Primary tabs

पाऊस, आठवक्षण आणि बरंच काही... 'तुझ्या आठवणींचा पाऊस'...

share on:

आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे. जोराचा वारा त्यात पावसाचीही रिमझिम. आज वातावरणात कुंद गारवा आहे. खिडकीतून या पावसाची रिमझिम बघतेय. पावसाच्या सरी निसर्गाला अगदी चिंब चिंब भिजवतायत. पानावर पडणारे पावसाचे थेंब चार क्षण अळवाच्या पानावर विसावा घेत आहेत; पण पुढच्या काही क्षणात घरंगळून मातीत मिसळून जातायत. खिडकीबाहेर चाललेला निसर्गाचा हा सुंदर खेळ बघत बसले आहे. 
पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. अन् मन तुझ्या आठवणींमध्ये रमले आहे. तुझ्या आठवणीने मन कासावीस होत आहे. आज तुझी खूप आठवण येत आहे  एकमेकांवर असणारं आपलं प्रेम आपल्याला शब्दात मांडता येत नाही. एकमेकांपासून दूर आहोत आपण पण आपलं प्रेम आपल्याला आपण खूप जवळ आहोत हे फिलिंग देतं. कुठेतरी आज मला तुझ्या खूप जवळ आणतोय हा पाऊस. कुठेतरी छान आहे ऐकलं होतं ज्या जमिनीवर आपण राहतो ती जमीन आपली वेगळी असली तरी आपल्याला जोडणारे आकाश मात्र एकच आहे. तरीही आज तुझी खूप आठवण येतेय. आज तू इथे असतास तर याच पावसात आपणही चिंबचिंब भिजलो असतो. पावसाचे टपोरे थेंब ओंजळीत भरून तुझ्यावर उडवले असते अळवाच्या पानावर जाऊन त्यावर विसावलेल्या थेंबांना हळूच सांगितलं असतं, 'बघा मला ज्याच्यासोबत भिजायचं होतं तो माझ्यासोबत आहे.  तू जसा आता या मातीत विसरून जाशील मला ही तसंच त्यांच्यात मिसळून जायचंय. स्वतःचं अस्तित्व विसरून.' असं म्हणून तुझ्याकडे पाहून हसले असते. रिमझिम पावसात प्रीतीचा गारवा अनुभवला असता. 
असंच या पावसात रस्त्यावरून दूरवर चालत गेलो असतो. रस्त्यावरून वाहणाऱ्या शाळांमधून चालताना हळूच तुझ्यावर पाणी उडवले असते, पण तूही तसंच पाणी माझ्यावर. नंतर समोरच्या टपरीवर जाऊन गरमागरम भजी आणि चहा प्यायलो असतो. पावसामध्ये तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगले असते. रात्रभर जरी हा पाऊस कोसळला असता तरीही मी तुझ्यासोबत या पावसात भिजले असते. या पावसात आपल्या अंगणात भिजत असताना मध्येच ढगांचा गडगडाट झाला असता तर घाबरून हळूच तुझ्या मिठीत लपले असते. असं तुला बिलगून राहिले असते तुझ्या मिठीत. हा गडगडाट थांबला असता तरीही. मग हळूच माझा चेहरा ओंजळीत घेऊन तू म्हणाला असतास, एकदा बघ तरी माझ्याकडे.' पण मला ते धाडस जमलंच नसतं. मी तुझ्या मिठीतून दूर झाले असते. तू पुन्हा मला जवळ घेतलं असतंस आणि....
इतक्यात ढगांचा गडगडाट झाला. मी भानावर आले. अजूनही अळूच्या पानांवर पाण्याचे थेंब विसावले होते. आकाशाकडे पाहिले तर इंद्रधनुष्याचे तोरण उभारले होते. खिडकी जवळून उठले. बाहेर कोसळणारा पाऊस आता थकला होता. पण मनात तुझ्या आठवणींचा पाऊस अजूनही बरसत होता. 

-    मैत्रेयी

लेखक: 

No comment

Leave a Response