Primary tabs

गणेशोत्सव आणि कौटुंबिक - सामाजिक भान

share on:

गणेशोत्सव आणि कौटुंबिक - सामाजिक भान

भारतभर साजऱ्या होणाऱ्या विशेष सार्वजनिक उत्सवांमध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सव पर्वाचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला सुरू होणारा हा उत्सव दहा ते अकरा दिवसांचा असतो. पेशव्यांच्या काळात घरगुती स्वरूपाच्या ह्या सणाला इ.स. १८९३ साली लोकमान्य टिळक ह्यांनी सार्वजनिक स्वरूप दिले आणि हा उत्सव समाजातल्या सर्व स्तरांत विशेषत्वाने पोहोचविला.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव कुटुंबाला एकत्र आणणारा, विखुरलेली नाती जमा करणारा, उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. वेगवेगळ्या वयोगटाची माणसे, त्यांच्या गप्पा, मुलांची धमाल, जुन्या नव्या पिढीच्या विचारांचे आदानप्रदान, विविध कार्यक्रम, जागरणं, वर्षभर न भेटलेल्या आपल्या नातलगांचं एकत्र येणं ह्या साऱ्यामुळे गणपती हा उत्सव न राहता परिवाराची ओळख होऊन जातो.

तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल, घरातला कर्ता पुरुष गणपती हातात घेऊन घराकडे निघालेला असतो, सोबत त्याची मुले असतात, त्यातला मोठा आपल्या बाबांना विचारतो,  'मी कधी धरेन हातात आपला गणपती?'  मला वाटतं जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याचे जे काही क्षण असतात त्यातला हा एक आहे. कुटुंबभान आणि त्यानंतर समाजभान व राष्ट्रभान निर्माण करण्यात ह्या अशा क्षणांना खूप महत्व आहे.

 गणेशाचे पूजन हा कौटुंबिक श्रद्धेचा विशेष कार्यक्रम असतो. ही मूर्ती जिवंत आहे हा विश्वास मुलांमध्ये सहजच तयार होतो. मानवी भावना, श्रद्धा आणि एकमेकांवर विश्वास ह्या सद्भावना आपसूकच रुजत जातात. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सकाळ-संध्याकाळ होणारी आरती हा तर विशेष कार्यक्रम असतो. हा कौटुंबिक कार्यक्रम कधी आजूबाजूच्या सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम होतो कळतही नाही. आज कोणी घंटा वाजवावी ह्यावर लहान्यांच्या चर्चा घडतात. तर ऐनवेळी शेजारची मद्रासी काकू तिच्या भाषेतली आरती गात भाव खाऊन जाते. घंटा, झांज, आरती ह्याने बाप्पा एकदम प्रसन्न दिसतो.

आरती झाल्यानंतर मिळणारा प्रसाद हाही फार कुतूहलाचा विषय असतो बरं का! माझ्या लहानपणी आम्ही गणपतीच्या पहिल्या दिवशी अकरा किंवा एकवीस गणपतींचे दर्शन करायला जात असू. बाप्पाच्या दर्शनानंतर त्या घरात मिळणाऱ्या प्रसादावर विशेष चर्चा आम्ही करत असू. वेगवेगळ्या चवीचे मोदक, निरनिराळ्या  मिठाया खायला तर मिळायच्याच पण एखाद्या काकूने वेगळा विशेष प्रसाद केला असेल त्याचे जाहीर कौतुकही होत असे. ‘माझे स्वयंपाक घरातले वेगवेगळे प्रयोग’ हे मला वाटतं त्या ‘वेगळ्या’ प्रसादाने मिळालेली देणगी असावी.  

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक असे अनेक पैलू आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे हे परस्परांना पूरक आहेत. ह्या काळात घरोघरी होणाऱ्या आरती, मंत्रपठण, अभिषेक, पूजाअर्चा असे सगळे धार्मिक विधी तर असतातच पण सोबतच रात्री रंगणारे कीर्तन, विविध भजनी मंडळांचे भजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ह्या दिवसांत असते. अनेक ठिकाणी वेगवेळ्या विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. लोककला संवर्धनाचे आणि संस्कृती जपण्याचे उदात्त कार्य ह्या उत्सवात होत असते.

हा सण कुटुंबाला बांधणारा, सगळ्या नातलगांना एकत्र आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुण्यांची ये-जा, मुलांची धमाल, जागरणं, देवाघरी गेलेल्या नातलगांच्या आठवणी काढत केलेल्या गप्पा, नातेवाईकांचे एकत्र येणं अशा अनेक कौटुंबिक घडामोडी ह्या दहा दिवसांत होतात. कुटुंबाचे बंध आणखीन घट्ट करणारा असा हा सण म्हणूनच महत्वाचा ठरतो.

गणपती विसर्जन हा तर वरवर साधा वाटणारा कार्यक्रम किती भावनिक असतो ह्याची प्रचिती कुटुंबातील लहानग्यापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला येत असते. डोळ्यांत कधी पाणी दाटून येतं हे कळतसुद्धा नाही. बाप्पा येतो, पाहुणचार घेतो अन परतीच्या प्रवासाला लागतो, पण त्याचा हा दहा दिवसांचा मुक्काम प्रत्येक कुटुंबासाठी जपून ठेवण्यासारखा असतो. ह्या आठवणींचा खजिना वर्षभर पुरतो. म्हणूनच ‘पुढच्या वर्षी लवकर या’ ही साद अंतःकरणापासून दिली जाते आणि हा आनंद सोहळा अनेक वर्षे सोबत करतो.

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत आपल्याला कौटुंबिक भान तर जपायचे आहेच पण त्याचबरोबर समाजभानही जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली आहे. ह्या वर्षी अनेक खर्च सहज टाळण्यासारखे आहेत. तोच पैसा आपल्याला समाजोपयोगी कार्यांसाठी देणगी म्हणून वापरता येऊ शकतो. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या अनेक कुटुंबांना आपल्याला मदत करता येऊ शकते. धर्मादाय दवाखान्यांना आर्थिक स्वरूपात मदत करता येऊ शकते. मदतीचे अनेक मार्ग आहेत फक्त आपण सहृदयी असणे गरजेचे आहे. 

ह्यावर्षीचा गणेशोत्सव तुम्हां आम्हां सर्वांना ह्या जागतिक संकटातून मुक्त ठेवो आणि कौटुंबिक व समाजभान जपण्याचे सामर्थ्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना. 

- मंजुषा अनिल

लेखक: 

No comment

Leave a Response