Primary tabs

लोकमान्य टिळकांचा दृढनिश्चयी 'पुनःश्च हरिॐ'

share on:

  "पुनःश्च हरिॐ" हा शब्द सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या तोंडून वाहिन्यांच्या माध्यमातून सतत आपल्या कानावर पडतो आहे. लाॅकडाऊन कडक करणे, पुन्हा शिथील करणे, पुन्हा कडक करणे, याबाबत राज्य सरकारचे धोरण सारखे बदलते आहे. विशेषतः पुणे व मुंबई या दोन धोकादायक कोरोनाग्रस्त शहरांना अजूनही  नीटसे 'पुनःश्च हरिॐ' करता आलेले नाही.
त्यामुळे सामान्य जनता हैराण आणि संभ्रमित आहे, परंतु
सामान्य जनतेचे कैवारी आणि तेल्या-तांबोळ्याचे पुढारी अशी बिरूदावली अभिमानाने मिरवणारे महाराष्ट्राचे तेजस्वी नेतृत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा दृढ निश्चयी 'पुनःश्च हरिॐ' एकदा इतिहासात डोकावून जाणून घ्यायला हवा, तर कळेल की, करारी आणि बाणेदार नेतृत्व असेल तर प्रतिकूल अशा संकटसमयी किती चतुराईने आणि कौशल्याने स्थिती हाताळता येते आणि किती सहजतेने  परिस्थिती पूर्वपदावर आणून आपला 'पुनःश्च हरिॐ' दमदारपणे सुरू होऊ शकतो. 
   आज जसा कोरोनाचा जीवघेणा संसर्ग पुण्यात पसरलाय तसाच, त्या वेळी प्लेगचा फैलाव माणसांचे जीव घेत होता. एकेका घरात मृत्यूचं थैमान सुरू होते, अशा वेळी टिळकांचे खंबीर व्यक्तिमत्व पुणे शहराचा आधार झाले होते.
  वास्तविक राजद्रोहाच्या खटल्यातील न्याय

निवाड्याप्रमाणे तुरुंगातील प्रदीर्घ आणि भयंकर शिक्षा भोगून लोकमान्य टिळक पुन्हा नुकतेच पुण्यात आले होते. त्या वेळी प्रथमतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्य नव्याने सुरू करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. ते लीलया पेलून पुन्हा आपल्या पूर्वीच्या सर्व कामांचा भार स्वतःच्या हाती घेऊन सर्व कारभार त्यांनी पुर्ववत सुरू केला, ते खरे 'पुनःश्च हरिॐ'चे यशस्वी उदाहरण म्हणावे लागेल. 
 विशेषतः  केसरीचे अग्रलेख लिहिण्यास टिळकांनी पुन्हा नव्या दमाने सुरुवात केली आणि 'सरकारचे डोके ठिकाणावर' ठेवण्याचा त्यांचा तेजस्वी बाणा त्याच धैर्याने तसाच सुरू पुन्हा झाला. दिनांक ३ जुलै १८९९ ला सिटी मॅजिस्ट्रेटपुढे जाऊन 'केसरी'चे संपादक म्हणून आपण  कार्यभार हाती घेतल्याचे टिळकांनी स्वतः लिहून दिले आणि ४ जुलै रोजी टिळकांच्या संपादनाखाली तुरूंगातून सुटकेनंतरचा पहिला केसरीचा अंक प्रसिद्ध झाला. त्यात टिळकांनी पहिला अग्रलेख लिहिला;
'पुनःश्च हरिॐ'
    अर्थातच या पुनःश्च हरिॐच्या पुनरागमनात  टिळकांनी  कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यात  अनेक चमकदार गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणल्या.
त्यातील सध्याच्या युवा पिढीला कदाचित फारशी माहीत नसलेली गोष्ट म्हणजे, टिळकाचे 'लाॅ '  विषयाचे क्लासेस. त्यांचे नियोजन इतके शिस्तबद्ध आणि पक्के की, ४ जुलैचा केसरीचा संपादक म्हणून अंक प्रसिद्ध होण्यापूर्वीच २७ जूनच्या केसरीत त्यांनी 'टिळक लाॅ क्लासेस' पुन्हा सुरू होतं आहेत, अशा अर्थाची अगदी थोडक्यात क्लासची जाहिरात दिली होती. 
 'केसरी' हे वृत्तपत्र एका ध्येयवादाला वाहिलेले होते. ते त्यांच्या चरितार्थाचे साधन नव्हते आणि म्हणूनच त्यातली पत्रकारिता विशुद्ध आणि दैदिप्यमान होती. अर्थात पत्रकार-संपादकाला पोट असते, संसार असतो. त्यांची उपजिविका चालण्यासाठी काहीतरी चरितार्थाचे साधन हवे. त्यानुसार  आपले चरितार्थाचे साधन म्हणून लोकमान्य 'टिळक लाॅ क्लाॅस' चालवित असत.
सार्वजनिक स्वरूपात 'केसरी' वृत्तपत्र  आणि खाजगी स्वरूपात 'टिळक लाॅ क्लासेस' असे टिळकांच्या जीवनाचे सर्वसामान्य चित्र त्या वेळी महाराष्ट्राला परिचित होते. म्हणून परगावचे विद्यार्थी सुद्धा या क्लासमध्ये नाव नोंदणी करीत असत. खरंच ते विद्यार्थी किती भाग्यवान, आणि तो क्लास किती दिव्य असेल, जिथे प्रत्यक्ष टिळक लाॅ शिकवित असतील आणि विद्यार्थी कायद्याचे  ज्ञानग्रहण करीत असतील, याची आपण आज नुसती कल्पना केली तरी तो भारावलेला क्लास डोळ्यापुढे तरळून जातो.
अशा त्या लाॅ क्लासला नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांची गर्दी पुन्हा जमली. क्लासमध्ये मदतनीस म्हणून कामं करणारे  पुन्हा  पूर्वीचेच लोक रूजू झाले. त्यांनी विद्यार्थ्यांची भरती करून घेतली. पण नेमका प्लेगचा प्रादुर्भाव जोरात वाढला. पुण्यातल्या लोकांना शहराबाहेर ठेवण्याची वेळ आलेली असताना बाहेरगावचे लाॅचे विद्यार्थी पुण्यात कसे राहणार, त्यांना पुन्हा आपापल्या गावी पाठवावे लागेल, आणि एकूणच क्लास चालवायला अनेक अडचणी येतील असा विचार करून टिळकांनी  दि. १८ जुलैच्या केसरीत, "लाॅ क्लास तूर्त सुरू करता येणार नाहीत" अशी उलट जाहिरात छापून टाकली आणि शिकवण्याच्या कामातून मोकळीक मिळाल्याने सकाळच्या क्लासच्या त्या वेळात  केसरीच्या कामात स्वतःला पूर्ण बुडवून घेतले. 
  प्लेगच्या नियंत्रणावर आणि सरकारी व वैद्यकीय मदतीने प्लेगला आळा घालण्याचे सर्व प्रयत्नांवर टिळकांनी लक्ष केंद्रीत केले व परिस्थिती नियंत्रणात आणण्यात केसरीने मोठा वाटा उचलला.
    हळूहळू प्लेग आटोक्यात आला, पण केसरीचा वाढता व्याप आणि इंग्रज सरकारशी पुकारलेला भारतीय स्वातंत्र्याचा वैचारिक लढा अनेक वर्ष टिळक लढत राहिले. इतका कठीण तुरूंगवास भोगूनसुद्धा  सरकारवर घणाघाती टीका करणारे ज्वलंत अग्रलेख लिहिणे टिळकांनी शेवटपर्यंत सोडले नाही. त्यातूनच समकालीन आणि पुढच्या तरूण पिढीला स्वातंत्र्याचा "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" असा  शक्तीमान  मंत्र दिला, ज्यामुळे लो. टिळकांचे स्थान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अलौकीक आहे.
   त्याच टिळकांची प्लेगच्या साथीत सगळे खाजगी धंदे बंद पडले असताना आपलाही 'लाॅ क्लास' बंद करून टाकला. तो तत्कालीन 'लाॅकडाऊन'चा बळी असं म्हणायला हरकत नाही. टिळकांच्या खाजगी उत्पन्नाचा स्रोत अशा तऱ्हेने कायमचा संपुष्टात आला.  पुन्हा 'टिळक लाॅ क्लास'  सुरूच होऊ शकले नाहीत. कारण टिळकांच्या सार्वजनिक कामाचा व्याप इतका वाढला होता की त्यांना क्लासला वेळ देणे जमले नाही. अर्थात स्वातंत्र्यलढ्यातील या साऱ्या स्वातंत्र्यवीरांचे संसार त्यांच्या पत्नींनी कसे चालवले असतील, हे त्या माऊलींनाच माहीत..! 
   तत्कालीन इंग्रज सरकारचा विस्कळीत कारभार त्याही वेळी अनेक खाजगी धंदे बुडवून बसला. पण... टिळकांनी मात्र ही इष्टपत्ती मानली आणि राष्ट्रकार्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. 
   टिळकांसारख्या थोर राष्ट्रभक्ताची गोष्ट आपल्याला नेहमीच वेगळी वाटते पण क्लास कायमचे बंद पडले ही गोष्ट आजची युवा पिढी कदाचित स्वतःशी रिलेट करू शकेल. त्या निमित्ताने हाही विचार येतो की, खाजगी धंदे बुडून आर्थिक नुकसानीतून त्या वेळी जसे लोक बाहेर आले असतील, त्यापेक्षा आजची स्थिती नक्कीच आशादायक आहे. तंत्रज्ञान, ज्ञान आणि विज्ञान यांच्या अत्याधुनिक सुविधांसह स्वतंत्र भारताच्या भूमीवर आज पुन्हा आपण सारे त्याच वळणावर उभे आहोत... जिथे लोकमान्यांचा महाराष्ट्र शंभर वर्षांपूर्वी प्लेगच्या संकटातून स्वतःला सावरत उभा होता... 
पुनःश्च 'हरिॐ'चा  निश्चय फक्त बोलण्यापुरता नव्हे तर कृतीतून दृढपणे उतरायला मात्र हवा..
  - अमृता खाकुर्डीकर

लेखक: 

No comment

Leave a Response