थोडासा आसमान
ही सिरीयल लक्षात राहिली तीच मुळी टायटल साँगमुळे!!!
एक लंबी साँस हो और एक आसमां..
एक आँच दर्द की और हल्कासा धुंआ...
थोडासा आसमां!!!
दिप्ती नवल, नादिरा, मोना आंबेगावकर या तीन वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रीया. त्यांची कहाणी, त्यांच्या अडचणी आणि त्यातून त्यांनी शोधलेलं त्यांचं छोटंसं..थोडंसं आकाश.
मिसेस जोशी (नादिरा) या वयस्कर आजी. जोशी अंकलसोबत त्यांचं लग्न आता ४० वर्षांचं झालंय. मुलीचं लग्न होऊन ती सासरी सुखी आहे. मुलगा बॉबी, बायको मुलांसह परदेशी राहतो. समुद्राकाठी असलेल्या प्रशस्त बंगल्यात त्या, जोशी अंकल (डॉ. श्रीराम लागू) आणि मरीयम राहतात. एका तारेमुळं त्यांना कळतं की कुणीतरी मिसेस जोशी वारल्या आहेत. त्यांच्याशी आपला काय संबंध? या प्रश्नाला जोशी अंकल जे उत्तर देतात ते ऐकून त्यांच्यावर आकाशच कोसळतं. ती जोशी अंकलची प्रेयसी असते. घरच्यांच्या हट्टापुढं काहीच न चालल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं पण ती प्रेयसी त्यांच्या आयुष्यात होती. पण ती आता मेली आहे. हे ऐकून प्रचंड दुखावलेल्या मिसेस जोशी घर सोडून दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला जातात.
दुसरी आहे नाशी (दिप्ती नवल). आपला नवरा आनंद आणि बाळ मन्नू यांच्यासोबत राहणारी. लग्नापूर्वी थिएटर करणारी पण आता चोवीस तास घरी. आपला नवरा आपल्याशी नीट वागत नाही हे सत्य तिला त्रास देत असतं. अधूनमधून होणाऱ्या बारीकसारीक वादावादीनं ती फार निराश होते. आपल्या आईला बोलावून सारं काही सांगते. आई तिला समजावते सगळं व्यवस्थित आहे तुझं. तू नाही नाही ते विचार करून दुःखी होत आहेस. दुसऱ्या वेळी गरोदर असलेल्या नाशीला ही भावनिक आंदोलनं फार त्रास देतात. त्याचं भरात आनंदनं बोललेल्या एका वाक्यामुळं नाशी गर्भपात करून घेते. आणि घर सोडून बाहेर पडते.
अनु (मोना आंबेगावकर) एअर होस्टेस होण्याच्या वेडाने झपाटलेली विशीतील तरुणी. तिचा प्रियकर विकी तिनं एअर होस्टेस न होता लग्न करावं म्हणून मागं लागला आहे. पण ती त्याला तयार नाही. त्यावरूनच आईशी आणि भावाशी तिचं भांडण होतं आणि ती घर सोडून जाते.
या तिघी जणी एके ठिकाणी येतात आणि आपापलं आकाश शोधायचा प्रयत्न करू लागतात.
ही १४ भागांची सिरीयल. काहीशी अपूर्ण आहे. काही गोष्टी मनाला पटत नाहीत. निव्वळ भावनिक घुसमट होत आहे म्हणून अकरा महिन्यांचं बाळ सोडून नाशी निघून जाते हा भाग थोडा अवास्तव वाटला होता. नादिरांनी फार छान काम केलं होतं. डॉ.श्रीराम लागू यांचंही काम खरंच छान झालंय. आपली चूक मान्य करणारा सहृदयी नवरा त्यांनी उभा केला आहे. त्यांच्या पार्किन्सन्स डिसीजची बहुतेक सुरुवात झाली असावी त्या वेळी. दिप्ती नवलनं घुसमटणारी कविमनाची नाशी छान उभी केली आहे. मोना आंबेगावकरची अनु फार लाऊड आहे. किंचाळत बोलणारी, अल्लड पण हट्टी मुलगी लक्षात राहिली होती. मला ते पात्र विशेष आवडलंही नव्हतं.
गुलजारनी लिहिलेलं टायटल साँग आजही मनात घोळतं. जयश्री श्रीराम यांनी इतकं सुंदर गायलं आहे. या सिरीयलमधील बरेच तांत्रिक बाजू सांभाळणारे लोक नावांनी माहिती होते. कितीतरी जण आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. श्रीराम लागू, नादिरा, देबू देवधर आता आपल्यात नाहीत. दिप्ती नवल आर्ट फिल्म करायची, पण आता तीही फारशी कुठं दिसत नाही. मोना आंबेगावकर छुटपुट कधीतरी दिसली. तरीही ही सिरीयल मात्र पक्की लक्षात राहिली.
खाली सिरीयलची लिंक दिली आहे. परत एकदा त्या काळात जायचा छोटासा रस्ता.
- मुक्ता कुलकर्णी
No comment