Primary tabs

नाॅस्टाल्जिया-६, अपना अपना आसमा...

share on:

मला आवडलेली ही अजून एक सिरीयल. मी नववीत असताना ही सिरीयल दूरदर्शनवर लागायची. ही १३ भागात संपलेली सिरीयल. जगजीत सिंग यांनी गायलेलं ‘जिंदगी में हर किसी का अपना अपना आसमां’ हे टायटल साँग आजही मनाला भिडतं. 
   गिरीश कर्नाड, बीना, श्रीराम लागू ही तगडी लोकं मुख्य भूमिकांमध्ये होती. वेंकटरामय्या (गिरीश कर्नाड) हे एक स्वातंत्र्यसैनिक असतात. कौसल्या (बीना) त्यांची बायको. अत्यंत आदर्शवादी क्रांतिकारक असलेले वेंकटरामय्या कुटुंबापेक्षा देशाला आपली गरज आहे म्हणून गरोदर पत्नीला सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतात. नाराज कौसल्या त्यांना सोडून माहेरी निघून जाते. वेंकटरामय्या जेलमध्ये असतानाच त्यांचे सासरे मरतात. पण तरीही कौसल्या परत येत नाही. वेंकटरामय्या पण तिची चौकशी करत नाहीत. जेलमधून सुटून आल्यानंतरही ते आपल्या गावात जेमतेम परिस्थितीत शेती करत आपले दोन‌ पुतणे मुकुंद, आनंद (ललित परिमू), एक विधवा पुतणी विशाला, तिची मुलगी जानकी यांच्यासह राहत असतात. 
       मुकुंद फक्त कविता आणि कविताच करत असतो. आनंदला शिकायचं असतं, पण परिस्थिती अशी येते की त्याला नोकरी करणं भाग असतं. तो पोलिसात अर्ज करतो. आपल्या आजवरच्या निरपेक्ष देशसेवेसाठी वेंकटरामय्यांच्या शब्दावर आनंदचं काम होतं. त्याच वेळी त्याला शेजारच्या गावातील ज्योतीचं स्थळ घेऊन रामदास हा अतिशय गरीब माणूस येतो. वेंकटरामय्या तिला बघायला जातात. माधवराव हे मोठे राजकारणी असतात. त्यांची मुलगी ज्योती (प्रिया वाधवा) ही अतिशय बोल्ड आणि फ्री माईंडेड मुलगी असते. एकाच नजरेत काका तिला ओळखतात आणि आपल्या साध्यासुध्या घरात ही झेपणार नाही हे त्यांच्या लक्षात येतं. नियतीचा खेळ वेगळाच असतो. त्यांची गावाकडं जाणारी बस चुकते. दोन तास कुठं थांबायचं? रामदास त्यांना आपल्या घरी जेवून मग बसला जा म्हणून आग्रहानं घरी नेतो. 
       रामदास हा माधवरावांचा मित्र असतो. अतिशय गरीब रामदास आपल्या मुलीसाठी अन्नपूर्णासाठी वर शोधत असतो. पण हुंडा द्यायला पैसा नसणं आणि मुलीचं कमी शिक्षण यामुळं अन्नपूर्णाचं लग्न ठरत नसतं. वेंकटरामय्यांना ती आनंदसाठी अगदी योग्य आहे असं जाणवतं. ते लग्न ठरवूनच गावी परत जातात. लग्नादिवशी विशाला आणि आनंदला समजतं की, अन्नपूर्णा अतिशय गरीब आणि कमी शिकलेली आहे. काकांनी ज्योतीचं श्रीमंत स्थळ सोडून ही गरिबाघरची मुलगी केली. विशाला फार नाराज होते आणि पाठवणीच्या वेळी सांगते की आम्ही हिला नंतर घेऊन जातो. घरी आल्यानंतर काकांशी हे सगळेजण असहकार पुकारतात. थोडासा वाद होतो नी वेंकटरामय्या घर सोडून निघून जातात.
     एव्हाना आनंदची पोलिसांतील नोकरी पक्की झालेली असते. ट्रेनिंगसाठी त्याला जावं लागणार असतं. अन्नपूर्णाचे वडील येऊन तिला कधी घ्यायला येणार म्हणून विचारतात. काका तीर्थयात्रेला गेले आहेत ते आले की आम्ही येऊ असं सांगून त्यांची बोळवण केली जाते. आनंद सर्वांना घेऊन शहरात राहायला जायचं ठरवतो. शेती कुळाला कसायला देऊन हे सारे काकीनाडाला जायचं ठरवतात. अन्नपूर्णाला सासरी आणायला विशाला आणि आनंद यांची चाललेली खळखळ जानकीला लक्षात येते. आणि ती आईला विचारते उद्या माझ्याबरोबर पण माझ्या सासरच्यांनी असं केलं तर? विशालाला एकदम आपली चूक लक्षात येते. आनंदला ती सांगते अन्नपूर्णाला आता घरी आणलं पाहिजे. तो ट्रेनिंग पूर्ण झालं की आणू या म्हणून सांगतो. जानकीला कॉलेजला शिकायला पाठवतात आणि तिथंच हॉस्टेलवर ज्योतीही असते. ज्योती जाणीवपूर्वक जानकीशी मैत्री वाढवते आणि आनंदबरोबर संधान बांधते. पुढं काय होतं? हे सिरीयलमध्येच बघावं अशी छान सिरीयल आहे. 
      मूळ तेलगू कादंबरी कौसल्यावर आधारित ही सिरीयल साधारणपणे १९९० मध्ये लागत होती. गिरीश कर्नाड यांनी आदर्शवादी क्रांतिकारक फार छान उभा केला आहे. श्रीराम लागू यांनी माधवराव साकारले. आपली मुलगी नाकारून आपल्या गरीब मित्राच्या मुलीला पसंत केलं हे कळल्यावर वरकरणी चांगलं बोलणारा आणि दारू पिऊन त्याचा अपमान करणारा माधवराव त्यांनी छान साकारला आहे. ललित परिमूंनी स्वतःचं ठाम मत नसलेला आनंद उभा केला आहे. नंतर काही सिरीयल आणि सिनेमात दिसलेही ते, पण प्रिया वाधवा मात्र कुठंही दिसली नाही. श्रीराम लागू, गिरीश कर्नाड आता या जगात नाहीत, पण दोघांचाही अभिनय खरंच छान झालाय. खेड्यातील विशिष्ट वातावरण, तिथले रीतिरिवाज इतके बारकाईने उभे केले आहेत.‌ अन्नपूर्णा, तिचे वडील रामदास यांचीही कामं छान झाली आहेत. लग्न होऊनही सासरी न नेलेल्या आपल्या मुलीच्या काळजीनं कासावीस झालेला बाप, आणि बापाच्या अपमानानं दुःखी अन्नपूर्णा बघताना पोटात तुटतं. खरोखर एकदा ही सिरीयल बघावीच..कथेसाठी आणि जगजीत सिंग यांनी गायलेल्या टायटल साँगसाठी!!!
  सिरीयल ची लिंक देते आहे-
https://youtu.be/rew9uzD_wBw
मुक्ता कुलकर्णी

लेखक: 

No comment

Leave a Response