Primary tabs

'घड्या'...

share on:

"अं हं... ती नाही... ती ... तिच्या खालची दोन नंबर... पिवळी... हं.. हं... ती दाखवा बरं... बरी दिसतेय..."
भल्यामोठ्या दुकानातील वितभर उंचीच्या नरम, शुभ्र गादीवर बसून गिऱ्हाईक आपली बोटं नाचवत काय हवं नको ते सांगत होतं आणि पिंट्या गेल्या तासाभरापासून वेगवेगळ्या साड्या दाखवत होता. पण एकही साडी गिऱ्हाईकाला पसंत पडेना. साड्या दाखवून दाखवून पिंट्या थकून गेला होता, पण थकवा चेहऱ्यावर दाखवायला बंदी होती. गडी माणसाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसले तर गिऱ्हाईक कसे पटणार?… माल कसा खपणार?… दुकान कसे चालणार?… शेवटी मालकाच्या नफ्याशी आपल्या पगाराची नाळ जोडल्या गेली आहे हे विसरून कसे चालेल? म्हणून आतला सगळा थकवा आत जिरवत पिंट्यानं एक हुकमी हसू तोंडावर आणत गिऱ्हाईकाच्या बोटाची दिशा सांभाळत गठ्ठ्यातून पिवळी साडी बाहेर काढली. पुढच्याच क्षणाला काउंटरवर पिवळा रंग ऐसपैस लखलखू लागला. "मस्त रंग आहे ताई. तुमच्यावर खूप चांगला दिसेल..." असं म्हणत पिंट्यानं साडीची तारीफ केली. गिऱ्हाईकाचे डोळे क्षणभर सोनेरी झाले...पण- "साडीच्या मिऱ्या कशा दिसतील.. तो समोरचा पॅच साईडला जाईल का?…मला नीट अंदाज येत नाहीये."- असं म्हणून गिऱ्हाईकाच्या बायकोची मर्जी त्या शंभराव्या साडीवरून डळमळीत होताना काउंटरवरील मालकाला दिसली तेव्हा मालक जागेवरूनच ओरडून म्हणाला- "पॅचचा काही प्रोब्लेम नाही दीदी... अय पिंट्या... साडी पहन के बता दीदी को.."

गिऱ्हाईकाला साडी नेसून दाखवण्याचे काम पिंट्याचे सगळ्यात नावडते होते. तरीही त्यानं साडीचा पदराकडील भाग डाव्या खांद्यावर टाकत उरलेल्या भागाचे एक टोक उजव्या हातात सांभाळत सफाईने मिऱ्या पाडून त्याचा घेर कसा दिसतो ते गिऱ्हाईकासमोर दाखवलं. त्यावेळी गिऱ्हाईकाचं आणि त्याच्या बायकोचंही समाधान होऊन त्यांनी ती साडी निवडली. निवडलेली साडी मालकाच्या काउंटरकडे रवाना करण्यात आली आणि गिऱ्हाईकही जागचं उठलं तेव्हा पिंट्याने बाजूला पडलेला साड्यांच्या ढिगातून एकेक साडी उपसत त्याच्या घड्या घालायला सुरुवात केली. 

घड्या घालता घालता लाल साडी हातात आली तसा तो क्षणभर थांबला. 'बबी किती दिवसापासून मागे लागलीय. लाल साडीसाठी. ही साडी किती छान दिसेल बबीवर ! तिच्यासाठी इतकी महाग साडी नाही घेता येणार आपल्याला. आपल्या पगाराईतकी ह्या साडीची किंमत. पण, साधी का होईना लाल साडी घेऊन देऊ आपण तिला' मनातल्या मनात त्याला बबीची आठवण आली तसा तो खूश झाला. तीन महिन्यांपूर्वी लग्न झालं तेव्हापासून त्याचं आयुष्य थोडंफार बदललं होतं. नाहीतर नेटक्या परीटघड्या मारल्यासारखे अचूक एकसारखे दिवस असायचे सगळे. बबी आल्यापासून घर आपल्याला बोलवतंय. हाक मारतंय असं त्याला वाटायचं. सणासुदीच्या, सिझनच्या दिवसात रात्रीचे बारा बारा वाजायचे दुकानात. घरी गेल्यावर अख्खं घर झोपलेलं असायचं. चार घरचं स्वयंपाकाचं काम करणारी आई थकलेली असायची. दादा-वहिनीची मागची खोलीही बंद असायची. घरात पाय ठेवल्याबरोबर समोरच्या भिंतीवर लावलेला बाबांचा, हार घातलेला फोटो तेवढा जागा असायचा. ह्या इतक्या मोठ्या शहरात आपलं कोणीच नाही असं त्यावेळी वाटायचं. पण बबी आल्यापासून आपलं जग बदललंय. ती आपली वाट बघत बसते. कितीदा 'तू जेवून घेत जा' म्हणून सांगितलं तरी आपल्यासाठी थांबते. आपण गेल्यावर अन्न गरम करते, वाढून घेते आणि आपल्यासोबतच जेवते. तेवढा वेळ आपण जगतो आहोत असं वाटतं. सकाळपासून पुन्हा बबी तिच्या कामात गुंतते. हल्ली वहिनीनेही एका टेलरच्या हाताखाली कारागिरी करायला सुरुवात केली आहे.  तेव्हा ती सुद्धा तिचं आटोपायच्या तयारीत असते.  दादा त्याच्या कामावर जाण्याच्या गडबडीत असतो. आई तर आपण उठायच्या आत कामावर गेलेली असते. प्रत्येकाच्या दिवसाची घडी कशी नीटनेटकी बसलेली आहे. परत त्याचे विचार घडीपाशी येऊन थांबले. त्याला असं थांबलेलं पाहून मालक जागेवरून पुन्हा ओरडला- "पिंट्या... घडी मार जल्दी"
त्या आवाजसरशी पिंट्यानं भानावर येत हातातल्या लाल साडीमध्ये बबीची आठवण घडी घालून ठेवली. सरावलेल्या हातानी समोरच्या ढिगाऱ्यातल्या साड्या उपसत पुन्हा पुन्हा घड्या घालायला सुरुवात केली. एक... दोन... मग तीन.... मोजणं कंटाळवाणं होईल इतक्या घड्या ! त्याला वाटलं ह्या घड्या आपल्या डोक्यात फिट्ट बसल्या आहेत. निघता निघत नाहीत. काढता येत नाहीयेत. आताशा सगळे विचार घडीसारखेच येतात. ठरलेल्या रेषेवर मुडपून ठेवता येतात. त्यापैकीच एक म्हणजे हे दुकान सोडण्याचा विचार !
मध्यंतरी त्याला खूप वाटायचं. 'काय साला काम आहे!… आला दिवस गेला दिवस नुसतं घड्या मारत बसा. गिऱ्हाईक काय शंभर साड्या बघून एखादी घेणार. त्याच त्याच साड्या दाखवा. टपर टपर तोंड वाजवा. साडी आपल्याला आवडो न आवडो. गिऱ्हाईकासमोर कौतुक करा. अधूनमधून माल बदलतो. तेवढाच काय तो फरक. तरीही हे काम सोडता येत नाही. दुसरी नोकरी शोधणं सापडणं कठीण आहे. काही दिवस नोकरीशिवाय काढणंही कठीण आहे. आता तर लग्न झालंय. तेव्हा बेकार राहणं अजिबात बरोबर नाही. उलट काही दिवसांनी नव्याने नऊ दिवस संपले की बबीलाही काहीतरी काम करावेच लागेल. ' विचार करता करता त्याच्या समोरचा साड्यांचा ढीग एकदमच बारीक झाला. सगळ्या घड्या होत आल्या. त्याचवेळी एक नवीन गिऱ्हाईक साड्या घेण्यासाठी त्याच्यासमोर गादीवर बसलं. पुन्हा एकदा एकेक करत साड्यांच्या घड्या मोडल्या जाऊन त्यांचा ढीग जमा होऊ लागला.
आणि त्याच ढिगात पुन्हा एकदा त्यानं लाल साडीची घडी उकलून पसरवली.

विनया निलेश पिंपळे 
पूर्व प्रकाशित - मासिक ज्येष्ठपर्व 

लेखक: 

No comment

Leave a Response