Primary tabs

कोकणातील गणेशोत्सव

share on:

 

 

१८९३ साली टिळकांनी 'समाज जागृती आणि समाज संघटनेच्या हेतूने पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. पण त्या आधीपासूनच महाराष्ट्रात गणेशोत्सवाची परंपरा आहे. तळकोकणात सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना आहे. पण त्यापेक्षा स्वतः च्या घरातला गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो.

'हरितालिके'पासून इथला गणेशोत्सव सुरू होतो. कुमारी आणि विवाहित स्त्रिया दिवसभर व्रतस्थ राहून हरितालिकेचे पूजन करतात आणि मनासारखा पती मिळावा अशी प्रार्थना करतात. या वेळी पुरुष मंडळींची धांदल असते ती सजावट करायची. घराची रंगरंगोटी दोन दिवस आधीच झालेली असते. आज डिजिटल प्रिटींगच्या माध्यमातून सजावटीचे फ्लेक्स वगैरे साहित्य उपलब्ध असलं तरी गेरूने रंगवलेल्या भिंतीवर चुन्याच्या पाण्यात बोटं बुडवून काढलेलं कमळ ही इथली खरी संस्कृती. मग सजवली जाते 'माटी'. गणपती रायाचं छत्रचं जणू. जाळीदार नक्षीची ती माटी' तेरडा हरणं, कांगलं, शेरवड, कळलावी आणि कवंडाळाची फळ बांधून रानफुलांनी सजवली जाते.

      भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी आगमन होतं ते बाप्पाचं. चाकरमान्यानी गाव बहरतं. घरातला कर्ता पुरुष आणि लहानथोर गणेश मूर्तीशाळेत रवाना होतात. फटाक्यांच्या धुमधडाक्यात बाप्पाचं आगमन होतं आणि 'श्री ' मखरात विराजमान होतात. महाआरती गर्जू लागते. पाच भाज्या, अळूच्या गाठी, उसळ, लोणचं, पापड, दही वरणभात आणि किमान २१ मोदकांचा नैवेद्य..

अहाहा ! काय थाट वर्णावा?

  मग 'ॠषीपंचमी'. या दिवशी वयस्कर स्त्रिया व्रत करतात. कंदमुळं आणि शेंगदाणे घालून केलेलं अळू आणि वरीचा भात ऋषींच्या मांडावर भक्तिभावाने ग्रहण केला जातो. कोकणात हा दिवस 'उंदिरकी' म्हणून पण ओळखला जातो. गणरायाच्या वाहनाला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवून तो शेतात सोडला जातो आणि 'तुला हा नैवेद्य अर्पण करतोय आमच्या शेताचं नुकसान करू नको.' अशी प्रार्थना केली जाते.

तिसऱ्या - चौथ्या दिवशी 'गौरी आवाहन' केलं जातं. ही गणपतीची आई माहेरवाशीण म्हणून येते. ही समृद्धीची देवता. तेरडा आघाडा, तुळस, पालेभाजी आणि हळदीचं रोप आणि ५ खडे सोबत गौरीचा मुखवटा पूजन करून धान्याच्या राशीसोबत स्थापन केली जाते. पाचव्या दिवशी साडीचोळी आणि मानाचे दागिने घालून गौराईचं रूप निखरतं. गौराईचा 'ओवसा' सजतो. पावसाळ्यात बहरणारी भोपळा, दोडके, करांदे, हळद, तवशाच्या वेलीची पानं काजूगर, सुकं खोबरं, फळांचे तुकडे, व लाह्यांनी भरून ओवश्याची सूपं तयार होतात. ही सूपं ही साधी नाहीत बरं का! गावच्या बलुतेदाराकडून हा ओवसा दारोदारी पोहोचं केला जातो. त्याची किंमत होत नाही. तो मानचं. हे भरलेले ओवसे गौरीपुढे मानवले जातात. गौरीला वडे-उसळीचा  नैवेद्य असतो. उत्साहाने आरती होते. 'घरात सौख्य नांदू दे' असं मागणं मागतात.

मग हे सौभाग्याचं लेणं घेऊन सुवासिनी तहानभूक विसरून घरोघरी मिरवतात. ही रात्र फुगड्यांचा जागर  घालून जागवली जाते. याच्या दुसऱ्या दिवशी माहेरवाशीण गौरीचं मिश्र पालेभाजी आणि भाकरीची  शिदोरी  देऊन पाठवणी  केली जाते. काही ठिकाणी गणपती बाप्पाचं देखील विसर्जन करतात.

गौरी विसर्जन नंतरही बाप्पाचे लाड थांबत नाहीत बरं का! भजनांची धामधूम सुरूचं असते. घराघरात खडखडे बुंदी, करंज्या, ओल्या पाकाचे लाडू, उसळ, मिसळपाव, पोहे, शिरा, उपमा ...भजनाला काय वाटायचं? याची चढाई असते. आता तर यात चायनीज पदार्थानी पण शिरकाव केला आहे.

आणि नैवेद्ययाच्या किती तऱ्हा?...वडे, उसळ, रस-घालवणे, आंबोळ्या, तवशाचा धोंडा स , शिरवाळ्या, अळवड्या,ओल्या नारळाच्या करंज्या, चूणकापं आणि किती काय? सुगरणीच्या सुपीक डोक्यातून येणाऱ्या कल्पना पानावर उतरतात. केळी-चवयीची पानं पंक्तीला असतातचं.  खाण्या-पिण्याची रेलचेल,भक्तीभावाची प्रसन्नता

भजनांची जल्लोष यात दिवस कसेच निघून जातात आणि अनंत चतुर्दशी येते. पावलं जड होतात आणि डोळे भरून येतात. पण तो जातोचं. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या तालात, ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांचा धूमधडाक्याचा आमचा बाप्पा त्याच्या घरी जातो. पुढच्या वर्षी पुन्हा पाहुणा येण्यासाठी.

 

 - आस्मी अजित जोइल

लेखक: 

No comment

Leave a Response