Primary tabs

योग...

share on:

योग.. लयबद्ध शारीरिक हालचाली, किंवा विशिष्ट प्रकारची आसनं, प्राणायाम किंवा ध्यान म्हणजे योग.. साधारणत: असा काहीसा समज बऱ्याच पाश्चात्य राष्ट्रांचा योग या शब्दाबद्दल झाला आहे, पण ज्या भूमीत याचा उगम झाला आहे त्या आपल्या भूमीतही अनेकांचा हाच समज होणे हे थोडे आश्चर्यकारक आहे. अनेक प्रकारच्या वादात आपण आपल्याकडील मौलिक आणि अत्यंत शास्त्रशुद्ध ज्ञानाकडे दुर्लक्ष करत आहोत. हे आपले प्राचीनतम ज्ञान नीट समजावून घेणे, त्या ज्ञानाची उजळणी करणे, ते पुन्हा आहे त्या स्वरूपात आत्मसात करणे आणि त्याचा योग्य पद्धतीने प्रसार करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने योगदिन साजरा करणे.

युज् या धातूपासून योग शब्दाची निर्मिती झालेली आहे. याचा अर्थ जोडणे असा होतो. मानव त्याच्याकडे असलेल्या बौद्धिक, शारीरिक आणि आत्मिक क्षमतेच्या फार थोडीच क्षमता वापरून जीवन जगतो आहे. त्या क्षमता जर वाढवल्या तर आपले जीवन आहे त्याहूनही अधिक सुखकर होईल असे अनेक आधुनिक वैज्ञानिकांचे मत आहे. आधुनिक विज्ञान त्याच मानवी क्षमता अधिक प्रमाणत कशा कार्यरत करता येतील यासाठी प्रयत्नशील आहे. सुदैवाने आपल्या पूर्वजांनी हे इंगित फार आधीच जाणून ठेवलं आणि त्यावर संशोधन करून मानवाचा सर्वांगीण विकास करण्याचं तंत्र विकसित करून आपल्या पुढच्या पिढ्यांना दिलं. हे तंत्र म्हणजेच योग. आपल्यात दडलेल्या अनंत सामर्थ्याला ओळखण्यासाठीच्या अनेक पद्धती भारतीय विद्वानांनी शोधून काढल्या. त्यापैकी सर्वात परिचित आणि आपापल्या पंथांच्या चौकटी न मोडताही अनुसरता येणारी पद्धत म्हणजे योग. हटयोग किंवा राजयोग. काही अभ्यासक हटयोग आणि राजयोग वेगळा मानतात. 
काही शारीरिक हालचाली ज्याला आसने म्हटलं जातं तिथपासून सुरू होणारा हा प्रवास, श्वसनाचा व्यायाम आणि त्यायोगे मनाचे आणि शरीराचे नियमन करवून घेत आपल्याला ध्यान-समाधीपार्यंत घेऊन जातो. यात समाधी अवस्था म्हणजे आपल्यातल्या त्या अनंतशक्तीची आपल्याला जाणीव होणे असे मानले जाते. या आसनांच्या, श्वासोच्छवासाच्या पद्धती कशा आहेत. त्या कधी कोणी, कुठे आणि कशा काराव्यात? त्यासाठी काही नियम पाळावे लागतात ते कोणते याबद्दल सूत्र रूपात आपल्या भारतीय परंपरेत लेखन झाले आहे. भारतीय परंपरेत भगवान शंकर ही देवता या योगशास्त्राची उद्गाती मानली जाते. दत्तात्रेय, नवनाथ इत्यादी ऋषी मुनी आणि देवता या योगशास्त्राच्या जाणकार मानल्या जातात. आज मात्र आपल्या सर्वांना परिचित असणाऱ्या योगसूत्रांचे निर्माते पतंजली ऋषी आहेत. आधुनिक काळात स्वामी विवेकानंदानी यावर अत्यंत सोप्या शब्दात मार्गदर्शन केले आहे. 
योग म्हणजे केवळ आसने नसून आहार-विहार-विचार यांच्यासह जीवनपद्धती आहे. योगात ज्याप्रमाणे शारीरिक आसने किंवा श्वसनाची आसने म्हणजेच प्राणायाम इ. गोष्टी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सांगितल्या आहेत, त्याचप्रमाणे अहिंसा, सत्य, स्वच्छता, स्वाध्याय, मन:संयम, एकाग्रता इत्यादींचा सुद्धा समावेश होतो. या जीवनपद्धतीचा अवलंब केल्यास सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक काळात, आपल्या सर्वांना ज्या मानसिक तणावाला आणि शारीरिक रोगांना सामोरे जावे लागत आहे, त्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल हे अनेक प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपल्या या प्राचीनतम जीवनपद्धतीचा अवलंब करून आपले जीवन अधिक सुखकर बनवणे इतकेच योगाचे साध्य नसून आपल्यातल्या अनंत क्षमतांची आपल्याला जाणीव होऊन त्यांचा पूर्ण विकास करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने योग करणे.         
-रोहित वाळिंबे 

No comment

Leave a Response