Primary tabs

माणसांना बोलते करतांना (भाग - २)

share on:

माणसांना बोलते करतांना

भाग - २

 

सुदैवाने मार्क मिळविण्याची रेस, क्लासेस याचा ससेमिरा नव्हता. त्यामुळे किमान अभ्यास करता करता शाळेतले हे उपक्रम, वातावरण, संध्याकाळी ऐकलेले व्याख्यान, कीर्तन यातून नेमके शब्द मांडण्याच्या दिशेने सुरुवात झाली. पुढे बृहन्महाराष्ट्र कॉमर्स (बीएमसीसी) कॉलेजात गेलो. तिथेही अभ्यासाचे तास कमी असल्याने कॉमर्स असोसिएशन, स्नेहसंमेलन यातून लोकांसमोर जाण्याच्या, व्यक्तिमत्त्वातल्या वेगळ्या छटा अनुभवता आल्या. ‘बीएमसीसी’त बापट आणि व्ही. ए. जोशी सरांमुळे मुंबईच्या सिस्टाज, हिंदुस्थान, थॉम्सन अशा मोठ्या जाहिरात संस्थांत जाऊन तिथल्या कॉपीरायटर, व्हाईस ओव्हर या वेगळ्या क्षेत्रांची माहिती ती घेता आली आणि जाहिरातशास्त्र शिकण्यापूर्वीच ‘विद्या’ उपक्रमांच्या माध्यमातून जाहिरातीचं जग समजून घेत गेलो. पुढे. टी. व्ही. च्या काळात विनय आपटेंच्या साथीनं, जाहिरातींना आवाज देण्याचा, जाहिरातींच्या कॉप्या लिहिण्याचा उद्योग या कॉलेजच्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीमुळे आत्मविश्वासानं करू शकलो. त्यावेळी बी.एम.सी.सी.च्या जवळील टेकडीच्या पायथ्याशी एका झाडाभोवती कट्टा होता. त्या कट्ट्यावर बसून मित्रांबरोबर गप्पा गोष्टी व्हायच्या. त्या कट्ट्याला ‘बोधीवृक्षाचा कट्टा’ असे म्हटले जायचे. पत्रकारितेची मला आवड होती म्हणून कॉलेजमध्ये शिकत असतानाच पैशासाठी नव्हे पण आवड जपण्यासाठी पुण्यातील सकाळ, केसरी, प्रभात अशा दैनिकात नोकरी केली.

कॉलेजमध्ये असताना देसाई प्रोफेसरांनी सांगितले की, गदिमांवर आधारित मंतरलेल्या चैत्रबनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावयाचे आहे. मी ते आव्हान स्वीकारले आणि कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून गदिमा, सुधीर फडके यांना भेटलो. त्यांना गीते कशी सुचली याबाबतचे किस्से त्यांच्याकडून ऐकले. त्याचबरोबर ज्या अभिनेते, अभिनेत्रींवर ती गाणी चित्रित झाली होती, ते म्हणजे राजा परांजपे, राजा गोसावी, रमेश देव, सीमा देव यांना भेटलो. त्यांच्याकडून गाण्यासंबंधीचे किस्से गोळा केले व त्याचा वापर गाण्याच्या मधे केला. त्यामुळे तो कार्यक्रम अतिशय उत्तम रितीने पार पडला. सूत्रसंचलनामुळे तो गाण्याचा कार्यक्रम असूनही त्याला रसिकांकडून वन्समोअर मिळाला. चैत्रबनच्या यशामुळे मातब्बरांच्या संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळत गेली.

‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे चेअरमन डॉ. वसंतराव पटवर्धनांनी ‘दीपमाळ’ हे बोधचिन्ह बदलून ‘मिंटी’ फोकस करताना त्यात सहभागी होण्याची संधी दिली आणि शब्द आवाजाशी निगडीत जाहिरातीचं क्षेत्र पूरक उद्योग म्हणून सुचून गेलं. निवेदन हा वेगळा, पण नवा व्यवसाय असल्याने त्याकाळी कमी पैसे मिळत, पण असे जाहिरातींसारख्या पूरक गोष्टी करत गेल्यानेच कालांतराने रितसर नोकरीचा राजीनामा देऊन फ्रीलान्स कलावंत म्हणून काम करण्याचं धाडस करू शकलो.

चौगुले आणि किर्लोस्कर या दोन उद्योगपतींनी एकत्र येऊन ‘तेजस्वी’ नावचं वृत्तविषयक साप्ताहिक काढलं होतं. तिथे संपादक म्हणून मी रुजू झालो. पुढे त्या साप्ताहिकाच्या निमित्ताने मी पुणे सोडून मुंबईला गेलो. राजकारणाच्या धगधगत्या मुंबई विश्‍वात ‘पुणं’ सोडून जायला तयार असणारा मी एकटा, केवळ या पात्रतेवर माझी मुंबई प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली. कॉलेजची वर्ष संपली होती. मी मुंबईला गेलो आणि राजकारण, साहित्य, सिनेमा अशा आवडीच्या क्षेत्रात संचार करायला मिळाला आणि मुंबईतलं लोकलमधलं जीवन, मुंबईचा अफाट पाऊस, चाळीतलं कोंदट राणं (पुण्यातल्या मोकळ्या वाड्याच्या पार्श्वभूमीवर) अनुभवता अनुभवता लालचंद हीराचंद, धीरुभाई अंबानी, देव आनंद, राज कपूर, दिलीपकुमार, बॅ. अंतुले, वसंतदादा, वसंतराव नाईक, विजय तेंडूलकर, जयवंत दळवी, देवयानी चौबळ अशा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींना भेटून त्यांच्याशी बोलता आलं, ते याच ‘तेजस्वी’ काळात!

 

लेखक - सुधीर गाडगीळ 

पूर्वप्रकाशित - मासिक ज्येष्ठपर्व 

लेखक: 

No comment

Leave a Response