Primary tabs

।। गौरी गणपती ।।

share on:

।। गौरी गणपती ।।

 

श्रावण आला की मन प्रसन्न होतं, कारण सणांची रेलचेल सुरू होणार असते. त्यामुळे श्रावण सर्वांचा लाडका महिना. मलाही श्रावण आवडतोच. पण मी जास्त वाट बघते ती भाद्रपद महिन्याची, कारण या महिन्यात आपल्या लाडक्या बाप्पाचं अन गौरींच आगमन होणार असतं. विदर्भात गौरी अर्थातच महालक्ष्मी अन गणपती हे दोन्ही सण फारच थाटामाटात साजरे होतात.

भाद्रपदात गणेश चतुर्थीला पार्थिव गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. व्यासा़ना महाभारत काव्य लिहायचं होतं,  तेही गणेशाच्या हातून अन दहा दिवसात सलग लिहायच़ होतं. गणेश तयार झाले लिहायला. भाद्रपद चतुर्थीला महाकाव्याचे लेखन सुरू केले. एका बैठकीत लिहित असल्याने गणेशाच्या अंगातली उष्णता वाढायला लागली, तेव्हा व्यास यांनी गणेशाच्या अंगावर माती लिंपायला सुरुवात केली. त्यांना थंड वाटावं म्हणून. अन मग दहा दिवसाने अनंत चतुर्दशीला लिहून पूर्ण झाल्यावर मातीमुळे गणेश आखडून गेले. म्हणून मग व्यासांनी त्या मातीचं विसर्जन केलं. अन मग ती प्रथा पडली. पार्थिव गणेश पूजनाची. दहा दिवस गणपती मांडणे अन अनंत चतुर्दशीला विसर्जन. गणेशाला वक्रतुंड म्हटलं जातं. "वक्रान तुण्डति ईति वक्रतुंड". अर्थात वाईट मार्गाने चालणारे व बोलणारे अशांना जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड. अर्थात गणपती.

गणपती दशदिशांना प्रभावित करतो. इतर कोणत्याही देवता त्याच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. म्हणूनच कोणतेही मंगलकार्य करताना आधी गणपतीलाच आवाहन करून त्याचीच प्रथम पूजा केली जाते. मन खंबीर करण्याची, आत्मिक बळ वाढवणारी, अशी ही देवता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावं म्हणून टिळकांनी गणपती सार्वजनिक स्वरूपात बसवायला सुरुवात केली. ही परंपरा आजतागायत सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उत्सव म्हणूनच महत्वपूर्ण वाटतो.

अशा या विघ्नहर्ता गजाननाच्या आगमनाच्या तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौरी अर्थात महालक्ष्मीचेही घरोघरी आगमन होते. या दोघी बहिणी तीन दिवस माहेरपणाला येतात अशी श्रद्धा आहे, त्यामुळे त्यांचे माहेरपण निगुतीने आणि थाटामाटात केले जाते. पहिल्या दिवशी गौरीची प्रतिष्ठापना अन दुसऱ्या दिवशी महाप्रसाद, तिसऱ्या दिवशी पाठवणी असा भरगच्च कार्यक्रम असतो.

देवता शास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते. अग्निपुराणात गौरी मूर्तीचे सामुहिक पूजन केले जात असे असा उल्लेख आहे.

एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या व आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी तिची प्रार्थना करू लागल्या. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला. अन समस्त मानवजातीला सुखी केले. तेव्हापासून सर्व स्त्रिया गौरीपूजन  करू लागल्या असा उल्लेख आहे. महालक्ष्मीला नैवेद्याला जो फराळाचा प्रसाद केला जातो त्याला फुलोरा असं म्हणतात. त्यामधे लाडू-करंजीसोबत त्यांच्यासाठी वेणी व साजश्रुंगाराची पेटी पण बनवली जाते. रव्यापासून हे पदार्थ बनवायलाही एक आगळाच उत्साह असतो. काही जणांकडे फुलोरा समोर ठेवतात तर काही ठिकाणी महालक्ष्मीचं पोट भरतात. त्या फुलोऱ्याने पोट भरणे म्हणजे, उभ्या महालक्ष्मींचे जे धड असतं. त्याला कोथळा म्हणतात ते पोकळ असतं त्यात तो फुलोरा भरतात. अशा अनेक प्रकाराने या महालक्ष्मीचं स्वागत केलं जातं. तीन दिवस सर्व कुटुंब एकत्र येतं हे या सणाचं फलितच म्हणायला पाहिजे. या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसाच्या भेटीला पारखा झालाय, या सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात.

गणपती आणि महालक्ष्मी हे दोन्ही सण कौटुंबिक आणि सामाजिक दोन्ही बांधिलकी जपतात. सार्वजनिक गणपतीच़ं स्वरूप आता जरी बदलल़ं असलं तरी श्रद्धा मात्र तिच आहे. मोठमोठ्या मूर्ती ट्रकवर असतात समोर डिजेचा ढणढणाट असतो, पण एक-दोन कार्यकर्ते गणपतीच्या मूर्तीला जीवापाड जपत असतात. मला ते फार भावतं मनाला. झी मराठीची एक सुंदर जाहिरात होती. वडिलांच्या हातात गणपती अन पाऊस सुरू होतो,  छोटा मुलगा कावराबावरा होतो, आपला बाप्पा आता भिजणार, तो तत्परतेने हातातला रुमाल पटकन बाप्पावर धरतो. त्याला हे करणं सांगावं लागत नाही बाप्पाविषयीचं प्रेम हे प्रत्येक जण जन्मत:च घेउन येतात, ते शिकवावं लागत नाही. या वर्षी कोरोनाचं संकट आहे गणपती आणि महालक्ष्मी या सणांवर. या वर्षी मनामनात जपलं पाहिजे बाप्पाला. बाप्पा फक्त भक्तीवर आनंदी असतो. त्याला तामझाम नकोच आहे. जगावर आलेलं हे कोरोनाचं संकट बाप्पा नक्कीच दूर करेल हा दृढविश्वास ठेवू या. अन पुढल्या वर्षी बाप्पाचं नव्या उमेदीने हर्ष उल्लासात स्वागत आपण करणार आहोत. हा कोरोना लवकर संपू दे ही प्रार्थना महालक्ष्मी व बाप्पा चरणी करू या.

 

उज्वला सबनवीस

लेखक: 

No comment

Leave a Response