Primary tabs

चिंचेतल्या मिरच्या

share on:

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने आणि नंतर शिक्षणासाठी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी राहणं झाल्यामुळे म्हणा किंवा शिकत असताना बरीच वर्ष एकटी राहिल्यामुळे म्हणा, स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग करणं झालं. कधी आवड, कुतुहल म्हणून वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ करून बघायचे तर कधी नाईलाज म्हणून काही काही सोपे पदार्थ शिकून रोजच्या जेवणात ते करायला लागायचे असं मी बरीच वर्ष केलं. कधी एकच पदार्थ अनेक पद्धतीने करून बघायचा तर कधी तोच तो पदार्थ घाईच्या वेळेत किंवा कंटाळ्याच्या वेळी चालवून घ्यायचा.

विशेषतः शिकत असताना असं बऱ्याचदा व्हायचं. बाहेरचं त्याच नेहमीच्या चवीचं खाऊन कंटाळा आलेला असायचा. घरात काही करावं म्हटलं तर सगळं समान असेलच असं नाही आणि कधी सामान असलंच तर आपल्याला स्वतःला उत्साह असेल असं नाही त्यामुळे पटकन होणारे, आपल्या चवीचे पदार्थ कोणते हे शोधून काढणं हे प्रत्येक एकट्याने राहून शिकणाऱ्या वा नोकरी करण्याऱ्या व्यक्तीसाठी गरजेचं असतं.

पुण्यात असताना आमचा असा एक हमखास कधीही चालून जाणारा पदार्थ म्हणजे वरणाच्या गोळ्यात तेल, तिखट मीठ, मसाला कालवून पोळीबरोबर खायचं. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मिसळणीचा डबा, तूरडाळ हे जिन्नस घेऊनच जातो. त्यामुळे या पदार्थाला मरण ते नाहीच. ऐन अडचणीच्या वेळेस भाजी कमी पडली की किंवा भाजी धुवून, चिरून फोडणीला टाकेपर्यंत धीर धरवत नसला की हा पदार्थ आपल्या मदतीला देवासारखा धावून येतो. याच सारखा अजून एक पदार्थ मला हल्लीच कळला आणि या कंटाळ्याच्या दिवसात अचानक आठवला.

त्याचं असं आहे की माझ्या या स्वयंपाकघरातल्या प्रयोगांना हातभार लावायचं काम माझ्या नवऱ्याने उत्तम प्रकारे पार पाडलं आहे. आम्ही मुळात वेगवेगळ्या प्रांतातले (पुणे आणि कोकण) असल्यामुळे आमच्या सगळ्याच जेवणाच्या पद्धतीत प्रचंड फरक आहे. भाज्या, आमट्या करायचे तर वेगवेगळे प्रकार आहेतच पण प्रत्येक घरात जसा ‘तोंडी लावणे’ हा जिव्हाळ्याचा विषय असतो तसा तो आमच्या घरात सुद्धा आहे. नावडीची भाजी असली की या तोंडी लावण्यावरच सगळा भर असतो. खासकरून कोकण म्हटलं की भात म्हणजेच जेवण हे ओघानं आलचं. यात सुद्धा घाईच्या वेळेत भातावर आमटी नसली तरी ताक किंवा साधं वरण यावर काम चालून जातं. मी एकटी राहायचे तेव्हा पोळ्या करायचा व्याप मला नको असायचा. त्याच दरम्यान माझा होणारा नवरा सुद्धा वेगळ्या शहरात एकटा राहायचा. त्याला पोळ्या करता येतच नाहीत त्यामुळे तो प्रश्नच त्याच्या बाबतीत उद्भवला नाही पण ताक-भात किंवा खिचडीबरोबर तोंडी लावण्याचा त्याचा एक खास पदार्थ होता, तो त्याने मला शिकवला आणि आता हाच पदार्थ आमच्या मदतीला नेहमी धावून येतो – चिंचेतल्या मिरच्या.

पोपटी हिरव्या रंगाच्या मोठ्या, कमी तिखट मिरच्या असतात त्या मधोमध चिर पाडून घ्यायच्या आणि एका वाडग्यात चिंचेचा कोळ करून, त्यात चवीपुरतं मीठ घालून अर्धा तास भिजत ठेवायच्या. अर्ध्या तासाने एका छोट्या कढईत थोडं, म्हणजे अगदी खायचा एक चमचा तेल तापवून त्यात मिरच्या आणि चिंचेचा सगळा कोळ घालायचा. मिरच्या शिजेपर्यंत आणि कोळ बऱ्यापैकी आटेपर्यंत अधूनमधून हलवत राहायचं. साधारण होतं त्यापेक्षा अर्ध झालं की डिश तयार म्हणून समजायचं.

तिखट, आंबट अशी मिश्र चव असलेला हा पदार्थ गरम गरम वरण भाताबरोबर खायला घेतला की इतर काही लागतच नाही. कमी तिखट मिरची असल्यामुळे तिखटाचा फार प्रश्न येत नाही पण जर एखाद्याला तिखट अगदीच सहन होत नसेल तर आटलेल्या चिंचेच्या कोळात सुद्धा मिरची मधून कापल्यामुळे पुरेसा तिखटपणा उतरलेला असतो. त्यामुळे मिरची वगळून फक्त कोळ घेतला तरी काम होतं.

या पदार्थाला साहित्य तर मोजकच लागतं पण याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मिरच्या चिंचेच्या कोळात भिजत ठेवून एकीकडे तांदूळ-डाळ घेऊन भाताचा कूकर लावून शिट्या होईपर्यंत त्या छान मुरलेल्या असतात आणि नंतर कुकरचं झाकण पडून गरम गरम भात ताटलीत वाढेपर्यंत त्या कोळात व्यवस्थित शिजतात. म्हणजेच काय? एकावेळेसच दोन्ही कामं होत असल्याने फार वेळ ताटकळत बसायची गरज नसते. एकटी राहत असताना चिंचेतल्या मिरच्या म्हणजे माझा नेहमीच करायचा पदार्थ होताच पण आत्ता सुद्धा कधीही पटकन करून, मिट्या मारत खायला आम्ही कधीही तयार असतो.  

 हा पदार्थ जरी मी कोकणातल्या माणसाकडून शिकले असले तरी तो कोकणातला नाही असं त्यांनीच मला सांगितलं. पुण्यात असे आंबट पदार्थ फारसे करत नाहीत त्यामुळे मी हा पदार्थ आधी कधीच खाल्ला नव्हता. थोडक्यात, चिंचेतल्या मिरच्यांचं मूळ काही मला माहीत नाही. मी राहिलेल्या कोणत्याही गावाचा हा पदार्थ नक्कीच नाही. माझ्या नवऱ्याच्या मते कर्नाटकमधल्या त्याच्या मामीच्या घरी त्याने हा पदार्थ कधीतरी खाल्ला होता त्यामुळे तो कर्नाटकी पदार्थ असायची शक्यता आहे. या चिंचेतल्या मिरच्यांच्या बाबतीतली अजून एक गंमत म्हणजे चेन्नईत असताना मी खूप वेळा डब्यात वरण-भात न्यायचे, कारण तेव्हा सगळेच डब्यात भाताचे वेगवेगळे प्रकार आणायचे. वरण-भात किंवा दही भात डब्यात नेला की त्याबरोबर मी बटाट्याची किंवा भेंडीची भाजी करून न्यायचे पण अर्थातच सकाळी नेहमी वेळ मिळेल असं नसायचं. अशावेळेस मग एकेदिवशी मी पटकन चिंचेतल्या मिरच्या करून डब्यात भरल्या. डबा खाताना आम्हा मैत्रिणींची अंगत-पंगत व्हायची त्यामुळे रोज एकमेकींच्या डब्यातले पदार्थ चाखून बघणे, कोणता पदार्थ कसा केला आहे ते विचारणे हे नेहमीचंच होतं. चेन्नई, गोवा, केरळ या किनारपट्टीवर असलेल्या ठिकाणी आंबट-चिंबट पदार्थांना वेगळीच पसंती मिळते त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींना या मिरच्या आवडल्या. मी जरी वरण-भाताबरोबर त्या खात असले तरी ‘कर्डराईस’ म्हणजे दहीभाताबरोबर त्या जास्त छान लागतील अशी छानशी सूचना त्यांनी मला दिली आणि योगायोग बघा काय, मुळात मला या मिरच्या शिकवणारी व्यक्ती स्वतः ताक-भाताबरोबरच तोंडी लावायला करत होती. मीच आपला त्यात मला हवा तो बदल करून घेतला होता. नंतर चेन्नई सोडल्यावर काही महिन्याने एका मैत्रिणीने अशा मिरच्या करून मला फोटो पाठवला होता. कोणत्या प्रांतातून, कोणत्या पद्धतीतून आलेल्या या चिंचेतल्या मिरच्या आता कुठे पोहोचल्या असतील? कदाचित एका तमिळ कुटुंबातला हा नेहमीचा प्रकार झाला असेल किंवा एकीकडून दुसरीकडे असा प्रवास करून अजून काही घरात पोहोचला असेल..

एकूण प्रांत, पद्धती या पलीकडे जाऊन चव जाणणारी लोकं असतील तर ‘तोंडी लावण्या’ला मूळ पदार्थाइतकच महत्त्व प्राप्त होतं हे मात्र या निमित्ताने समजलं.   

-    मुग्धा सचिन मणेरीकर

No comment

Leave a Response