Primary tabs

१०वी व १२वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेख 

share on:

१०वी व १२वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर लेख 

 

दहावीच्या पहिल्या दिवसापासून शाळेतले शेवटचे वर्ष याची जाणीव ठळक होतं जाते. तेव्हा, वर्षानुवर्षे असलेले शाळेतल्या मित्रांचे नाते कुठेतरी तुटणार तर नाही नां, या शंकेने मन पोखरायला लागते. पुढे अशीच घट्ट मैत्री राहावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात, ते याच दहावीच्या वर्गात. महत्त्वाचे वर्ष म्हणून अभ्यासही अधिक असतो, तो करता करता येते परीक्षा, लागतो निकाल आणि शाळेतून पाउल मोठ्या दुनियेत पडते. 

 

दहावी-बारावी ही दोन वर्षे अधिक महत्त्वाची असतात, असे सगळे म्हणतात. माझ्यादृष्टीने मधले अकरावीचे वर्ष अधिक महत्त्वाचे वाटते. ते रेस्ट इअर असे म्हणतात, खरं तसं नसते. दहावी पास झाल्याझाल्या पुढे नक्की काय करायचे हे ठरलेले असो वा नसो विद्यार्थ्यांनी विविध प्रवेश परीक्षा अभ्यास करायला सुरुवात करावी. ते करताकरता, आपला आवका जोखता येतो. स्वत:ची उडी आजमावता येते. पुढील निर्णय घेणे सोयीचे जाते. एकीकडे असा अभ्यास चालू ठेवावा. बारावी नंतरच्या सीईटी (CET–Commin Entrance Test) परीक्षेची तयारी होते आणि खरा निश्चित मार्ग ठरवला जातो. प्रचंड संख्येने विद्यार्थी परीक्षेला म्हणजे अधिक स्पर्धा असते. म्हणून अकरावी हे रेस्ट इअर न समजता, भविष्याची आखणीचा पाया तयार करायचे वर्ष समजावे.  

 

दहावीनंतर कुठल्या शाखेत जायचे, पुढे काय शिकायचे? काय आवडते? जमते, झेपते? परवडणारे आहे का? अशा अनेकविध प्रश्नांनी मुलांच्या मनात गोंधळ असतो, असाच पालकांच्या मनातही. त्यासाठी मुलांची कलचाचणी आणि बुध्यांक चाचणी करून घेणे फायद्याचे ठरते. शास्त्रशुद्ध चाचणी करणाऱ्या अनेक संस्था मोठ्या शहरांमध्ये तरी आहेत. राज्य सरकारकडूनही अशा चाचण्या घेतल्या जातात. त्याचा फायदा होतो. पुढे पाऊल टाकताना सजगता येते. 

 

आता, दहावी बारावीत अनुत्तीर्ण विदयार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, अभ्यास नाही जमला म्हणजे मी संपलेलो नाही ही भावना जागृत व्हावी यासाठी ‘नापास’ शब्द वापरणे बंद केले आहे. (सप्टेंबर, २०१८पासून)  त्याऐवजी ‘विद्यार्थी कौशल्य विकासास पात्र’ शेरा दिला जातो. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते. त्यांची कुशलता वाढवून स्वत:चे पायावर उभे राहण्याची क्षमता नक्कीच मिळते. कौशल्य असणाऱ्यांची आज देशाला गरज आहे, अशांना प्रतिष्ठा, समाजात मानाचे स्थान मिळते. स्वाभिमान जपला जातो. 

 

सर्वसाधारणपणे दहावी/बारावीनंतर ठरलेल्या दिशेने शिक्षण घेण्याकडे मुलांचा कल असतो. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, बीसीए, बीबीए, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, पॅरामेडिकल, पशुवैद्य, औषध निर्मिती, कृषी, बायोमेडिकल, संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सायबर, ग्राफिक्स, आर्किटेक्ट, सैनिकी, नाविक, शैक्षणिक, मनोरंजन, नाट्याभिनय, इत्यादी इत्यादी, अशी अनेकविध प्रकारची क्षेत्रे वयाच्या कुठल्याही पायरीवर शिकता येतात. तेव्हा, स्वत:ला ओळखून, परिस्थितीनुसार घरातल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णयाप्रत यावे. काहीजण जाणीवपूर्वक हटके असे काहीतरी निवडतात, यशस्वी होतात. कुठेही गेलात तरी कष्ट, जिद्द, परिश्रम, अभ्यास, वेळ, वर्तणूक याचे महत्त्व जाणून वागणे अत्यंत आवश्यक आहे. 

 

आता, तुम्ही शाळेच्या बाहेर मोठी मुले म्हणून वावरणार आहात. तेव्हा, तुमची वर्तणूक व्यवस्थित अदबीची, योग्य प्रकारची, इतरांचा आदर करणारी, स्वत:हून सगळ्यात सहभाग घेणारी, घरातले, शेजारीपाजारी, समाज यांची कदर करणारी पाहिजे. इतरांशी बोलताना तुम्ही कसे बोलता, वागणे किती परिपक्व (matured) आहे, यावर इतरांची नजर असतेच असते. तुमच्याबद्दल इतरांच्या मनात आत्मीयता निर्माण होईल असेच वागणे आता तुमच्याकडून अपेक्षित आहे. इतके दिवस लहान आहे, सुधारेल, कळेल त्याचे त्यालाच असे म्हणून तुम्ही वाट्टेल तसे वागला असलात तर आता मात्र तसे करणे चुकीचे होईल. माणूस म्हणून चांगली ओळख समाजात निर्माण करताना हे वय खूप मोलाची कामगिरी करणारे असते हे कायम लक्षात ठेवा. फक्त मी आणि माझे करणे सोडा, घरी-दारी सर्वत्र तरुणाईचे उत्साही वर्तन, मदतीचा हात देत चला. आजूबाजूच्या अनेकांशी मुद्दाम जाऊन संवाद साधा. त्यांच्याकडे तुम्हाला देण्याजोगे खूप काही असणार आहे. ते घेण्याची तुमची तयारी पाहिजे. आपला देश तरुणांचा म्हणून ओळखला जातो, तेव्हा देशाला, समाजाला तुमचा अभिमान वाटेल अशीच तुमची वागणूक हवी, हे लक्षात घ्याल. 

 

माणूस म्हणून जन्माला आलात. माणूस म्हणून जगा. या एकविसाव्या शतकात नुसत्या मनाच्या श्रीमंतीने भागत नाही आणि नुसत्या पैशाच्या श्रीमंतीने माणूसपण मिळत नाही आणि आपण तर सारी माणसे हाडामासाची भावभावनांची. तेव्हा दोन्ही प्रकारची श्रीमंती पाहिजे. थोडे मार्क्स कमी पडले, थोडा पगार कमी मिळाला तरी चालेल, पण माणूस म्हणून कमी पडू नका. आयुष्यात कधीही मानवी मूल्ये पायदळी तुडवू नका. देशहिताचे रक्षण करा, हे सगळे समजते ना? नसेल समजत तर घरातील मोठ्यांकडून हे मार्गदर्शन स्वतंत्रपणे समजून घ्या. यश तुमचेच आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. 

 

- वंदना धर्माधिकारी

लेखक: 

No comment

Leave a Response