Primary tabs

आषाढस्य प्रथम दिवसे।

share on:

आषाढस्य प्रथम दिवसे।

 

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिटसानुं।

वप्र कृडा परिणतगज प्रेक्षणीय ददर्श।

पुरा कविनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाsधिष्ठित: कालिदास।

आज आषाढाचा पहिला दिवस ! आज महाकवी कालिदासाचा दिवस !

उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम्।

दण्डीना पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा: ||

(कालिदासाची उपमा, भारवीचा अर्थगौरव, दण्डीचं पदलालित्य नि माघामध्ये हे तिन्ही गुण आहेत.)

असं ज्याचं यथार्थ वर्णन केलं जातं, ज्याच्यामुळे अनामिका हे नाव मध्यमेनंतरच्या बोटाला प्राप्त झालं, असं म्हटलं जातं, त्या महाकवी कविकुलगुरू अशा कालिदासाचा आज दिवस!

हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात तीन शब्दावरून तीन महाकाव्यांची निर्मिती करणारा कवी कालिदासाशिवाय न कुठे झाला न कुठे होईल असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आपल्या पत्नीने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर म्हणून तीन महाकाव्य रचलेला कालिदास हा भारतीय इतिहास परंपरेचाच नव्हे तर जागतिक इतिहास परंपरेतला अग्रदूतच मानावा लागेल. "व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं" असं आपण अभिमानाने म्हणतोच. पण तरीही कालिदासाची प्रतिभा ही निश्चितच मन:पटलावर कायमची अंकित होणारी आहे. आजचा दिवस ह्याच कालिदासाच्या मेघदूत ह्या अजरामर काव्याच्या निर्मितीचा दिवस!

अस्ति कश्चित वाग्विशेष: ???

कालिदासाच्या पत्नीने त्याला हा प्रश्न विचारला की तुमच्या वाणीमध्ये काही विशेषत्व प्राप्त झालंय काय??? तेंव्हा त्यांस प्रत्युत्तर म्हणूनच की काय पण पुढे जाऊन कालिमातेच्या वरप्रसादाने अधिकारसंपन्न झालेल्या कालिदासाने ह्या तीन शब्दांवरून तीन महाकाव्यांची निर्मिती केली.

अस्ति ह्या शब्दांवरून कुमारसंभवाची निर्मिती

अस्त्युत्तरदिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।

पूर्वोsपरा तोयनिधीं वगाह्य पृथिव्याम् मानदण्ड इव स्थित:।

कश्चित शब्दावरूनच आजच्या मेघदूत काव्याची रचना

कश्चित कान्ता विरहगुणा स्वाधिकारतप्रमत्त:।

 वाग् शब्दावरून रघुवंशाची निर्मिती

वागर्थाविव संपृक्तौ वागर्था प्रतिपत्तये।

जगत: पितरौ वन्दे पार्वति परमेश्वरौ।

एवढी विलक्षण प्रतिभा आजपर्यंत कधी कुणाला लाभली??? एकतरी उदाहरण दाखवावं. साहित्यक्षेत्रात कालिदासाची प्रतिभा ही आजपर्यंत तरी अनुपमच राहिली आहे. म्हणूनच ह्या महाकवीला विनम्र प्रणाम !!!

मेघदूत काव्याची निर्मिती

 

कालिदासाने आजच मेघदूताला सुरुवात केली. एका मेघाला बघून एक पत्नीच्या विरहाने होरपळलेला एक यक्ष स्वपत्नीच्या विरहात समोरून चाललेल्या एका मेघाला दूत समजून संदेशवाहक म्हणून पाठवतो नि त्याला दूर हिमालयात राहणाऱ्या आपल्या पत्नीला आपला संदेश पाठवण्याची आज्ञा देतो. हे काव्य श्रृंगाररसप्रधान जितकं आहे, तितकंच ते प्रवासवर्णपर असल्याने निश्चितच वाचनीय आहे. कालिदासाच्या तत्कालीन हिॅदुस्थानाच्या भौगोलिक ज्ञानाच्या कुशलतेचेदेखील हे काव्य एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे सर्वांनी नक्कीच हो काव्य वाचावे ही विनंती.

भारतवर्षाच्या तत्कालीन राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकही हे काव्य आहेच आहे...!

कालिदास हा शृंगाररसप्रधान कवी

कालिदासाचा शृंगार हा सर्वात जास्ती कुमारसंभावमध्ये पाहायला मिळतो. मेघदूतात तो तितकासा नाही. कुमारसंभव हे कार्तिकेयाच्या जन्मावरचं काव्य असल्याने हिमालयातलं केलेलं वर्णन कालिदासाच्या अप्रतिम अशा शृंगाररसप्रधानतेचे द्योतक आहे.

उपमा कालिदासस्य !

संस्कृत साहित्यात कालिदासाची उपमा अप्रतिम मानली जाते. रघुवंशामध्ये कालिदासाने ज्या उपमा वापरल्या आहेत, त्या पहिल्या म्हणजे मन आल्हादित होतं. कैवल्यसम्राट चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊलींनी ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीतही जवळजवळ चाळीसहून अधिक उपमा योजिल्या आहेत, त्याप्रमाणेच कालिदासाचं रघुवंश हे उपमेच्या बाबतीतही वाचनीय आहे. लोकमान्य टिळकांनी तर लहानपणी वडिलांच्या मागे लागून हट्ट करून रघुवंश वाचल्याचा इतिहास आहे.

उपमेच्या संदर्भात अजून एक उल्लेखनीय गोष्ट अशी की कालिदासाची उपमा ही इतर संस्कृत कवींच्याप्रमाणे शब्दश्लेष किॅवा अर्थश्लेषानुप्रणित नाही, ज्यामुळे सर्वसामान्य वाचकांनादेखील त्याच्या अर्थबोधात फारशी क्लिष्टता वाटण्याचा संभव नसतो. म्हणूनच कालिदासाची उपमा ही प्रमाण मानली जाते.

अशा ह्या कविकुलगुरू कालिदासाला पुनश्च एकदा विनम्र अभिवादन!!!

- तुकाराम चिंचणीकर

लेखक: 

No comment

Leave a Response