Primary tabs

सेवा है यज्ञकुंड भाग ३

share on:

चंदन है इस देश की माटी, तपोभूमी हर ग्राम है I

हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है II

सध्याच्या स्त्री- पुरुष समानतेच्या या युगाला अगदी समर्पक अशा या पद्याच्या ओळी आहेत. आज असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे स्त्रियांचा सहभाग नाही. विविध क्षेत्रे आज महिलांनी पादाक्रांत केली आहेत. आपल्या कार्यकौशल्याने स्त्रिया तिथे आभाळाची उंची गाठत आहेत. आपल्या कामाचा एक ठसा उमटवत आहेत.

परंतु स्त्रीला आदिशक्ती म्हणून आपण भारतीय अगदी अनादी काळापासूनच पूजत आलेलो आहोत. प्रात:स्मरडेरणीय असलेल्या एकात्मता स्तोत्रामध्ये देखील म्हणूनच वेदकाळापासून ते आजपर्यंतच्या स्त्रियांचा आदरपूर्वक समावेश आपल्याला बघायला मिळतो.

अरुन्धत्यनसूय च सावित्री जानकी सती

द्रौपदी कन्नगे गार्गी मीरा दुर्गावती तथा ॥

लक्ष्मी अहल्या चन्नम्मा रुद्रमाम्बा सुविक्रमा

निवेदिता सारदा च प्रणम्य मातृ देवताः II

आजपर्यंत देशावरील प्रत्येक आपत्तीच्या वेळीही स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा प्रसंगी त्यांच्या पुढे जाऊन महत्त्वाचे कार्य केलेले आहे. रा. स्व. संघ - जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिकेच्या रेड झोन स्क्रिनिंग मोहीमेमध्ये सुद्धा महिलांचा खूप मोठा सहभाग बघायला मिळाला. महाविद्यालयीन तरुणींपासून ते व्यावसायिक, गृहिणी आणि प्रतिष्ठित डॉक्टर अशा सगळ्याच कार्यक्षेत्रातील महिलांनी यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे.

सहभागी डॉक्टरांपैकी महिलांचे प्रमाण हे जवळपास ३५% इतके होते. वैश्विक महामारीच्या या कठीण प्रसंगी जिथे पुरुष डॉक्टरही घराबाहेर पडायला धजावत नव्हते, तिथे महिलांचे असलेले हे प्रमाण नक्कीच अचंबित करणारे आहे. या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या आयुर्वेदाचार्य वैद्य लीना राजवाडे आपला अनुभव सांगताना असे म्हणतात की,

लॉक डाऊन घोषित झाला त्या दिवसापासून खरं तर मी रोज देवाला प्रार्थना करत होते की मला समाजात, या परिस्थितीत काही तरी मदत करण्याची संधी मिळाली पाहिजे. मी जेव्हा या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले तेव्हा माझी आई होती माझ्या घरी!! मी खरंच उद्या सकाळी या युद्धात सहभागी व्हायला जाणार आहे हे तिला पूर्ण पचनी पडत नव्हतं, पण तरी "चला तुझी इच्छा पूर्ण होते आहे ना छान जा" असं ती म्हणाली. माझा नवरा तो जरी व्यवसायाने डॉक्टर नसला तरी त्याचा मला पाठिंबा असतो आणि त्याला हे देखील माहिती आहे की समाजसेवा किंवा धर्मादाय काम करायला मला आवडते. माझी दोन्ही मुले पण मला नेहमी पाठिंबा देतातच!! मी त्यामुळे खरंच खूप नशीबवान आहे. फक्त या वेळी त्या सगळ्यांना कुठे तरी मनात काळजी वाटते आहे हे मला जाणवले होते, पण आपल्याला जर खरंच संकटकाळी देशकार्यात मदत करायची आहे, तर कुटुंब ही संकल्पना विशाल ठेवायची असते आणि त्यामुळे बाकी कुठलाही विचार न करता, मी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये सात दिवस जाऊन राहिले. संघ परिवाराशी मी प्रत्यक्ष परिचित नव्हते. लहानपणी समितीमध्ये, दलात जात असे पण बाकी संघाबद्दल काही माहिती नव्हती. पण संघाबद्दलचा एक विश्वासच मला प्रेरणा देऊन गेला. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर अशा कितीतरी वीरांगनाबद्दल आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत इतिहासात वाचले होते. त्यांच्या पराक्रमाशी तुलना केली तर खरंच आम्ही या करोनाच्या दहशतीच्या विरोधात जे मनुष्य जमातीचे युद्ध सुरू झाले त्यात खारीचा वाटा उचलू शकलो याचे समाधान नक्की आहे. 

- वैद्य. लीना राजवाडे

 

या मोहिमेमध्ये सहभागी प्रत्येकाने शारीरिक दृष्ट्या खंबीर असणे अतिशय महत्त्वाचे होते. त्यामुळेच सहभागी प्रत्येकासाठी वयाची एक मर्यादा (१८ ते ५० वर्षे) घालून देण्यात आली होती. त्याचबरोबर कुठलीही व्याधी सहभागी व्यक्तीला नाही ना? याचीही काटेकोर तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे कित्येक ज्येष्ठ स्वयंसेवकांना यामध्ये इच्छा असूनही सहभागी होता येत नव्हते. पण घरातील संघसंस्कारांमुळे त्यांची पुढची पिढी यामध्ये आनंदाने सहभागी झाली. एकाच घरातून मुलगा आणि दोन्ही मुली या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे अनोखे उदाहरण बोंगाळे कुटुंबाने समाजासमोर प्रस्तुत केले आहे. संघाचा कार्यकर्ता गुरुप्रसाद आणि अभियंता असलेल्या त्याच्या दोन्ही बहिणी स्नेहा आणि श्वेता या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. दोघींचा अनुभवही वाचणाऱ्या सगळ्यांनाच नक्कीच प्रेरणा देईल.

देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि हे कोरोना नावाचं संकट वाटत होत त्यापेक्षा गंभीर आहे हे जाणवलं. रोज येणाऱ्या बातम्यांमधून अहोरात्र काम करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्या कामाबद्दल ऐकत, पाहत होतो. सर्वसामान्य माणसाची केवळ घरी राहावं लागल्यामुळे होणारी कोंडी पाहत होतो. अशा परिस्थितीत आपण ही आपले योगदान द्यायला हवे असे वाटत होते. अशातच भाऊ (गुरुप्रसाद बोंगाळे) च्या माध्यमातून पुण्यातल्या हॉट स्पॉटमध्ये जाऊन नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी चालून आली. आम्ही अर्थातच खूप उत्साही होतो.

 बाबा संघ स्वयंसेवक असल्याने त्यांचा आणि आईचा अगदी १००% पाठिंबा होता. उलट बाबांच्या वयामुळे त्यांना सहभागी होता येणार नाही समजल्यावर त्यांनी आम्हा भावंडाना आवर्जून पाठवले. एका आठवड्याच्या या मोहिमेने आम्हाला खूपच अनुभवसंपन्न बनवले. या काळात नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले. विविध क्षेत्रातल्या लोकांशी परिचय करून घेता आला. आजपर्यंत फक्त लांबूनच पाहिलेल्या दैनंदिन शाखेत या वेळी प्रत्यक्ष सहभागी होता आलं. संध्याकाळच्या विविध कार्यक्रमांच्या मेजवानीने करोनाचा ताण एकदमच हलका व्हायचा. विलगीकरणात आम्हाला प्रचारकांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. या चर्चासत्रांमधून अनेक संकल्पना नव्याने समजण्यास मदत झाली. घरी होणाऱ्या स्वयंसेवकांच्या बैठका, संघाच्या विविध उत्सवांचे नियोजन, विविध कार्यक्रम, बालांच्या सहलींचे नियोजन या गोष्टी आम्ही वेळोवेळी पाहिल्या होत्या, पण संघाच्या सेवाकार्यात या वेळी प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाल्याने, संघाची शिस्त व नियोजन अगदी जवळून अनुभवता आले. एकूणच हा एक अविस्मरणीय अनुभव होता. यापुढेही अशी संधी मिळाल्यास आम्ही कायमच सिद्ध असू. 

स्नेहा आणि श्वेता बोंगाळे, (BE E& TC & BE Mech)

आपल्या तिन्ही लेकरांना या सेवेसाठी पाठवणाऱ्या आईच्या भावनाही फार विलक्षण अशा आहेत. संघावरचा विश्वास आणि संघाने परिवार म्हणून निर्माण केलेले एक नाते यामुळेच हे शक्य झाले आहे. असे विलक्षण धैर्य दाखवणाऱ्या आईची ही प्रतिक्रिया -

सध्या आपण सर्व जणच कोरोनाच्या संकटाचा आपल्यापरीने सामना करत आहोत. माझे पती आणि मुलगा यांना मी पहिल्यापासूनच संघात, शाखेत जाताना पाहत आले आहे. त्यांच्या माध्यमातून मला संघाचे नियोजन, कामाची पद्धत याची कल्पना आहे. संघाचे सेवाभावी कार्य,विचार मला नेहमीच भावले आहेत. अशा वेळी माझ्या मुलांना त्यांचे समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पडण्याची व भारतमातेची सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल एक आई म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल मी संघाचे अभिनंदन करते आणि इतर पालकांनीही आपल्या मुलांना अशा उपक्रमात अवश्य पाठवावे अशी विनंती करते. 

-  उज्वला शाम बोंगाळे (गृहिणी) गुरुप्रसाद, श्वेता आणि स्नेहाची आई.

काही सांगोवांगी किंवा ऐकीव गोष्टींमुळे, संघापासून चार हात लांबच असलेल्या कुटुंबातीलही अनेक महिला या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या या आठवड्याच्या वास्तव्यात जो काही अनुभव आला, तो त्यांचे आणि पर्यायाने त्यांच्या घरच्यांचेही संघाविषयीचे मत कायमचा बदलणारा ठरला आहे. संघ विविध प्रकारे, अगदी प्रसिद्धीपासून दूर राहत, एवढी सेवाकार्ये कशी करतो, याचे प्रचंड कुतुहल आता त्यांना वाटत आहे. अशीच ही एक प्रतिक्रिया -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव खूप मोठं आहे. खूप ऐकलं असूनही प्रत्यक्ष कधीच संपर्क आला नव्हता किंवा तशी संधीही मिळाली नव्हती. मी समाजकार्य पदवीधर आहे(MSW). या कोरोनाच्या हल्ल्यामुळे ऑफिसला न जाता घरूनच काम करत होते. सतत काहीतरी करत राहायची सवय आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामध्ये नोंदणी केली. पण बरीच वाट पाहूनही आपल्याला या साथीच्या काळात काहीच करता येत नाही याचं वाईट वाटत असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यादरम्यान काहीतरी काम करीत आहे याची माहिती कळली. पण परत तिथे ही फक्त डॉक्टर हवे आहेत असं कळलं. चौकशी तर करून बघू असा विचार करून मी फोन केला आणि स्वयंसेवक म्हणून आलात तरी चालेल, असे मला सांगण्यात आले.

मग काय, घरात मुले व पती यांना माहीत आहेच की मी हे असं काही करायची संधी सोडणार नाही. फक्त त्यांना जरा शंका होती, की हे जरा धाडसाचं काम आहे, तर यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा तिथे असतील का?? पण पहिल्याच दिवशी मला तिथे घेतल्या जात असलेल्या काळजीची जाणीव झाली आणि निर्धास्त मनाने घरीही मी त्याबद्दल सांगून टाकले. त्याचबरोबर मला हेही समजलं की इथे कुणीही छोटं-मोठं अथवा जुने-नवीन नाही, तर सगळे फक्त स्वयंसेवक म्हणूनच ओळखले जातात. मग ते प्रत्यक्षात डॉक्टर असो किंवा इतर कोणत्याही व्यवसायात असो. 

मी तिथल्या सगळ्यांपेक्षा वयाने खूपच मोठी होते, पण अगदी सहज सगळ्यांनी मला सामावून घेतलं. ज्यांचं काम संपलं होतं ते नवीन लोकांना मदत करत होते. आणि आश्चर्य म्हणजे कुणीच कशाची काळजी करत नव्हतं. अनुभव कथनाच्या वेळी मी माझ्या शंका विचारल्याच शेवटी, की संघ नक्की काय करतो? अतिशय कमी शब्दात खूप सोपं उत्तर मिळालं मला, संघ स्वतः काहीही करीत नाही. स्वयंसेवक हेच आमचं बळ! जिथे ज्या कामाची गरज असेल तिथे स्वयंसेवक पोहोचतात. कुणीही कोणत्याही प्रकारची मदत, मग ती काहीही असेल वस्तू, वेळ, पैसे या प्रकारे करू शकतो. त्यासाठी कोणतीही मेम्बरशीप लागत नाही अथवा रोज शाखेत जाण्याची सक्तीही. जो स्वतःला देशाचा नागरिक समजतो त्या सर्वांचं संघात स्वागत! आणि अशा प्रकारे माझं संघाबद्दलचं स्वतःचं मत तयार झालं. शिवाय संघाबद्दलचे असलेले गैरसमजही या कामाच्या निमित्ताने दूर झाले. कामाच्या शेवटच्या दिवशी मला संघाशी जोडली गेल्याची भावना निर्माण झाली. कधीही कोणत्याही प्रकारची मदत करण्याची तयारी दाखवून मी खूप मोठं अनुभवाचं गाठोडं घेऊन घरी आले. ही तर केवळ सुरुवात आहे. मला यापुढे ही संधी मिळेल तेव्हा जशी जमेल तशी मी स्वयंसेवक म्हणून काम करीत राहीन..

- मंजुश्री बेंद्रे, समाजकार्य पदवीधर

कित्येक गृहिणीसुद्धा या मोहिमेमध्ये अगदी आनंदाने सहभागी झाल्या होत्या. देशावरच्या या मोठ्या संकटामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, ही प्रत्येकाच्या मनात असलेली भावना त्यांनी या धाडसी कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्यक्षात उतरवली. आपण घरात नसताना, घरच्यांचे काय होईल, असा विचार मनाला शिवला तरी, देशासाठी काहीतरी करायला मिळतेय याचे त्यांना जास्त समाधान होते. म्हणूनच या मोहिमेच्या आठ दिवसात येणारा लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस टाळून यामध्ये सहभागी झालेल्या गृहिणी शरयु सोनार यांचा अनुभव बऱ्याच गृहिणींना नक्कीच प्रेरणा देईल.

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हिड - १९ स्क्रिनिंग प्रोग्रॅमसाठी जे कोणी इच्छुक असतील ते आपले नाव देऊ शकतात' असा मेसेज व्हाट्सअपवर आला आणि हे कळाल्यावर आपणसुद्धा या उपक्रमात भाग घेतला पाहिजे असं वाटलं. आणि मी ठरवलं! इथे आपण जायचंच! मी एक गृहिणी असल्याने मीच स्क्रीनिंगला गेल्यावर घरातील सर्व कामं कशी होणार याविषयी मनात चिंता होती. मी ८ दिवस तिकडे जाणार आणि त्यात आमच्या लग्नाचा २५वा वाढदिवस असल्यामुळे आई तिकडे गेल्यावर घरच्याघरी का होईना पण सेलिब्रेशन होणार नाही म्हणून मुलांनी थोडा त्रागा केला खरा, पण मी मात्र ठाम होते.

शेवटी मुलांनी पण 'आई तू जा. तू तिथून परतल्यावर आपण घरच्याघरी सेलिब्रेशन करू' असं म्हणत सहमती दर्शवली. का करताना पीपीई किट, ३ मास्क, फेस शिल्ड आणि एकावर एक ३ असल्यामुळे सुरुवातीला चालायला, श्वास घ्यायला थोडा त्रास व्हायचा, पण नंतर त्याची सवय झाली होती. या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये रोज सकाळी शाखा भरायची. त्याचबरोबर योगासने घेत असत. हे सर्वच मला नवीन होते. सायंकाळी वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक सत्र असायचे. त्यामुळे एक वेगळीच अनुभूती या आठ दिवसाच्या काळात मला आली. संघामध्ये मला स्वयंशिस्त जाणवली. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. संघ म्हणजे समाज व समाज म्हणजे संघ याची प्रचिती मला इथे आली. या ठिकाणी मला विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय झाला व ते करीत असलेल्या सामाजिक कार्याविषयीची माहिती मिळाली. सात दिवस कसे गेले कळलेच नाही. या स्क्रीनिंगच्या महायज्ञामध्ये मला एक समिधा अर्पण करायची संधी मिळाली. जनसेवा हीच राष्ट्रसेवा आहे या उक्तीचा प्रत्यय मला या ठिकाणी आला. खरं तर या सगळ्यामध्ये माझा खारी इतकाही वाटा नाही. पण अशा संकटसमयी मी माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी थोडंसं का होईना पण काहीतरी करू शकले याचं समाधान नक्की आहे ! भारत माता की जय. 

- शरयू शैलेश सोनार, खडकी, पुणे

 

अनेक महाविद्यालयीन विद्यार्थीनी देखील (मेडीकल आणि इतरही) यामध्ये मोठ्या प्रमाणावर सामील झाल्या होत्या. आत्ताच्या या कठीण परिस्थितीत आपणही या देशाचे काही लागतो, या भावनेने सामील झालेल्या या तरुणींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशाच दोन तरुणींची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया -

जैविक महामारी कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल आपणा सर्वांनाच काही वेगळे सांगायला नको. टीव्ही, रेडीओ, मोबाईल सगळीकडे नुसते कोरोना संक्रमितांचे आकडे वाढतानाच दिसत होते. सर्व लोकांमध्ये पसरलेली भीती, चिंतेचे वातावरण आणि अफवा ह्यांचा कहर माजला होता. आपण सर्वजण घरात सुरक्षित राहून कोरोना नावाचे संकट टाळू बघतच होतो पण मनात विचार आला की, आपण ह्यात काही थोडंफार योगदान देऊ शकतो का? तेवढ्यात कानावर आलं "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका" यांनी हाती घेतलेल्या "COVID-19 screening" उपक्रमाबद्दल ऐकून मनातील आशेचा किरण जागा झाला आणि त प्रत्यक्ष सहभागी होण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. आई आणि बाबांशी या संदर्भात बोलले, मला या अवघड परिस्थितीमध्ये काम करायचे आहे. समाजाप्रती माझे काही कर्तव्य आहे, माझी काळजी करू नका. मी नक्की काळजीपूर्वक काम करेन, हे काम करण्यासाठी मला परवानगी द्या.

“कोरोना संदर्भात ऐकू येणाऱ्या बातम्या चिंताजनक अशा आहेत. तुला स्वतः खूप सावध राहून काम करावे लागेल”, आई म्हणाली. ठीक आहे नीट काळजी घे. परंतु बाबा अजून स्पष्टपणे हो म्हणत नव्हते, त्यांना माझी खूप काळजी वाटत होती, ते गप्प होते. थोड्यावेळाने ते मला म्हणाले रेणुका, मला माहीत आहे की तुला लोकांची सेवा करण्याची मनापासून आवड आहे आणि तू खूप मनस्वी आहेस, हे सर्व ठीक आहे. पण ह्या वेळची परिस्थिती ही भूकंप, पूर, दुष्काळ ह्यासारखी नसून खूप वेगळी आहे, त्यामुळे थोडी जास्त काळजी वाटते. त्यानंतर जरा थांबून बाबा आत्मविश्वासाने म्हणाले, “जा तू, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी.” या वाक्याने माझा विश्वास दुणावला आणि मी तयारीला लागले गरवारेमध्ये जाण्याच्या.

"सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे ।"

समर्थांच्या ह्या उक्तीचे स्मरण करून, घरातील देवाला नमस्कार करून, इच्छित लोकसेवा कार्याबद्दलचे देवाला निवेदन करून, आई - बाबांचे आशीर्वाद घेऊन मी या उपक्रमात सहभागी झाले. 

तपासणीच्या सुरुवातीला काही लोक हे अफवांना बळी पडून, कुटुंबाबद्दल माहिती देण्यास घाबरत होते, परंतु जसा जसा आमच्याबद्दल त्यांना विश्वास वाटू लागला तशी त्यांच्या मनातील भीती आणि कोरोनाला परतवून लावण्याची तयारी दिसू लागली. नुकत्याच बाळंतीण झालेल्या महिलाही आपल्या छोटयाशा लहानग्या बाळालाही तपासा, असे आग्रहपूर्वक सांगत होत्या. या महिलांना आपल्या बाळाबद्दलसुद्धा खूप काळजी वाटत होती, कोरोनाची धास्ती तर होतीच पण आता सर्वचजण जागरूक झाले आहेत असे आश्वासक चित्र दिसत होते. 

रा.स्व. संघाचे कार्यकर्ते आपदा क्षेत्रांत जीवाची पर्वा न करता कार्यरत असतात, पण ह्या वेळेची परिस्थिती बघून जीवाला जास्त धोका असला तरी स्वयंसेवक मैदानात उतरले आणि पुढेही उतरतील. हे काम करून देखील स्वयंसेवकांच्या मनात ना गर्वाची ना अहंकाराची भावना. उलट केलेल्या थोड्या कामाचे समाधान आहे. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यांच्या इतके नाही पण जे काही थोडेफार काम करायला मिळाले यावरून त्यांची हिंमत, जिद्द आणि आत्मीयतेची जाणीव झाली. 

कोरोना योद्धा ,रेणुका प्रमोद पोटभरे, M Phil Zoology, पुणे विद्यापीठ

 

 आमचा राष्ट्रवंदना नावाचा एक ग्रुप आहे, त्यातील काही सिनियर्समुळे या कार्यक्रमासंदर्भात मला माहिती मिळाली. सुरुवातीला कामाचं स्वरूप कसं असेल, राहायची, खाण्यापिण्याची सोय कशी असेल ह्या संदर्भात घरच्यांना प्रश्न होते. मी आधी फक्त एक दिवस तिथे जाऊन पाहायचं ठरवलं होतं आणि अर्थातच तिथे आल्यावर तिथला उत्साह पाहिल्यावर अजून थांबून काम करावसं वाटलं.

तिथले वातावरण, मूलभूत सोयी सर्व काही उत्तम होते. घरच्यांना काळजी होतीच परंतु आपली मुलगी काहीतरी चांगलं करते आहे, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला. एका दिवसाचे सामान मी घेऊन आले होते. त्यामुळे अजून थांबायचा निर्णय घेतल्यावर दुसऱ्या दिवशी आई पुढील दिवसांसाठी लागणारे आवश्यक ते सामान माझ्यासाठी घेऊन आली. भेटली तेव्हा तिच्या डोळ्यात "मला ही यायला आवडलं असतं गं, काळजी घे. योग्य कामात सहभागी होत आहेस" अशा सर्व भावना दिसत होत्या. मला स्वतःला तिथले वातावरण, तो उत्साह, संघाने केलेली व्यवस्था, शिस्त ह्या सर्व गोष्टी खूप भावल्या. रोज संध्याकाळी घेतले जाणाऱ्या मिटींग्स केवढे काही शिकवायचे. गाण्याचे कार्यक्रम, आमच्यासोबतच असलेल्या काही मोठ्या व्यक्तींची मुलाखत, सामूहिक खेळ, व्याख्याने या गोष्टींनी एक वेगळाच उत्साह यायचा. जेवणाची सोय तर उत्तमच होती ! मला स्वतःला घरच्या जेवणाची आठवणच आली नाही. विशेष गोष्ट अशी जाणवली की तिथे प्रत्येकाच्या मताला ऐकून घेतले जायचे. सामुहिक कामांमध्ये सर्वांना सहभागी करून घेतले जायचे. जेणेकरून त्यात सक्रीय व्हायचे आणि अधिक मजा यायची.

पूर्वा समीर जोशी, सुमतीभाई शहा आयुर्वेद महाविद्यालय, चतुर्थ वर्ष, पुणे.

 

या अगदी प्रातिनिधिक स्वरूपातल्या प्रतिक्रिया आहेत. प्रत्यक्ष सामील न होता, या मोहिमेला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या महिलाशक्तीचेही प्रमाण खूप मोठे आहे. आपल्या पतीला, मुलाला देशसेवेच्या या मोहिमेत सहभागी व्हायला उद्युक्त करणाऱ्या सर्व माताभगिनींना मनापासून प्रणाम आणि देशावरच्या, जगावरच्या या "न भूतो न भविष्यती" अशा या संकटात, आपल्या विजिगिषु वृत्तीने सामील झालेल्या या आणि अशा असंख्य आधुनिक रणरागिणींना मानाचा मुजरा.

 

हृषीकेश कापरे

No comment

Leave a Response