Primary tabs

गुलमोहर

share on:

त्याला आठवत राहते फार पूर्वी रस्त्याच्या त्या टोकाला असलेली पांढरीशुभ्र बकुळी. तिची आठवण आली की तो आजही थरथरतो. एखाद्या चित्रपटासारखं झरझर सगळं काही त्याच्या डोळयासमोर येतं. ह्याची लालबुंद बेफाम जवानी आणि तिचं संयत पांढरंशुभ्र तारुण्य एकमेकांच्या नकळत एकमेकांकडे ओढलं गेलं. ते दोन ॠतू मनापासून जगलेला तो. त्याच्या बहराला आगळीच लाली होती दोन वर्षं.

 आळसावलेली दुपार. सूर्याच्या भेदक किरणांनी आणखीनच काळा पडत जाणारा डांबराचा रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 'टुमदार' बंगल्यांची रांग. ही वस्ती माणसांची की निव्वळ बंगल्यांची असा प्रश्न पडावा इतकी शांतता. सरळ सरळ आसमंतात गेलेला तो डांबराचा रस्ता आणि त्याच्या शेवटच्या टोकाला उभा असलेला तो गुलमोहर. एकटाच. ही वस्ती तयार होत होती, तेव्हापासून तो तिथेच होता. त्याला आठवतात एकेक गोष्टी. कच्चा रस्ता, पक्की घरं; मग डांबरी रस्ता मग टुमदार बंगले; मग एकदा कुणीतरी त्याच्या अंगाखाली चार बाकडी टाकली. संध्याकाळी त्या बाकडयांवर चार ज्येष्ठ मंडळी येऊन 'आमच्यावेळेस असं नव्हतं बुवा' या पालुपदाचे काही राग आळवू लागली. गुलमोहराला याचे काय सोयरसुतक नाही. तो आपल्यातच मग्न. पूर्वी त्याच्याशी बोलायला बरेच जण असायचे. पण जसजशी बंगल्यांची ओळ वाढत गेली, तसतशी ह्याच्या मित्रांची ओळ छोटी होत गेली. आता त्या टुमदार बंगल्यांच्या छोटेखानी गार्डन्समध्ये काही मित्रांना ठेवलंय त्याच्या, बोन्साय करून.

त्याला आठवत राहतात स्थित्यंतरं स्वत:ची. ॠतूगणिक बदलत जाणारी रूपं. ग्रीष्मातला फुलून आलेला लालबुंद बहर, वर्षेतली उत्फुल्ल सर आणि मग शेवटी शिशिरातली पानगळ. एक वर्ष, सहा ॠतू, सहा स्थित्यंतरं आणि अविरत फिरणारं एक चक्र. त्याला आठवत राहते फार पूर्वी रस्त्याच्या त्या टोकाला असलेली पांढरीशुभ्र बकुळी. तिची आठवण आली की तो आजही थरथरतो. एखाद्या चित्रपटासारखं झरझर सगळं काही त्याच्या डोळयासमोर येतं.

ह्याची लालबुंद बेफाम जवानी आणि तिचं संयत पांढरंशुभ्र तारुण्य एकमेकांच्या नकळत एकमेकांकडे ओढलं गेलं. ते दोन ॠतू मनापासून जगलेला तो. त्याच्या बहराला आगळीच लाली होती दोन वर्षं. वाऱ्यासंगं येणाऱ्या तिच्या गंधाने बेफाम व्हायचा तो. त्याच वाऱ्याला कवेत घेऊन आपल्या फांद्यांवरून खेळवायचा. दूरच्या एका टोकावरून बकुळी हे सारं पाहत असायची आणि लाजायची. तिच्या पांढऱ्याशुभ्र फुलांवर त्याच्या लाल रंगाचा रक्तिमा पसरायचा हळुवारपणे. अन  मग लोक म्हणायचे, ''हिलाही त्याच्या प्रेमाचं वारं लागलंय वाटतं...''

तो आठवत राहतो असेच काही क्षण. ती असतानाच्या ॠतूंमधील. आणि मग एका दिवशी रस्त्याच्या त्या टोकाशी चार लोक जमले. त्यांनी हातातल्या कुऱ्हाडींनी त्याच्या आवडत्या बकुळीवर घाव घातले. तो चवताळला. त्याच्या फांद्यान फांद्या जणू एल्गार करू लागल्या. अर्थातच त्याची तगमग व्यर्थ ठरली. त्याच्या डोळयांदेखत त्याची बकुळी नाहीशी झाली. तिच्या अंगावर टोलेजंग बंगला उभा राहिला 'बकुळ निवास' नावाचा. त्या ॠतूमधील त्याची पानगळ सुगंधी होती म्हणतात.

तो आठवत राहतो जगण्यातले असेच काही क्षण, ज्यांनी त्याच्या जगण्याची असोशी खेचून नेली. ॠतुचक्र सुरूच राहतं. त्याला स्वत:ला संपवता येत नाही, म्हणून तो आजकाल स्वत:तच मग्न असतो. बकुळी गेली, तेव्हा त्याला वाटलेलं - त्या चार माणसांनी येऊन आपलाही जीव घ्यावा. पण त्यांनी तसं केलं नाही. आजूबाजूच्या छोटया-मोठया गुलमोहरांचा आणि बकुळींचा जीव घेतला, पण ह्याला तसंच ठेवलं. ह्याच्या अंगाखाली चार बाकडी टाकून ह्याचं 'उद्यान' केलं.

त्यातल्याच एका बंगल्याच्या गॅलरीत एक आजोबा, घडयाळाच्या लंबकासारख्या मागेपुढे होणाऱ्या खुर्चीत बसून दररोज दुपारभर गुलमोहराची गोष्ट ऐकत राहतात. स्वत:तच मग्न होत पाहत राहतात गुलमोहराकडे किंवा पुटपुटल्यागत बोलत राहतात काहीतरी. तुम्ही शेजारी बसलात, तर क्षणभर तुम्हालाही कळत नाही आजोबा गोष्ट ऐकताहेत की सांगताहेत.

- अभिषेक राऊत

 

लेखक: 

No comment

Leave a Response