Primary tabs

टी.व्ही.एफ. पिक्चर्स

share on:

एकविसावं शतक आधुनिक विचारसरणीचं शतक मानलं जातं. पण भारतात अजूनही काही बाबतीत ही आधुनिक विचारसरणी स्वीकारली गेली नाहीये. उदाहरणच द्यायचं झालं तर करिअरच देता येईल. आपल्या मुलाने भरघोस मार्क्स मिळवून शक्यतो विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा त्यानंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी यातूनच पुढचं शिक्षण घ्यावं, ही दोन क्षेत्रं सोडल्यास इतरही क्षेत्रात शिक्षण घेऊन उत्तम करिअर करता येतं याविषयीचं अज्ञान अगदी आत्ता आत्तापर्यंत सर्व भारतीय पालकांमध्ये असल्याचं निरीक्षण आहे. पदवी शिक्षणानंतर २५ मे नोकरी २६ मे छोकरी आणि मग पुढे संसार; तर अशी टिपिकल भारतीय जीवनपद्धती. ही अजूनही सर्रास अवलंबलेली पाहायला मिळते. कुणाला चित्रकला शिकण्यात रस असतो, कुणाला उत्तम अभिनेता/ अभिनेत्री  व्हायचं असतं तर काहींनी उद्योजक/उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. पण ज्यातून हमखास पैसा मिळेल अशी नोकरी करणंच सुरक्षित अशी मानसिकता असलेल्या समाजामध्ये चित्रकार, अभिनेत्री किंवा उद्योजिका होण मुश्किलच. समजा प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं धाडस दाखवून एखाद्याने आपलं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द दाखवली तरी त्यात अडचणींचा डोंगर. पण हा डोंगर पोखरून चिकाटीने आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवणारे काही असतात.

आज या विषयावर लिहिण्याचं कारण आहे एक हिंदी वेबसिरीज जिचं नाव आहे 'टिव्हीएफ पिचर्स'. कशाबद्दल आहे ही वेब सिरीज? तर चार तरुण आहेत, कॉलेजपासूनचे मित्र आहेत. कॉलेजमध्ये असताना त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं उद्योजक बनण्याचं. शिक्षण संपलं, स्वप्न पूर्ण करण्यासाठीची आर्थिक तयारी करण्यासाठी त्या तरुणांनी नोकरीच्या वाटा धरल्या आणि एक वेळ अशी आली की स्वप्नाची धग स्वस्थ बसू देईना मग सुरू झाला खडतर प्रवास स्वप्नाच्या दिशेने, वाटेत अनेक अडचणी, खाचखळगे पण हे सगळं पार करत हे तरुण आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची अतोनात धडपड करतात आणि त्यात ते  यशस्वी होतात का? या तरुणांच्या जिद्दीचा प्रवास म्हणजे ही वेबसिरीज.

नवीन बन्सल या वेब सिरीजच मुख्य पात्र. मोकार्ट नावाच्या प्रायव्हेट कंपनीत चांगल्या पदावर असलेल्या आणि भरपूर पैसा कमवत असलेला नवीन कंपनीतल्या राजकारणामुळे त्रस्त आहे. याची कंपनी इतर चार कंपनीजसारखीच. प्रमोशनच्या वेळी, एम्प्लॉईजना परदेशात ऑनसाईट पाठवण्याच्या वेळी अनेक कारणं पुढे करणारी. नवीनच्या ढोर मेहनत करण्यानंतरही त्याच्या हातातून एक चांगली संधी काढून घेण्यात येते म्हणून नवीन मनातून त्याच्या  कंपनीवर, बॉसवर चिडलेला आहे. जितेंद्र माहेश्वरी हे या वेब सिरीजमधल दुसरं महत्त्वाचं पात्र. कोडींगमध्ये बाप असलेला जितेंद्र एका कंपनीत सध्या डेव्हलपर म्हणून काम करतोय. जितेंद्र कामात अत्यंत चोख, शिस्तबद्ध आणि इतका प्रामाणिक की कोड कॉपी करायला १०० सेकंद लागतात आणि त्या वेळात करण्यासारखं इतर काही काम नसत म्हणून ती वेळ पाण्याची बाटली भरण्यासाठी निवडणारा जितेंद्र अर्थात जितू. 'बाकी किसीको प्रमोशन मिले ना मिले इस बंदे का प्रमोशन पक्का है' अशी ख्याती आहे जितूची. फॅमिलीची काळजी करणारा, वडिलांच्या शब्दाबाहेर कधीही न जाणारा, वडिलांचा अतिशय धाक असणारा विवाहित जितू स्वभावाने साधाभोळा आहे. योगेंद्र अर्थात योगी हे कथेतलं तिसरं पात्र. नवीन आणि जितू काम, नोकरी आणि एकूणच आयुष्याबाबत जितके गंभीर योगी तितकाच निष्काळजी. कॉलेजमध्ये धक्के खात खात शिकलेला, गुंड प्रवृत्ती असणारा पण आत्मविश्वासासारखा गुण असणारा योगी. सध्या योगीही एका ठीकठाक कंपनीत चांगल्या पदावर आहे, त्याला चांगलं पॅकेजही आहे. नवीन, जितू आणि योगी यांना कॉलेजमध्ये पाहिलेली स्वप्नं अजूनही आठवतात, त्या स्वप्नांचा या तिघांना ध्यास आहे आणि कधी ना कधी हे स्वप्न पूर्ण करायचंच असा या तिघांचा मानस आहे. आता कथेतलं शेवटचं पात्र मंडल. हा अतिशय दुर्लक्षित असणारा व्यक्ती, दुर्लक्षित असण्यामागे कारण आहे मंडलचा स्वभाव. नवीनचा रुममेट् असणारा मंडल सतत ज्ञानी बाबासारखा ग्यान देत फिरतो, समोरच्याला आपलं म्हणणं ऐकण्यात रस आहे की नाही याची अजिबात पर्वा न करता तो आपलं घोडं सतत पुढे दामटत असतो, मंडलचा अनेक अंधश्रद्धांवर विश्वास आहे, त्याच्या सततच्या बडबडीमुळे त्याला सगळे कंटाळले आहेत. आपल्या देशात उद्योजक मुलाला कोणीही आपली मुलगी देत नाही हे मंडलला एक मुलगी पाहण्याच्या निमित्ताने समजतं आणि लग्न टाळण्याच्या हेतूने तो नवीन, जितू आणि योगी यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात एंट्री घेऊ पाहतो.

'टिव्हीएफ पिचर्स' या वेब सिरीजचा पहिला सिजन २०१५ मध्ये आला होता. पहिल्या सिजनमध्ये एकूण ५ एपिसोडस आहेत. आता एकेका एपिसोडविषयी थोडक्यात माहिती घेऊ या. सिरीजची सुरुवात होते 'तू बिअर है' या एपिसोडपासून. पहिल्याच एपिसोडमध्ये पुढचे एपिसोड बघितले गेलेच पाहिजेत अशा पद्धतीची उत्कंठा ताणली जाते. कॉलेजच्या सिनिअरच्या सक्सेस पार्टीत नवीन बिअर पितोय. त्याचा सिनिअर त्याच्या स्वप्नांविषयी त्याला पुन्हा आठवण करून देतोय आणि फक्त बोलू नकोस काहीतरी करून दाखव असं त्याला बोलून दाखवतोय. बॉसवर चिडलेला आणि बिअरच्या नशेत असलेला नवीन तिरमिरीत जाऊन पहाटे ४ वाजता स्वतःच्या बॉसला शिव्या घालतो आणि इथेच या वेब सिरीजच बीज रोवलं जातंय. कॉलेजपासून या स्वप्नाचा पाठपुरावा करणाऱ्या नवीनने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही आराखडे आखले आहेत, काही तजवीज करण्याचा प्रयत्न केलाय यातलाच एक प्रयत्न म्हणजे 'नॅस्कॉम'सारख्या नामांकित आणि प्रतिष्ठित संस्थेकडे आपल्या उद्योगाची मूळ कल्पना पाठवणे. जेणेकरून या कल्पनेची निवड करण्यात आली तर नॅस्कॉमकडून उद्योग उभा करण्यासाठी सर्वोतोपरी मदत मिळेल. असं काय होतं की नवीन आपल्या नोकरीचा राजीनामा देतो आणि मग जितू आणि योगीदेखील त्याच रस्त्यावर चालण्याची तयारी दाखवतात..इतक्या वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे तिघे पहिलं पाउल कसं टाकतात या प्रश्नांची उत्तरं पहिल्या एपिसोडमध्ये दडलेली आहेत. 

 दुसऱ्या एपिसोडचं नाव आहे 'अँड देन दे वेअर फोर'. जितू फार पापभिरू माणूस आहे वडिलांची परवानगी मिळाल्याशिवाय तो उद्योजक बनण्याइतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. स्वप्न तर पूर्ण करण्याची तीव्र इच्छा आहे पण मग त्यासाठी परवानगी नाही मिळाली तर या स्वप्नाचं काय करायचं अशा संभ्रमावस्थेत जितू आहे. इकडे मंडल या तिघांच्या कल्पनेत स्वतःलाही शामिल करून घेण्याची धडपड करतोय; तर दुसरीकडे नवीन आणि योगी दोघेही राजीनामा देऊन बसलेत. त्यांना कधी एकदा स्वतःची कल्पना प्रत्यक्षात येतेय असं झालंय अशा वेळी जितू आपल्या प्रवासात आपला साथीदार बनला नाही तर काय करायचं ही चिंता या दोघांना भेडसावतेय. एपिसोडच्या शेवटी हे सगळे तिढे सुटतात. 

 तिसऱ्या एपिसोडचं नाव आहे 'द ज्युरी रुम'. तर आता स्वप्नांच्या प्रवासातले चार साथीदार आहेत नवीन, जितू, योगी आणि मंडल. उद्योजक बनण्यासाठी मूलभूतरीत्या काय गरजेचं असतं मेहनत, चिकाटी, जिद्द हे तर आहेच पण महत्त्वाचं म्हणजे आर्थिक भांडवल. या एपिसोडमध्ये या चौघांना एक गुंतवणूकदार भेटतो, पण ज्याला केवळ पैसे गुंतवण्यात आणि त्यातून नफा कमावण्याच्या रस आहे. या मुलांची कल्पना, मेहनत याच्याशी त्या गुंतवणूकदाराला काहीही घेणेदेणे नाहीय आणि नेमकं हेच नवीनला खटकतंय. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे चौघेही जण जमेल तिथे, जमेल तसे हातपाय मारत आहेत. सर्व गुंतवणूकदाराकडे आपली कल्पना घेऊन हे चौघे चकरा मारतायत. पण कुठेतरी माशी शिंकतेय. आपल्याकडे वेळ कमी आहे याची दिवसेंदिवस वाढत जाणारी जाणीव या चौघांना अस्वस्थ करून सोडतेय. या एपिसोडमध्ये उद्योजक बनू पाहणाऱ्या लोकांचा संघर्ष फार सुंदर पद्धतीने अधोरेखित केला गेलाय. एपिसोडच्या शेवटी 'वो सिकंदर ही...' हे गाणं गाणाऱ्या या मित्रांचा सिन प्रेक्षकांना भावूक करून टाकतो. एपिसोडचं नाव ज्युरी रूम का आहे याचं उत्तर एपिसोडच्या उत्तरार्धात मिळतं.

 

चौथ्या एपिसोडचं नाव आहे 'बलब् जलेगा बॉस'.ह्या एपिसोडमध्ये कथा वेगवेगळी वळणं घेते. नविनच्या गर्लफ्रेंडला नोकरीनिमित्त दुसऱ्या देशात जावं लागतंय. स्वप्नाच्या प्रगतीने खूप वेग घेतलाय त्यामुळे ब्रेकअपबद्दल काही विचार करण्याइतपतही नवीनकडे वेळ नाहीये. दुसरीकडे बिझनेससाठी चांगला गुंतवणूकदार मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. इकडे जितूच्या वडलांना त्याच्या स्वप्नाबद्दल आणि त्या दृष्टीने उचलल्या गेलेल्या पावलांबद्दल समजलंय त्यावरून घरात जोरदार तमाशा झालाय. एपिसोडच्या शेवटी या चौघांना भेटतो पुनित. पुनित एक चावी आहे, गुंतवणूकदार आणि त्याच्या खजिन्याची. जो या चौघांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने जाण्यात त्यांना साहाय्य करणार आहे.

 

पाचवा आणि फीनाले एपिसोड आहे 'व्हेअर मॅजिक हॅपन्स'.  नावाप्रमाणेच जादुई अनुभव देणारा हा एपिसोड. या एपिसोडमध्ये अशा काही घटना घडताना दाखवल्या आहेत ज्यायोगे कथा खूप वेग पकडते. आपण दुर्लक्षित आहोत या भावनेने  ग्रासलेला मंडल, आज पुनित ज्या प्रथितयश गुंतवणूकदाराला भेटवणार आज तिथे आपलं काम झालं नाही तर आपलं स्वप्न धुळीला मिळेल या चिंतेत असणारे नवीन, योगी आणि जितू. पुनित या सर्वांना त्या बहुचर्चित गुंतवणूकदाराकडे मिटिंगकरता घेऊन जातो. तिथे गेल्यावर तुम्ही जी कल्पना मांडताय तशीच कल्पना माझ्याकडे एक टीम आधीच मांडून गेलीय अशी धक्कादायक न्यूज तो गुंतवणूकदार या सर्वांना देतो. मग आपली कल्पना चोरली कुणी याचा शोध सुरू होतो.. ही कल्पना नेमकी कुणी चोरलेली असते? हा गुंतवणूकदार या मुलांच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करायला तयार होतो का? नवीन, जितू, योगी आणि मंडल या सर्वांची मेहनत फळास येते का? मंडल कायमचाच दुर्लक्षित राहतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एपिसोडच्या शेवटी मिळतात आणि या वेब सिरीजचा पहिला सिजन सुफळ संपूर्ण होतो.

 

 संपूर्ण वेब सिरीजच वैशिष्टय म्हणचे प्रत्येक एपिसोडगणिक कथेची प्रेक्षकांच्या मनावर घट्ट होत जाणारी पकड. प्रगतीचा हा ग्राफ कुठेच खाली होत नाही उलट हा आलेख चढता आलेख आहे. प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला काही यशस्वी आणि लोकप्रिय उद्योजकांची वाक्यं, प्रत्येक एपिसोडचं नाव जे अगदी अर्थपूर्ण आहे. 

वेब सिरीजमधली इतर पात्रंदेखील लक्षात राहण्याजोगी वठवली गेली आहेत. हॅकर डँजन मास्टर प्रथितयश कोडींग कॉम्पिटीशन जिंकणारा ज्यातून मिलियन डॉलर्सची कमाई करणारा, ज्याला मेल पाठवायची गरज नाही तुमच्या ड्रफ्ट्समध्ये सेव्ह असलेले मेल तो सहज वाचू शकतो. नवीनचा बॉस ज्याला वाटत ३ जणांमागे २ जण उद्योजक होण्याचं स्वप्न घेऊन जगतात पण शेवटी नोकरीच करतात. नवीनची गर्लफ्रेंड जी नवीनचा मानसिक आधार आहे, ती त्याला सतत उद्युक्त करते त्याच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करायला. ७ कंपनीज बंद पडल्या तरी ८वी कंपनी उघडू पाहणारा रविराम रस्तोगी, जितूची बायको जी नवऱ्याच्या स्वप्नाला खंबीर पाठिंबा देते, सासऱ्यांशी वाद होऊनही आपल्या नवऱ्याची बाजू त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. या तरुणांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मदत करणारा पुनित आणि सिरीजच्या शेवटी भेटलेला गुंतवणूकदार जो गुंतवणूकदार गुंतवणूक कशी, का आणि कशासाठी करतात हे रंजक पद्धतीने या सर्वांना सांगतो. या मुलांमधलं पोटेन्शिअल ओळखतो. ही सगळी पात्रं वठवणार्यांनी छान मेहनत घेतली आहे त्यामुळे ही पात्रं लक्षात राहतात.

नवीन बन्सल हे पात्रं साकारलंय नवीन कस्तुरीया या कलाकाराने. अनेक शॉर्टफिल्म्स तसच वेबसिरीज मध्ये नविनने या आधी बऱ्याचदा काम केलंय, इथेही नविनचा रोल वाहवा मिळवून जातो. जितूची भूमिका केलीय जितेंद्र कुमार या अभिनेत्याने. टिव्हीएफच्या अनेक वेबसिरीजमध्ये काम केलेला हा अभिनेता जितूच्या भूमिकेने भाव खाऊन जातो. योगीची भूमिका केलीय अरूनब कुमार या अभिनेत्याने.याने योगीची भूमिका इतकी छान वठवली आहे की प्रत्यक्षातही हा माणूस असाच बोलत असेल आणि अशीच गुंडगिरी करत असेल असं वाटू लागतं. मंडलची भूमिका केलीय अभय महाजन या कलाकाराने. आधी सर्वांना इरिटेट करणारा मंडल नंतर स्वतःच कथेला एक सुंदर वळण देतो अशा या मंडलची भूमिका अभयने खूप छान साकारली आहे. 

कथेची मूळ कल्पना अरूनब कुमार यांची असून कथाविस्तार पर्मनंट रुममेट्ससारखी हिट वेबसिरीज देणारा बिस्वप्ती सरकार याने केला आहे त्यामुळे ही वेब सिरीज हिट झाली नसती तरच नवल. या वेबसिरीजच्या यशात दिग्दर्शन आणि सिरीजला दिलं गेलेलं संगीत यांचाही मोठा वाटा आहे.

सिरीजचा सिजन १ तुफान यशस्वी ठरला. जो तुम्हीदेखील युट्युब किंवा टीव्हीएफच्या ऍपच्या माध्यमातून पाहू शकता.सिजन २ ची सर्व प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. सिजन २ येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत उद्योजक बनू पाहणाऱ्या या चार तरुणांच्या जिद्दीची ही मनोरंजक आणि प्रेरणादायी कहाणी तुम्ही नक्की पहा.

 

 भाग्यश्री भोसेकर बीडकर

लेखक: 

No comment

Leave a Response