Primary tabs

नाॅस्टॅल्जिया-३

share on:

केवळ आठ भागात संपलेली ही छोटीशी प्रेम कथा- कशिश. कशिश म्हणजे ओढ...आकर्षण!!!  कुणाची, कुठे, कधी, कुणाशी, गाठभेट होईल हे माणूस नाही तर नियतीच ठरवत असते. त्या भेटीतून पुढं चांगलं वाईट जे काही निष्पन्न होणार असतं ते केवळ आणि केवळ नियतीच्या इशाऱ्यावर ठरलेलं असतं. ते चांगलं किंवा वाईट घडवण्यासाठीच नियती लोकांना भेटवते.

अशीच ही भेट घडवते आणि कथा सुरू होते.

       मोहना कुमार (मालविका तिवारी) ही आपल्या मैत्रिणीसह तिच्याच फ्लॅटमध्ये राहत असते. त्यादिवशी पेपरमध्ये एका सिरीयलसाठी कलाकार हवे आहेत अशी जाहिरात आलेली असते. प्रिया(प्रिता माथूर) मोहनाला तिथं अर्ज करायला सांगते. मोहनाला आॅडिशनसाठी बोलावणं येतं. आॅडिशनला निघालेली मोहना उशीर होतो आहे म्हणून टॅक्सी करते. तोच तिच्या टॅक्सीपाशी एक मध्यमवयीन स्त्री चक्कर आल्यासारखी भेलकांडते. मोहना तिला तिच्या पर्समधील औषध काढून देते. पण त्या ठीक आहेत असं वाटत नाही म्हणून त्यांना घरापर्यंत सोडते, त्या असतात मिसेस आनंद (कल्पना अय्यर). त्यांना घरी सोडून‌ मग ती आॅडिशनला जाते. या सगळ्या घोळात आॅडीशनला पोहोचायला उशीर होतो. ती तिथं पोहोचते तर लिफ्टमध्ये कुणीतरी असतं.. ती जवळपास घुसतेच लिफ्टमध्ये. एक अगदी शिष्ठ चेहऱ्याचा माणूस (सुदेश बेरी) असतो तिथं. मध्येच लिफ्ट बंद पडते. मोहना इतकी बडबड करते की बास... देवा, आधीच मला उशीर झाला आहे.. मला बेकार टेन्शन आलं आहे. माझ्या पोटात कसंतरीच होतं‌ आहे. तेवढ्यात लिफ्ट चालू होते. ती धावतच आॅडिशनच्या आॅफीसमध्ये जाते. एक तास उशिरा आली आहे म्हणून रिसेप्शनिस्ट तिला परत जायला सांगते तोच फोनवरून तिला आॅडीशनसाठी आत बोलावलंय असं सांगितलं जातं. आॅडीशन होते मोहनाची मुख्य भूमिकेसाठी निवड होते. त्या सिरीयलचा दिग्दर्शक तोच शिष्ठ चेहऱ्याचा माणूस राहुल आनंद असतो. मोहनाला ही गोष्ट माहीत नसते.

मिसेस आनंद आठवणीने मोहनाला आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावतात. तिथं राहुल आनंद त्यांचा मुलगा आहे हे मोहनाला समजतं. राहुलला वाटतं की मोहनानं आपल्याला जाळ्यात ओढायला म्हणून आपल्या आईशी ओळख करून घेतली आहे. तो तिला जाताना स्पष्ट सांगतो आपण फक्त व्यावसायिक संबंध ठेवायचे आहेत. मोहनाला फार वाईट वाटतं. त्याच वेळी मिसेस आनंद त्याला सांगतात की कशी त्यादिवशी मोहनाशी गाठ पडली होती म्हणून आपण वाचलो. राहुलला आपल्या बोलण्याचा पश्चाताप होतो पण वेळ निघून गेलेली असते.

सिरीयलचं शुटिंग सुरू असताना मोहना आणि राहुल एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण बोलणार कोण?

सिरीयलचं शुटिंग संपतं आणि राहुल मोहनाचा फार अपमान करतो. ती काहीही सफाई न देता निघून जाते. ती सिरीयल खूप गाजते. मग मोहना राहुलशी असलेले व्यावसायिक संबंधही तोडून टाकते. तो दिग्दर्शक म्हणून आहे म्हटलं की ती काम करायला नकार देत असते. राहुल एका पार्टीत भेटतो नी माफी मागतो पण मोहनाचा राग गेलेला नसतो. ती त्याच्याशी अजिबात नीट बोलत नाही. दुखावलेला राहुल बाहेर पडतो नी त्याचा अपघात होतो.

त्या अपघातात त्याच्या डोळ्यांना इजा होते. मिसेस आनंदना या दरम्यान राहुलनं वारंवार मोहनाचा केलेला अपमान, तिला जास्तीत जास्त हीन लेखणं हे सारं मोहनाची मैत्रीण प्रिया सांगते. मग त्या, डाॅक्टर मर्चंट आणि मोहना असे तिघेजण एक प्लॅन बनवतात.. काय असतो तो प्लॅन? राहुल आपलं मन मोकळं करतो का? हे मी इथं सांगितलं तर मज्जा जाईल. तुम्ही यू ट्यूबवर जाऊन पाहा..

मालविका तिवारी खरोखर सुंदर दिसली आहे. तिच्या अभिनयात सहजपणा आहे. पुढे चमत्कार सिनेमात ती झळकली होती, पण नंतर झाकोळली. सुदेश बेरी घुम्या राहुल आनंदच्या भूमिकेत फार परफेक्ट बसला आहे. कल्पना अय्यर, सनत व्यास, प्रिता माथूर यांची कामंही छान झाली आहेत. फक्त काही गोष्टी कदाचित आता आपण खूप काही बघत असल्यामुळे लक्षात येतात.. जसं की हॉस्पिटल हे घर आहे. तो माहोल उभा करता आला नाही. पण कथानक इतकं सुंद‌र आहे की हे छोटे छोटे लूप होल फार खटकत नाहीत. एकदा खरंच पाहाच ही सिरीयल... कशिश

- मुक्ता कुलकर्णी

No comment

Leave a Response