Primary tabs

माती

share on:

माती

 

निर्गुण, निराकार, रंग, रूप नसलेली. रोज आपल्या पावलांचा भार पेलणारी, आपल्या जगण्याला निरंतर अर्थ प्राप्त करून देणारी, सोशिक माती. 

माती हळवी असते, ओलाव्याचा शिडकावा जरी मिळाला, तरी ती स्वतःशीच कुजबुजते,  ” हे तर माझ्यासाठीच की”. अन पोटात पहुडलेल्या जाणिवेच्या बिजाबरोबर तरारून येते माती. जगण्याची आणि जगवण्याची प्रचंड क्षमता घेऊन जन्माला आलेली असते जणू.

हे मातीचं गायन निरंतर चालू असतं.

माती गाते?

हो,  आपल्याला हे गाणं ऐकू येत नाही. अंगात सत्त्व मुरवून घेऊन,  माती हळूहळू मोकळी होते, अन गाऊ लागते.

तिचं ते गाणं फक्त त्यालाच ऐकू येतं.

अन तो खेचल्यासारखा येतो तिच्याकडं. तिला आपल्याजवळ ठेवून न्याहाळत बसतो. तिला एकत्र करतो अन तिच्यातले तुटलेले दुवे सांधत राहतो. तिला लहान बाळासारखं जोजवत राहतो, शांतवत राहतो.

मातीच्या मनातली गडबड हळूहळू शांत झालेली असते.

मग तो हळूच तिच्या कानात कुजबुजतो एक गुपित, तिच्या आणि त्याच्यापुरतंच.

माती मान डोलावते.

सराईत बोटं अंगाखांद्यावर वागवताना माती देहभान विसरुन जाते. तिच्या डोळ्यांसमोर तिचे रूप बदलत जाते. मग एकेक वळणं उमटत जातात. खाली पसरट, त्यावर थोडेसे मोठे, गोलसर, अन वर उभट, असे आकार.

हे असं आपलं निराकारपण गळून जाताना माती हसत हसत पाहात राहते. काही मिळवताना काही गमवावं लागतं खरं. काय गमावलं ते अजिबात न जुमानता ती नव्या अवताराच्या स्वागताला सज्ज राहते. आपल्या सभोवती आकार घेणारं देखणेपण कुतूहलाने पाहत, अंगाखांद्यावर नवे स्पर्श मिरवत राहते.

गोळ्याला आकार मिळतो आणि अवतरून येतात देहाची वळणे, वस्त्रांचे झुळझुळीत स्पर्श. वरच्या बाजूच्या दोन उंचवट्यातून दोन कोमल बाहू साकार होतात. वरच्या भागातून वळसा घेऊन एक मातीचा लांबट तुकडा वाढलेल्या दोंदावर जाऊन स्थानापन्न होतो.

दोन बाजूला दोन सुपासारखे पसरट भाग, सर्वात वर किरीट चढवून हा कळसाध्याय समाप्त होतो. आभूषणे चढतात, वस्त्रे झुळझुळतात, मुकुट झगमगतो.

माती आपलं बदललेलं रुपडं आश्चर्याने पाहात राहते.

रंगाची मोहमाया सुटता सुटत नाही. ते निळे सावळे रंग, केशर जास्वंदी अंग, सोनेरी आभूषणे, अन झगमगता किरीट.

“कोण आहेस तू?”

त्या मूर्तीचे रेखीव पाणीदार डोळे फक्त हसतात.

”तू इथेस होतास का माझ्यात?”

हसरे डोळे मिचकवल्याचा भास होतो.

”तत्त्वमसि”

तिला आश्चर्य वाटते. फक्त रुजवणे माहीत असलेली ती, सजणे तिच्यात केव्हापासून आले?

आजूबाजूला तिची अशीच अनेक रूपे तिच्याकडे बघून खुदूखुदू हसत असतात.

मातीला कळून चुकते, आपण आता माती राहिलो नाही, मूर्ती बनलो आहोत. कशाची तरी स्फूर्ती झालो आहोत. आपल्यात काहीतरी वेगळं होतं, ते आता झगमगून उठलं आहे.

माती ते मूर्ती हा प्रवास काय होता?

कशासाठी होता?

मातीचं विलक्षणपण त्यातच तर आहे, ती भिजते, घडते, सावरून परत घडी नेटकी होते. आकार परिधान करते. अन सर्वात शेवटी मिसळते तेव्हा मातीच उरते.

देहदाखले कशासाठी ?

मूर्तीकाराचे समाधान, तेजाचे प्रतिष्ठान, आणि शेवटी विसर्जन यासाठी.

ही नाती अनादी काळापासून चालत आलेली, न कळेलशी, गूढ गंभीर. माहीत नाही मी काय बोलू?

सिंहासनावर प्रतिष्ठापित झालेला तो, त्याच्या पायीचा मूषक, हातीचा मोदक, अन डोईचा किरीट, साऱ्यांचे तत्व एकच आहे असं तर सांगायचं नाही ना त्या नात्यांना? समोर बसलेला लीन कोणी, त्याच्या पायीची जमीन, डोईवर पसरलेलं आभाळ साऱ्यात एकच काही भरून राहिलेलं आहे म्हणे. 

तो येतो म्हणजे काय होतं? एक भारलेपण आसमंतात व्यापून राहतं. आजूबाजूला खूप मोठी नकारात्मकता पसरली असताना, त्याचं येणं आश्वासक वाटून जातं. नाती दूरदूर असताना नात्यांचं देखणेपण कळून येतं. समईच्या शांत तेवणाऱ्या ज्योतीमध्ये किती एकात्मता भरून राहिली आहे, हे प्रखरपणे जाणवून येतं. मातीच्या आयुष्याची किंमत फार मोठी आहे, कारण ती जगवायचे काम करते. सकारात्मक जाणिवा जागृत करते. तसा बाप्पा मातीत वर्षभर रुजून येतो,  मात्र हाच एक दिवस मातीचा बनून येतो. ते मृण्मय तत्व तोच तर असतो.

"ते तूच आहेस."

“त त्व म सि”

मातीला ते आज कळलं.

तुम्हाला आम्हाला केव्हा कळणार ही मृण्मयी नाती, बाप्पा जाणे.

- सिद्धी नितीन महाजन

लेखक: 

No comment

Leave a Response