माणसांना बोलतं करताना
भाग - ३
‘तेजस्वी’ आणि मुंबई सोडून पुण्यात आलो तोवर किर्लोस्करांच्या प्रतिष्ठित मासिकांपैकी ‘मनोहर’ मासिकाचं ‘साप्ताहिका’त रूपांतर करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आणि तरुणांसाठी हे साप्ताहिक मुख्यत्वे प्रकाशित करायचं ठरवल्याने मुकुंदराव किर्लोस्करांनी मुख्यत्वे दत्ता सराफांमुळे माझी ‘मनोहर’च्या संपादक खात्यात नेमणूक केली. तिथे पत्रकार म्हणून सराफ साहेबांनी मला खर्या अर्थानं मुक्त वाव दिला. पहिल्या वर्षातल्या ५० अंकापैकी २४ कव्हर स्टोरीज करण्याची संधी मला मिळाली. मुंबईतल्या डेंटल कॉलेजच्या हॉस्टेलवर राहून, तिथल्या रॅगिंग प्रश्नाला वाचा फोडण्यापासून मराठवाडा नामांतर आंदोलन, युक्रांद चळवळ, जोशी-अभ्यंकर हत्याकांड अशा कव्हर स्टोरीज गाजल्या. महाराष्ट्रभर भटकता आलं. खूप मुलाखती घेतल्या आणि शब्दबद्ध केल्या.
१९७४मध्ये दूरदर्शनच्या युवादर्शन कार्यक्रमात एक चर्चा ठेवली होती. त्याचा विषय होता ‘महाविद्यालयीन युवकांच्या नियतकालिकांचं जग’, ‘मनोहर’तर्फे चर्चेत भाग घ्यायला दत्ता सराफांनी मला पाठवलं होतं. तेथे त्या वेळचा आमचा ‘स्टार हिरो पत्रकार अनिल थत्ते’ होता, ‘जिप्सी’ अंक काढणारा श्रीधर माडगूळकर होता. चर्चेचा कार्यक्रम चांगला रंगला. विजया जोगळेकर निर्मात्या होत्या. त्यांना माझा चर्चेतला भाग आवडला आणि तशाच चर्चेत भाग घेण्यासाठी येशील का, असं त्यांनी मला विचारलं. यावर ‘मी कार्यक्रम कंडक्ट करेन’ असं बेधडक म्हटलं आणि ‘दूरदर्शन’च्या माध्यमातून मुलाखती घ्यायला माझी सुरुवात झाली.
पत्रकारिता करत असल्याने रोज नवनवे विषय सुचत आणि ‘दूरदर्शन’ साठी त्यावर कार्यक्रम करता येईल का, असं स्वत:चं सेलिंग मी टिव्ही निर्मात्यांकडे करत असे. उदाहरणार्थ पत्रकारितेमुळे ज्येष्ठ उद्योजकांकडे गेल्यावर त्यांच्या बोलण्यात त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी डोकावत. यातून टीव्हीसाठी ‘आमची पंचविशी’ कार्यक्रमा सुचला आणि लालचंद, हिराचंद, शकुंतला परांजपे, बाळासाहेब ठाकरे, व. पु. काळे, आबासाहेब गरवारे, नानासाहेब गोरे अशा विविध क्षेत्रांच्या नामवंतांच्या तरुणपण मुलाखतींच्या माध्यमातून वर्षभर उलगडण्याचा प्रयत्न केला.
ज्येष्ठांच्या घरी गेल्यावर, तिथे भेटणार्या त्यांच्या कुटुंबीयांशी बोलताना, वडिलांच्या वलयात गुणी तरुण मुलगा झाकोळला जातो, असं लक्षात आलं आणि या तरुण पिढीला बोलकं करणारा ‘वलयांकित’ कार्यक्रम केला. जयंत भीमसेन जोशी, स्नेहल रमेश भाटकर, जान्हवी प्रभाकर पणशीकर, श्रीधर सुधीर फडके असे अनेक जण वर्षभरात बोलके केले.
‘दूरदर्शन’चे निर्माते अरुण काकतकरांमुळे लतादीदी, आशाताई, ह्रदयनाथ, उषाताई, मीनाताई या पाचही मंगेशकरांची दूरदर्शनवर ‘शब्दांच्या पलीकडले’द्वारे प्रथम मलाखत घेण्याची संधी मिळाली. आशा भोसलेंशी तर इतके छान सूर जुळले की गेली २९ वर्षे त्यांच्या अनेक प्रकट मुलाखती आणि अनेक गाण्यांचे शोज करण्याचं भाग्य मला लाभले.
मंगेशकरांप्रमाणे अशोक पत्की, यशवंत देव, सुधीर फडके ते प्यारेलाल अशा संगीतकारांशीही संवाद साधला. बाबूजींशी अनेकदा गप्पा झाल्यात. ‘गेट वे ऑफ इंडिया’ समोर समुद्रात तासाच्या अंतरावर एका बोटीच्या डेकवर बोटीत चाललेली पार्टी सोडून देऊन मला खळाळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर बाबूजींशी अनेक गाण्यामागच्या कहाण्या ऐकायला मिळाल्यात.
दूरदर्शन मुंबई केंद्रामुळेच ‘मुलाखावेगळी माणसं’ भेटली. बल्ब खाणारा कुलकर्णी, शंभरीनंतर उलटी पर्वती चढणारे गोखले काका. ‘गजरा’ कार्यक्रम करता आला. ताज्या घडामोडींवर राजकारण-समाजकारणातल्या माणसांना बोलकं करत ‘महाचर्चा’ घडवता आल्या. विनय आपटे, किरण चित्रे, सुधीर पाटणकर, जमू भाटकर अशा उत्साही निर्मात्यांमुळे या कार्यक्रमांमधून माझ्या बोलण्याच्या उद्योगाला मागणी येऊ लागली.
सिनेमाच्या जगातल्या देव-दिलीप-राज कपूर ते रणबीर कपूरपर्यंत, मराठी चित्रपटातील ललिता पवार, चंद्रकांत-सुर्यकांत, डॉ. श्रीराम लागू, जयश्री गडकर, सुलोचनादीदी ते मुक्ता बर्वे अशा प्रत्येक क्षेत्रातल्या तीन-तीन पिढ्यांना मला बोलकं करायला मिळालं.
पुलं, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन, शंतनुराव किर्लोस्कर अशांच्या मुलाखती संस्मरणीय ठरल्या. सर्वांनी गप्पाष्टक सविस्तर मांडणं शक्यच नाही; पण मी यावर या माणसांचं मुलखावेगळंपण मांडणारा एकपात्री कार्यक्रम करत असतो. त्यामुळे मला सिलोन, दुबई, आफ्रिका, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, जपान, हाँगकाँग, अमेरिका, युरोप, चीन अशा सर्व देशांतल्या मराठी माणसांपुढे किस्से कथन करत सादर होण्याची संधी मिळाली.
बाळासाहेब ठाकरेंनी चौदा वेळा भरभरून गप्पा मारत प्रबोधनकारांच्या संस्कारांपासून स्केचेसच्या जगापासून, शिवसेनेच्या वाटचालीपर्यंत अनेक विषय खट्याळ विनोद सांगत खुलवले आहेत. २४ एप्रिल २०१२ रोजी झालेल्या शेवटच्या सार्वजनिक भाषणात (षण्मुखानंद-दीनानाथ पुण्यतिथी) त्यांना धाप लागत असल्यामुळे मला थेट त्यांचंच भाषण मध्ये मध्ये निम्मं सादर करण्याची संधी लता मंगेशकरांच्या साथीनं दिली. शिवाय माझ्या करिअरला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर माझा स्वत: उपस्थित राहून विशेष सन्मान करत मानपत्र दिलंय आणि मराठी मध्यमवर्गीय घरातल्या मुलाला नोकरी सोडून देऊन निवेदन-मुलाखतीच्या बेभरवशी क्षेत्रात व्यवसाय करायला प्रोत्साहित करणार्या माझ्या आई-वडिलांचासुद्धा त्यांनी सन्मान केलाय. त्यांना विसरणं शक्यच नाही.
पुलंनी लेखणी-वाणीतून मिळवलेले पूर्णत: ‘प्युअर’ पैसे, बाबा आमटेंचं आनंदवन, डॉ अनिल अवचट यांचं मुक्तांगण, जयंत नारळीकरांची विज्ञान संशोधन संस्था, अनाथ विद्यार्थी गृह अशा सामाजिक-शैक्षणिक संस्थांना दान केल्याचं मी विसरूच शकत नाही. डेक्कन क्वीनमध्ये त्यांच्याशी गप्पा मारत असताना हे सगळं सुनीताच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
गोविंदराव तळवलकर, कुमार केतकर, डॉ. अरुण टिकेकर, गिरीश कुबेर या संपादकांशी थेट संवाद साधता आला, तर विजय कुवळेकर मित्रच असल्याने त्यांनी संपादक पद सोडल्यानंतर त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारता आल्या. कुवळेकरांमुळेच आणि दिनकर गांगल यांच्यामुळे वृत्तपत्रीय स्तंभलेखन करू शकलो. लोकांना बोलतं करत असताना काही लेखनही माझ्या हातून झाले आणि आठ पुस्तकं प्रकाशित झाली. रेखाचित्र हा ही माझ्या आवडीचा विषय आहे. मुलाखत घेता-घेता जवळजवळ सातशे रेखाचित्रे मी काढली आहेत.
सार्याचं मूळ ‘माणूस’ हा वीक पॉइंट. आकडेवारीच्या नोकरीत अडकण्यापेक्षा माणसांना शब्दबद्ध करत गेलो आणि अगदी अनोखं करिअरचा उच्चांक करू शकलो. हे जरी माझे श्रेय असलं तरी मला समजून घेत, संदर्भ देत, वेळ देत, स्वत:चं वलय-पद-सत्ता संपत्ती विसरून माझ्यासारख्याला सांभाळून घेत सारी मोठी माणसं आपुलकीनं वागली, बोलली म्हणूनच केवळ संवादाचा उच्चांक मी करू शकलो.
आजपर्यंत जवळजवळ ४००० जणांच्या मुलाखती घेतल्या. बाळासाहेब ठाकरे यांची जवळ जवळ १६ वेळा तर शरद पवार यांची १४ वेळा मुलाखत घेतली. तसेच, प्रमोद महाजन, शंतनूराव किर्लोस्कर, भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, श्रीराम लागू, देव आनंद पासून ते आजच्या रणबीर कपूरपर्यंत यांना बोलतं करण्याची संधी मिळाली.
अकाऊंट्स-कॉस्टिंग असे अभ्यासाचे आरंभीचे विषय बाजूला ठेवून मी पत्रकारितेत येतो काय, तऱ्हेतऱ्हेच्या माणसांना भेटतो काय, आकाशवाणी पुणे केंद्रावर सकाळी सातच्या बातम्या देताना माझा लागलेला उत्तम आवाज आणि शब्दांचे नेमकेपण यातून जाहिरातीच्या व्हॉइस ओव्हरच्या क्षेत्रात काम मिळवतो काय, ‘चैत्रबन’चं निवेदन करण्याच्या निमित्ताने निवेदन-सूत्रसंचालन हा पूर्णवेळ व्यवसाय सुरू करतो काय...माझा जुना वाडा पाडला जात असताना, तो मनात डोळ्यासमोर जपण्यासाठी त्याचं चित्रण करतो काय आणि साठी-पंचाहत्तरीला आई-वडिलांच्या वाढदिवसांना जेवणावळीवर पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांना चालतेबोलते अर्काइव्ह करून ठेवा, असे आवाहन, घरापासून दूर परदेशात स्थायिक झालेल्या मुलांना करून सव्वाशे आजी-आजोबांच्या फिल्म्स करून अग्रलेखातून दाद मिळवतो काय?
लेखात उल्लेखलेल्या, जागेअभावी उल्लेख करू न शकलेल्या किमान चार हजार व्यक्तींच्या हाताचा स्पर्श पाठीवर दाद मिळत झालेला आहे. कृतार्थ हातांच्या स्पर्शाने मी आज कृतज्ञ आहे.
समाप्त
लेखक - सुधीर गाडगीळ
पूर्वप्रकाशित - मासिक ज्येष्ठपर्व
No comment