Primary tabs

रिव्हर्स लर्निंग (शिकवताना शिकतं जातो तेव्हा) 

share on:

आज पहिल्यांदाच असं झालं की आधी शीर्षक आलं मनात. मग जरा गुगुलवर पाहिलं. तर ह्या नावाची एक अख्खी थिअरीचं निघाली. आणि तिचा माझ्या विषयाशी काडीमात्र संबंध नाही. पण हे नावं मला होतंच आवडलं. मग काय करायचं आता? म्हणून हे कंसातले उपनाम दिलं. झालं. आता विषयाकडे वळू या. हल्ली मुलं ऑनलाईन लर्निंग करताहेत. कोविडच्या आधी सुद्धा असे कोर्सेस होतेच. परत इ लर्निंग आहेच. म्हणजे बेसिकली लर्निंग ह्या शब्दासोबत अनेक जोड शब्द तयार झाले. जसं अन-लर्निंग आणि री-लर्निंग. सतत बदलत जाणारं काही. सगळंच कदाचित. जे आजवर शिकलो ते विसरून जाणं. पाटी चक्क कोरी करणं. म्हणजे झालं अन-लर्निंग. आणि मग त्या कोऱ्या पाटीवर नवीन अक्षरं लिहिणं झालं री-लर्निंग.अर्थात ह्या व्याख्या खूपच सोप्या झाल्या. असो. पण आता हे दोन्हीही शब्द चांगलेच रुळले आहेत आपल्या जीवनात. कॉर्पोरेटमध्ये काम करताना तर सतत आदळत असतात. आणि मग जीवनाचा भाग बनून जातात. रोज नवीन शिकायचं. मग आधीचं बरंच काही पुसून टाकावं लागतं. पण माझ्या रिव्हर्स लर्निंगचं तसं नाही. ही एक प्रोसेस होती. जी मी अनुभवली. आणि ती अनुभवतांना इतकं शिकले की त्यावर लिहावं असं वाटलं. 

गेली वीस एक वर्ष मी जपानी शिकवतं आहे. आणि शिकवताना इतकं शिकायला मिळालं आहे, त्याबद्दलच लिहावं असं वाटलं. म्हणून हे रिव्हर्स लर्निंग. ही गोष्ट खूप जुनी. मी अगदी नुकतीच सुरुवात केलेली शिकवायला तेव्हाची. २००० सालची वगैरे असेल. मला एक फोन आला. एका तरुणाचा. तो सॉफ्टवेअरमध्ये होता. त्याला आणि त्याच्या मित्राला जपानी शिकायचं होतं. ते आधी जपानमध्ये राहून आले होते. थोडं, अगदी जुजबी शिकले होते. त्यांना तिथंच जाऊन नोकरी करायची होती. त्यांचं सगळं ठरलं होतं. मग ते दोघे आले, भेटले आणि आमचा क्लास सुरू झाला. दर शनिवारी आणि रविवारी सकाळी सात ते दुपारी एक. सलग सहा तास. असं पाच महिने ते शिकले. आणि ते पण जपानी. जगातली दुसरी सर्वात कठीण भाषा. सॅमसन आणि किरण. मी कधीही ही नावं विसरूच शकतं नाही. असे विद्यार्थी मला परत कधीही सापडले नाहीत. डेडिकेशन. लगन. झोकून जाऊन शिकणं काय असतं हे मी त्यांच्याकडून शिकले. किरणला तर एकच लिपी येतं होती. जपानीत तीन लिप्या आहेत. पण त्याने तर कमालच केली. थेट दुसरी परीक्षा पास झाले दोघे. इतकं मन लावून नेटानं शिकतं की मी अवाक होऊन जाई. मी त्यांच्याहून वयानं लहान होते. पण मला त्यांनी खूप आदरानं वागवलं. मी त्यांच्या रूमवर जाऊन शिकवलं एकदा. मी एक तरुण मुलगी. ते दोन तरुण. पण आम्हांला खरंच जपानीशिवाय काहीही दिसतं नव्हतं आणि दिसलंही नाही. अशी माणसं दुर्मीळ असतात. वाईट माणसं तेव्हाही कमी नव्हतीचं. पण ह्या दोघांनी मला खूप काही दिलं. सगळ्यात जास्त काही दिलं तर तो म्हणजे विश्वास. आपण माणसांवर विश्वास टाकू शकतो हे त्यांनी मला शिकवलं. त्यामुळे मग जेव्हा जेव्हा तो डळमळतो तेव्हा सॅमसन आणि किरणचा चेहरा तरळून जातो डोळ्यासमोर. आता ते जपानमध्ये असतात. गेली अनेक वर्ष. मी तिथे असतांना सुद्धा कधीही आमची भेट होऊ शकली नाही. योग. तो नंतर कधीही आला नाही. पण ते शिकवून गेलेचं मला बरंच काही. 

पुढची गोष्ट आहे २००७ मधली. आम्ही गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे परकीय भाषा केंद्र चालवत असू. एका संध्याकाळी एक आजोबा आले तिथे. वय जवळपास सत्तर. मला वाटलं नातवंडांसाठी आले असतील, चौकशीला. मग त्यांनी मला एकदम धक्काच दिला. त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीतून एका मागोमाग एक ते काढत राहिले. काय आणि किती. ती ओरिगामीची मॉडेल्स होती. मी निव्वळ अवाक. शंभर एक मॉडेल्स काढल्यावर त्यांनी एक पुस्तकं काढलं. ते पण इतकं जाडजूड. एकही इंग्रजी शब्द नाही त्यात. म्हटलं त्यांना तुम्ही हे कुठून मिळवलं? मला म्हणाले जपानवरून मागवलं. जपानी पुस्तकं भयंकर महाग असतात. त्यांच्या उत्साहापुढे मी हात टेकले. पुढं ते नेटानं क्लासला येऊ लागले. भिंग घेऊन यायचे. दोन लिप्या शिकले. गिरवून. रोज नेमानं. मग ओरिगामी हा शब्द जपानीतून लिहून दाखवला त्यांनी मला. खरं सांगते त्यांच्या आणि माझ्या दोघांच्याही डोळ्यांत एकाचवेळी पाणी आलं. आनंद किती देऊन जातो तुम्हाला. बरंच काही. पुढं मग जपानी चित्रलिपी आल्यावर आजोबांना झेपेनासं झालं. पण तरी ते क्लासला येतं. अगदी शेवटच्या क्लासपर्यंत आले. सर्वात शेवटच्या बाकावर बसून ते दोन तास ओरिगामी करतं. त्या आमच्या क्लासचं शूटिंग झालं एकदा. झी मराठीच्या एका कार्यक्रमासाठी. आजोबा टी.व्ही.वर आले. बेहद्द खूष होते ते त्यादिवशी. कॅमेरामन आणि निवेदकाला तीन चार मॉडेल्स दिली त्यांनी ओरिगामीची. त्यांची जिद्द, चिकाटी. त्यांनी ह्या वयात पाहिलेलं स्वप्न. त्यातून दिसणारा त्यांचा आशावादी स्वभाव. ज्या तन्मयतेने ते ओरिगामी करतं ती नजर आणि ते हात. देऊन गेलेचं ते मला, असं काही. जे मला, मनाला माझ्या उभारी देतं. आजही त्यांची अनेक मॉडेल्स माझ्या घरी आहेत. जपून ठेवलेली. त्यांच्या आठवणींच्या इतकीच. 

मग मी अनेक वर्षे फक्त कॉर्पोरेटमध्ये शिकवलं. अजूनही शिकवते. तिथं बरंच काही मिळालं. थोडंसं नाव. नवीन ओळखी. त्यातून नवीन काम. पैसा. ते सुद्धा होतंच बरंच काही.  पण शिकवून जाणारी माणसं भेटली नाहीत तिथे. कारण तिथे तुम्हांला दुसऱ्याला देता येण्याइतकी सवड मिळतच नाही.  पण अपवाद दोन मुलींचा. वरना आणि विनिता. ह्या दोघी सख्ख्या मैत्रिणी. त्यांना मी शिकवायला सुरुवात केली तेव्हा पहिले दोन तीन क्लास वरनाच्या डोळ्यांत खूप अविश्वास होता. मला तो दिसतं असे. जाणवतं असे. करू मी काहीच शकत नव्हते. मग असेच चार क्लास झाले. मी तिच्याकडे बघतं असे शिकवताना मध्येच. तिचा चेहरा अतिशय बोलका आहे. डोळे तर खूपच. मग असाच चौथा क्लास संपवून मी घरी जात होते. इतकं मोठ्ठ माईंड स्पेसचे कॅम्पस. माणसाला माणूस दिसू, भेटू, गाठू शकतच नाही. पण ही कशी कुठून आली तिरासारखी, मला कळलंच नाही. बघते तर तिच्या काजळ रेखलेल्या भावुक डोळ्यात पाणी. खूप सुंदर शिकवता तुम्ही सेन्सेई. खूपचं. हीच का ती वर्गात अखंड प्रश्न विचारणारी बडबडी वरना. तिला तेव्हा दुसरं काही बोलताच नाही आलं. मलाही नाही. आणि मग गेलीच ती निघून तिथून. ही थोडी वेडी पण खूप बुद्धिमान, अत्यंत मनस्वी मुलगी खूप देऊन गेली मला. निखळ. निरलस प्रेम. तिनं आवर्जून जपानवरून माझ्यासाठी आणलेली जपानी बाहुली. तिच्यासारखीच सुंदर. विनिता तर छोटी बहीणच झाली. त्यांना शिकवताना मध्ये मी डेंग्यूने आजारी पडले. हिचा रोज फोन. इतकी जुजबी ओळख होती आमची खरं तर. विनिता खूप गोड मुलगी आहे. खूपच. तिच्यासोबत गाडीतून केलेला छोटासा प्रवास. ती अखंड बोलते. हसता हसता. पण रस्त्यावरची नजर ढळली नाही एकदाही. बुद्धिमान आणि स्वतंत्र मुली आहेत ह्या. त्यांच्या वागण्या बोलण्यातला आत्मविश्वास. त्यांच्या विचारांमधली स्पष्टता. कामाचा दांडगा उरक. मदत करण्याची वृत्ती. दुसऱ्याला भरभरून देण्याचा स्वभाव. त्यांना माहीत सुद्धा नसेल किती देऊन गेल्या त्या मला. आज आमचं कधीतरी बोलणं होतं. ते ही सहजच. माणसं देतात आणि निघून जातात. पण जाताना देऊन जातात. हेही किती विलक्षण. विनिताने जपानवरून आणलेली छत्री सुद्धा इतकी गोड तिच्याचसारखी.  पाऊस नसताना सुद्धा ती काढली जाते ह्यातच आलं ना, बरंच काही.

झालं ना मग हे रिव्हर्स लर्निंग. नेहमीच, शिक्षकच मुलांना शिकवतो असं तर मुळीच नाही. हा विचारच कन्व्हेंशल झाला आणि कोविड मुळे सगळंच नाही तरी बरंच बदलून गेलेलं असताना, हा विचार नक्कीच बदलला जाईल, नाही? 

- प्राची बापट

लेखक: 

No comment

Leave a Response