Primary tabs

नारायण: एक घरगडी अनेक आठवणी

share on:

मी त्याला कधीही पाहिलं नाही. माझ्या जन्माच्याही आधी तो आमचं कामच काय चाळही सोडून गेला खरंतर. पण न बघता सुद्धा त्याची एक प्रतिमा बनली माझ्या मनात. धुवटसा खाकी किंवा तत्सम गडद रंगाचा हाफ शर्ट खाली हाफ पॅन्ट. तिरकी मान करून आपल्याच नादात चालणं. तंबाकूचा लावलेला बार. पायांत करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी वहाणा. कधी हसला तर नवल असा सतत आपल्याच नादात हरवलेला बराचसा तिरसट चेहरा. डोक्यावर विरळ झालेल्या पण काळ्या केसांना छान खोबरेल तेलं लावून पाडलेला भांग. आणि त्यांना अधून मधून सतत आहे त्याच जागी बसवण्याची ढब. असच काहीसं चित्र, कोण जाणे माझ्या तरी डोळ्यांसमोर येतं. कधी कोणाबद्दल नुसतं ऐकून, वाचून न बघता, न पाहता कधी नव्हे बऱ्याचदा त्या माणसाची एक प्रतिमा बनत जाते आपल्या मनात नकळत आपल्याच. आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असतेच किंबहुना केवळ प्रतिमाच असते सुंदर.....

 

तर असा हा आमचा नारायण, मला तर त्याचे पूर्ण नाव सुद्धा माहीत नाही. तो नक्कीच माझ्या आजोबांच्या वयाचा नाही पण बराच वयस्कर होताच. पण कधीही, कोणीही त्याला अहो जाहो केलं नाही. त्याच्या कामामुळे असेल कदाचित पण तो आपला नारायणचं राहिला. पण स्वतःच नाऱ्या न होऊन देण्याइतपतचे self esteem त्याच्यात नक्की शिल्लक होतं.  

 

नारायण असाच होता. कोकणातल्या कोणत्याशा लांबवरच्या खेड्यातून तो इथे मुंबईत आला. कधी आला हे त्याला देखील माहीत नव्हतं म्हणे. तसं सुद्धा तो अंगुठाबहाद्दर. आपल्या कोणत्या तरी काका, मामाचा हात धरून तो इथे मुंबईत आला. पण माझ्या वडिलांच्या मते साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तो इथे आला. तेव्हाचा तो काळ भयंकर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्वस्थतेचा होता. त्यात त्या वेळचं कोकण. कंदिलाच्या वातीवर आणि मुंबईत राबायला गेलेल्यांच्या मनीऑर्डरवर जगणारं. साध्या एक वेळच्या पेजेची बोंब. त्यात काय शिजवणारं आणि काय कोणाकोणाला खायला घालणारं. मग प्रामुख्याने चिपळूण, रत्नागिरीचे बरेच तरुण इथं मुंबईत आले. जे थोडेफार शिकलेले आणि त्यातल्या त्यात सुदैवी होते ते मिलमध्ये लागले. बाकीचे कोणी कोणा शेटकडे कामास चिकटले. कोणी त्या काळच्या मराठी हॉटेलात काम करू लागले. कोणी घरगडी म्हणून दादर, माहीमच्या तशा तुलनेनं मध्यमवर्गीय माणसं जास्त असणाऱ्या चाळींमधून कामं करू लागले.

 

आणि मग बघता बघता हे इथल्या चाळीतल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून गेले. इतके की ह्यांच्याशिवाय चाळीतल्या बायकांचे पान देखील हलेना. प्रामुख्याने हे गडी भांडी धूत आणि दिवसांतून दोनदा कामाला येतं. त्यांचे आणि चाळीतल्या बायकांचे कधी कधी विळ्याभोपळ्याचे सख्य असे. कधी कधी तुझ्या माझ्या गळा असतं. कधी तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना असे. ह्या गड्यांच्या कामाचा झपाटा आणि ह्यांच्यामधला उरक जबरदस्त असे. आणि त्यांच्या इतकं सुंदर काळ, काम, वेगाचे गणित कुणा गणिताच्या मास्तराला सुद्धा सोडवायला जमलं नाही. कोकणातल्या शेतांमध्ये काम केलेले हे जीव, उन्हापावसाची तमा न बाळगलेले त्यांच्यापुढं ही अशी कामं म्हणजे अगदीच किस झाड की पत्ती.

 

 

माझ्या आजीचं आणि ह्या नारायणचं कधी म्हणता कधी जमायचं नाही. दोघेही डोक्यानं थोडे तापट. परत चिडले की तोंडाचा पट्टा चालवायची दोघांनाही दांडगी हौस. त्यात परत हार कोणी मानायची हा कळीचा मुद्दा होताच. पण ह्या दोघांचा एकमेकांवर जीव सुद्धा फार होता. आमचं घर चाळीतलं शेवटचं. पण तो आमच्या मजल्यावर आला की सर्वात आधी तो आमच्या घरी येऊन वर्दी देऊन जातं असे. "रेखाच्या आई मी आलोय बरं का", असं सांगून पाऊण एक तासाच्या आत हा परत हजर. मग बरेचदा आधी सांगून सुद्धा आजीची जाम धावपळ होतं असे. तिचा एक हात आणि पाय दुखरा होता. त्यात जेवायला कधी कोणी जास्तीचं आलेलं असे. कधी घरातलं कोणी वेळेत आलेलं नसे. मग हा नारायणचं तिच्या मदतीला धावून येतं असे. काही माणसं दिलेल्या नावाला जागतात ती अशी. "बाजूला व्हा, बाजूला व्हा, करतोय ना मी सगळं" असं म्हणतं एकीकडे हा उष्टी खरकटी भांडी चटचट उचलू लागत असे.

 

त्या काळच्या रिवाजानुसार ह्या गड्यांना स्वयंपाकघरात प्रवेश नसे. पण आमचं घर त्याला अपवाद होतं. माझी आजी शिवाशिव किंवा सोवळं ओवळं मानणारी बाई नव्हती. तो आला की ती त्याला चहा करून देई, कधी भूक असेल तर जेवायला वाढे. त्यांची भांडणं, वाद जरूर झाले असतील पण आजीने त्याला प्रेम पण खूप दिलं, जीव लावला. शेवटी माणसांचं काय हो त्यांना जरा ओलावा मिळाला की ते रुजून जातात तिथंच मग झाडामाडांसारखे. त्यात नारायण तर कोकणातला. बाहेरून काटेरी आतून गोड, रसाळ बरक्या फणसासारखा.

 

कधी कधी मात्र नारायणाचे तंत्र एकदम बिघडत असे. खूप चिडचिड, मग कोणाकोणाला कोकणातल्या इरसाल गाळ्या दिल्या की नंतरच त्याच्या तापलेल्या जीवाला शांती लाभत असे. आजीच्या मते नारायण अगदी सरळ मनाचा, साधा माणूस होता. बेरकीपणा करणारी, दोन तोंडाची माणसं त्याला अगदी आवडतं नसतं. मग तो जो सुरु होई ते थांबेल तर शप्पत. "माणसं कसली म्हणायची ही रेखाच्या आई हे तर आमच्या कोकणातले मुंजे. ज्या झाडाला धरून राहणारे वर त्याच्याच भाळी बदनामीचा शिक्का मारणारे". हे असं आजीच्या तोंडून त्याचं वर्णन ऐकल्यावर माझ्या मनात येतं की नसेना का ह्याला वाचता लिहिता येतं काही पण माणसं वाचायला किती छान जमतं असे त्याला. वास्तविक हेच तर सगळ्यांत अवघड कामं

 

असा हा एकटा नारायणचं नाही तर त्याची बायको सुभद्रा दोन, तीन मुलं सगळं कुटुंबच आमच्या घरात सामावून गेलं होतं जणू. इतकं की पुढे आजीने माझ्या वडिलांच्या मागे लागून त्याच्या मुलाला बँकेत नोकरी लावून दिली. त्या एका निर्णयाने नारायणाच्या घराचा अगदी चेहरामोहराच बदलून गेला. पुढे तोच मुलगा बँकेत चांगला ऑफिसर झाला आणि हे सगळं पाहायला नारायण आणि माझी आजी दोघेही होते हा किती सुंदर योगायोग. किती वेळा माझ्या आजीसारखी छोटी छोटी माणसंसुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या कृतीतून वरवर छोटे वाटणारे बदल घडवत जातात, नाही? असा हा आमचा नारायण, थोडा तापट, थोडा फटकळ, थोडा भांडखोर, उरक्याचा आणि माणूस म्हणून खूप खरा.

माणसांनी असंच असावं खरं तर. खोल, आतल्या आत खळबळ चालू असणारे पण वरून मात्र अगदी शांत पहुडलेले वाटावेत जणू असे डोह मला अजगरासारखे वाटतात. कधी ते तुम्हांला गिळून टाकतील कुणास ठाऊक. त्यापेक्षा मनाचा तळ दुसऱ्याला दिसला पाहिजे असं साधंसं, छोटं तळं होऊन जगावं आणि जगवावं इतरांना.

 

- प्राची बापट

लेखक: 

No comment

Leave a Response