Primary tabs

सावली

share on:

बराच काळ उन्हात चालल्याने जिवाची काहिली होत असताना, एखाद्या डेरेदार वृक्षाची थंडगार सावली अकस्मात वाटेत आली तर किती बरं वाटतं! तहानेल्या माणसाला पाणी मिळाल्यावर जसं सुख वाटतं, अगदी त्याच प्रकारचं. या पलीकडे त्या सुखाला शब्दांत पकडता येत नाही. त्या क्षणी ती थंडगार सावली ही सुखाची परमावधी असते. तिची सोबत कायमची लाभत नसली, तरी त्यानंतरच्या वाटचालीत तिच्या सुखद आठवणी सोबतीला असतात, ज्यांचं स्मरणही मनाला गारवा देणार, ताजंतवानं करणारं असतं. आयुष्याच्या वाटचालीतही किती माणसं अशी अवचित भेटतात, जी आपल्या आयुष्याच्या त्या कालखंडावर सावलीसारखी थंडगार, शीतल छाया धरतात... निरपेक्षपणे.

हे लिहीत असताना अशीच एक व्यक्ती आठवली. पूर्णपणे अनोळखी गावात माझी जवळची आप्त असल्यागत काळजी घेणारी, मोठया बहिणीच्या मायेने मला जेवू घालणारी... त्या वेळेस तिचं असणं माझ्यासाठी सावलीच्या मोलाचं होतं. ते मोल आजही मनात आहेच. कायमच राहील.

12-13 वर्षांपूर्वीची गोष्ट. पत्रकारितेतली पदव्युत्तर पदवी घेण्याच्या निमित्ताने मी पहिल्यांदा औरंगाबाद शहरात पाऊल ठेवलं. तोवर हे शहर माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होतं. कोर्सचा कालावधी 2 वर्षांचा होता. त्यात 4 मोठया परीक्षा असणार होत्या आणि टयूटोरियल्स वेगळी. त्यातल्या पहिल्याच मोठया परीक्षेसाठी 10-12 दिवस मुक्काम करायच्या तयारीने मी औरंगाबादला येऊन पोहोचले. घराचा 'कम्फर्ट झोन' सोडून मी प्रथमच पूर्ण परक्या वातावरणात, तेही चाळिशीच्या उंबरठयावर असताना परीक्षा द्यायला गेले होते. अभ्यासाच्या बरोबरीने त्याचा एक ताण मनावर होताच. वडिलांच्या एका मित्राने तिथल्या नव्याने बांधल्या गेलेल्या हॉस्टेलचा पत्ता दिला होता. माझ्यासाठी बोलणंही करून ठेवलं होतं. शहर जसं अनोळखी, तशी हॉस्टेल लाइफचीही अजिबात सवय नसलेली मी. तोवर कधी या व्यवस्थेचा आधारच घ्यावा लागला नव्हता. त्यामुळे मन खूप साशंक होतं. मात्र हॉस्टेलची नवी कोरी इमारत पाहताक्षणी मनात भरली. हवेशीर आणि आवश्यक तितकी स्वच्छता असलेली छोटीशी दुमजली इमारत. हॉस्टेल मालकांच्या ओळखीतून प्रवेश मिळवला असल्याने विशेष चांगली खोलीही वाटयाला आली. भर दुपारच्या उन्हात, 8 दिवसांचं भलंथोरलं सामान घेऊन दाखल झालेली मी त्या वास्तूच्या दर्शनाने सुखावले. खोलीतल्या कॉटवर बसून शांतपणे जागा निरखली. मन प्रसन्न ठेवणारी खोली वाटयाला आली होती. आणलेलं सामान, पुस्तकांची मांडामांड करून मी त्या खोलीला आपलीशी करून घेतली.

आता प्रश्न होता तो दोन वेळच्या चहापाण्याची आणि जेवणाची सोय होण्याचा. हॉस्टेलमधल्या अन्य मुलींचे डबे एकाच खानावळीतून येतात, हे समजलं. भाजी, पोळी, आमटी, भाताचे चार खणांचे मोठ्ठे डबे. तोच डबा लावणं हा माझ्यासाठी पहिला (आणि खरं तर एकमेव) पर्याय होता. एका मुलीचा जेवणाचा डबा माझ्या पाहण्यात आला. भाजीवर असलेला तेलाचा लालसर तवंग दिसला आणि मी थोडी काळजीत पडले. तिखट खाणं मला वर्ज्य वगैरे नसलं, तरी सलग 8 दिवस ते पचेल का? ही शंका मनात होती. शिवाय दिवस परीक्षेचे होते. तेव्हा जेवण पुरेसं आणि हलकं मिळालं तर हवं होतं. ते कुठे मिळेल याची त्या नव्या शहरात कल्पना नव्हती. थोडा वेळ विचार करून मी ठरवलं की, हॉस्टेलच्या व्यवस्थापक बाईंकडेच सोय होऊ  शकते का, हे विचारून पाहू. त्या नाही म्हणाल्या तरी किमान पर्याय तरी सुचवतील. नुकतीच ओळख झालेली असतानाही मी त्यांना विचारायचं धाडस केलं. माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेत त्या म्हणाल्या, ''माझं इथलं काम रेक्टरसारखं आहे. मी असे डबे किंवा जेवण देत नाही. जेवण देण्याचं काम स्वीकारलं तर आवर्जून काही ताजे पदार्थ करावे लागतात. व्हरायटी ठेवावी लागते. ते मला शक्य होईलसं वाटत नाही. आमचं रोजचं जेवण अगदी साधं असतं.'' पूर्णपणे नकाराच्या रुळावर गाडी जाण्याआधीच मी त्यांना थांबवत म्हटलं, ''चालेल मला. रोज घरीही साधंच जेवतो की. अगदी वरणभातही चालेल. सलग 8 दिवस खानावळीचं जेवण झेपेल का, अशी मला शंका आहे. माझ्या काही आवडीनिवडीही नाहीत. सगळया भाज्या चालतात मला.'' काही आवडीनिवडी नाहीत म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर होकाराचे भाव दिसायला लागले. तरीही पटकन तसं न म्हणता त्या म्हणाल्या, ''मी तुमच्या खोलीवर जेवण पाठवणार नाही. तुम्हांला इथे खाली यावं लागेल.'' माझी त्यालाही हरकत नव्हतीच. मी लगेच हो म्हटलं. आणि सुटकेचा निश्वास टाकला.

पहिल्या दिवसापासूनच आमच्यातलं बोलणं औपचारिकतेकडून अनौपचारिकतेकडे कधी वळलं, ते समजलंच नाही. पूर्णपणे भिन्न वातावरणात जगणाऱ्या आम्ही दोघी, वयातही चांगलं 12-15 वर्षांचं अंतर, तरी खूप पटकन एकमेकींशी 'कनेक्ट' झालो खऱ्या. मी नोकरी, घर, दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळत हौसेने पुढचं शिक्षण घेते आहे याचं त्यांना मनात कुठेतरी कौतुक आणि अप्रूपही वाटलं असावं बहुधा. परिस्थितीमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकायला मिळालेलं नसलं, तरी शिक्षणाची, नवं जग जाणून घ्यायची ओढ जागी होती, हे त्यांच्या बोलण्यातून समजत गेलं. कोणत्याही तक्रारीचा सूर न लावता, न पाहिलेल्या जगाबद्दलची उत्सुकता बोलण्यात डोकावत असे. वाचनाची आणि त्यावर बोलायची आवड होती. आमचे सूर जुळायला इतकं पुरेसं होतं. 

त्यांच्या आपुलकीच्या वागणुकीमुळे माझ्यासाठी त्या केवळ हॉस्टेलच्या व्यवस्थापक राहिल्या नाहीत. एक अकृत्रिम स्नेहाचं नातं तयार झालं आमच्यात. सकाळी चहा झाला की मला फोन करून खाली बोलावणं, आग्रहाने चहाबरोबर काही खायला देणं, इतकंच नाही, तर परीक्षेला जाताना गरमागरम पोळी माझ्या पानात वाढणं. चटणी, लोणचं, भाजी आणि घरी कढवलेलं साजूक तूप असं माझ्या ताटाच्या सभोवती मांडून ठेवणं. पहिल्या दिवशी जेव्हा ही मांडामांड पाहिली, तेव्हा मला एकदम भरून आलं. म्हटलंही त्यांना, ''इतकं कौतुक करू नका हो...''

तेव्हा मला थांबवत त्या म्हणाल्या, ''अगं, यातलं काहीच मुद्दाम तुझ्यासाठी केलेलं नाही. चटणी, लोणचं केलेलंच असतं तोंडी लावायला. आणि तूपही असतंच कढवलेलं. परीक्षेला जाताना पोट रिकामं ठेवू नये फार. मग एनर्जी कशी मिळणार तुला?''

घरी आई/आजी जे कौतुक करायच्या, तेच कौतुक पुन्हा एकदा - तेही असं अनपेक्षितपणे वाटयाला आलं. दुपारी पेपर संपवून परत आले की जेवण तर तयार असायचंच, क्वचित माझ्यासाठी त्या जेवायलाही थांबलेल्या असायच्या. कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध होते कोण जाणे! पण त्यांनी अगदी पोटातून माया केली माझ्यावर. उन्हाळयाच्या दिवसांत परीक्षा असली की 'तुला सोसणार का आमच्याकडचा उन्हाळा' असं म्हणत माझी काळजी करायच्या आणि घ्यायच्याही. माझा अभ्यास आटपला असेल तर रात्री गच्चीवर गार हवेत आमच्यात गप्पाही रंगायच्या.

दोन परीक्षांना मुक्काम झाल्यानंतर तर त्यांनी मला फर्मावलंच की, अध्येमध्ये कोणत्याही सबमिशनकरता 1-2 दिवसांसाठी औरंगाबादला यायची वेळ आली, तर आमच्या घरीच मुक्काम करायचा. तोवर खरंच इतकी जवळीक निर्माण झाली होती की मलाही त्यांच्या घरी मुक्काम करायला कधी वावगं वाटलं नाही.

या गोष्टीला आता 12-13 वर्षं होऊन गेली. पूर्णपणे नवख्या गावात कोणत्याही ताणाशिवाय मी राहून परीक्षेवर लक्ष केंद्रित करू शकले ते केवळ त्यांच्या आत्मीय वागण्यामुळे. या अनोळखी गावात आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे ही भावना खूप उभारी देणारी, चित्ताला स्वस्थता देणारी होती. 

एका नव्या पदवीबरोबर मला या शहराने एक ज्येष्ठ सुहृद दिली. त्या वेळी तिचं असणं हे माझ्यासाठी सावलीहून कमी नव्हतं.

 

- अश्विनी मयेकर. 

 

लेखक: 

No comment

Leave a Response