Primary tabs

सेवा है यज्ञकुंड (भाग २)

share on:

जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच सर्वात जास्त संक्रमण असलेल्या रेड झोनमधील सेवा वस्त्यांमध्ये जाऊन, प्रत्यक्ष तपासणीचे काम करण्यात आले. जवळपास तीन आठवडे चाललेल्या या मोहिमेमध्ये, पुण्यातील १६८ वस्त्यांमधील एक लाखाच्या वर लोकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. जवळपास एक हजार कार्यकर्त्यांनी (संघ स्वयंसेवक, स्थानिक कार्यकर्ते, डाॅक्टर असे सगळे मिळून) यामध्ये "करोना योद्धा" म्हणून कामगिरी बजावली.

या सगळ्या योद्ध्यांचे अनुभव वेगवेगळ्या समाज माध्यमांवर आपण वाचले, ऐकले. हे सगळे कार्यकर्ते हे या मोहिमेचा चेहरा होते, पण या सगळ्यांच्या पाठीशी संघव्यवस्थापनाचे एक खूप मोठे जाळेही तेवढेच महत्त्वाचे काम करत होते. म्हणजे म्हणतात ना की, हिमनगाचे फक्त एक छोटे टोक आपल्या डोळ्यांना दिसत असते आणि बाकीचा मोठा भाग हा पाण्याखालीच असतो. अगदी तशाच पद्धतीने, या मोहिमेमध्ये अनेक अदृश्य हात, चेहरे या करोना योद्ध्यांच्या बरोबरच काम करत होते. या मोहिमेच्या पडद्यासमोर न आलेल्या गोष्टींचा घेतलेला हा मागोवा.

अगदी सुरुवातीच्या काळात, जेव्हा भारतामध्ये करोनाचा अजिबातच शिरकाव झाला नव्हता, तेव्हा फक्त बाहेरच्या देशातून आलेल्या प्रवाशांची सखोल तपासणी करणे अत्यंत गरजेचे होते. आणि त्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणाही पुरेशी होती. दुर्दैवाने दिल्लीतील मरकज प्रकरणानंतर, देशभरात करोना संक्रमणाने हातपाय पसरायला सुरुवात केली आणि अगदी छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये जाऊन तो पोहोचला. एवढ्या सगळ्या ठिकाणी पोहोचणे प्रशासनाला खरच शक्य नव्हते.

देशावरच्या कुठल्याही आपत्तीच्या वेळी सर्वप्रथम धावून जाणारा हा संघस्वयंसेवकच असतो. या आत्मविश्वासातूनच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समितीने पुणे महानगरपालिकेसमोर एक प्रस्ताव ठेवला. यानुसार, रेड झोनमधील वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तिथल्या प्रत्येक माणसाची प्राथमिक तपासणी करायची आणि काही लक्षणे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला द्यायची अशी मूळ कल्पना मांडण्यात आली. यामध्ये मनुष्यबळ हे संघ पुरवणार आणि सगळ्या रेड झोनमधील हाॅट स्पाॅट्सची माहिती ही महानगरपालिका देणार असे ठरवण्यात आले.

संघ परिवारातील सगळ्याच संस्था यामध्ये सामील झाल्या होत्या. भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि इतरही अनेक संस्थांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आणि रा. स्व. संघ- जनकल्याण समितीने या सगळ्यांच्या मदतीने पुणे महानगरपालिकेसमोर एक योजना सादर केली. अशा आपत्तीचा अनुभव कुणालाही नसल्याने, वेळोवेळी त्यामध्ये आवश्यक ते बदल होत गेले. फक्त संघस्वयंसेवकच नाही तर समाजातील वेगवेगळ्या वर्गातील, स्तरातील कार्यकर्ते यात सहभागी झाल्यामुळे त्यानुसारही या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या.

काही दिवसांपूर्वीच प. पू. मोहनजींनी उद्गारलेल्या "अगर जरूरत पडी और सरकारने अनुमती दी तो संघ के स्वयंसेवक तीन दिन में तयार हो सकते है । ये हमारी क्षमता है I" या वाक्याला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी एवढ्या लवकर मिळेल, असे कुणालाही वाटले नसेल. त्यामुळेच प्रत्यक्ष स्वयंसेवकांसमोर जेव्हा ही योजना मांडली गेली तेव्हा प्रत्येकजण क्षणभर विचारातच पडला. पण दुसऱ्याच क्षणाला त्यातील योद्धा जागृत झाला आणि "करोना योद्धा" हे नाव उदयास आले. तरीही स्वयंसेवकांच्या आणि त्यांच्या घरच्यांची यासाठी मानसिकता निर्माण होणे ही तशी अवघडच गोष्ट होती. पण संघावरचा विश्वास आणि समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना यामुळे या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सर्व विचारांती गरवारे काॅलेज आणि त्याची वसतीगृहे ही या मोहिमेची मुख्य छावणी ठरवण्यात आली. भारतीय जैन संघटनेने फोर्स मोटर्सच्या सहकार्याने, यासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकांची उपलब्धता करुन दिली. जनकल्याण समितीने आपल्या परिवारातील अन्य संस्थांच्या मदतीने बाकी सगळ्या व्यवस्था पार पाडायचे शिवधनुष्य उचलले. मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आणि स्वयंसेवकांचा प्रतिसाद मिळायला लागला. डाॅक्टर लोकांची जास्त आवश्यकता असल्याने, संघ वर्तुळात नसलेल्याही अनेक डाॅक्टरांना संपर्क करण्यात आला आणि त्यांनीही या मोहिमेमध्ये जमेल तितका सहभाग नोंदवला. बऱ्याच डाॅक्टरांनी सहभागाबरोबरच यामध्ये विविध प्रकारची मदतही दिली आहे. विविध बचत गटांनी उत्कृष्ट गुणवत्तेच्या मुखपट्ट्या बनवून दिल्या, ज्या सेवावस्त्यांमध्ये विनामूल्य वाटण्यात आल्या.

पूर्ण विचारांती राहण्याची व्यवस्था गरवारे वसतीगृहात करण्यात आली होती. तीन दिवस प्रत्यक्ष तपासणी, नंतर तीन दिवस सक्तीचे विलगीकरण, सातव्या दिवशी व्यक्तीची स्वॅब चाचणी आणि आठव्या दिवशी चाचणीचा निकाल आल्यानंतर घरी जायला परवानगी, अशी साधारण ही योजना होती. प्रत्यक्ष तपासणी करणारे आणि विलगीकरणात असलेले, यांची सरमिसळ होऊ नये म्हणून वसतीगृहाच्या दोन वेगवेगळ्या इमारती यासाठी वापरल्या होत्या. म्हणजे एक फक्त तपासणीसाठी जाणाऱ्यांची इमारत आणि चौथ्या दिवसापासून विलगीकरणात जाणाऱ्यांची एक इमारत. महिला वसतीगृहाची इमारत मोठी असल्याने, त्यातीलच एक बाजू तपासणीसाठी जाणाऱ्यांची आणि एक विलगीकरणात राहणाऱ्यांची अशी व्यवस्था केली होती.

आठ दिवसांचा मुक्काम असल्याने, प्रत्येकाच्या चहा, नाश्ता, जेवणाची चांगली सोय करणे हे क्रमप्राप्तच होते. टाळेबंदीच्या काळात, अशी सोय करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखेच होते. स्वयंपाक बनवणाऱ्या निवासी कामगारांपासून ते रोजच्या ताज्या भाज्या, फळे, दूध आणि आवश्यक ते किराणा सामान वेळच्या वेळी पोहोचवण्याचे काम संघाच्या व्यवस्था विभागाने अगदी चोख बजावले. स्वयंपाक बनवणाऱ्या प्रत्येक माणसाची सुरुवातीला स्वॅब टेस्ट करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आल्यावरच त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची परवानगी देण्यात आली. दिवसाला पन्नास लोकांचा अंदाज केलेला असताना, दुसऱ्या आठवड्यापासून सहभागी स्वयंसेवकांची संख्या ही साधारण १०० होती. यावरुनच ही किती मोठी व्यवस्था होती हे तुमच्या लक्षात येईल. असे असतानाही, पूर्ण मोहिमेदरम्यान यातील कुठल्याही गोष्टीत कणभरही त्रुटी राहिली नाही.

सहभागी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रोजचा नाश्त्यापासूनचा मेनू ठरवला जायचा. उन्हाळ्याच्या दिवसांमुळे शरीरातील पाणी कमी होते हे लक्षात घेऊन, नाश्त्यामध्येच एका फळाचा समावेश करण्यात आला होता. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचा मेनूही, सर्वांची प्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा विचार करुनच ठरवण्यात येत होता. दोन्ही जेवणांच्या वेळी सूतशेखर वटी आणि रात्रीच्या जेवणानंतर आयुर्वेदिक काढा यामुळे सहभागी कुणालाच या दरम्यान विशेष असा त्रास जाणवला नाही. रात्रीच्या वेळी असलेल्या आमरस, शीरा, गुलाबजाम यामुळे तर स्वयंसेवकांना घरच्या वातावरणाचाच अनुभव येत होता. तपासणी करणारे आणि विलगीकरणात राहणारे यांच्या नाश्ता आणि जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवून, तिथेही दोघांमधला संपर्क टाळण्यात आला होता.

प्रत्यक्ष कामाचे नियोजनही अगदी विचारपूर्वक केलेले होते. तपासणीसाठी जाण्यासाठी सकाळ आणि दुपार अशी दोन सत्रं ठरवण्यात आली होती. सकाळी आठे ते बारा आणि दुपारी दोन ते सहा अशी साधारण विभागणी होती. उपलब्ध स्वयंसेवकांचे गट करुन त्यांनी कुठल्या वस्तीत जायचे, याचे नियोजन आधीच केलेले असायचे. त्यांच्याबरोबर असलेले डाॅक्टर आणि स्थानिक कार्यकर्ते याचीही जोडणी आधीच केलेली असायची. त्या प्रत्येक गटाबरोबर लागणारे सर्व वैद्यकीय साहित्य (पीपीई कीट, हातमोजे, तापमापक यंत्र, वाटायच्या गोळ्या, मुखपट्टी इत्यादी) आणि इतरही आवश्यक गोष्टी यांची सिद्धता आधीच केलेली असायची. प्रत्येक गटाबरोबर न चुकता सरबताच्या दोन बाटल्या दिल्या जायच्या. पीपीई कीट घालून केलेल्या तपासणीनंतर कमी झालेले शरीरातील क्षार या सरबताने आपोआप मूळपदावर यायचे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये देखील खूप अदृश्य हातांचा सहभाग होता. संघाच्या वार्षिक शिबिरांमध्ये अवलंबत असलेल्या वेगवेगळ्या पद्धतींचा यामध्ये समावेश होता आणि म्हणूनच हेही काम अतिशय चोखपणे होत होते.

तपासणीचे काम अर्धा दिवस आणि तेही तीनच दिवस असल्याने, रोज मिळणारा अर्धा दिवस आणि विलगीकरणाचे पाच दिवस यांचे नियोजन करणे फार गरजेचे होते. घरापासून दूर आणि तेही अशा वातावरणात राहत असल्याने, सहभागी स्वयंसेवकांना शारीरिक बरोबरच मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवणेही गरजेचे होते. म्हणून मग त्या दृष्टीने स्वयंसेवकांच्या दिनचर्येची आखणी करण्यात आली होती. महिलांचा सहभागही यामध्ये लक्षणीय होता. महाविद्यालयीन तरुणी, व्यावसायिक महिला, अनेक डाॅक्टर अशा सर्व प्रकारच्या महिला यामध्ये होत्या. घरापासून लांब असल्यामुळे त्यांच्या मनस्थितीचा विचारही ही दिनचर्या बनवताना केला गेला होता.

दिवसाची सुरुवात सकाळी सहालाच होत असे. प्रातर्विधी आवरुन साडेसहा वाजता सुरक्षित अंतर ठेवून अर्ध्याच तासाची शाखा लागत असे. शाखेमध्येही फक्त व्यायामयोग, योगासने आणि प्राणायाम याचाच अंतर्भाव केलेला होता. महिलांचाही एक गण यामध्ये सहभागी होत असे. त्यानंतर सकाळच्या सत्रात तपासणीला जाणारे आवरुन, नाश्ता करुन घेत. त्यांचा नाश्ता झाला की मग विलगीकरणवाले नाश्त्याला जात. जेवणाच्या वेळी याउलट होत असे. विलगीकरणात असलेले स्वयंसेवकच दुपारच्या सत्राला लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करुन ठेवत असत.

दुपारी तपासणीसाठी गेलेले स्वयंसेवक वगळता, सर्वांनी सक्तीने विश्रांती घेणे बंधनकारक होते. संध्याकाळी पाच वाजता चहा झाल्यावर सामाजिक अंतर राखत एकमेकांशी ओळखी आणि गप्पाटप्पा व्हायच्या. रात्री सात ते आठ रोज एक सत्र व्हायचे. त्यामध्ये अनुभवकथन, प्रश्नमंजुषा, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, सहभागी प्रतिष्ठित कलावंत, खेळाडू यांच्या मुलाखती, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर आधारित चर्चासत्र असे अनेक प्रकारचे कार्यक्रम व्हायचे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना, आपल्यासारखेच स्वयंसेवक म्हणून राहताना पाहणे हा नवीन लोकांसाठी एकदम सुखद धक्काच होता. रात्रीचे जेवणही दोन टप्प्यांत झाल्यावर काढा पिता पिता परत एकदा सगळ्यांशी चर्चा रंगायच्या. त्यानंतर बऱ्याचदा, वसतीगृहाच्या वेगवेगळ्या इमारतींमधील स्वयंसेवकांमध्ये संघाच्या पद्याच्या स्पर्धाही (सामाजिक अंतर राखूनच) रंगल्या. भरगच्च अशा दिनचर्येमुळे कुणाही स्वयंसेवकाला मानसिक ताणदेखील जाणवला नाही.

या सगळ्या बरोबरच विलगीकरणाच्या चौथ्या दिवशी घेतल्या गेलेल्या चाचणीचे नियोजनही फार चांगल्या पद्धतीने केले गेले होते. तीन दिवस विलगीकरण पूर्ण होत असलेल्यांची नाव, फोन नंबर, ईमेल सहीत यादी करुन ती सह्याद्री किंवा संजीवनी दवाखान्यात पाठवली जायची. दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता अशा सगळ्या स्वयंसेवकांची चाचणीसाठी जाण्याची आणि परत येण्याची तयारी केली जायची. चोवीस ते सहव्वीस तासानंतर त्याचा निकाल यायचा. एकत्र आलेल्या त्या निकालाला वेगवेगळे करुन, प्रत्येक स्वयंसेवकाला एक "करोना योद्धा" असा गौरवपर उल्लेख केलेला ईमेल आणि त्याला जोडलेला चाचणीचा निकाल पाठवला जायचा. तो ईमेल आल्यावरच कुणालाही, गरवारेतून बाहेर पडायची परवानगी होती. ही सगळी प्रक्रिया डोळ्यात तेल घालून राबवणाऱ्यांच्या मानसिक स्थितीची आपण कल्पनाही करु शकत नाही.

आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या स्वयंसेकांची जीवापाड काळजी घेणे याला या मोहिमेदरम्यान अत्युच्च महत्त्व होते. त्यामुळेच सुरक्षिततेच्या कुठल्याही लहानसहान गोष्टींकडेही अगदी बारीक नजर ठेवण्यात आली होती. गरवारेमध्ये वावरताना तोंडाला मुखपट्टी लावणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे बंधनकारकच होते. तपासणी करुन आल्यावर गरम पाण्याने आंघोळ झालीच पाहिजे याकडेही अगदी कटाक्षाने लक्ष ठेवण्यात आले. तिथे निवासी असलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाची संध्याकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात यायची. थोडाफार जरी त्रास कुणाला जाणवत असेल तर त्याला दुसऱ्या दिवशी तपासणीच्या कामाला पाठवले जायचे नाही. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याची काळजी घेतली जायची.

स्वच्छतेच्या दृष्टीने, संपूर्ण परिसराचे, खोल्यांचे, शौचालयांचे, रुग्णवाहिकांचे रोजच्या रोज निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. प्रत्यक्ष तपासणीसाठी न जाणाऱ्या पण व्यवस्थेमध्ये असलेल्या प्रत्येकाच्या आरोग्याकडेही अगदी बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. गरवारेमधील सेवक सेविकांची स्वॅब टेस्टही या मोहिमेदरम्यान घेण्यात आली होती. या सगळ्या घेतल्या गेलेल्या सावधगिरीच्या उपायांमुळेच, सहभागी कुणालाही करोनाची लागण झाली नाही. संघाच्या अतिसूक्ष्म स्तरावर घेतल्या गेलेल्या काळजीचेच हे यश म्हणावे लागेल.

एवढ्या भयानक परिस्थितीतही आपण समाजासाठी भरीव असे काहीतरी करु शकतो, याचा वस्तुपाठच या मोहिमेच्या निमित्ताने परत एकदा संघाने जगासमोर घालून दिला आहे. व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही मोहीम म्हणजे एक अचंबित करणारी घटनाच आहे. कमीत कमी मनुष्यबळामध्ये, एवढी मोठी मोहीम कशी राबवायची याचे एक आदर्श उदाहरण आहे. "सारे भारतीय माझे बांधव आहेत" या प्रतिज्ञेतल्या ओळीचा खरा अर्थ समजून घेऊन, समोरच्याच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तन, मन, धन अर्पून काम करायची संधी यानिमित्ताने सहभागी प्रत्येकाला मिळाली.

त्याचबरोबर, रेड झोनमधील लोकांनाही, या कठीण काळातही आपण एकटे नाही, आपल्याला बघायला आपल्या दारात कुणीतरी आले याचे खूप मोठे मानसिक समाधान या मोहिमेमुळे मिळाले. अशा प्रकारच्या संकटातही, योग्य ती काळजी घेऊन समाजात वावरता येते हा आत्मविश्वास या मोहिमेने सर्वांनाच दिला. या मोहिमेचे सर्वात मोठे यश हे हेच म्हणावे लागेल.

हृषीकेश कापरे

No comment

Leave a Response