वस्थ नजर आख्ख्या हॉटेलभर फिरली.

''छोटयाशा विश्रांतीनंतर आमच्या या 'talk show'मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण जाणून घेतोय महाराष्ट्रातल्या एका सुप्रसिध्द बिझनेसमनच्या आयुष्याची कहाणी त्यांच्याच शब्दांत.'' ऍंकरच्या या शब्दांनी तो भानावर आला. खूप वर्षांपूर्वी घडलेल्या त्या डेटची गोष्ट तो आज सगळयांसमोर सांगत होता. ''हं, तर सर, तुम्ही असे हॉटेलचा दरवाजा जवळजवळ ढकलतच आत पोहोचलात. तुमची अस्वस्थ नजर आख्ख्या हॉटेलभर फिरली. आणि पुढे? ती होती का सर तिथे?? तुमची वाट बघत ती थांबली होती का??'' तो हसला. पुन्हा भूतकाळात गेला. क्षणभर थांबून पुन्हा वर्तमानात आला. पक्का बिझनेसमन होता तो. सगळंच काही उलगडून सांगणार नव्हताच. चारचौघात काय बोलायचं आणि किती बोलायचं, याचं चांगलंच भान त्याला होतं. तो म्हणाला, ''तशी तर आयुष्यात मी केलेली कुठलीच 'मीटिंग' निष्फळ गेल्याची मला आठवत नाही. त्यामुळे ती 'मीटिंग'सुध्दा...'' तो अर्थपूर्ण हसला, आणि म्हणाला, ''प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक 'डेट' असते, अशी नवीन म्हण काढायला काही हरकत नाही!''

तिने टीव्ही बंद केला. बेडरूममध्ये जाऊन कपाटात ठेवलेली डायरी काढली. तसं बऱ्याच दिवसांनी त्याने डेटची आठवण काढलेली. तिने डायरी उघडली. त्या पानात नेहमीच बुकमार्क ठेवलेला असायचा. तो दिवस त्या पानात तिने कोरून ठेवला होता. मनातल्या मनात ती डायरीमधला मजकूर वाचू लागली. 'कळत नव्हतं काय करावं, थांबावं की निघावं. नात्यांबद्दल विचार करायला लागले. नातं टिकवायचं म्हणजे तडजोड आलीच. नाती असतात बॅलन्स शीटसारखी. ऍसेट आणि लाएबिलिटीजचा खेळ. त्याच्या ज्या गोष्टी आवडत नाहीयेत, त्यात प्रेमाची ऍडिशन करायची आणि तरीही हिशोब कधी मागायचाही नाही आणि चुकताही करायचा नाही. जमेल का आपल्याला हे?? इतक्यात त्याच्याशी नजरानजर झाली. तो आवेगाने समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. बरंचसं काही बोलला. नेहमीसारखा तोच बोलला, पण आज नुसता स्वत:बद्दल नाही, तर 'दोघांबद्दल' बोलत होता. त्या बोलण्यातून मला तो आणि त्याला मी जास्त समजत गेले. त्या 'डेट'ने आमच्या नात्याचा पाया घातला. उशिरा येऊनही त्याने 'मीटिंग' सक्सेसफुल केलीच.' इतक्यात तिचा मोबाइल वाजला. ''डिअर, आज रात्री आपण डिनरला जातोय. मी घरी पोहोचेन तोवर तयार हो.'' तिने डायरीत आजची तारीख लिहिली. प्रसन्न हसली. आणि त्याच उत्साहाने तयारीला लागली. 'ती' डेट आणि आजची 'डेट'. वर्षं उलटली तरी उत्साह कायम होता. फरक इतकाच होता - आज टेबल त्याने बुक केलं होतं, साडी त्याने आणली होती आणि वेळ तो पाळणार होता. इतका सारा बदल. कारण अर्थातच आता ती बायको होती आणि तो नवरा. आणि त्याला हे मनोमन पटलं होतं की 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक 'डेट' असते.'

 

- अभिषेक राऊत

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response