Primary tabs

माणसं न भेटलेली अन भेटलेली काही...

share on:

मोठी आई, एक कधीही न भेटलेली आजी आणि तुम्ही आम्ही ….

 

मोठी आई. मी काही त्यांना पाहिलेलं नाही. पण त्यांचे नाव घेतलं नाही असा अगदी दिवस नाही तरी आठवडा मात्र  नक्कीच जातं नाही. मोठी आई म्हणजे माझ्या सासूबाईंची आई. माझ्या नवऱ्याची आजी. त्यांच्या दोघांच्याही बोलण्यातून त्या मला सतत भेटत राहिल्या. शांताबाई काणे, मुक्काम पोस्ट १ गणेश कॉलनी, इंदौर.

 

महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधल्या सरदार पटवर्धन ह्यांची ही मधली कन्या. पुढे नागपूरच्या डॉक्टर विठ्ठलराव काणे ह्यांची पत्नी होते काय आणि त्यांचे आयुष्य इतके बदलून जाते काय. सगळंच विलक्षण. मोठ्या आईंचे यजमान ब्रिटिशांच्या आर्मीमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे ते सतत फिरतीवर. ह्या कधी नागपूर कधी साताऱ्यातले कोरेगाव अशा फिरत राहिल्या. आणि पुढे मग तात्यासाहेबांनी म्हणजे त्यांच्या यजमानांनी इंदौरमध्ये कायमचे स्थायिक व्हायचे ठरवल्यावर सगळे काणे कुटुंबीय मग माळव्याचे झाले. तात्यासाहेबांच्या सैन्यातल्या नोकरीमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मोठ्या आईंना आपल्या नवऱ्याचा पत्ताच काय साधा ठावठिकाणंसुद्धा माहीत नव्हता. तो कुठे आहे, कसा आहे काही म्हणता काहीही माहीत नव्हते. फक्त तो आहे हे कळतं असे कारण दर महिन्याला त्यांच्या हातात पडणारा त्यांच्या नवऱ्याचा पगार. पण बाई मोठी धीराची आणि खंबीर. लग्नाने बाईचे माहेर सुटतं, नवीन नाती जुळतात, नवीन बंध रुळतात पण ते ज्या नवऱ्याच्या नावाने बांधलेले असतात त्याचाच असा ठावठिकाणा नसताना स्वतःला रुजवणं आणि फुलवणं वाटतं तितकं सोपं नाही.

 

मी आज नुसता विचार करते तर मला इतकं नवल वाटतं आणि येतं मनात की काय वाटतं असेल त्यांना तेव्हा. किती त्या जीवाची उलघाल, तगमग होतं असेल. कधी आठवणीने नवऱ्याच्या, काळजीने त्याच्या डोळ्यांतून श्रावण बरसत असेल, नाही का? असं मी साधं म्हटलं तरी नवरा माझा म्हणतो, “छे, छे, मोठ्या आईसारखी घट्टमुट्ट बाई एवढ्या तेवढ्याने खचणारी ती नाहीच”. त्याच चूक आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही. असतीलच त्या धीट, धीराच्या पण म्हणून नवऱ्याची सय त्यांचाही डोळा कधी ओला करून गेली नसेल, असं तर नाही.

 

पण त्या काळच्या समाजात असं काही सांगण्या बोलण्याची सोय कुठं होती. त्या सगळ्या पिढीलाच काय काय दिव्यांतून जावं लागलं त्यांचं त्यांना माहीत. आर्थिक ओढाताण, मोठी कुटुंब, संसाराच्या न संपता संपणाऱ्या जबाबदाऱ्या आणि आजूबाजूचे सतत बदलत जाणारे भवताल. आता मोठ्या आईंचेच बघा ना, कुठे पनवेल कुठे इंदौर. खाणंपिणं, भाषा, रीतिरिवाज, अगदी जगण्याच्या पद्धतीत जमीन आस्मानाचं अंतर पण तरी किती सहज त्यांनी हे बदल स्वीकारले, रुजवलं आपल्याला नवीन वातावरणात आणि अगदी भरभरून जगल्या त्या त्यांचं आयुष्य. साधा रोजचा संसार, रोजचंच जेवणखाण, आला गेला, राबता माणसांचा, त्यात मुलांचे जन्म, त्यांना वाढवणं, त्यांचे दुखलं खुपलं सगळं सगळं. तसं पाहिलं तर हे सगळं अगदी एकहाती करणं अजिबातच सोप्प नाही. पण बाई असतेच चिवट आणि तिची जीवनेच्छा तर लव्हाळ्या सारखी महापुरांना पुरून उरणारी.

 

मोठ्या आईंचा कामाचा उरक, झपाटा त्यांचा, त्यांची शिस्त, हाताला असलेलं वळणं, त्यांचं ते सतत कार्यमग्न असणं. आपल्या मुलांसाठी त्यांचे झटणं हे सगळं त्या काळच्या लक्षावधी बायकांनी केलेलं आहेच. पण तरी एक व्यक्ती आणि ती सुद्धा न भेटलेली व्यक्ती असून सुद्धा त्या मला का भावल्या आणि काय देऊन गेल्या हे महत्वाचं वाटतं मला. माणसांनी नुसतं माणसांच्या आयुष्यात असणं त्यात कसली आलेय गंमत. त्या माणसांनी त्या नात्यांनी आपल्याला आणि आपण ही त्यांना काही दिलं तर खरं.

आज जेव्हा केव्हा मी विचार करते की ह्या कधीही न पाहिलेल्या मोठ्या आईंनी मला काय दिलं? तर त्यांनी दिला मला विचार. त्या खरंच काळाच्या खूप पुढे होत्या. त्यांनी कधीही आपल्या मुलीमध्ये आणि सुनेमध्ये भेदभाव केला नाही. आपल्या मुलांमध्ये आणि मुलीमध्ये सुद्धा केला नाही. किती म्हणी त्यांच्या अजून वापरतात माझ्या सासूबाई. ज्याचा केर त्याचा शेर. त्यामुळे कामापुढे मग मुलगा की मुलगी असा भेदभाव नाही. त्यांनी माझ्या सासूबाईंना त्यांच्या लग्नात एक कानमंत्र दिला जो मला सुद्धा इतकं बळ देऊन जातो. त्या म्हणाल्या त्यांना की ज्या घरात जाते आहेस त्या घरात तुझं एक स्थानं निर्माण कर. स्वतःचा कधी असा चेंडू होऊन देऊ नकोस की कधी नवऱ्याने, कधी सासूने तर कधी मुलांनी दिला ढकलून इकडून तिकडे. माझ्या सासूबाईंनी सुद्धा त्यांचा हा कानमंत्र अगदी प्राणपणाने जपला आणि पुढे तो मलाही सांगितला. नात्याने मी त्यांची सून असून सुद्धा. हा मनाचा मोठेपणा त्यांना ज्यांनी दिला त्या परत मोठ्या आईचं. त्यांनी कधी कधीही चार दिवसांचे सोवळं ओवळं पाळलं नाही. नवरा बायकोचे नाते खुलावे,त्यांना त्यांचं जग असावं, अवकाश असावा ह्यासाठी त्या किती तत्पर असतं. हे सगळं, सगळं नक्कीच त्या काळाच्या खूप पुढंच होतं. मोठ्या आईंचा जन्म १९११ मधला होता म्हणजे तुम्हीच विचार करा. किती जुनी ती बाई. त्यावेळचं सनातनी वातावरण पण मोठ्या आई बदलत गेल्या. सरत्या काळानुसार, गरजांनुसार, कधी आपल्या सुनामुलांसाठी, कधी बदललेल्या परिस्थितीमुळे, कारणं काहीही असोत पण त्या  बदलत राहिल्या आणि बदलल्या म्हणूनच तरत राहिल्या.

 

मोठ्या आईचं नाही तर त्या काळातील किंबहुना कोणत्याही काळातली कोणतीही बाई. बाई किती विलक्षण असते नाही? मला बायकांचे अतोनात कौतुक वाटते, मग ती बाई भारतातली असो किंवा कुठलीही. बायका केवळ स्वतःसाठी आणि स्वतःपुरतं जगत नाहीत. बाई जगवत राहते निव्वळ आपल्या घरादारालाच नाही तर परसातल्या झाडामाडांना, अंगणातल्या तुळशीला. पायात येणाऱ्या मांजरीला. खिडकीवरच्या कावळ्याला. दारावर येणाऱ्या भिक्षेकऱ्याला. वेगवेगळ्या नात्यांमधून ती देतंच राहते अक्षय दान. आज मोठ्या आईंच्या निमित्ताने हे सगळं आठवलं आणि त्यातलं उतरलं काही. तुमच्याही घरांत अशी एखादी मोठी आई असेलंच. आणि तिने ही तुमचं आयुष्य कधी भेटता न भेटता उजळवून टाकलेलं असलेच, नाही? 

 

- प्राची बापट

 

लेखक: 

No comment

Leave a Response