Primary tabs

विठ्ठलवारी...

share on:

महायोग पीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः।
समागत्य तिष्ठन्तमानंदकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्॥
     विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. असे मानले जाते की विठ्ठल हा कृष्णाचा एक अवतार आहे. एकदा कृष्ण आणि रुक्मिणी असे दोघे आपल्या भक्ताला भेटायला पुंडलिकाकडे आले, पण पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेमध्ये गर्क होता. त्यामुळे पुंडलिक आपल्या लाडक्या देवाला भेटायला जाऊ शकला नाही. (आईवडिलांचे स्थान हे देवापेक्षाही उच्च असे मानले गेले आहे ना!) पुंडलिकाने देवासाठी वीट ठेवली आणि कृष्ण आपल्या लाडक्या भक्ताची त्या विटेवर उभा राहून वाट बघत राहिला; अशी एक रंजक आख्यायिका सांगितली जाते.
   पुंडलिकाप्रमाणेच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी अशा अनेक संतांनी पांडुरंगाची भक्ती केली. त्याला प्रेमाने हाक मारली तर कधी लडिवाळपणे पांडुरंगाशी भांडणही केले.
   टाळ, मृदुंग यांच्या नादात आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये, त्याच्या नावाच्या गजरात अवघा महाराष्ट्र हरपून गेला, तो यादवांच्या काळात. संत ज्ञानेश्वर, संत सोपान देव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई, संत सावतामाळी आणि अनेक विठ्ठलाचे भक्त त्या पांडुरंगाला साद घालत, विठ्ठलाच्या नावाचा गजर करीत आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला गेले हीच वारी आज आपण आषाढीची वारी म्हणून ओळखतो. 
   या आषाढीवारीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे वारीच्या वेळी केले जाणारे रिंगण. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. तसेच ‘धावा’ हेही एक वैशिष्ट्य वारीच्या वेळी आपल्याला बघायला मिळते.
    धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.
     या वारीमध्ये एक विशेषत्वाने आढळणारी गोष्ट म्हणजे सर्व वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते तर वारकरी स्त्रिया डोक्यावर तुळशीची कुंडी घेतात. आपल्या परंपरेमध्ये तुळस ही एक पवित्र व पूजनीय अशी वनस्पती आहे. ही तुळस म्हणजे समर्पणाचे प्रतीक आहे आणि ती विष्णुप्रियाही आहे. हे विठ्ठलाचे भक्त त्यांच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरला त्याच्या दर्शनासाठी येतात. येथे लहान-मोठे असे कोणी असते आपल्यातला अहंभाव नष्ट करीत सर्वच वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. हे दृश्य बघताना मला तर असे वाटते या सर्व विठ्ठलाच्या भक्तांना एकमेकांमध्ये जणू विठ्ठलाचे दर्शन होते. 
            देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।
            तेणे मुक्ती चारी साधियेल्या।।
असा हरिपाठ करीत, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा‌ विठूरायाच्या नामाचा गजर करीत सर्वच भक्तगण विठ्ठलाचे दर्शन घेतात. या विठ्ठलाच्या जयघोषात, भक्तीच्या रसामध्ये पंढरपूरच, नाही तर अवघा महाराष्ट्र रंगून जातो.
                       -सुरश्री आनंद रहाळकर

लेखक: 

No comment

Leave a Response