Primary tabs

प्रिय सई

share on:

....इथंच जवळपास असेल तुझं नवं घर, या आशेने माझी नजर चहूबाजूंना भिरभिरत्ये... आज ना उद्या तुझी पिल्लं बाहेर येतील आणि त्यांचं 'टयांहा' तुझी मोहीम फत्ते झाल्याची द्वाही फिरवेल. पण मला एक सांगशील? हे जग त्यांना दाखवण्यासाठी तू केलेली धडपड कधी पोहोचेल का त्यांच्यापर्यंत? कधी कळेल त्यांना त्यांच्या आईचं मोठेपण? की, आई म्हणून ते तुझं कर्तव्यच होतं असं म्हणतील ती?... नाही. तसं नाही होणार. तुझी बाळं तुझ्यासारखीच शहाणी, समजूतदार होतील याची खात्री आहे मला.

 प्रिय सईबाई,

खरं तर काही दिवसांपूर्वीचीच आपली ओळख! आमच्या आवारातल्या, माझ्या लाडक्या सोनचाफ्यावर तुझं येणं वाढू लागलं तेव्हापासूनची. सकाळच्या कामाच्या लगबगीतही, एक दिवस तुझ्या कर्णमधुर 'टिटिव... टिटिव'ने माझं लक्ष वेधून घेतलं. खिडकीसमोरच्या माझ्या चाफ्यावर बसून तू कसलीशी टेहळणी करत असावीस. चिऊताईपेक्षाही नाजूक चणीची, अगदी मुठीतही सहज मावशील इतकी इवलुशी ... आपल्या चिमुकल्या चोचीतून तू एकसारखं काहीतरी आणत होतीस. कधी गवताची लहानशी काडी, तर कधी चिमूटभर कापूस.

 

आठवडयानंतर माझ्या लक्षात आलं की, जेमतेम 15-20 पानं असलेल्या माझ्या त्या 'बाळ'चाफ्यावर तू सुरेख घरटं केलं आहेस. चाफ्याची अगदी खालच्या अंगाला असलेली दोन पानं तू टाके घालून इतकी सुरेख शिवली होतीस की तुझं 'शिंपी' नामकरण सार्थ ठरावं! दोन पानांनी तयार झालेल्या त्या बंदिस्त चिंचोळया जगात मी कुतूहलाने डोकावून पाहिलं. कापसाच्या मऊशार दुलईवर गवताच्या काडया गोलाकार अंथरलेल्या... त्याच्या बांधणीवरूनच त्यातली ऊब मला जाणवली.

सई, वाऱ्याच्या मंद झुळकीवरही हलकेच झुलणारं तुझं इवलुसं घरटं बांधायला तू निवडलंस अजूनही बालवयात असलेलं माझं चाफ्याचं झाड ... ज्याचा बुंधा अजून माझ्या दोन बोटांइतकाही रुंद नाही आणि ज्याच्या कायेला निबरपणाचं अजून वारंही लागलेलं नाही, इतकं नाजूक झाड. 'किती विश्वासाने ही याच्या आश्रयाला आल्ये, पेलवेल नं याला ही जबाबदारी?' माझ्या मनात शंका. पण ज्या अर्थी तुझ्या पारखी नजरेने याची निवड केलीय, त्या अर्थी माझा चाफाही तयारीचा असावा.. असा मीच मला दिलासा दिला.

घरट बांधलंस, त्या अर्थी तुझा विणीचा हंगाम जवळ आला असावा हे समजलं होतंच. अवघ्या 2-4 दिवसांतच काळे करडे बारीक ठिपके असलेली तीन अंडी त्या घरटयात दिसली. तुझ्या घरात नवे पाहुणे येणार याचा आम्हांला सर्वांनाच कोण आनंद झाला!

नेमकं त्याच वेळी पावसाच्याही अंगात आलं होतं. जणू माझ्या चाफ्याची परीक्षा घेण्यासाठीच तो वेडावाकडा कोसळत होता.. सतत तीन दिवस, अविश्रांत! 'या वादळवाऱ्यात घरटं खाली पडून अंडी फुटली तर?' तो विचारही सोसवत नव्हता मनाला. पण तुझं  घरट वाचवण्यासाठी काहीही करू शकत नव्हते. कारण माणसाने घरटयाला स्पर्श केल्याचं पक्ष्यांना कळलं, तर ते घरट सोडून जातात म्हणे... माझ्या हात लावण्याने तू घरटयात परतली नाहीस, तर तुझ्या मायेच्या उबेची प्रतीक्षा करणाऱ्या त्या जिवांचं काय होईल.. या विचाराने मी चार हात दूरच राहिले.

पावसाच्या झोडपण्याने चाफाही पार झुकला होता. इतका, की कोणत्याही क्षणी उन्मळून पडेल असं वाटावं. पण त्याला सरळ करणं म्हणजे पाण्याला तुझ्या घरात प्रवेश करू देणं. शेवटी अगदी हलक्या हाताने, त्याच्या बुंध्याला दोरी बांधली, आधारासाठी...

दिवसा जास्त वेळ बाहेर असायचीस तू. मात्र काळोखाचं साम्राज्य पसरलं की तुझा मुक्काम घरटयातच असायचा. एका सकाळी, नेहमीपेक्षा जास्त जवळ जाऊन तुझं घरटं निरखायचा प्रयत्न केला, तर आतून तुझे दोन सुंदरसे इवले डोळे लुकलुकले. मला काही कळायच्या आत तू उडालीससुध्दा. दूरच्या झाडावर बसून तुझ्या नाजूक आवाजात ओरडू लागलीस. माझं फार जवळ येणं रुचलं नसावं बहुधा, म्हणून निषेध नोंदवत असावीस.

त्या दिवसांत तुझं घरटं हाच आमच्या गप्पांचा एकमेव विषय होता. तुझी गोजिरी पिल्लं पाहण्याची उत्सुकता दिवसागणिक वाढत होती. आणि एक दिवस लक्षात आलं - ज्या दोन पानांनी तुझ्या घरटयाचा भार तोलला होता, त्यातलं खालच्या बाजूला असलेलं पान सुकत चाललंय. नंतरच्या 2-3 दिवसांतच ते अगदी कोरडं होऊन गेलं. हे असं वठलेलं पान उद्या तीन-तीन पिल्लांचा भार पेलेल का? ही शिवण उसवली तर? या शंकेने खूपच अस्वस्थ झालो आम्ही, पण काय करू शकत होतो? ठरावीक परीघाच्या पुढे तुझ्या जगात आम्हाला प्रवेशच नव्हता.

या घालमेलीत आणखी 5-6 दिवस गेले. आणि एका सकाळी सवयीने नजर घरटयाची खुशाली जाणण्यासाठी चाफ्याकडे गेली... तुझं घरट जागेवर दिसेना. काळजात धस्स झालं माझ्या. हातातलं काम टाकून चाफ्याकडे धाव घेतली. तिथे त्याच्या पायाशी तुझं रिकामं घरट त्या वाळक्या पानासह पडलं होतं. 'अंडी कुठायत यातली?' ती फुटलेली असू नयेत अशी मनोमन प्रार्थना करत नजर शोध घेऊ लागली. सुदैवाने असं काही विपरीत दृष्टीस पडलं नाही. ''अगं आई, तिनेच मोडलं असणार घरटं. पण त्याआधी दुसरीकडे तयार केलं असणार नक्की.. अंडी तिथे ठेवून मगच हे घरट मोडलं असेल तिने.'' माझा लेक सांगत होता.  पानांची शिवण कोणीतरी हलक्या हाताने उसवल्यासाराखी दिसत होती. ''आई, पक्ष्यांनाही कळतो धोका. ते घरट कोणी पाडलं असतं, तर एक अंड तरी फुटलेलं दिसलं असतं ना?' त्याच्या सांगण्यात खरंच काही तथ्य होतं की माझा चेहरा बघून त्याने माझी समजूत घातली होती, देव जाणे...

''तो सांगतोय तसंच झालं असावं...' माझं मन प्रार्थना करत होतं आणि तसंच जर खरं घडलं असेल तर, तुझ्यातल्या त्या गुणाच्या दर्शनाने चकितही झालं होतं. घरटयाला असलेला धोका तू  जाणलाही होतास आणि त्यावरचा उपायही तुला माहीत होता. आमच्यापेक्षा अनंत उणिवा असलेल्या तू हे सारं बिनबोभाट पार पाडलं होतंस. तरी, आणखी किती युगं आम्ही स्वत:ला श्रेष्ठ समजत राहणार आहोत, कुणास ठाऊक?

तुझी अंडी सुरक्षित असतील यावर आता माझा विश्वास बसलाय. इथंच जवळपास असेल तुझं नवं घर, या आशेने माझी नजर चहूबाजूंना भिरभिरत्ये...आज ना उद्या तुझी पिल्लं बाहेर येतील आणि त्यांचं 'टयांहा' तुझी मोहीम फत्ते झाल्याची द्वाही फिरवेल. पण मला एक सांगशील? हे जग त्यांना दाखवण्यासाठी तू केलेली धडपड कधी पोहोचेल का त्यांच्यापर्यंत? कधी कळेल त्यांना, त्यांच्या आईचं मोठेपण? की, आई म्हणून ते तुझं कर्तव्यच होतं असं म्हणतील ती?... नाही. तसं नाही होणार. तुझी बाळं तुझ्यासारखीच शहाणी, समजूतदार होतील याची खात्री आहे मला.

आणि तुला एक सांगू सई, माझं ते लाडकं चाफ्याचं झाडही मला शहाणं झाल्यासारखं वाटतंय अलीकडे. ते मोठं व्हायला लागल्याच्या खुणा त्याच्या अंगोपांगी उमटू लागल्यायत. साहचर्य इतकं शिकवतं का गं?

आजही केव्हातरी तू आमच्या बागेत दिसतेस. आता तुझा   आवाज माझ्या ओळखीचा झालाय. दूर राहूनही तुझ्याबद्दल मनात असलेली आपुलकी, भाषेच्या अडसराशिवाय पोहोचेल का तुझ्यापर्यंत? सर्व प्राणिमात्रांचा आत्मा एकच असेल, तर हा सद्भाव पोहोचायलाच हवा तुझ्यापर्यंत. हो ना?

तुझ्यासारखी 'आई' व्हायला धडपडणारी,

तुझी सई    

- अश्विनी मयेकर

लेखक: 

No comment

Leave a Response