Primary tabs

नाॅस्टाल्जिया-४

share on:

तलाश

      माणसाचं आयुष्य इतकं विचित्र आहे. प्रत्येक माणसाच्या अपेक्षा वेगळ्या.. प्रत्येकाला असणारा शोध वेगळा. प्रत्येकाच्या आकांक्षा वेगळ्या. हा शोध या आकांक्षा कोणत्या वळणावर नेऊन पोहोचवतील हे कुणालाच माहीत नसतं. असं अचानक एका अनोळखी वळणावर घेऊन गेलेली ही सिरीयल होती तलाश.

मुद्रा व्हिडीओटेक यांची निर्मिती असलेल्या या सिरीयलमध्ये सिनेमासृष्टीतील नामी अभिनेत्री काम करत होती मौसमी चॅटर्जी!! याचं टायटल साँग ‘तुम पुकार लो’च्या चालीवरच घेतलं होतं. एखाद्या घाटातून वळणारी नी बोगद्यात शिरणारी रेल्वे आणि पाठोपाठ सुरेश वाडकर यांचा आवाज... जीवन इक प्यास है... सभी को कुछ तलाश है!!

      तर कथा सुरू होते.. एक लेखक महोदय शंकरलाल श्रीवास्तव (आलोकनाथ) साहित्य संमेलन संपवून रेल्वेत बसतात. एका दोन मिनिटे थांबणाऱ्या स्टेशनवर रेल्वे थांबते. त्याचं नाव असतं सरसावन. ते नाव वाचून हे लेखक महोदय झटका बसल्यासारखे रेल्वेतून उतरतात. अतिशय आडगाव असलेल्या सरसावनशी त्यांना फार जवळचं नातं आहे, असं वाटत असतं. स्टेशन मास्तर त्यांना  परतीसाठी दुसरी गाडी सांगतात, पण ते रेस्टहाऊसमध्ये थांबायचं ठरवतात. स्टेशन मास्तरना प्रश्न पडतो की सरसावनशी यांचं काय नातं? तेंव्हा शंकर श्रीवास्तव सांगतात, त्यांच्या नात्यातील एक भाऊ सात-आठ वर्षांपूर्वी नाहीसा झाला आहे आणि त्यानं जे पत्र लिहिलं होतं ते मिळालं त्यावर सरसावन पोस्टाचा शिक्का होता. तेंव्हा काहीच माहिती नव्हती. काही सोयी सुविधा नव्हत्या, मग त्या वेळी कुठं शोधणार सरसावन? पण आता माझ्या भावाला शोधूनच इथून जाईन.

       रेस्टहाऊसमध्ये त्यांना एक मफलर सापडतो, तो मफलर त्यांच्या भावाचा सुधीर चौधरीचा (विजयेंद्र घाटगे) असतो. मग त्यांची खात्री होऊ लागते की, इथंच आपल्या भावाचं काहीतरी बरं वाईट झालं आहे. शोध घेत घेत ते पलीकडच्या गावात जातात. तेथील पुजारी (चंद्रकांत गोखले) त्यांना अगदी जुजबी माहिती देतात आणि याहून जास्त मला सांगता येणार नाही असं सांगतात. मग तिथं त्यांना बहनजींचं नांव समजतं. ते त्या बहनजींना भेटायचं ठरवतात, पण बहनजी (मौसमी चॅटर्जी) त्यांना अजिबात भेटायला तयार होत नाहीत. खूप प्रयत्न करतात, पण बहनजी जराही दखल घेत नाहीत. शेवटी एकदा शंकर श्रीवास्तव पडून त्यांच्या पायाला दुखापत होते. मग त्या त्यांना आश्रमात ठेवून घेतात आणि मग त्यांना एक डायरी देतात. ती डायरी असते सुधीरची. वाचता वाचता मग एक एक गाठ सुटत जाते. सुधीर कसा त्या संस्थानिक असलेल्या राजांकडं कामाला लागतो आणि त्यांची मोठी मुलगी उर्मिला (मौसमी चॅटर्जी) त्याच्या प्रेमात पडली.. त्यातून निर्माण झालेला संघर्ष कसा पूर्ण घराण्याला नेस्तनाबूत करून जातो.

ही २६ भागांची मालिका होती. सुधीर चौधरी आणि उर्मिला यांच्या प्रेमकहाणीसोबतच जंगली आणि कन्हैय्या या आदिवासी तरुण तरुणीची प्रेमकहाणी, त्यांच्या आई-वडिलांच्या प्रेमाची, भांडणाची सूडाची कथा, खुद्द उर्मिला, तिचे आई वडील यांच्या वादाची कथा अशा बऱ्याच वळणावळणांनी पुढं‌ सरकत‌ शेवटी उर्मिलाच्या धाकट्या बहिणीने प्रमिलाने (निलीमा आजीम) सुधीरचा घात करायचा केलेला प्रयत्न अशा उपकथानकांनी फार गिचमिडकाला झालेली ही सिरीयल होती, पण तरीही बघावी अशी होती. फक्त त्या वेळी हे समजत नव्हतं की, मौसमीचा नवराच त्या सिरीयलचा निर्माता असल्यामुळं उर्मिलाची मुख्य भूमिका तिला दिली होती... पण तिच्या वयाला ती शोभत नव्हती. प्रमिलाची भूमिका फारच लाऊड होती.‌ म्हणजे ते पात्रच तसं होतं. विजयेंद्र घाटगे मौसमीपेक्षा लहान आहे हे लक्षात येतं. ही सारी आत्ताची निरीक्षणं.‌ पण त्या वेळी ती सिरीयल पुढं काय? पुढं काय? अशा उत्सुकतेने पाहिली होती.

- मुक्ता कुलकर्णी

No comment

Leave a Response