Primary tabs

वारीतली तरुणाई 

share on:

वारीतली तरुणाई 
.
आषाढ महिना जवळ आला की, अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे. ज्येष्ठ महिन्यातच दिंडी निघते आणि हजारो वारकरी देहभान विसरून पंढरपूरची वाट चालू लागतात. वाटेत भेटेल त्याला आपल्यामध्ये सामावून घेत ही भक्तिगंगा पुढे प्रवाहित होते. साडेतीनशे वर्षांपासून ही प्रथा इथे चालत आलेली आहे. वय, लिंग, जात, धर्म, पंथ या कशाचाही विचार न करता केवळ विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने हे वारकरी प्रवास करत असतात. कित्येक घरांमधून वारीची प्रथा वंशपरंपरागत चालत आलेली आहे. मात्र ज्यांच्या घरातून ही प्रथा नाही अशा लोकांनाही वारीने आकर्षित केले आहे. यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हेत, तर देश-परदेशातील माणसे समाविष्ट आहेत. 
गेल्या काही वर्षांत वारीला जाणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाचा सहभाग वाढला आहे. हे तरुण वेगवेगळ्या कारणाने वारीत सामील झालेले असतात. देव, पूजापाठ, भक्ती यांपासून तरुण मुले दूर चालली आहेत असा ओरडा ऐकू येत असताना वारीत मात्र वेगळे चित्र दिसत आहे. एरवी जीन्स, रंगीबेरंगी टीशर्टस्, पाठीला अडकवलेली सॅक, हातात अखंड मोबाईल आणि कानात घातलेले इअरफोन्स अशा अवतारातली तरुणाई वारीच्या वाटेवर मनापासून दंग झालेली आढळते. हे का बरे होत असेल? 
गेली साडेतीनशे वर्षे ही वारी अविरत चालू आहे. या मागे काय कारण असावे? याचे गूढ शोधता येते का हे पाहण्याचा काहीजणांचा प्रयत्न आहे. विठोबाला भेटण्यासाठी नक्की कोणत्या इच्छेने आणि जिद्दीने हे वारकरी हालअपेष्टा सहन करून हा खडतर प्रवास करतात याचे प्रचंड कुतूहल तरुणांच्या मनात असते. या नि:स्सीम भक्तीने तरुणाईला भुरळ घातली आहे. वारीचा अभ्यास करून, तिच्यावर संशोधन करून प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवणारे काही परदेशी अभ्यासकही आहेत. परदेशातही आपल्या या वारीचे कौतुक होते हे समजल्याने अजून काही तरुण याकडे आकर्षित झाले आहेत. 
सध्याचे युग अत्यंत ताणाचे झाले आहे. तरुण पिढीला अनेक आघाड्यांवर लढावे लागते. हा ताण कमी करण्याचा एक भाग म्हणूनही तरुण वारीकडे वळले असावेत. भक्ती, कुतूहल, अगम्य अशी ओढ यांच्याबरोबरच हवी असणारी मन:शांती शोधत हा प्रवास सुरू झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच वारीत आता ग्रामीण, शहरी हा भेद उरला नाही. वारीला जाण्याची प्रत्येकाची प्रेरणा वेगवेगळी असते. कोणी मनापासून श्रद्धा आहे म्हणून येतात, तर कोणी वारीच्या-भागवत धर्माच्या इतिहासाचा, व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी येतात. कोणी वारीच्या महान कार्यात सेवेचा आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येतात, तर काहीजण अर्थार्जनाची एखादी संधी साधून घेण्यासाठी येतात. हौशे, नवशे, गवशे असे सगळे वाण तर असतातच. 
एक तरी ओवी अनुभवावी हे जसे म्हटले जाते, तसेच एकदा तरी वारी अनुभवावी असा विचार बरेचजण करतात. एकदा या वारीला गेले की, मग ती आपोआप पुढच्या वर्षी खेचूनच नेते. हल्ली कॉलेजमधील मुले, आयटी क्षेत्रात काम करणारी मुले आवर्जून वारीला जातात. भले ते पूर्ण वारी करत नसतील; पण सुट्टीच्या दिवशी किंवा एखाददुसरा दिवस रजा काढून वारीचा एक तरी टप्पा वारकऱ्यांच्या संगतीने चालणे त्यांना भावते. या भोळ्याभाबड्या विठूभक्तांच्या सोबत चालताना ज्या निर्मल, निर्व्याज प्रेमाचे दर्शन घडते, त्याने त्यांचा जगातल्या चांगुलपणावरचा उडू पाहणारा विश्वास पुन्हा जाग्यावर येतो. वारीत चालत असताना सगळेच लोक एकमेकांना ‘माऊली’ म्हणून हाक मारतात. त्या हाकेने जिव्हाळा आणि आपलेपणाची भावना मनात जागी होते. 
वारी तरुणाईपर्यंत पोहोचवण्यात सध्याच्या सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. सवयीने तरुण माणसे इंटरनेटवर वारीबद्दल वाचतात, फोटो पाहतात. त्या निमित्ताने दिंडी म्हणजे काय, तिचे व्यवस्थापन कसे होते हे जाणून घेतानाच आपल्या संतांची माहिती गोळा करतात. अभंग वाचतात. त्यामुळे आपल्या समृद्ध अशा संतपरंपरेची ओळख होते आहे. एक अनामिक ओढ त्यांना जाणवते आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, चॅटिंग अशा आभासी जगात कंटाळलेल्या मनाला हा जिवंतपणा अगदी आतून हाकारतो. 
वारीत सहभागी होणे म्हणजे फक्त वारीचे फोटो काढून ते अपलोड करणं इतकंच नाही. वारीची भव्यता, वारकरी लोकांची शिस्त, त्यांचं व्यवस्थापन, त्यांची बांधिलकी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरला पोहोचल्यावर केवळ मंदिराच्या कळसाच्या दर्शनाने भरून पावणारा वारकऱ्यांचा भक्तिभाव, या सगळ्याची मोहिनी तरुण मुलांवर पडते आहे. याच सगळ्यातून वारी हे एक आकर्षण बनले असावे. विठोबाला भेटायच्या ओढीने, त्या भक्तिभावाने देहाच्या श्रमाचा त्रास जाणवत नाही असे वारकरी सांगतात. यातून तरुणांना हेही शिकता येते की, आपली जर प्रचंड कष्ट करण्याची तयारी असेल, मनात जिद्द असेल आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक ताकद पणाला लावण्याची तयारी असेल तर आपण ठरवलेले ध्येय गाठणे नक्कीच शक्य होते. या पद्धतीने तरुणांची एक पिढी शरीराने, मनाने खंबीर होते आहे.  
ज्याप्रमाणे मुंबईचे डबेवाले हा व्यवस्थापन क्षेत्रात एक अभ्यासविषय ठरला आहे, त्याचप्रमाणे वारी हादेखील अभ्यासाचा विषय आहे. माऊलींच्या पालखीच्या पुढे आणि मागे मिळून साडेतीनशेच्यावर दिंड्या चाललेल्या असतात. हजारोंनी माणसे या दिंड्यांमध्ये असतात. मात्र कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता अतिशय शिस्तीने वारी सुरू असते. सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणाची, राहण्याची अतिशय व्यवस्थित सोय केली जाते. यात कधीच कुचराई होत नाही. हे व्यवस्थापन शिकण्यासारखेच आहे. या मुलांच्याच भाषेत बोलायचे तर त्यांना यातून टीम स्पिरीट, टाईम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग या गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येक शिक्षण शाखेच्या विद्यार्थ्याला शिकता येईल असे काही ना काही वारीत नक्कीच असते. 
शिवाय सोशल मिडियामुळे, शाळा-महाविद्यालये यातल्या विविध उपक्रमांमुळे तरुणांचे सामाजिक भान वाढते आहे. अगदी वारीबरोबर चालायला गेले नाहीत तरी आपापल्या गावांत, शहरांत ही तरुणाई वारी येते तेव्हा सेवा देते. अन्नधान्य, फराळ वाटप, पाणी वाटप, कुणाला इतर कसली मदत लागली तर ती पुरवणे, आजारी लोकांना वैद्यकीय सेवा देणे, स्वच्छतेचे काम करणे अशी कामेही हे तरुण करताना दिसतात. तरुण पिढीला नवनव्या गोष्टी शिकण्याची, समजून घेण्याची हौस असते. मग एखादा तरुण लेखक-कवी वारी आपल्या शब्दांत उतरवतो, तर एखादा चित्रकार त्याला भावलेली वारी कागदावर रेखाटतो.
वारी हे आपले सांस्कृतिक लेणे आहे. सामाजिक एकीकरणाची आणि निकोप भावना जागवण्याची ती एक रुजलेली परंपरा आहे. समाजात तेढ वाढवणाऱ्या अनेकविध गोष्टी आजूबाजूला घडत असताना सामाजिक समता, बंधुत्व आणि एकात्मता यांचे तत्त्वज्ञान रुजवणारा हा वारीचा सोहळा असाच चालत राहायला हवा. तो असाच वाढीला लागावा हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना!
 
- आरती देवगावकर 

(पूर्वप्रकाशित - मासिक ज्येष्ठपर्व) 

लेखक: 

No comment

Leave a Response