Primary tabs

युवा चैतन्यशक्तीचं उत्सवी प्रतीक - कृष्ण जन्माष्टमी 

share on:

युवा चैतन्यशक्तीचं उत्सवी प्रतीक - कृष्ण जन्माष्टमी 

 युगपुरूष युगंधर श्रीकृष्ण म्हणजे करोडो भारतीयांचं आराध्य दैवत. अशा या प्रिय दैवताचा जन्मदिन म्हणजे उत्साहाची आणि उत्सवाची पर्वणी. श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातल्या अष्टमी तिथीला कृष्णाचा जन्म झाला. कृष्ण जन्माची ती घडी अतिशय विलक्षण होती. कडाडणाऱ्या विजा, धो धो पडणारा पाऊस, कारावासात बंदी असलेले माता-पिता, जन्मःताच मृत्यूची भीती असलेलं ते दैवी अर्भक आणि त्यांच्या जिवाचं रक्षण करण्यासाठी पिता वसुदेवाने गोकुळचा राजा नंद यांच्याकडे यमुना नदीतून भर पावसातून पैलतीरी पोहोचून सुरक्षित केलेला तो बालजीव...कुणी साधा नव्हे तर दैत्यांना मारण्यासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतलेला तो धुरंधर कृष्ण..म्हणूनच कृष्णजन्मदिनाची ही तिथी खूप मोठा उत्सव म्हणून देशभर साजरी होते. विशेषतः युवा चैतन्यशक्तीचं प्रतीक कृष्णाष्टमीला प्रतिबिंबीत होतं ते दहीहंडीच्या थरारक क्रीडा प्रकारात.
    या उत्सवाचं सर्वात मोठं  आकर्षण म्हणजे दहीहंडी आणि काला. जन्माष्टमीचं हे खास वैशिष्ट्य. युवा वर्गात अनोखा उत्साह भरून तनामनात एक थरार जागा होतो आणि उंच दोरीला लटकवलेली हंडी कोण फोडणार यांची उत्सुकता पोराटोरांबरोबर जुन्या जाणत्यांनाही लागून राहते, कारण अनेक तरूण यासाठी वर्षभर कसरत करून मेहनत घेऊन प्रॅक्टीस करीत असतात. दहीहंडीचा हा खेळ जिंकणं हे त्यांचं स्वप्नं असतं. थरावर थर रचून दहीहंडी फोडण्याचा हा थरारक क्रीडा प्रकार गावोगावी गल्लोगल्ली ज्या उत्साहात सुरू असतो, तो पाहून गोकुळात कृष्ण आणि त्यांच्या गोपाळांनी केलेल्या लीला आजही भारतीयांच्या जनजीवनात किती चिरंतन होऊन बसल्या आहेत, याची प्रचिती येते. आज हजारो वर्षानंतरही तरूणांच्या गळ्यातला ताईत आणि मनातला खरा हिरो श्रीकृष्णच आहे, हेच सिद्ध होतं.  
   अर्थात या वर्षी कोरोनाच्या जीवघेण्या महासाथीने सर्व उत्सव साधेपणाने करायचे असल्याने दहीहंडीच्या अमाप उत्साहाला आवर घालून युवा दहीहंडी मंडळं शांत कसं राहायचं आणि शांत राहून काही विधायक करता येईल का या विचारात मग्न आहेत. पण या दहीहंडीशी जोडल्या गेलेल्या तरूण गोविंदांच्या मनातून दहीहंडीची दर वर्षीची धमाल जाता जात नसणार... त्याला कारण लोकांच्या मनीमानसी हजारो कथांमधून मांडण्यात आलेलं कृष्ण कन्हैयाचं अलौकीक चरित्र आणि अद्भूत व्यक्तिमत्व. 
     श्रीकृष्ण चरित्र लिहिणाऱ्या सर्व कवी-ग्रंथकारांनी कृष्णाचं वर्णन करताना असं म्हटलंय की, कृष्णाचा सावळा नीलवर्ण, चेहऱ्यावरील मधुर स्मितहास्य आणि खोडकर टप्पोरे काळेभोर डोळे हे रूप इतकं देखणं होतं की बघणारा मोहीत होऊन जाई. त्याच्या लीला, त्याचे विभ्रम वेड लावीत असत. कान्हाच्या बासरीने ऐकणाराचे भान हरपून जाई. कृष्णबासरीतून श्वासांचा लयताल असा अविष्कृत होत असे की, संपूर्ण वातावरण भारले जाई. त्या सप्तसुरांचा परिणाम गाई-गुरांवर होत असे. प्रत्यक्ष कृष्ण राखण करीत असलेल्या त्या दुभत्या गायी कृष्णबासरीच्या सूरावर तन्मय होऊन अशा पोषक वातावरणात चारा खात असत की, त्यांच्याकडून अतिउच्च दर्जाचं दूध मिळत असे. म्हणूनच गोकूळची भूमी ही दुधा-दह्याने समृद्ध होती. 
   गोकूळ या छोट्याशा राज्याचा अधिपती मथुरेचा राजा दुष्ट हुकूमशहा कंस होता. त्याच्या आदेशाने गोकूळचं सारं दूध-दही-लोणी मथुरेच्या बाजारात विक्रीला जात असे. कृष्णाला ही गोष्ट मान्य नव्हती. गोकूळच्या भूमीपुत्रांना उपाशी ठेवून, लहान मुलं आणि तरूणांच्या तोंडचा हक्काचा पौष्टीक लोण्याचा घास काढून तो मथुरा नगरवासियांच्या मालकीचा होतं असे. म्हणून कृष्ण दूधादह्याची मटकी घेऊन जाणाऱ्या गोप-गोपिकांना आडवित असे. तरीही कोणी ऐकले नाही, तेव्हा झाडाआड गोपाळांना जमवून खडी मारून मटकी फोडण्याचे उद्योग त्याने सुरू केले. गोपी जेव्हा कान्हाच्या या उद्योगांची आणि खोड्यांची तक्रार घेऊन नंद-यशोदेकडे येत, तेव्हा युवा अवस्थेत आलेला कृष्ण आपल्या माता-पित्याला गोकूळचे दूध गोकूळातच राहिले पाहिजे, याचं महत्त्व आणि त्यातील अर्थकारण सुध्दा पटवून देत राहिला. कंसाला विरोध करण्याची ताकद गोकुळवासियांना मिळावी यासाठी प्रतीकात्मक म्हणून दहीहंडीचा हा खेळ कृष्णाचे गोकुळात आपल्या सवंगड्यांसह खेळायला सुरुवात केली. उंचच ऊंच लटकलेली ती दह्याची हंडी कष्टपूर्वक मिळवण्याचं महत्त्व त्याने गोपाळांना समजून सांगितलं.  
  काळाच्या ओघात बाकी सगळे अर्थ आणि व्यवहार मागे पडले तरी ही प्रथा कायमची सुरू राहिली आणि आज या प्रथेला एका क्रीडा प्रकाराचं स्वरूप प्राप्त झालं. यात कुठे गैरप्रकार होतात, म्हणून त्यावर टीकाही होते. स्पर्धा जीवघेण्या ठरतात, म्हणून त्यावर बंदी आणण्याचाही विचार मांडला जातो. यातला लहान बालकांचा सहभाग यावरही आक्षेप आहेत. परंतु या सगळ्या त्रूटी दूर करता येतील, अशी मंडळाची भूमिका सुध्दा विचारात घेतली जात आहे. भारतीय परंपरेतील दहीहंडीचा हा कृष्णचरित्राशी जोडला गेलेला खेळ चालू रहावा आणि "गोविंदा आला रे आला... जरा मटकी संभाल ब्रिजबाला" अशा दहीहंडी स्पेशल गाण्यांच्या तालावर हा खेळ सुरक्षेचे सर्व नियम पाळून रंगत राहावा असंच आताच्या बालगोपाळांना आणि नवतरूण गोविंदांना वाटत असणार. 
-    अमृता खाकुर्डीकर

लेखक: 

No comment

Leave a Response